Followers

Wednesday, 30 June 2021

जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष, नेवासा

 













जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष, नेवासा

भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे महाराष्ट्रातील एकमेव मंदीर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावात असून सध्याचे हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी अठराव्या शतकात बांधले आहे. मंदिरातील गर्भगृहात भगवान विष्णूची मोहिनी अवताराची मूर्ती जिला भक्त "मोहिनीराज" म्हणतात ती अर्धनारी नटेश्वर रूपातील आहे. याच गावात प्रवरा नदीच्या तीरावर मोहिनीराजाचे जुने पुरातन मंदिर अस्तित्वात होते असे ग्रामस्थ सांगतात. आज त्या मंदिराचे केवळ भग्न अवशेष शिल्लक आहेत.
जुन्या मंदिराचा शोध घेत असताना आपण एका अरुंद रस्त्याने प्रवरा नदीच्या घाटावर जाऊन पोहचतो. तिथे आपल्याला भग्नावस्थेत असलेले मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिराचे काही अवशेष, शिवपिंडी, भग्न नंदी व काही मूर्ती इतरत्र विखुरलेल्या दिसतात. सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या प्रवेशद्वाराच्या सुंदर द्वारशाखेवरून पुरातन मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. घाटावर अजून काही मंदिरे असून त्यातील गणपती व मारुती मंदिर चांगल्या स्थितीत आहेत. या सर्व अवशेषांवरून लक्षात येते की प्राचीन असा ऐतिहासिक वारसा नेवासा गावाला लाभला आहे.

इक्केरीचा अघोरेश्वर, कर्नाटक.






















 इक्केरीचा अघोरेश्वर, कर्नाटक.

सदाशिव नायक या राजानं सन १५४० च्या आसपास केळदी इथली आपली राजधानी इक्केरी इथं हलवली. तेव्हापासून केळदीच्या नायकांना ‘इक्केरीचे नायक’ अशी उपाधी लागली. पुढची १२० वर्षं या नायकांनी इक्केरी इथून आपला राज्यकारभार चालवला; पण हे नायक मुळात होते कोण आणि ते आले कुठून याचा इतिहास मोठा चित्तवेधक आहे.
शिवाजीमहाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी कर्नाटकमधलं विजयनगर साम्राज्य हे भारतातलं शेवटचं स्वतंत्र, सार्वभौम हिंदुसाम्राज्य होतं. हम्पी ही या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरच्या साम्राज्याच्या सीमा दक्षिण भारतात सर्वदूर पसरलेल्या होत्या. त्या सर्व भागावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून आणि प्रशासनाच्या सोईसाठी साम्राज्याचं विभाजन मदुराई, तंजावर, जिंजी, इक्केरी, म्हैसूर अशा वेगवेगळ्या भागांत केलं गेलं होतं. या विभागांचं प्रशासन पाहण्याऱ्या लोकांना नायक अथवा पाळेगार असं म्हणत. हे अधिकारी सहसा राजघराण्याशी संबंधित असत. त्यांचं कर्तृत्वही तसंच असे. आपल्या अखत्यारीतल्या विभागात त्यांना निर्णय घेण्याची बऱ्यापैकी स्वायत्तता असे. त्यामुळे असे नायक किंवा पाळेगार त्या प्रदेशाचे जवळजवळ राजेच बनत.पुढं सोळाव्या शतकात तालिकोटाच्या लढाईत दक्षिणेतल्या सर्व मुसलमान सल्तनतींनी एकत्र लढून विजयनगरच्या हिंदुसाम्राज्याचा दारुण पराभव केला आणि राजधानी हम्पी लुटून, जाळून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. स्वतः सम्राट रामराया या लढाईत मारला गेला. राजवंशातले उरलेसुरले लोक पेनुकोंडा या किल्ल्यातून नाममात्र राज्यकारभार पाहू लागले; पण विजयनगरचं साम्राज्य तर लयाला गेलंच होतं; त्यामुळे ठिकठिकाणी जे राज्याचा कारभार पाहणारे नायक होते त्यांनी, छोटी का होईना; पण स्वतंत्र राज्ये निर्माण केली.मदुराई, जिंजी, इक्केरी, तंजावर इत्यादी स्वतंत्र राज्ये अशीच निर्माण झाली.इक्केरीबद्दल सांगायचं तर, बिदनूरचा बसप्पा हा या घराण्याचा मूळ नायक. त्यानं प्रथम काही सैन्य जमवून आसपासची गावं आपल्या ताब्यात घेतली व तो पाळेगार झाला. त्याचा मुलगा सदाशिव हा अत्यंत शूर होता. त्यानं विजयनगरच्या राजाला लढाईमध्ये खूप मदत केली, त्याबद्दल त्याला ‘रायनायक’ ही पदवी मिळाली. त्यानंच आपली राजधानी केळदीहून इक्केरीला हलवली. त्याचा किल्ला आणि राजवाडा एकेकाळी इक्केरीत होता; पण आज मात्र या गावात एकच जुनी इमारत शिल्लक आहे व ती म्हणजे, सदाशिव नायकाचा धाकटा मुलगा चिक्क संकण्णा या नायक राजानं सोळाव्या शतकात बांधून घेतलेलं अघोरेश्वराचं मंदिर. माडा-सुपाऱ्यांच्या गर्द रायांनी वेढलेलं अघोरेश्वराचं हे सुंदर मंदिर कदंब, होयसळ आणि कर्णाट-द्रविड अशा मिश्रशैलीतलं आहे. प्रवेशद्वारावर मोठं रायगोपुर हे खास विजयनगरशैलीचं वैशिष्ट्य मात्र इथं दिसत नाही. भव्य गोपुराऐवजी अघोरेश्वरमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी ग्रॅनाईटची एक साधी अनलंकृत कमान आहे. त्या कमानीखालून आपण गेलो की काही पायऱ्या चढून मंदिराच्या भव्य प्राकारात आपण प्रवेश करतो.मंदिरप्राकारात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतो तो अतिशय भव्य असा चौकोनी आकाराचा स्वतंत्र नंदीमंडप. हा नंदीमंडप मंदिराशी जोडलेला नाही. लालसर ग्रॅनाईट दगडात उभारलेल्या या नंदीमंडपाच्या दर्शनी भिंतीवर सुरेख कोरीव काम आहे. बाहेरच्या लालसर दगडाच्या पार्श्वभूमीवर आतला काळा कुळकुळीत नंदीश्वर चांगलाच उठून दिसतो. आपल्या देवाकडे, म्हणजे शिवाकडे, एकटक दृष्टी लावून डौलात बसलेला हा नंदी त्याच्या गळ्यातल्या घंटांच्या माळांमुळे खूपच गोड दिसतो. हा नंदी एकाच काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. नंदीमंडपाच्या महिरपी कमानीवर इस्लामी वास्तुशैलीचा थोडासा प्रभाव दिसतो. नंदीमंडप आणि मुख्य मंदिराच्या मध्ये नैवेद्य किंवा बळी अर्पण करण्यासाठी वापरले जाणारे बळीपीठ आहे.नंदीमंडपासमोर मुख्य मंदिराचं उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजांच्या दर्शनी भिंतींवर उत्तम कोरीव काम आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत मंदिर विभागलेलं आहे. सभामंडप भव्य अशा १२ खांबांवर तोललेला आहे. खांबांवरदेखील उत्तम कोरीव काम आहे. सभामंडपाच्या बरोबर मध्यावर छतावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन छोटी देवकोष्ठे आहेत, ज्यांत श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा आहेत. भिंतीवर अजून दोन देवकोष्ठे आहेत, जिथं महिषासुरमर्दिनी आणि भैरवाची शिल्पं आहेत. सभामंडपाच्या भिंतीच्या वरच्या भागात दगडात कोरलेली जालवातायनं आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा कोरीव कामानं नटलेली आहे. दोन्ही बाजूंना शैव द्वारपाल आहेत. गर्भगृहात अघोरेश्वराची सध्या शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते; पण एकेकाळी इथं अघोरेश्वराची चोवीस हातांची भव्य मूर्ती होती. पुढं मुसलमानी आक्रमकांनी त्या मूर्तीचा विध्वंस केला. आज आपल्याला त्या मूर्तीचे केवळ तुटलेले पाय दिसतात, तेही बाजूच्या हिरवळीवर नुसतेच ठेवलेले!दक्षिणी स्थापत्यानुसार आणि आगमशास्त्रानुसार, अघोरेश्वर शिवाच्या मुख्य मंदिराशेजारी शिवपत्नी पार्वतीचं अखिलांडेश्वरी या स्वरूपात स्वतंत्र छोटंसं मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या स्तंभांवर व्याळ या काल्पनिक पशूची सुंदर शिल्पं कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. सागर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे अघोरेश्वराचं सुंदर मंदिर मुद्दाम जाऊन बघण्यासारखं निश्चित आहे.(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)Edited By - Prashant Patil.

Friday, 25 June 2021

लोहगड किल्ला

 

🚩

लोहगड किल्ला
🚩
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निते. सातवाहन, चालुक्य, [[, यादव VM BN BN या सवटी या किल्ल्याने पाहिल्या.

इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.

इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.

पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला.

Friday, 18 June 2021

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेला घोडेश्वरचे किल्ला

 










घोडेश्वरचे किल्ला

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेला
संताजी धनाजीच्या हल्लापासुन बचावासाठी बांधलेले घोडेश्वरचे किल्ला
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून35 कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. सरसेनापती संताजी घोरपडे व सेनापती धनाजी जाधव यांच्या भीतीपोटी हे किल्ले बांधले होते औरंगजेब यांना या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा घोडेश्वरचे किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे घोडेश्वर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. घोडेश्वर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर भुईकोट किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
सदर किल्ला बदल खोटे इतिहास व माहिती कोण देऊ नये