Followers

Saturday, 23 March 2019

किल्ला पहिला: अशेरीगड

ओळख उत्तर कोकणातील गडकोटांची

किल्ला पहिला: अशेरीगड

अनेक गडांची सध्याची अवस्था पाहिल्यावर इथे कधीकाळी गड होता का असा प्रश्न पडतो पण काही गड मात्र त्या वेळी मजबूत होत्व आणि त्यामुळे पाच सहा शतकांपूर्वी तिथे काय होते, याचा अंदाज आपण बांधू शकतो. पालघर जिल्ह्यातील अशेरीगड हा त्यातलाच एक.
अशेरीगडाची निर्मिती राजा भोजच्या कारकिर्दीत करण्यात आली. महिकावतीच्या बिंब राजाची सत्ता या गडावर असताना गडाचा चोख बंदोबस्त करण्यात आला.इ.स.१५५६ च्या सुमारास पोर्तुगीजांनी गडावर ताबा मिळवला.पोर्तुगीजांनी गडावर एक छोटेखानी गावच वसवण्याचा प्रयत्न केला.पोर्तुगीजांच्या कुटुंब कबिल्यासह मुले, सैनिक, कैदी अशा एकूण ८०० लोकांचा गडावर वावर होता. इ.स.१६८३ मध्ये संभाजी महाराजांनी गड स्वराज्यात आणला.पण लवकरच पोर्तुगीजांनी गड परत जिंकून घेतला. नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेत फेब्रुवारी १७३९ मध्ये अशेरीगड जिंकून घेतला.
पालघर स्थानकातून मनोरपुढे लागणारे मस्तान नाका याठिकाणी पोहोचावे.मस्तान नाक्यातून मिळेल त्या वाहनाने खोडकोना गावाच्या फाट्यापर्यंत पोहोचावे.खोडकोना गावात आदिवासी वस्ती आहे.अशेरीगड हा डोंगरी किल्ला असून गडावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दीड तासाची चढाई करावी लागते.तासाभराच्या चढाईनंतर खिंडीच्या माथ्यावर असलेल्या सपाटीच्या पुढील पायवाटेवर उजव्या बाजूस आदिवासींच्या वाघदेवतेची मूर्ती पाहण्यास मिळते.
अशेरीगडाच्या मुख्य वास्तुघटकांना पोर्तुगीजांचे राजचिन्ह, खोदीव पायरीमार्ग, कोरीव गुंफा, पाण्याच्या १४ कोरीव टाक्या, गडावर विविध कालखंडातील प्रवेशद्वार, संरक्षण व्यवस्थेबद्दल योजना, शिबंदीची घरे, मंदिराचे अवशेष, सदर, प्रार्थनास्थळे इत्यादींचा समावेश होतो.संपूर्ण गडाची गडफेरी पूर्ण करण्यास ३ तास पुरेसे आहेत.गडावरील बऱ्याच अवशेषांची अवस्था विखुरलेल्या आणि उध्वस्त स्वरूपात असल्याने शोधमोहीम करावी लागते.डोंगरउतारावरील बऱ्याच प्राचीन खोदीव टाक्या मातीच्या गाळाने बंदिस्त झाल्या आहेत. अशेरीगडाचा पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात तयार केलेला नकाशा वास्तुघटकांची संख्या दर्शवणारा आहे. या नकाशात गडाच्या सपाटीवर असणारा टेहळणीचा मनोरा व मध्यावर असणारी गुंफा प्रवेशद्वारे दिसतात. आजही अभ्यासकांना गडावरील विविध राजवटींनी केलेली बांधकामे अभ्यासण्याची संधी आहे.
गेल्या काही वर्षात दीपस्तंभ प्रतिष्ठान वसई आणि किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे गडाची संवर्धन आणि इतिहास सफर मोहीम आयोजित करण्यात येते.गडावरील बहुतेक वास्तुघटक कातळात खोदुन काढल्याने अशेरीगड प्रत्येक क्षणी मजबुतीची साक्ष देतो.दुर्गसंवर्धनाची जाणीव मनात जपत अशेरीगडाचा मूक इतिहास जपण्यास दुर्गयात्रीची पावले अशेरीगडकडे कूच करायला हवीत.

किल्ले वसई मोहीम परिवार.

No comments:

Post a Comment