#भ्रमंती_कोल्हापूरची


मी लहान असताना ज्यावेळी कोल्हापूरला यायची त्यावेळी गंगावेश मध्ये सोमेश्वर नावाचा एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये एक विहीर होती. मुख्य म्हणजे त्यावेळी त्या परिसरात अनेक वाडे होते आणि या प्रत्येक वाड्यामध्ये विहीर असायची. कोल्हापूर तर तळ्यांचे शहरच..!!! त्यामुळे पाण्याचा प्रश्नच नव्हता. जिथे खोदेल त्या ठिकाणी पाणी लागत असेल, आणि विहीर हे स्थळ माझ्यासाठी काही फार नवीन नव्हते... कारण आमच्या तळ कोकणाच्या भागात सर्वत्र विहिरी असायच्या. अलीकडच्या काळात कोकणातील विहीर जरा जास्तच प्रसिद्ध झाली कारण की "रात्रीस खेळ चाले" या मालिकेत एक हटके विहीर दाखवली होती. तसेही आपल्या कोल्हापूर परिसरातील पंचक्रोशी मध्ये अनेक विहिरी आहेत आणि काही ऐतिहासिक विहिरींबद्दल याआधी आपण काही माहिती पण घेतलेली आहे. परंतु उंचावरील डोंगरांवर किंवा गडकिल्ल्यांवर ज्या विहिरी आहेत किंवा होत्या त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घ्यायला हवी असे मला वाटते आणि मग एकदा ठरवलं की थांबायचं नाही.. लगेच लिहायला सुरुवात करायची..!! त्यामुळे म्हणूनच आज विहिरींवर थोडासा लेखन प्रपंच.. तो देखील पुन्हा एकदा एका ऐतिहासिक विहिरीवर. असो .
खरं तर प्राचीन काळापासूनच पाणीपुरवठ्याचे एक साधन म्हणून विहिरींचा वापर व्हायचा. आपण आपल्या पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात (पूर्वीच्या) मोहेंजोदारो व हडप्पा संस्कृती यांच्या काळातील विहिरीची चित्रे पाहिलेली आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच पाणीपुरवठ्याचे साधन म्हणून प्रचलित असलेल्या या विहिरी अर्थात गडकिल्ल्यांवरही होत्याच.. कारण तेथे राहणाऱ्या सैनिकांसाठी पाण्याची व्यवस्था तर केलीच पाहिजे होती. आपल्याकडील म्हणजे कोल्हापूरकडील भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा पेक्षा जास्त किल्ले आहेत आणि त्यापैकी आपल्या शहरापासून जवळ असलेल्या म्हणजे साधारण कोल्हापूर पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा या दुर्गावर देखील आपल्याला एक अतिशय आगळीवेगळी अशी विहीर पाहायला मिळते. तिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.
तर मंडळी, पन्हाळा या किल्ल्यावर तर आपण नेहमीच जातो आणि ती वास्तू आपण पाहिलेलीच आहे. पण काय होतं.. आपण पाहतो पण त्याबद्दल फारशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. इतिहासाचे अभ्यासक, पुरातत्व अभ्यासक याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांनी जी माहिती मिळवलेली असते ती आपण इतरांना द्यायची असते, नाही का..!! असो. तर अंधारबाव ही जी विहीर आहे ती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. ही विहीर इतर विहिरींच्या तुलनेत खूपच वेगळी आहे. विहिरीचा जो मुख्य उद्देश असतो की पाणी मिळवणे, तो उद्देश या ठिकाणी सफल झालेला आहे म्हणजेच या विहिरीतून नेहमीप्रमाणे पाण्याची प्राप्ती तर होतेच पण तिचा वापर निवासासाठी करून घेण्याची कल्पकता या ठिकाणी दाखवली गेली आहे. अंधार बाव या वास्तूचा मधला भाग हा चोरवाट किंवा भुयारी मार्ग म्हणून वापरण्याची केलेली या विहिरीतील व्यवस्था हे देखील अभूतपूर्व अशीच आहे. अशी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रातील अन्य कोणत्याच दुर्गातील विहिरीत असलेली आपल्याला आढळत नाही. अर्थातच जर असे कुठे काही असेल तर मात्र जाणकारांनी या ठिकाणी त्या गोष्टीवर प्रकाश टाकावा.
अंधार बाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळगडावरील या विहिरीचा उल्लेख श्रीनगर किंवा शृंगारबाव असा केलेला देखील आढळतो. तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेली ही विहीर तीन मजली आहे. तिच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे. ही बाव म्हणजे नुसतीच विहीर नसून खरे तर हा तीन मजली महालच आहे. सुंदर, स्वच्छ असा पाण्याचा झरा, राहण्याची भक्कम जागा आणि किल्ल्यातून बाहेर पडण्याचा चोर मार्ग अशा तीनही गोष्टींचा या अंधार बाव नावाच्या वास्तूत एकत्र मिलाफ करण्यात आलेला आहे. त्यामुळेच ही विहीर सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशीच ठरते. अंधार बाव इसवी सन १४८९ साली विजापूरचा तत्कालीन सुलतान आदिलशाह याच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली आणि अबू युसुफ या कामगाराच्या नेतृत्वाखाली तिचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असा पर्शियन भाषेतील शिलालेख या अंधार बाव मधील भिंतीवर कोरलेला आहे. या विहिरीचे बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये केलेले असून अत्यंत मजबूत आहे. या बांधकामात चुनखडी व गुळ यांचा वापर झालेला आहे. वरच्या मजल्यावर म्हणजे अगदी सुरुवातीच्या मजल्यावर अनेक खोल्या दिसतात. सध्या त्यातील काही खोल्या बंद आहेत. या सर्व खोल्या पहारेकऱ्यांच्या राहण्यासाठी असाव्यात किंवा होत्या. त्या पाहून ज्यावेळी आपण दुसऱ्या मजल्यावर येतो त्यावेळी आपल्याला तेथे एकच खोली दिसते आणि एका बाजूला चोरवाट दिसते. या चोरवाटेने दुर्गाच्या बाहेर पडण्याची संधी मिळत होती. आता ती चोरवाट बंद केलेली आहे. जेव्हा आपण आणखी पायऱ्या उतरून तिसऱ्या मजल्यावर जातो म्हणजे शेवटचा मजल्यावर तेव्हा आपल्याला खोल अशी विहीर दिसते. या विहिरीमध्ये आताही पाणी आहे. विहिरीमध्ये जिवंत झरे असल्यामुळे अद्यापही तेथे आपल्याला पाणी आढळते. आम्ही ज्यावेळी शाळेत असताना पन्हाळ्यावरती सहलीला गेलो होतो त्यावेळी आम्हाला असे सांगण्यात आले होते की या पाण्यात जर लिंबू टाकला तर तो रंकाळ्याकडे बाहेर पडतो. आता ते किती खरं किती खोटं हे माहित नाही. असो.
या ठिकाणी खरोखरच खूप अंधार आहे म्हणून ही अंधारबाव..!! हिला अंधार बावडी असेही म्हणतात. बावडी म्हणजे विहीर. पण आपल्याला शेवटच्या म्हणजेच तळमजल्यावर जाईपर्यंत येथे विहीर आहे याची कल्पना येत नाही. हेच तर पूर्वीच्या काळातील वास्तूंचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
किल्ले पन्हाळा येथील एक महत्त्वाचे ठिकाण अंधार बावडी हे आहे. त्या काळी छोट्या तलाव किंवा विहिरीला बावडी असे म्हणत असत. तुम्ही येथील बांधकाम बघून निश्चितच आश्चर्यचकित होता. इथे चोर दरवाजा आहे जो एके ठिकाणी जाऊन बाहेर पडतो. तसेच येथे विष प्रयोग वगैरे काही होऊ नये यासाठी त्याकाळी विहिरी सुद्धा अगदी व्यवस्थित बांधल्या जात होत्या. जेणेकरून इथल्या सैनिकांना त्यातले पाणी पिता यावे व कुठल्याही प्रकारची हानी त्या पाण्याने होऊ नये यासाठी विशिष्ट पद्धतीने या विहिरी बांधल्या गेल्या होत्या.
पन्हाळगडावरील अतिशय सुस्थितीत असलेल्या वस्तूंपैकी अंधार बाव ही एक सुस्थितीतील वास्तू आहे.
खरे तर पूर्वी प्रत्येक गडावर किंवा दुर्गावर एकापेक्षा जास्त विहिरी होत्या. पन्हाळा या गडावर देखील ही फक्त एकच विहीर नव्हती, तर कर्पूर बाव नावाची अजून एक विहीर त्यावेळी होती. या विहिरीचा उल्लेख जयराम पिंडे यांनी आपल्या "पर्णाल पर्वताग्रहण आख्यान" नावाच्या ग्रंथात केलेला आढळतो. आपले सर्वांचे आवडते छत्रपती शिवाजी महाराज हे देखील त्यावेळी काही काळ या विहिरीजवळ थांबले होते आणि त्यांनी या पाण्याला स्पर्श केला होता असा उल्लेख देखील त्याच ग्रंथात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित या विहिरीचे पाणी प्राशन केलेले असावे असे वाटते.
तर मंडळी, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अलीकडच्या काळात ज्यावेळी मी पन्हाळगडावर गेले होते त्यावेळी या अंधार बाव च्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा म्हणजेच पाण्याच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पाहिला होता. आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळी जातो तो असा कचरा करण्यासाठी जातो का? मुळातच पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन झाल्यानंतर इकडे तिकडे इतस्ततः का टाकाव्यात हा मुख्य मुद्दा आहे. तरी भटकंती करणाऱ्या पर्यटकांनी तसेच हौशी पर्यटकांनी अशा प्रकारची कोणतीही कृत्ये करू नयेत ज्यामुळे प्रदूषण वाढेल.
सर्व फोटो सौजन्य #गुगल (चूकभूल देणेघेणे)


३०.११.२०२४