Followers

Tuesday, 13 August 2019

तोफे वरील फार्सी लेख (परंडा किल्ला) :





तोफे वरील फार्सी लेख (परंडा किल्ला) :
तोफेवरील लेख (परंडा किल्ला):
परंडा किल्ल्यावरील मुख्य दरवाजाच्या बुरुजावर एक सुंदर तोफ आहे. त्यावर तिचे नाव फार्सी मध्ये कोरले आहे. ते पुढली प्रमाणे.
मैदान (میدان)
मलिक (ملک)
तोप (توپ)
नावाप्रमाणे ही तोफ रणभूमीची राणी शोभते खरी.
परंडा किल्ला छोटेखानी असला तरी त्याच्या सुरक्षेची काळजी पूर्ण व्यवस्थित घेतलेली दिसते. दुहेरी तटबंदी, बुरुजांचे कोंदण आणि त्यावर दिसायला सुंदर पण तोंडातून आग ओकणाऱ्या अजस्त्र आकाराच्या तोफा. यातील एका तोफेवर तिचे नाव , बनवणाराचे नाव आणि शासकाचे नाव कोरले आहे. हे सर्व लेख फार्सी भाषेत आहेत.
.
.
तोफेचे नाव :
सदर तोफेवर तिचे नाव आहे ज्याच्या मुळे तोफेची उग्रता पण लक्षात येते.
तोफेवर कोरलेले नाव पुढील प्रमाणे :
अझदहा पैकर (اژدها پیکر )
तोप (توپ )
म्हणजेच " आग ओकणारी तोफ "
याचा खरा अर्थ असा होतो की एक काल्पनिक प्राणी ज्याच्या तोंडातून आग बाहेर पडते.
मागे पहिली ती तोफ युद्धमैदानातील राणी होती तर ही आगीच्या ज्वाळा फेकण्यासाठी प्रसिद्ध आहे.
तोफेचा आकार बघून कल्पना पण करवत नाही की हिला बत्ती दिल्यानंतर काय आवाज होत असेल आणि हीच्यातून निघालेल्या तोफगोळ्याची तीव्रता काय असेल.
.
तोफ बनवणाऱ्याचे नाव :
तोफेवर दुसरा लेख आहे तो तोफ कोणी बनवली याची माहिती देतो. तो लेख असा :
महमद (محمد)
हुसैन ( حسین )
अमल अरब ( عمل ارب)
म्हणजेच ही तोफ महमद हुसैन अरब याने बनवली किंवा त्याच्या देखरेख खाली बनवली. याचा बाप म्हणजे महमद अली अरब हा मुघल काळात प्रसिद्ध असा तोफ बनविणारा कारागीर होता.

.
आता महत्वाचा प्रश्न की तोफ कोणाच्या सांगण्यावरून बनवली आहे. तर त्यासंबंधी देखील एक लेख तोफेवर सापडतो. तो पुढील प्रमाणे :
आलमगीर बादशहा गाजी (عالمگیر بادشاه غازی)
औरंगजेब बहादुर (اورنگزیب بهادر)
ही तोफ बनवली गेली ती औरंगजेब याच्या आज्ञेवरून.
त्याचे अखबारात म्हणजे बातमी पत्रे वाचली की समजून येत परंडा किल्ला त्याच्या दृष्टीने किती महत्वाचा होता. बादशहाचा धान्यसाठा , दारूगोळा परंडा किल्ल्यात होता आणि त्याचा हत्तीखाना परंडा भागात होता.
५ ऑक्टोंबर १७०० ची एक नोंद आहे ज्यात औरंगजेब सांगतो की परंडा येथून रसद आणा आणि त्यापैकी धान्याच्या गोण्यानी भरलेले ५ हजार बैल बेदरख्त खानाच्या फौजेत पाठवा. ५ हजार बैल ओढतील इतकं धान्य विचार पण करवत नाही आणि इतक धान्य तिथून आणायचं तर तिथे एकूण किती असेल हे कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यामुळे अशा किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आग ओकणारी तोफ हवीच.
आधी पाहिलेली मैदान मलिक ही पण औरंगजेब याच्या सांगण्यावरून बनवली होती कारण तिच्या वर पण त्याच्या नावाचा लेख आहे.
पोस्ट आणि माहिती - ओंकार खंडोजी तोडकर

No comments:

Post a Comment