Followers

Wednesday, 11 September 2019

अनंतपुर किल्ला

अनंतपुर किल्ला

अनंतपुर हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेले छोटेसे शहर. सध्या कर्नाटकात असलेला हा भाग कधीकाळी जत संस्थानात सामाविष्ट होता. स्वतंत्रपुर्व काळात जत हे एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर, अनंतपुर, उमराणी यासारखी लहानमोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. जत व आसपासच्या परिसराचा इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८०च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गढ्या व छोटे किल्ले बांधले. सतराव्या शतकात जत शहरापासुनकाही अंतरावर असलेल्या अनंतपुर गावात त्यांनी एक भक्कम व मजबुत असा भुईकोट बांधल्याचे सांगीतले जाते. अनंतपुर किल्ला जत या संस्थानाच्या राजधानी पासुन २६ कि.मी.अंतरावर तर उमराणी व डफळापूर या संस्थानातील महत्वाच्या ठिकाणापासुन अनुक्रमे २२ व १० कि.मी. अंतरावर आहे. संस्थानाच्या मध्यवर्ती भागात असलेला हा किल्ला संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्याने संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदुन त्याला अधिक मजबुत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेला हा किल्ला सांगली-सलमलगेवाडी महामार्गावर सांगली पासुन ६० कि.मी.वर तर महाराष्ट्र सीमेपासुन केवळ ३ कि.मी.अंतरावर आहे. डफळापूरहुन अनंतपुर गावाकडे जाताना अनंतपुर गाव येण्यापुर्वीच किल्ल्याचे मोठमोठे गोलाकार आकाराचे बुरुज आपले लक्ष वेधुन घेतात. खाजगी वाहन असल्यास अनंतपुर गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीकडून आपल्याला थेट खंदकापर्यंत जाता येते. कधीकाळी आत व बाहेर असा दोन्ही बाजुंनी बांधुन काढलेला हा खंदक आज मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. या खंदकात उतरूनच किल्ल्याच्या तटबंदीला वळसा घालत मुख्य दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे . हा मार्ग किल्ल्यावरून पुर्णपणे माराच्या टप्प्यात आहे. या वाटेसमोरच किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज असुन या बुरुजावरून किल्ल्याच्या वाटेवर, मुख्य दरवाजावर तसेच संपुर्ण किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवता येते. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण ५ एकर परिसरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण ९ बुरुज आहेत. या बुरुजांची व तटबंदीची रचना वैशिष्टपुर्ण आहे. चार टोकाला चार मोठे बुरुज असुन या दोन बुरुजांच्या मध्यभागी प्रत्येकी एक लहान बुरुज आहे. साधारणपणे दोन बुरुजांना जोडणारी तटबंदी हो एका सरळ रेषेत असते पण येथे मात्र किल्ल्याची तटबंदी गोलाकार असुन मोठ्या बुरुजाच्या मध्यावर असलेले चार लहान बुरुज अंतर्गत भागात जोडुन आत बालेकिल्ला बांधण्यात आला आहे. बालेकिल्ल्यातील एका लहान बुरुजाशेजारी खंदकात दुसरा लहान बुरुज बांधुन या दोन बुरुजामध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा बांधण्यात आला आहे. खंदकात उतरणाऱ्या या वाटेच्या सुरवातीस असणारा दरवाजा पुर्णपणे कोसळला असुन आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. या वाटेने आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य दरवाजात पोहोचतो. दोन बुरुजामध्ये असलेला किल्ल्याचा हा दरवाजा घडीव दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील बांधकाम मात्र विटांनी केले आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजुस फुलांची नक्षी असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांना बसण्यासाठी बैठक व राहण्यासाठी देवड्या आहेत. या दरवाजातून तटबंदीला वळसा घालत आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाची केवळ कमान शिल्लक असुन आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. बालेकिल्ल्यात एका चौसोपी वाड्याचा घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन या चौथऱ्यावर समाधीवजा लहान शिवमंदिर आहे. हे मंदीर आपल्याला सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची आठवण करून देते. वाडयाच्या आवारात चौकोनी आकाराची एक बांधीव विहीर पहायला मिळते. किल्ल्यात फिरताना अजुन एक खोल विहीर तसेच काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याच्या दरवाजाचे व सर्व बुरुजाचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी चुन्यामध्ये केले असले तरी रचीव तटबंदीचे बांधकाम मात्र पांढऱ्या मातीमध्ये केले आहे. हि तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली असल्याने संपुर्ण किल्लाभर पांढरी माती पसरली आहे. किल्ल्यातील सर्वात उंच बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार मार्ग असुन बुरुजात शिरण्यासाठी दरवाजा आहे. या बुरुजावर ध्वज उभारण्यासाठी तसेच तोफ ठेवण्यासाठी गोलाकार कठडा बांधलेला दिसुन येतो. इतर तीन बुरुजावर देखील अशीच रचना असावी पण बुरुजाची पडझड झाल्याने काळाच्या ओघात ती नामशेष झाली आहे. या बुरुजावरून संपुर्ण किल्ला एका नजरेत पहाता येतो. संपुर्ण किल्ला फिरायला एक तास पुरेसा होतो. महाराष्ट्राच्या सीमेवर आजही बऱ्यापैकी टिकुन असलेला हा भुईकोट त्याच्या बांधकाम वैशिष्ठ्यासाठी एकदा तरी पाहायलाच हवा.
www.durgbharari.com






पोर्तुगीज संस्कृती व मराठा इतिहासाशी नाते सांगणारा एक सुंदर किल्ला मोटी दमण व नानी दमण

मुंबईहुन १८० कि.मी.अंतरावर दिव दमण शहर आहे. महाराष्ट्राबाहेर असलेल्या या शहरात पोर्तुगीज संस्कृती व मराठा इतिहासाशी नाते सांगणारा एक सुंदर किल्ला आहे. दमण शहरातुन वाहणाऱ्या दमणगंगा नदीमुळे या शहराचे







मोटी दमण व नानी दमण असे दोन भाग पडले आहेत. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात असल्याने पोर्तुगालशी थेट संबंध ठेवण्यासाठी व दमण शहराच्या रक्षणासाठी त्यांनी दमणगंगा खाडीमुखावर दोन किल्ले बांधले. हे दोन्ही किल्ले एकमेकासमोर असुन यातील मोटी दमण किल्ला दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर आहे. पोर्तुगीजांची मुळ वसाहत हि मोटी दमण किल्ल्यात असल्याने मोटी दमण किल्ला नानी दमण किल्ल्यापेक्षा आकाराने मोठा आहे. मराठयांचा या किल्ल्याशी आलेला संबंध म्हणजे इ.स १७३९ साली मराठयांच्या वसई मोहिमेच्या काळात या किल्ल्यावरून वसई किल्ल्यावरील पोर्तुगीजांना मदत मिळू नये यासाठी मराठा फौजांनी या किल्ल्याची नाकेबंदी केली होती. पोर्तुगीजांचे येथे बस्तान बसण्यापुर्वी हा प्रांत गुजरातचा सुलतान महंमदशहा बेगडा याच्या ताब्यात होता. बंदराच्या रक्षणासाठी त्याने दमणला किल्ला बांधला होता. इ.स.१५२३ साली पोर्तुगीजांनी शहाकडे व्यापार करण्याची परवानगी मागितली व व्यापार सुरु केला. पण काही काळात त्याच्याशी वाद झाल्याने इ.स.१५२९ साली पोर्तृगीजांनी दमण बंदरावर हल्ला केला. इ.स.१५२९ ते १५५९ या काळात पोर्तुगीजांनी अनेकदा या बंदरावर हल्ले केले. शेवटी गोव्याचा गव्हर्नर कॉन्स्टेटिनो डी. ब्रगांझा याने सुमारे ३००० सैनिक आणि १०० युद्धनौकांसह दमणवर हल्ला करत येथील बंदर व किल्ला ताब्यात घेतला. गोव्याला परत जाताना गव्हर्नर ब्रगांझा याने बंदर आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी कप्तान दियागो द नऱ्होना याची मेजर म्हणुन नेमणुक करून त्याच्या दिमतीला १२०० सैनिक दिले. यानंतर इ.स.१५५९ साली दमणचा जुना किल्ला पाडून त्याजागी नवीन किल्ला बांधायला सुरवात झाली. दक्षिणेकडील दरवाजावर असलेल्या शिलालेखानुसार हा दरवाजा व या भागातील बुरुजाचे काम मुघल शासक अकबर याच्या काळात झालेल्या आक्रमणानंतर १५८१ साली पुर्ण झाले तर उत्तरेकडील दरवाजावरील शिलालेखानुसार या भागातील किल्ल्याचे बांधकाम इ.स.१५९३ साली पुर्ण झाले. म्हणजे या संपुर्ण किल्ल्याचे बांधकाम करण्यास २४ वर्ष लागली. इ.स.१५९३ साली बांधलेला हा किल्ला आजवर नांदता असल्याने त्याच्या मुळ रुपात पहायला मिळतो. किल्ल्याचे बांधकाम म्हणजे पोर्तुगाल वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला ८४ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत बाणाच्या आकाराचे दहा बुरुज आहेत. किल्ल्याच्या पश्चिम बाजुस अरबी समुद्र ,उत्तरेस दमणची खाडी असुन उरलेल्या दोन दिशाना खोल खंदक खोदुन किल्ला संरक्षित केला आहे. किल्ल्याची तटबंदी साधारण ३ कि.मी. लांब असुन १० फुट रुंद व २० फुट उंच या तटबंदीत उत्तरेला एक व दक्षिणेला एक अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. याशिवाय किल्ल्याला समुद्राच्या दिशेने पश्चिमेकडे असलेला तिसरा सध्या विटांनी बंद करण्यात आला आहे. किल्ल्यात गिरीजाघर,न्यायालय, रुग्णालय, महाविदयालय, सचिवालय, नगरपालिका कार्यालय, टपाल कार्यालय यासारख्या महत्वाच्या सरकारी वास्तु आहेत. किल्ल्यात पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक विहिरी खोदल्या आहेत. एक प्रकारे स्वयंपूर्ण असे संपुर्ण शहरच या किल्ल्यात वसले आहे. याशिवाय किल्ल्याच्या पश्चिम तटावर जहाजांना इशारा देण्यासाठी जुने दीपगृह आहे. किल्ल्याच्या पश्चिम तटाबाहेर नव्याने दीपगृह उभारण्यात आले आहे. किल्ला आजपर्यंत नांदता असल्याने व त्याची योग्य काळजी घेतल्याने अपवाद वगळता किल्ल्याचे दरवाजे,बुरुज,तटबंदी खंदक हे सर्व अवशेष व आतील वास्तु आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या दोन्ही मुख्य दरवाजावर पोर्तुगीज राजचिन्ह व शिलालेख कोरलेले असुन पोर्तुगीज शैलीत संपुर्ण दरवाजा सजवला आहे. नानी दमण किल्ला पाहुन पादचारी पुलावरून खाडी ओलांडुन मोटी दमण किल्ला पहायला आल्यास आपला उत्तरेकडील दरवाजातुन किल्ल्यात प्रवेश होतो. या दरवाजासमोर किल्ल्याचे बंदर असुन तेथे बोटी थांबण्यासाठी नव्याने धक्का बांधला आहे. दरवाजातुन आत जाणारा सरळ रस्ता दक्षिणेकडील दुसऱ्या दरवाजातुन बाहेर पडतो. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस तीन शिलालेख कोरलेले असुन दरवाजाला असलेली लाकडी दारे आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याचे दरवाजे मोठे असल्याने या दरवाजातून मोठया प्रमाणात वाहनांची रहदारी सुरु असते. येथे डावीकडील बाजुस तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. तटावर जाण्यासाठी अनेक ठिकाणी अशा पायऱ्या बांधल्या आहेत पण तटावर न जाता आपण किल्ल्यातील वास्तु पहात सरळ रस्त्याने किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे निघावे. वाटेत आपल्याला किल्ल्यातील जुन्या वास्तुं तसेच त्यांच्या आवारात ठेवलेल्या काही तोफा पहायला मिळतात. या रस्त्याने जाताना वाटेच्या उजव्या बाजुस आपल्याला बॉम जिजस नावाचे इ.स.१६०३ ते १६०६ दरम्यान बांधलेले चर्च पहायला मिळते. या चर्चची कलाकुसर व आतील लाकडावरील कोरीव काम आवर्जुन पहावे असे आहे. चर्चच्या अलीकडे उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला १७ व्या शतकात बांधलेल्या पडक्या इमारतीकडे नेतो. संत डॉमिनिकन मॉनसेटरी म्हणुन ओळखली जाणारी हि इमारत म्हणजे पोर्तुगीज बांधकामाचा उत्तम नमुना आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय फौजा मोटी दमण किल्ल्यात शिरल्या असता पोर्तुगीज सैन्याने या इमारतीचा आधार घेतला. त्यावेळी मराठा रेजिमेंटबरोबर झालेल्या चकमकीत या इमारतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मराठा रेजिमेंटने केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे स्मारक मोटी दमण किल्ल्यात उभारण्यात आले आहे. हि इमारत पाहुन मुळ रस्त्यावर येत किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात यावे. या दरवाजाबाहेर एक शिलालेख कोरलेला असुन दरवाजाची कमान सुशोभित केलेली आहे. या दरवाजाची लाकडी दारे आजही सुस्थितीत असुन त्यावर भलेमोठे टोकदार खिळे ठोकलेले आहेत. या दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजाला लागुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बुरुजाखाली तळघर असुन त्यात जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे पण तटावरून हे तळघर पहायला मिळते. या बुरुजावर असलेल्या चौथऱ्यावर झेंडा उभारण्यासाठी लाकडी खांब रोवलेला असुन त्याशेजारी घंटा बांधण्याची कमान आहे. घंटा बांधण्यासाठी असलेल्या या कमानी जवळपास सर्व बुरुजावर आहेत. या दिशेला किल्ल्याबाहेर खंदक असुन त्यात आजही पाणी भरलेले असते. या बुरुजावरून सुरवात करून किल्ल्याला प्रदक्षिणा करत दुसऱ्या बाजूने या बुरुजावर आल्यावर आपली संपुर्ण गडफेरी होते. किल्ल्याची तटबंदी साधारण १० फुट रुंद असुन काही ठिकाणी हे अंतर २० फुट आहे. तटबंदी व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठी झरोके बांधले असुन काही ठिकाणी केवळ एक माणुस उभा राहू शकेल अशा आकाराचे गोलाकार आडोसे बांधले आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर सैनिक उभा राहण्यासाठी असलेले हे गोलाकार आडोसे म्हणजे हे कॅप्सुल बुरुज पोर्तुगिज बांधणीचे खास वैशिष्ठ आहे. किल्ल्यात फिरताना किल्ल्याच्या अंतर्गत भागात सहा तर तटबंदीवर २५ पेक्षा जास्त तोफा पहायला मिळतात. या सर्व तोफा व्यवस्थित जागी रचलेल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबुत असुन तटाला लागुन अनेक कोठारे व पहारेकऱ्याच्या खोल्या तसेच काही तळघरे आहेत. या सर्व वास्तुत जाण्यासाठी तटावर भुमीगत दरवाजे तसेच पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे सर्व पहात साधारण ३ कि.मी.लांबीची ही तटबंदी पार करण्यासाठी दोन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. वापी ते दमण हे अंतर १२ कि.मी. असुन वापी रेल्वे स्थानकातून बस, रिक्षा आणि खाजगी वहानाने दमणला जाता येते. नानी दमण बस स्थानकापासुन खाडीवरील पादचारी पुल पार करून पंधरा मिनिटात आपण किल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो.
(दूर्ग भरारी यांच्या माध्यमातून) www.durgbharari.com

जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर गावात असलेला भुईकोट

महाराष्ट्राला गडकिल्ल्याचा वारसा इतक्या मोठया प्रमाणात लाभला आहे कि कित्येक गढीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीतही दिसत नाही. कागदोपत्री गढी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेला ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात तोंडापूर येथे असलेल्या या कोटाला भेट देण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे अजंठा फर्दापूर. फर्दापूरपासुन केवळ १० कि.मी.अंतरावर असलेल्या या कोटाला औरंगाबाद अजंठा फर्दापूर या भटकंतीत सहजपणे भेट देता येते. तोंडापूर गावाच्या मध्यभागी एका लहानशा उंचवट्यावर साधारण दीड एकरवर पसरलेल्या या कोटाची सध्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आयताकृती आकार असलेला हा कोट मोठया प्रमाणात पडझड झाल्याने त्याच्या बांधकामाबाबत नेमका अंदाज करता येत नाही. वाढत्या वस्तीने कोटाचा बहुतांशी भाग गिळंकृत केला असुन अनेक ठिकाणी कोटाचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. कोटाची संपुर्ण तटबंदी नष्ट झाली असुन दोन तीन ठिकाणी ती कशीबशी तग धरून उभी आहे. कोटाचे शिल्लक बांधकाम पहाता कोटाची २० फुट उंच तटबंदी घडीव लांबलचक दगडांनी बांधलेली असुन बांधकामात चिकणमातीचा वापर केला आहे. कोटाचे दोन बुरुज आजही ढिगाऱ्याच्या स्वरुपात उभे आहेत. कोटाच्या मध्यभागी असलेल्या वास्तुची भिंत व दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या आतील बाजुस देवड्या आहेत. या वास्तुच्या आत सुंदर शिल्पकृतीने नटलेले मंदीर आहे. कोरीव खांबावर उभे असलेले हे मंदीर आजही कसेबसे तग धरून उभे आहे. मंदिराच्या दरवाजावर अप्रतिम शिल्पे कोरलेली आहेत. कोटात पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. कोटाची सध्याची अवस्था बिकट असल्याने संपुर्ण कोट पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता या कोटाच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. याशिवाय तोंडापूर गावात आवर्जुन पहावी अशी सुंदर पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या काठावर अनेक मंदीरे असुन त्यातील मुर्ती मात्र नाहीशा झाल्या आहेत. काही काळाची सोबती असलेल्या ह्या वास्तुंचे साक्षीदार होण्यासाठी या कोटाला लवकरात लवकर भेट दयायला हवी.
www.durgbharari.com






जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर गावात असलेला भुईकोट त्यापैकी एक. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील उल्लेख वगळता इतर कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या कोटाची

राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतिल एक महत्वाचे गाव विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा नावाचे लहानसे खेडे









विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा नावाचे लहानसे खेडे आहे. संतश्रेष्ठ चोखामेळा ह्यांचे जन्मस्थानं असलेले हे ठिकाण इतिहासात राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतिल एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी आपले नाते सांगणाऱ्या जाधवांच्या दोन उध्वस्त गढ्या व या गावाचा नगरदुर्ग आजही ताठ मानेने उभा आहे. मेहुणा गाव बुलढाणा शहरापासुन ७० कि.मी.अंतरावर तर देऊळगाव राजा या तालुक्याच्या ठिकाणापासुन केवळ १५ कि.मी.अंतरावर आहे. मेहुणाराजा गाव मुख्य रस्त्याहुन १.५ कि.मी. आत असुन मुख्य रस्त्यावरून आत शिरल्यावर गाव येण्याआधी रस्त्याच्या डाव्या बाजुस २० फुट उंचीचा एक प्रशस्त दरवाजा दिसतो. घडीव दगडानी चुन्यात बांधकाम केलेल्या या दरवाजा शेजारी असलेले दोन्ही बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेले असुन या दोन्ही बुरुजांच्या आतील बाजुस कमानी असलेली सुंदर अशी दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या भिंतीवर पंजात दोन हत्ती पकडलेले शरभशिल्प या भिंतीत मुख्य दरवाजाच्या वरील बाजुस तसेच आतील इमारतीच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी कमान असलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस कोणतेही अवशेष नसुन केवळ लांबवर पसरलेल्या पडझड झालेल्या तटबंदीचा पाया आहे. हे बहुदा एखाद्या गढीचे अर्धवट झालेले बांधकाम असावे. येथुन ५ मिनिटात आपण मेहुणा गावात पोहोचतो. कधीकाळी तटबंदीच्या आत वसलेल्या या गावाची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीत असलेले दोन्ही दरवाजे मात्र शिल्लक आहेत. यातील आपण वाहनाने प्रवेश करतो तो दरवाजा पश्चिमाभिमुख असुन दुसरा दरवाजा उत्तराभिमुख आहे. आपण प्रवेश केलेला दरवाजा हा या कोटाचा मुख्य दरवाजा असुन हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाच्या कमानीची इमारत दुमजली आहे. यातील जिन्याने या इमारतीच्या वरील मजल्यावर तसेच दरवाजाच्या वरील भागात व बुरुजावर जाता येते. दरवाजा व बुरुज यांचे बांधकाम दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. फांजीवरील भागात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. या दरवाजाच्या पुढील भागात काही अंतरावर एक लहान दरवाजा आहे. हा या नगरदुर्गाच्या आत असलेल्या गढीचा दरवाजा असुन जाधवरावांची हि गढी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या गढीचे दोन दरवाजे व केवळ एक बुरुज शिल्लक आहे. गढीच्या बुरुजाला लागुनच गढीचा दुसरा लहान दरवाजा आहे. गढी परिसरात जाधवरावांच्या वंशजांची घरे आहेत. गढीच्या बुरुजाला वळसा मारून उत्तरेच्या दिशेने गेल्यावर काही मिनिटात आपण कोटाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. येथे आपली मेहुणा राजा कोटाची भटकंती पुर्ण होते. गावाभोवती फेरी मारल्यास काही ठिकाणी तुरळक तटबंदीचे अवशेष दिसतात मात्र स्थानिक माहीतगार सोबत असायला हवा. हा संपुर्ण परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. सिंदखेडराजा येथे त्यांची समाधी पहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा,किनगाव राजा व मेहुणा राजा या ठिकाणी विस्तारल्या आहेत. यातील मेहुणाराजा गावाला केवळ ऐतिहासिक नव्हे तर वारकरी संप्रदायाचा वारसा देखील लाभला आहे. वारकरी संप्रदायातील महत्वाचे संतकवी असलेले संत चोखामेळा यांची हि जन्मभुमी आहे.