Followers

Sunday, 14 December 2025

एरंगळ किल्ला

 एरंगळ किल्ला

दाना पाणी बीच
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : मुंबई




या किल्लाचा फक्त एक बुरुज शिल्लक राहिला आहे.
पश्चिम रेल्वेवर असलेल्या एरंगळ समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परीचीत आहे. एरंगळ गाव मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे.
पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील प्रदेशात या परिसराचा समावेश होत होता. हा परिसरराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे.
फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी उभारलेले
आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती.
फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन
होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एका
बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना
पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. एरंगळ गावाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या बुरूजाची निर्मिती केली होती. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात मढ भागातील ईतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर
कोकणात आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले.

Monday, 2 December 2024

#भ्रमंती_कोल्हापूरची #अंधारबाव #किल्ले_पन्हाळा







 #भ्रमंती_कोल्हापूरची

©️®️ राजश्री (पूजा)
मी लहान असताना ज्यावेळी कोल्हापूरला यायची त्यावेळी गंगावेश मध्ये सोमेश्वर नावाचा एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये एक विहीर होती. मुख्य म्हणजे त्यावेळी त्या परिसरात अनेक वाडे होते आणि या प्रत्येक वाड्यामध्ये विहीर असायची. कोल्हापूर तर तळ्यांचे शहरच..!!! त्यामुळे पाण्याचा प्रश्नच नव्हता. जिथे खोदेल त्या ठिकाणी पाणी लागत असेल, आणि विहीर हे स्थळ माझ्यासाठी काही फार नवीन नव्हते... कारण आमच्या तळ कोकणाच्या भागात सर्वत्र विहिरी असायच्या. अलीकडच्या काळात कोकणातील विहीर जरा जास्तच प्रसिद्ध झाली कारण की "रात्रीस खेळ चाले" या मालिकेत एक हटके विहीर दाखवली होती. तसेही आपल्या कोल्हापूर परिसरातील पंचक्रोशी मध्ये अनेक विहिरी आहेत आणि काही ऐतिहासिक विहिरींबद्दल याआधी आपण काही माहिती पण घेतलेली आहे. परंतु उंचावरील डोंगरांवर किंवा गडकिल्ल्यांवर ज्या विहिरी आहेत किंवा होत्या त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घ्यायला हवी असे मला वाटते आणि मग एकदा ठरवलं की थांबायचं नाही.. लगेच लिहायला सुरुवात करायची..!! त्यामुळे म्हणूनच आज विहिरींवर थोडासा लेखन प्रपंच.. तो देखील पुन्हा एकदा एका ऐतिहासिक विहिरीवर. असो .
खरं तर प्राचीन काळापासूनच पाणीपुरवठ्याचे एक साधन म्हणून विहिरींचा वापर व्हायचा. आपण आपल्या पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात (पूर्वीच्या) मोहेंजोदारो व हडप्पा संस्कृती यांच्या काळातील विहिरीची चित्रे पाहिलेली आहेत. त्यामुळे पूर्वीपासूनच पाणीपुरवठ्याचे साधन म्हणून प्रचलित असलेल्या या विहिरी अर्थात गडकिल्ल्यांवरही होत्याच.. कारण तेथे राहणाऱ्या सैनिकांसाठी पाण्याची व्यवस्था तर केलीच पाहिजे होती. आपल्याकडील म्हणजे कोल्हापूरकडील भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा पेक्षा जास्त किल्ले आहेत आणि त्यापैकी आपल्या शहरापासून जवळ असलेल्या म्हणजे साधारण कोल्हापूर पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा या दुर्गावर देखील आपल्याला एक अतिशय आगळीवेगळी अशी विहीर पाहायला मिळते. तिच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.
तर मंडळी, पन्हाळा या किल्ल्यावर तर आपण नेहमीच जातो आणि ती वास्तू आपण पाहिलेलीच आहे. पण काय होतं.. आपण पाहतो पण त्याबद्दल फारशी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. इतिहासाचे अभ्यासक, पुरातत्व अभ्यासक याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांनी जी माहिती मिळवलेली असते ती आपण इतरांना द्यायची असते, नाही का..!! असो. तर अंधारबाव ही जी विहीर आहे ती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. ही विहीर इतर विहिरींच्या तुलनेत खूपच वेगळी आहे. विहिरीचा जो मुख्य उद्देश असतो की पाणी मिळवणे, तो उद्देश या ठिकाणी सफल झालेला आहे म्हणजेच या विहिरीतून नेहमीप्रमाणे पाण्याची प्राप्ती तर होतेच पण तिचा वापर निवासासाठी करून घेण्याची कल्पकता या ठिकाणी दाखवली गेली आहे. अंधार बाव या वास्तूचा मधला भाग हा चोरवाट किंवा भुयारी मार्ग म्हणून वापरण्याची केलेली या विहिरीतील व्यवस्था हे देखील अभूतपूर्व अशीच आहे. अशी व्यवस्था आपल्या महाराष्ट्रातील अन्य कोणत्याच दुर्गातील विहिरीत असलेली आपल्याला आढळत नाही. अर्थातच जर असे कुठे काही असेल तर मात्र जाणकारांनी या ठिकाणी त्या गोष्टीवर प्रकाश टाकावा.
अंधार बाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पन्हाळगडावरील या विहिरीचा उल्लेख श्रीनगर किंवा शृंगारबाव असा केलेला देखील आढळतो. तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेली ही विहीर तीन मजली आहे. तिच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे. ही बाव म्हणजे नुसतीच विहीर नसून खरे तर हा तीन मजली महालच आहे. सुंदर, स्वच्छ असा पाण्याचा झरा, राहण्याची भक्कम जागा आणि किल्ल्यातून बाहेर पडण्याचा चोर मार्ग अशा तीनही गोष्टींचा या अंधार बाव नावाच्या वास्तूत एकत्र मिलाफ करण्यात आलेला आहे. त्यामुळेच ही विहीर सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशीच ठरते. अंधार बाव इसवी सन १४८९ साली विजापूरचा तत्कालीन सुलतान आदिलशाह याच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली आणि अबू युसुफ या कामगाराच्या नेतृत्वाखाली तिचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असा पर्शियन भाषेतील शिलालेख या अंधार बाव मधील भिंतीवर कोरलेला आहे. या विहिरीचे बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये केलेले असून अत्यंत मजबूत आहे. या बांधकामात चुनखडी व गुळ यांचा वापर झालेला आहे. वरच्या मजल्यावर म्हणजे अगदी सुरुवातीच्या मजल्यावर अनेक खोल्या दिसतात. सध्या त्यातील काही खोल्या बंद आहेत. या सर्व खोल्या पहारेकऱ्यांच्या राहण्यासाठी असाव्यात किंवा होत्या. त्या पाहून ज्यावेळी आपण दुसऱ्या मजल्यावर येतो त्यावेळी आपल्याला तेथे एकच खोली दिसते आणि एका बाजूला चोरवाट दिसते. या चोरवाटेने दुर्गाच्या बाहेर पडण्याची संधी मिळत होती. आता ती चोरवाट बंद केलेली आहे. जेव्हा आपण आणखी पायऱ्या उतरून तिसऱ्या मजल्यावर जातो म्हणजे शेवटचा मजल्यावर तेव्हा आपल्याला खोल अशी विहीर दिसते. या विहिरीमध्ये आताही पाणी आहे. विहिरीमध्ये जिवंत झरे असल्यामुळे अद्यापही तेथे आपल्याला पाणी आढळते. आम्ही ज्यावेळी शाळेत असताना पन्हाळ्यावरती सहलीला गेलो होतो त्यावेळी आम्हाला असे सांगण्यात आले होते की या पाण्यात जर लिंबू टाकला तर तो रंकाळ्याकडे बाहेर पडतो. आता ते किती खरं किती खोटं हे माहित नाही. असो.
या ठिकाणी खरोखरच खूप अंधार आहे म्हणून ही अंधारबाव..!! हिला अंधार बावडी असेही म्हणतात. बावडी म्हणजे विहीर. पण आपल्याला शेवटच्या म्हणजेच तळमजल्यावर जाईपर्यंत येथे विहीर आहे याची कल्पना येत नाही. हेच तर पूर्वीच्या काळातील वास्तूंचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
किल्ले पन्हाळा येथील एक महत्त्वाचे ठिकाण अंधार बावडी हे आहे. त्या काळी छोट्या तलाव किंवा विहिरीला बावडी असे म्हणत असत. तुम्ही येथील बांधकाम बघून निश्चितच आश्चर्यचकित होता. इथे चोर दरवाजा आहे जो एके ठिकाणी जाऊन बाहेर पडतो. तसेच येथे विष प्रयोग वगैरे काही होऊ नये यासाठी त्याकाळी विहिरी सुद्धा अगदी व्यवस्थित बांधल्या जात होत्या. जेणेकरून इथल्या सैनिकांना त्यातले पाणी पिता यावे व कुठल्याही प्रकारची हानी त्या पाण्याने होऊ नये यासाठी विशिष्ट पद्धतीने या विहिरी बांधल्या गेल्या होत्या.
पन्हाळगडावरील अतिशय सुस्थितीत असलेल्या वस्तूंपैकी अंधार बाव ही एक सुस्थितीतील वास्तू आहे.
खरे तर पूर्वी प्रत्येक गडावर किंवा दुर्गावर एकापेक्षा जास्त विहिरी होत्या. पन्हाळा या गडावर देखील ही फक्त एकच विहीर नव्हती, तर कर्पूर बाव नावाची अजून एक विहीर त्यावेळी होती. या विहिरीचा उल्लेख जयराम पिंडे यांनी आपल्या "पर्णाल पर्वताग्रहण आख्यान" नावाच्या ग्रंथात केलेला आढळतो. आपले सर्वांचे आवडते छत्रपती शिवाजी महाराज हे देखील त्यावेळी काही काळ या विहिरीजवळ थांबले होते आणि त्यांनी या पाण्याला स्पर्श केला होता असा उल्लेख देखील त्याच ग्रंथात असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित या विहिरीचे पाणी प्राशन केलेले असावे असे वाटते.
तर मंडळी, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अलीकडच्या काळात ज्यावेळी मी पन्हाळगडावर गेले होते त्यावेळी या अंधार बाव च्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा म्हणजेच पाण्याच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पाहिला होता. आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळी जातो तो असा कचरा करण्यासाठी जातो का? मुळातच पाण्याच्या बाटल्या पाणी पिऊन झाल्यानंतर इकडे तिकडे इतस्ततः का टाकाव्यात हा मुख्य मुद्दा आहे. तरी भटकंती करणाऱ्या पर्यटकांनी तसेच हौशी पर्यटकांनी अशा प्रकारची कोणतीही कृत्ये करू नयेत ज्यामुळे प्रदूषण वाढेल.
सर्व फोटो सौजन्य #गुगल (चूकभूल देणेघेणे)
©️®️ राजश्री (पूजा), कोल्हापूर
३०.११.२०२४

पारंपरिक भारतीय शस्त्रसंज्ञा

 


पारंपरिक भारतीय शस्त्रसंज्ञा

भारतावर कित्येक शतके झालेल्या परकीय आक्रमणांनी स्थानिक भारतीय भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती अशा अनेक पैलूंवर परिणाम झाले. ही सर्व आक्रमणे युद्धांमधून पसरत गेल्याने युद्ध आणि संबंधित व्यवस्था या मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या. यांचा सर्वात मोठा परिणाम झाला तो म्हणजे युद्धातील शस्त्रांची नावे आणि संज्ञांवर! सततच्या परकीय आक्रमणांनी मध्ययुगीन भारतात प्रचलित असलेल्या पारंपरिक शस्त्र संज्ञांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. शस्त्रांची, शस्त्रांशी संबंधित अन्य पारंपरिक संज्ञांची जागा ही परकीय नावांनी काबीज केली.
शस्त्रांच्या नावांच्या, संज्ञांच्या या ‘replacement’ ने नेमके काय घडले? पहिले म्हणजे ‘Loss of meaning’. परकीय शस्त्रसंज्ञांनी पारंपरिक शस्त्रसंज्ञांची जागा घेण्याआधी अनेक भारतीय संज्ञा या संस्कृत, प्राकृतप्रचुर होत्या. या प्रत्येक नावाला, संज्ञेला भाषेनुरूप विशिष्ट अर्थ होता. उदा. ‘खंजीर’ ला ‘असिधेनुका’ म्हणजे लहान तलवार म्हटले गेले होते, ‘ढाल’ ला ‘चर्म’, म्हणजे चामड्यापासून तयार केलेले आवरण म्हटले गेले होते. अशा कितीतरी नावांमधून शस्त्राचे नेमके स्वरूप, रचना, कार्यपद्धती हे नेमकेपणाने प्रतिबिंबित होत होते. अशा नावांना परकीय संज्ञांनी बदलल्याने शस्त्राचा ‘context’ हा जनमानसापासून तुटत गेला. दुसरे म्हणजे शस्त्रसंज्ञांचे ‘सपाटीकरण’. भारतीय शस्त्र जगतात सध्या प्रचलित असलेल्या बहुसंख्य शस्त्रसंज्ञा या परकीय आहेत अथवा स्थानिक पातळीवरून प्रचलित झालेल्या आहेत. या शस्त्रसंज्ञा दोन प्रकारे रूढ झालेल्या आहेत. एक म्हणजे, मौखिक परंपरेने आणि दुसरे म्हणजे, लिखित स्वरूपातील नोंदींच्या स्वरूपात, ज्या तुलनेने फार कमी आहेत. या लिखित नोंदी मुख्यत्वे इंग्रज वसाहतीच्या काळात विविध इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदींच्या स्वरूपात आहेत. ज्या ज्या इंग्रज अधिकाऱ्यांना जे जे शस्त्रतज्ज्ञ भेटले त्यांनी त्यांच्याकडून नोंदी करून घेतल्या. इंग्रजांनी नेमक्या कोणत्या प्रांतातल्या लोकांकडून नोंदी करून घेतल्या याची माहिती नसल्याने या नोंदी सर्वसमावेशक, ‘comprehensive’ मानता येत नाहीत आणि शस्त्रसंज्ञांचे प्रांतिय दस्तावेजीकरण, म्हणजे विशिष्ट शस्त्राला / शस्त्राच्या भागाला वेगवेगळ्या भाषांमध्ये, प्रदेशांमध्ये काय म्हटले जाते / जात होते? हे आजमितीस आपल्याकडे नसल्याने उपलब्ध नोंदी पूर्णतः बादही ठरवता येत नाहीत.
उदाहरणादाखल पोस्टसोबत ‘तलवार’ शस्त्राच्या विविध भागांची पारंपरिक नावे जोडली आहेत. ही संस्कृत नावे, शस्त्रसंज्ञा या बृहतसंहिता, अमरकोश, हलायुधकोश, अभिधानरत्नमाला, युक्तिकल्पतरू, शिवतत्वरत्नाकर अशा विविध प्राचीन ते मध्ययुगीन भारतीय ग्रंथांमध्ये विखुरलेल्या आढळून येतात. यातील प्रत्येक संज्ञेची स्वतंत्र अर्थपूर्ण व्युत्पत्ती आहे, त्याबद्दल नंतर कधीतरी! शस्त्रसंज्ञांमधील या बदलांमुळे त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक शस्त्र संज्ञांसोबत त्यांमागील भाषिक, सांस्कृतिक, प्रसंगी धार्मिक पार्श्वभूमीही काळाच्या ओघात नाहीशी होत गेली. परिणामी भारतीय शस्त्रांच्या अभ्यासाला आवश्यक ‘theoretical’ पाया तयार होऊ शकला नाही.
अर्थात, ही संस्कृत नावे म्हणजे संपूर्ण भारतीय शस्त्रसंज्ञांचे प्रतिनिधी मुळीच नाहीत! भारतामध्ये आज जेवढे भाषिक वैविध्य आहे तेवढेच, किंबहुना त्याहूनही अधिक वैविध्य मध्ययुगीन कालखंडात होते. एकाच शस्त्राची विविध प्रांतीय नावे, शस्त्र संबंधित संज्ञांचे प्रांतिय वैविध्य आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, ‘माडू’ शस्त्र महाराष्ट्रात ‘माडू’, राजस्थानमध्ये ‘सिनगोटा’ तर दक्षिण भारतात ‘मानकोंबू’ म्हणून ओळखले जाते. शस्त्राचे ‘पाते’ हे कुठे वाल, कुठे कत्ती, कुठे पच्छना, तर कुठे फल म्हणून ओळखले जाते. या शस्त्रसंज्ञांमधून त्या त्या शस्त्राची स्थानिक ओळख निर्माण होत असते. स्थानिक आणि प्रांतीय पातळीवरील हे पारंपरिक शस्त्र संज्ञांचे वैविध्य येत्या काळात लिखित स्वरूपात नोंदवून ठेवणे आवश्यक आहे!
भारतीय शस्त्रांच्या वैशिष्ट्यांचा परिघ हा प्रत्येक प्रांतानुसार रचना, नक्षीकाम, धातू अगदी भाषिक पातळीवरही वेगळा आहे. प्रांत, भाषानिहाय शस्त्र संज्ञांच्या दस्तावेजीकरणातून शस्त्र संज्ञांच्या सपाटीकरण होण्यापासून थांबवता येऊ शकते तसेच त्यांची स्वतंत्र वैशिष्ट्येही अधोरेखित करता येऊ शकतात. या दस्तावेजीकरणाचा उद्देश प्रचलित परकीय शस्त्रसंज्ञा बदलून टाकणे नसून त्याला समांतर प्रांतिय संज्ञांचे दस्तावेजीकरण करून भारताच्या शस्त्र जगताचा एक ‘comprehensive’ भाषिक पट तयार करणे असावा..अन्यथा चालू गोंधळात भर पडण्याची शक्यता अधिक असेल! छत्रपती शिवरायांनी 'राज्यव्यवहारकोश' सारखी राबवलेली योजना मार्गदर्शक ठरावी!
छायाचित्रात - उजव्या बाजूला तलवारीच्या भागांची पारंपरिक संस्कृत नावे व डाव्या बाजूला आज रूढ असलेल्या शस्त्र संज्ञा.
गिरिजा

Saturday, 30 November 2024

{ महाराष्ट्रातील गड किल्ले }

 


{ महाराष्ट्रातील गड किल्ले } इतिहासाच्या या साक्षीदारांच्या सोबतीने चला पाहुया आज शिवबा ते छत्रपती शिवराय.

भाग १

शिवरायांच्या जन्मापासून म्हणजे किल्ले शिवनेरीपासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच किल्ले रायगडापर्यंत शिवरायांच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या किल्ल्यांच्या इतिहासाची सचित्र माहिती असलेली मालिका.

" राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा" असा हा "महाराष्ट्र" दुर्गांचा देश. यातील बहुतेक दुर्गांनी श्री शिवछत्रपतींची चरणधूळ मस्तकी धारण केली आहे. जेथे शिवनेरी किल्ल्याने स्वराज्याचा सूर्योदय पाहिला तेथेच रायगडाने या तेजस्वी सुर्याचा अस्त होताना पाहिला. ज्या भूमीने तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेले पाहिले, रायगडावर शिवराज्याभिषेक पाहिला त्याच भूमीने तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे अशा कैक विरांना स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले पाहिले. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली असता चार-दोन शिखराआड एखादं शिखर तटा-बुरुजांचा शेला-पागोटं चढवून उभा राहिलेला आढळतो.

इतिहासाच्या या साक्षीदारांच्या सोबतीने चला पाहुया आज शिवबा ते छत्रपती शिवराय.

Monday, 23 September 2024

असावा किल्ला

किल्ले असावा .....🚩🚩🚩












असावा किल्ला
किल्ल्याची उंची : 2400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : पालघर
प्रकार : मध्यम
ठाणे जिल्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी डहाणू, तारापूर, ठाणे, कल्याण इत्यादी बंदरातून मोठया प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणार माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक असावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणाऱ्या मार्गांवर प्राचीनकाळी बांधण्यात आला. ठाण्यातील पुरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा रज दिवसाचा ट्रेक आल्हाददायक होतो.
पाहण्याची ठिकाणे :
गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड रकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली 2 टाक्या आहेत. त्यापैकी मोठ्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाक आहे. या टाक्यांची लांबी 59 फूट व खोली 15 फुट आहे. या टाक्याचे वैशिष्ठ म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. या टाक्यांची भिंत फुटल्याने यात आता पाणी साठत नाही.
हे टाक पाहून उत्तरेकडे चालत जाताना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराची जागा दिसते. प्रवेशद्वार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतींचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायऱ्याही मिळतात.
प्रवेशद्वार पाहून किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहार. हे लहान असून त्याची रचना मोठ्या टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी खोदलेली आहे.या पन्हालीतून येणारे पाणी टाकायला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायऱ्या कोरलेल्या आहेत.
याशिवाय किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेल्या गुहा व टाक आहे. ते पाहण्यासाठी मोठ्या टाक्या जवळून खाली उतरून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळसा घालून पूर्वेकडे जावे लागते. गुहा पाहिल्यावर आपली गडफेरी संपते. गुहे जवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. पण ती फारशी वापरात नसल्यामुळे वाटाड्या बरोबर असेल तरच या वाटेने उतरावे.
गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा:
रेल्वेने : - बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. असावा किल्ला पाहण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहुन सुटणाऱ्या काही पेसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार - डहाणू या दर तासाला सुटणाऱ्या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून 5.33 ला सुटणारी गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. असावा किल्ला बोईसर पुर्वेकडे आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस व टमटम पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्क्यच्या पायथ्याचे वारंगडे गाव 8 किलोमीटरवर आहे.
रस्त्याने :- मुंबई -अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून 92 किलोमीटरवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना 10 किलोमीटर वारंगडे हे गाव आहे.
वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस बारीपाडा गावाकडे जाणार रास्ता जातो. या फॅक्टरीच्या कम्पाउंडला लागून जाणार रास्ता 850 मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच अंगांवडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहोळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने 5 मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर 3 फूट पूल आहे. येथून गडावर जाण्यासाठी 3 वाट आहेत.
१)पहिला पूल पार करून सरळ चालत गेल्यास आपण असावा किल्ला व त्याला लागून असलेला डोंगर या मधील खिंडीतून गडावर जातो. पुढे ही वाट मुख्य वाटेला मिळते. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते. वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. या वाटेने साधारणतः पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.
२)पहिला पूल पार करून डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण असावा किल्ल्याच्या डोंगराजवळ पोहोचतो. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते व किल्ल्याखाली असलेल्या गुहे जवळून गडावर जाते. हि वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. पावसाळ्यात ही वाट टाळावी. या वाटेने साधारणतः पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचतो.
३)पहिल्या पुलापाशी आल्यावर तो पूल न ओलांडता उजव्या बाजूच्या कच्चा रस्ता पकडावा. थोड्या अंतरावर दुसरा पूल लागतो. त्यापुढे तिसरा पूल आहे. हा तिसरा पूल पार केल्यावर समोरच्या टेकडीकडे जाणारी पायवाट दिसते. हि किल्ल्यावर जाणारी राजवाट आहे. किल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू चढत किल्ल्यावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही. किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारणतः 1 ते 1.5 तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. हि वाट मळलेली व रुंद असल्यामूळे या वाटेने गडावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.
राहण्याची सोय :- गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :- गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :- फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :- पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १.३० तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :- जुने ते मार्च.
ट्रेकिंगकडे वळणारी तरुणाई आता हळूहळू गडसंवर्धनासाठी सुद्धा झटत आहे. दुर्गप्रेमींच्या माध्यमातून संघटन करुन सातत्याने मोहिमा घेत आहेत. या मोहिमांमुळेच किल्ल्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली किंवा टाक्यांतील गाळात गाडले गेले अवशेष पुन्हा बाहेर येऊ लागतात. 'बा रायगड परिवाराने' रविवारी आयोजित 'किल्ले असावा' संवर्धन मोहिमेत असाच ऐतिहासिक ठेवा आढळून आला. किल्ल्यावरील सुकलेल्या पाण्याच्या टाक्यातील गाळ साफ करत असताना त्या गाळात गाडली गेलेली एक भरभक्कम चांगल्या स्थितीतील तोफ सापडली.
बोईसरजवळ असलेल्या 'असावा' किल्ल्याच्या संवर्धनासाठी जोशपूर्ण वातावरणात गाळ काढायला सुरुवात केली. पुढच्या ३० ते ४० मिनिटांनी तोफेचा पुढील भाग सर्वांना दिसला. त्यामुळे सगळ्यांनाच स्फुरण चढले. छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणांनी गडाचा कानाकोपरा दुमदुमून गेला. गेले वर्षभर चाललेल्या कार्याचे फळ या तोफेच्या रूपाने मिळाले असून यात प्रत्येक मोहिमेस हजर असलेल्या सर्व सहभागींचा मोलाचा वाटा आहे.
तज्ज्ञांच्या मते ही तोफ ब्रिटिशकालीन असावी. तोफेची लांबी १४० सेमी, तोफेच्या तोंडाचा व्यास ८.५ सेमी, मागचा परीघ ७४ सेमी तर पुढचा परीघ ५४ सेमी इतका आहे. तोफेवर इंग्रजी अक्षर 'बी' सदृश अक्षर कोरलेले आहे. पुढील मोहिमेत ही तोफ टाक्यातून वर काढून व्यवस्थितपणे साफ करण्यात येईल. पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली नीट जतन केली जाईल.
माहिती साभार - किल्ले महाराष्ट्र

Wednesday, 20 March 2024

२० मार्च १६६९ नखलचा किल्ला

 


२० मार्च १६६९ नखलचा किल्ला...
हा किल्ला मस्कत ह्या राजधानीपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.. हा किल्ला “सल्तनत ऑफ ओमान” ह्या देशात असून “अल बतिनाह” भागातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे...
किल्ल्यात सुंदर संग्रहालय असून ते 'मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चर' कडून चालविले जाते ह्या किल्ल्याला आजून एक नाव आहे 'ह्यूसन अल हिम' ह्या किल्ल्याचा इतिहास पूर्व-इस्लामिक कालखंडातील आहे हा किल्ला अत्यंत प्राचीन असून इतिहासकारांच्या मते हा साधारण १५०० वर्षांपूर्वीचा आहे...
ह्या किल्ल्याचे 'नखल' हे नाव तिथे असणाऱ्या नखल ह्या प्राचीन गावावरून पडले आहे शतकानुशतके ओमान मधील बऱ्याच शासकांनी किल्याचा विस्तार आणी नुतनीकरण केले किल्यात सुधारणा केल्याची सर्वात जुनी नोंद हि ९ व्या शतकातील आहे ती सुधारणा इमाम सलत बिन मलिक अल खसुरी ह्यांनी केली किल्ल्याचा आजून विस्तार हा तेथील यामादि, नभानी, आणी यरुबी ह्या जमातींनी (tribe) केला १७ व्या शतकात ह्या किल्याचे बरेच पुनर्वसन झाले...
निझवा ह्या प्रादेशिक राजधानी पासून जवळच्या व्यापार मार्गांसाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून ह्या किल्याचा वापर केला गेला वादी बनी खारुस चे इमाम (धर्म गुरु ह्यांचं मोठं वर्चस्व असायचं) आणी यराबा वंशाचे इमाम ह्या किल्ल्यात राहत होते नखल किल्ल्यातील सर्वात अद्वितीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे तो एकसमान आकाराचा नाही किल्ल्याचे बांधकाम हे उंच अश्या खडकांवर असल्याने किल्ल्यात बरेच चढ उतार आहेत ह्या उंच खडकांमुळे किल्ल्याची भव्यता छान दिसते किल्यात बरीच बांधकाम असून त्यात प्रामुख्याने एक मशीद, एक विहीर किल्लेदाराची कोठी, महिलांच्या राहायच्या खोल्या लहान मुलांच्या खोल्या, सैनिकांसाठीच्या खोल्या, किल्ल्यातील दरबाराची कोठी, आन धान्य साठवायचा खोल्या आणी कैद्यांचे तुरुंग असे अनेक प्रकार आहेत...
“छत्रपती शिवाजी महाराज” आणि ओमानचे संबंध :
ह्याच नखल किल्ल्याचे इमाम ‘सुलतान बिन सैफ’ ह्यांनी पोर्तुगिजांचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत घेऊन आपल्याकडे मस्कतवरून अरबी आरमार पाठविले होते...
मुंबईकर इंग्रज सुरतेला २० मार्च १६६९ ला पत्र लिहितात कि.., “मस्कतहून ताजी बातमी अशी आली आहे कि १९ मोठी आणि ५-६ छोटी मिळून ४००० लोक असलेले एक अरबी आरमार हिंदुस्तानच्या किनाऱ्याकडे निघून गेले काहींच्या मते हे आरमार शिवाजीराजास मदत करण्याकरीता म्हणून जात असावे...”

Thursday, 1 February 2024

करंडीकर व झेरवाडी कर जाधव-

 






करंडीकर व झेरवाडी कर जाधव-
मूळपुरुष
तुकोजीराव
पुत्र दोन
१) चंदाजीराव हो करडीकर घराणे हो
१) येसाजीराव हो झेरवाडीकर
यास पुत्र तीन एक कन्या
१) भवानराव
२) यशवंतराव
3) रामराव... यांचे पुत्र भिवराव होय यास तीन पुत्र
१) भवानराव
१) माधवराव
३) नारायणराव
यातील भवानराव यांचे उल्लेख सदर पत्रातून आले आहे
__________________
पत्र चिटणीशी
इ. स. १७६३-६४
आर्या सितैन मया अलफ रबिलावल१४
श्री
जानोजी भोसले सेनासाहेबसुभा हे परराज्यात गेले होते याजकरितां यांची वतने वगैरे गांव जप्त केले होते;त्यास मशारनिले सरकारांत येऊन भेटले,
याजकरितां यांची वतने वगैरे मोकळी करून सुदामा प्रमाणे चालवणै म्हणोन
पत्रे ३परळीचे देशमुखी विशी पत्रे
१अवचितराव गणेश
१व्याकाजी माणकेश्वर व विष्णू नरहर
१ भावनी जाधव व कारकून किल्ले सजणगड
____
सदर जाधव घराणे हे किल्ले सज्जनगड येथे तत्कालीन काळापासून रामदासी नवमी उत्सवात धनुष्य बाणा चे मान या करंडीकर-झेरवाडीकर जाधव घराण्यात आहे आजपण दरवर्षी झेरवाडीतील जाधव घराणे येथे रामनवमी उत्सव साठी जातात सदर घराण्यातील अभ्यास करताना आढळल्या मुळे येथे दिले आहे
झरेवाडी, सज्जन गड येथील जाधव इनामदार!!!
जाधव यांचे सज्जन गडावर मानकरी असलेले ची नोंद .मानकरी जाधव गडावर हा धनुष्य बाण घेणून दासनवमी रोजी जातात .१००वर्षी अगोदरच्या या घराण्यातील भांडयावर जाधवराव इनामदार असे उल्लेख आहे .
तर कारंडीकर जाधव याकडे मुळे पाटीलकी असुन झेरवाडी येथे पाटीलकी वतन आढळून आले नाही अथवा आमच्या पर्यतं नोंदी आले नाही कारण सदर दोन्ही गावातील अंतर खुप कमी आहे व छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या राज्याभिषेक नंतर जो इनाम दिले त्याठिकाणी कांरडीकर-झेरवाडीकर जाधव घराण्यातील लोकांना लोकवस्ती केले आहे
फोटो तील वास्तू आम्ही स्वत बघतील आहे त
या दोन्ही गावातील अनेक सरदार छत्रपती सातारा कर महाराजांच्या हुजूर कडे व खाजगी कडे होते व शिल्लेदार म्हणून अनेक लढवय्या वीर या दोन्ही गावातील जाधव-जाधवराव इनामदार घराण्यात झाले आहेत याबद्दल उल्लेख पून्हा कधीतरी देऊ
.............
तळटीप:मागील अनेक अभ्यासदौरात या घराण्याचे वंशज कडून१०० वर्षे अगोदरच काही जुन्या काळातील वास्तू
दाखवले होत्या त्यावर जाधवराव असे उल्लेख आढळतात पण अजुनही कागदपत्रे उल्लेख जाधव आहे त
आपले
मा श्री. संतोष झिपरे
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष
९०४९७६०८८८