पारंपरिक भारतीय शस्त्रसंज्ञा
भारतावर कित्येक शतके झालेल्या परकीय आक्रमणांनी स्थानिक भारतीय भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती अशा अनेक पैलूंवर परिणाम झाले. ही सर्व आक्रमणे युद्धांमधून पसरत गेल्याने युद्ध आणि संबंधित व्यवस्था या मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. यांचा सर्वात मोठा परिणाम झाला तो म्हणजे युद्धातील शस्त्रांची नावे आणि संज्ञांवर! सततच्या परकीय आक्रमणांनी मध्ययुगीन भारतात प्रचलित असलेल्या पारंपरिक शस्त्र संज्ञांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. शस्त्रांची, शस्त्रांशी संबंधित अन्य पारंपरिक संज्ञांची जागा ही परकीय नावांनी काबीज केली.
शस्त्रांच्या नावांच्या, संज्ञांच्या या ‘replacement’ ने नेमके काय घडले? पहिले म्हणजे ‘Loss of meaning’. परकीय शस्त्रसंज्ञांनी पारंपरिक शस्त्रसंज्ञांची जागा घेण्याआधी अनेक भारतीय संज्ञा या संस्कृत, प्राकृतप्रचुर होत्या. या प्रत्येक नावाला, संज्ञेला भाषेनुरूप विशिष्ट अर्थ होता. उदा. ‘खंजीर’ ला ‘असिधेनुका’ म्हणजे लहान तलवार म्हटले गेले होते, ‘ढाल’ ला ‘चर्म’, म्हणजे चामड्यापासून तयार केलेले आवरण म्हटले गेले होते. अशा कितीतरी नावांमधून शस्त्राचे नेमके स्वरूप, रचना, कार्यपद्धती हे नेमकेपणाने प्रतिबिंबित होत होते. अशा नावांना परकीय संज्ञांनी बदलल्याने शस्त्राचा ‘context’ हा जनमानसापासून तुटत गेला. दुसरे म्हणजे शस्त्रसंज्ञांचे ‘सपाटीकरण’. भारतीय शस्त्र जगतात सध्या प्रचलित असलेल्या बहुसंख्य शस्त्रसंज्ञा या परकीय आहेत अथवा स्थानिक पातळीवरून प्रचलित झालेल्या आहेत. या शस्त्रसंज्ञा दोन प्रकारे रूढ झालेल्या आहेत. एक म्हणजे, मौखिक परंपरेने आणि दुसरे म्हणजे, लिखित स्वरूपातील नोंदींच्या स्वरूपात, ज्या तुलनेने फार कमी आहेत. या लिखित नोंदी मुख्यत्वे इंग्रज वसाहतीच्या काळात विविध इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदींच्या स्वरूपात आहेत. ज्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांना जे जे शस्त्रतज्ज्ञ भेटले त्यांनी त्यांच्याकडून नोंदी करून घेतल्या. इंग्रजांनी नेमक्या कोणत्या प्रांतातल्या लोकांकडून नोंदी करून घेतल्या याची माहिती नसल्याने या नोंदी सर्वसमावेशक, ‘comprehensive’ मानता येत नाहीत आणि शस्त्रसंज्ञांचे प्रांतिय दस्तावेजीकरण, म्हणजे विशिष्ट शस्त्राला / शस्त्राच्या भागाला वेगवेगळ्या भाषांमध्ये, प्रदेशांमध्ये काय म्हटले जाते / जात होते? हे आजमितीस आपल्याकडे नसल्याने उपलब्ध नोंदी पूर्णतः बादही ठरवता येत नाहीत.
उदाहरणादाखल पोस्टसोबत ‘तलवार’ शस्त्राच्या विविध भागांची पारंपरिक नावे जोडली आहेत. ही संस्कृत नावे, शस्त्रसंज्ञा या बृहतसंहिता, अमरकोश, हलायुधकोश, अभिधानरत्नमाला, युक्तिकल्पतरू, शिवतत्वरत्नाकर अशा विविध प्राचीन ते मध्ययुगीन भारतीय ग्रंथांमध्ये विखुरलेल्या आढळून येतात. यातील प्रत्येक संज्ञेची स्वतंत्र अर्थपूर्ण व्युत्पत्ती आहे, त्याबद्दल नंतर कधीतरी! शस्त्रसंज्ञांमधील या बदलांमुळे त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक शस्त्र संज्ञांसोबत त्यांमागील भाषिक, सांस्कृतिक, प्रसंगी धार्मिक पार्श्वभूमीही काळाच्या ओघात नाहीशी होत गेली. परिणामी भारतीय शस्त्रांच्या अभ्यासाला आवश्यक ‘theoretical’ पाया तयार होऊ शकला नाही.
अर्थात, ही संस्कृत नावे म्हणजे संपूर्ण भारतीय शस्त्रसंज्ञांचे प्रतिनिधी मुळीच नाहीत! भारतामध्ये आज जेवढे भाषिक वैविध्य आहे तेवढेच, किंबहुना त्याहूनही अधिक वैविध्य मध्ययुगीन कालखंडात होते. एकाच शस्त्राची विविध प्रांतीय नावे, शस्त्र संबंधित संज्ञांचे प्रांतिय वैविध्य आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, ‘माडू’ शस्त्र महाराष्ट्रात ‘माडू’, राजस्थानमध्ये ‘सिनगोटा’ तर दक्षिण भारतात ‘मानकोंबू’ म्हणून ओळखले जाते. शस्त्राचे ‘पाते’ हे कुठे वाल, कुठे कत्ती, कुठे पच्छना, तर कुठे फल म्हणून ओळखले जाते. या शस्त्रसंज्ञांमधून त्या त्या शस्त्राची स्थानिक ओळख निर्माण होत असते. स्थानिक आणि प्रांतीय पातळीवरील हे पारंपरिक शस्त्र संज्ञांचे वैविध्य येत्या काळात लिखित स्वरूपात नोंदवून ठेवणे आवश्यक आहे!
भारतीय शस्त्रांच्या वैशिष्ट्यांचा परिघ हा प्रत्येक प्रांतानुसार रचना, नक्षीकाम, धातू अगदी भाषिक पातळीवरही वेगळा आहे. प्रांत, भाषानिहाय शस्त्र संज्ञांच्या दस्तावेजीकरणातून शस्त्र संज्ञांच्या सपाटीकरण होण्यापासून थांबवता येऊ शकते तसेच त्यांची स्वतंत्र वैशिष्ट्येही अधोरेखित करता येऊ शकतात. या दस्तावेजीकरणाचा उद्देश प्रचलित परकीय शस्त्रसंज्ञा बदलून टाकणे नसून त्याला समांतर प्रांतिय संज्ञांचे दस्तावेजीकरण करून भारताच्या शस्त्र जगताचा एक ‘comprehensive’ भाषिक पट तयार करणे असावा..अन्यथा चालू गोंधळात भर पडण्याची शक्यता अधिक असेल! छत्रपती शिवरायांनी 'राज्यव्यवहारकोश' सारखी राबवलेली योजना मार्गदर्शक ठरावी!
छायाचित्रात - उजव्या बाजूला तलवारीच्या भागांची पारंपरिक संस्कृत नावे व डाव्या बाजूला आज रूढ असलेल्या शस्त्र संज्ञा.
गिरिजा
No comments:
Post a Comment