Followers

Friday, 26 April 2019

चौगावचा विजयगड व श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर










चौगावचा विजयगड व श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर
जळगाव जिल्ह्यात प्राचिन वैभवसंपन्न राजघराण्यांचा वारसा सांगणारे काही गडकोट आहेत व ते आवर्जून पाहाण्यासारखे आहेत.यावर कोणाचाही चटकन विश्वास बसणार नाही.अशा या गड किल्ल्यांच्या द्रुष्टीने फारसा ऐकिवात नसलेल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुडाच्या पहिल्याच रांगेत एका उंचच उंच कड्यावर कधी काळी घोर गर्द जंगल असलेल्या जंगलभागात हिरमुसले तोंड करून दुर्ग विरांची व पुरातत्व विभागाची आतुरतेने वाट पाहात बसलेला  चौगावचा विजयगड उभा आहे..

प्राचीन काळापासून मध्यप्रदेशात जाणार्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या चौगावच्या विजयगडाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते.असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा चौगावचा किल्ला समुद्र सपाटी पासुन 660 मीटर उंचीवर उभा असुन तो चौगाव गावापासुन उत्तरेला असणार्या सातपुडा डोंगराच्या पहिल्याच रांगेत उभा विराजमान आहे.
चोपड्यापासून नऊ कि.मी.अंतरावर पश्चिमेला चौगाव गाव असून चौगाव पासून साधारण चार कि.मी.उत्तरेला चारचाकी किंवा दुचाकी वाहणाने आपण गडाशेजारच्या महादेव मंदिराशेजारी येऊन पोहचतो.या ठिकाणी तीन प्रवाहीत ओढ्यांचा संगम असल्यामुळे यास त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जाते येथे काही शतकापुर्वीचे बांधेले सुंदर असे प्रशस्त महादेवाचे मंदिर आहे.या मंदिराभोवती जंगलात भरपुर सरपण व ओढ्याला पावसाळ्यात नेहमी थंडगार पाणी असल्यामुळे तसेच अलिकडच्या काळात मोठे पत्री शेड उभारण्यात आल्याने हे मंदिर दुर्गभटक्यांना पथार्या पसरायला योग्य आहे.त्रिवेणी संगमाच्या या गाभार्यात शिवलिंग,पंच मुखी हनुमान,गणपती व नंदी सभोवार असणारे खांब व त्यावर तोललेल्या कमानी तसेच मंदिराच्या संमुख भागात संस्क्रुत भाषेत असलेली कोणशिला जुन्या परंपरेला साजेशा अश्याच आहेत.
आपण मंदिर परीसर पाहून शेजारील ओढा पार करून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोहचतो.येथे समोरच उत्तरेस आपणास खुरट्या झाडी -झुडपाने व्यापलेला चौकोणी आकाराचा चौगावचा विजयगड दिसतो.या किल्ल्याच्या आसपास अनेक छोटे मोठे डोंगर असून त्यांना काली टेकडी,बांदरा डोंगर लहाण चिपाट्या म्हणून ओळखले जाते.येथिल पठारावरून आपण गडाशेजारी जाऊन पोहचतो.चौगावचा किल्ला जरी उंचीने थोडका असला तरी याचा अंतिम कातळटप्पा सभोवार विस फुटाचा ताशीव असाच आहे.त्रिवेणी संगम मंदिरापासुन चालायला सुरवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पुर्वाभिमुख प्रवेशद्वाराच्या समोर येऊन पोहचतो.सुबक घडीव अशा आयताक्रुती दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत उभे असुन त्याच्या माथ्याची कमान फारच सुंदर आहे.प्रवेद्वाराच्या बाहेरूनच डाव्याबाजूला एक पायवाट असुन अगदी हाकेच्या अंतरावर दोन भुयारी टाक्या आहेत.त्यातील एका टाकीत खाली उतरल्यावर दुरवर कायम थंडगार पाणी भरलेले असते.तर बाजूलाच दुसरी भुयारी टाकी आहे तिला उंबरची टाकीही म्हणतात.तेथेही खाली उतरल्यावर 20 ते 25 फुट स्टार्च लावून भुयारी मार्गाने पुढे जावे लागते.आत गेल्यावर तेथे आई भवानीची मुर्ती द्रुष्टीस पडते.आत बसण्यासाठी मोकळीक आहे.तेथून परत प्रवेद्वाराकडे येऊन या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चौगाव गडाचा झाडी भरला माथा आपणास दिसतो .गड प्रवेश केल्याकेल्या समोरच एक कोरडा तलाव असुन तो पार करून पुढे गेल्यावर डाव्या हाताला झेंडा बुरूज लागतो.या बुरूजाभोवतीची तटबंदी आजही उत्तम स्थितीत उभी असुन येथेच आसपास भिंती शाबुत असलेली शिबंदीची घरटी आपणास दिसतात.ही घरटी पाहून पुढे गेल्यावर एका झाडाखाली कोरीव सुघड दगड एकत्र करून रचलेले दुर्गादेवीचे अर्धवट मंदिर पाहावयास मिळते.या छोट्या मंदिरात देवीचा मुळ तांदळा व अलिकडे बसवलेली मुर्ती असुन परीसरात अनेक इतस्तत: पडलेले कोरीव दगड आपणास दिसतात.या दगडांवरून येथील इतिहास काळातील मंदिर काही वेगळेच असणार याची आपणास थोडीफार कल्पना येते.या मंदिराच्या पुढेच थोडे खालच्या बाजूस झाडी भरल्या भागात दगडात कोरीव टाक्यांचा समुह असुन  या टाक्यांतील पाणी गड चढाईचा थकवा घालविणारे आहे.या टाकी समुहात मधोमध दगडाच्या भिंती असुन त्यावरून आपण ईकडे तिकडे फिरू शकतो.या टाक्यांना लागून चार कमानीयुक्त गुहालेणी आहेत.
गडावरील हा टाकी समुह पाहून आपण एक चढ चढून उत्तरेकडील उंचवट्यावर बांधलेल्या राजप्रसादाच्या इमारतीजवळ पोहचतो.येथिल वाड्यास या भागातील लोक गवळी राजांचा राजप्रसाद म्हणून ओळखतातचौगाव किल्ल्यावरील या वाड्याच्या सभोवती विस ते पंचवीस फुट उंचीच्या दगड व  चुन्याच्या मदतीने बांधलेल्या भिंती आजही उत्तम स्थितीत उभ्या आहेत.विशेष करून या भिंतींच्या माथ्यावर दोन टप्प्यात केलेले नक्षीकाम फारच सुंदर असुन असे काम इतरञ कोणत्याही किल्ल्यावर पाहावयास मिळत नाही .त्यामुळे हे राजप्रसादावरचे विटांचे नक्षीकाम आपल्यासाठी संस्मरणीय ठरते.पुर्व बाजूने प्रवेश्द्वार असलेल्या या वाड्याच्या आत गेल्यावर समोरच एक भिंत असुन तिला वळसा मारून आत प्रवेश केल्यावर या वाड्याची भव्यता आपल्या नजरेस भरते.या वाड्याच्या आतील बाजुस अनेक दालने ,देवळ्या व कोनाडे आजही आपले अस्तित्त्व टिकवून असुन हा सर्व परीसर पाहील्यानंतर गड नांदता असतांना या राजप्रसादाचा डामडौल किती न्यारा असेल याचे चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभे रहाते.याच्याच पश्चिमेला पावसाळ्यात सहाशे मीटर उंचीचा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहात असतो.हा रोहर्षक नजारा पाहाण्यासाठी खास करून पावसाळ्यात अनेक भागातून पर्यटक या ठिकाणी येत असतात.या वाड्यासमोरील मोकळ्या जागेत सहा फुट लांबीच्या ऐतिहासिक तोफा सन 1977 साली सापडल्या असुन त्या चोपडा तहसिलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत.गडाच्या उत्तरेस खालच्या बाजूस गडाचे दुसरे प्रवेशद्वार असुन त्याला डोंगरी दरवाजा म्हणतात.
असा हा चौगावचा विजयगड जळगाव जिल्ह्यातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असुन परीसरात अनेक वन्य प्राणी ,पक्षी द्रुष्टीस पडत असुन अस्वल,मोर, हरण,जंगली डुक्कर,तडस,ससे आदि प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.पावसाळ्यात खास करून श्रावण महिण्यात या ठिकाणी दुर्ग प्रेमी पर्यटकांची मोठी वर्दळ असते.श्रावनी सोमवारला या भागात यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.
      विश्राम तेले
उपाध्यक्ष, वन व्यवस्थापण समिती चौगाव
तालुका संपर्क प्रमुख,निसर्ग मित्र समिती चोपडा
मो.9823985631

No comments:

Post a Comment