Followers

Wednesday, 30 June 2021

इक्केरीचा अघोरेश्वर, कर्नाटक.






















 इक्केरीचा अघोरेश्वर, कर्नाटक.

सदाशिव नायक या राजानं सन १५४० च्या आसपास केळदी इथली आपली राजधानी इक्केरी इथं हलवली. तेव्हापासून केळदीच्या नायकांना ‘इक्केरीचे नायक’ अशी उपाधी लागली. पुढची १२० वर्षं या नायकांनी इक्केरी इथून आपला राज्यकारभार चालवला; पण हे नायक मुळात होते कोण आणि ते आले कुठून याचा इतिहास मोठा चित्तवेधक आहे.
शिवाजीमहाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी कर्नाटकमधलं विजयनगर साम्राज्य हे भारतातलं शेवटचं स्वतंत्र, सार्वभौम हिंदुसाम्राज्य होतं. हम्पी ही या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरच्या साम्राज्याच्या सीमा दक्षिण भारतात सर्वदूर पसरलेल्या होत्या. त्या सर्व भागावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून आणि प्रशासनाच्या सोईसाठी साम्राज्याचं विभाजन मदुराई, तंजावर, जिंजी, इक्केरी, म्हैसूर अशा वेगवेगळ्या भागांत केलं गेलं होतं. या विभागांचं प्रशासन पाहण्याऱ्या लोकांना नायक अथवा पाळेगार असं म्हणत. हे अधिकारी सहसा राजघराण्याशी संबंधित असत. त्यांचं कर्तृत्वही तसंच असे. आपल्या अखत्यारीतल्या विभागात त्यांना निर्णय घेण्याची बऱ्यापैकी स्वायत्तता असे. त्यामुळे असे नायक किंवा पाळेगार त्या प्रदेशाचे जवळजवळ राजेच बनत.पुढं सोळाव्या शतकात तालिकोटाच्या लढाईत दक्षिणेतल्या सर्व मुसलमान सल्तनतींनी एकत्र लढून विजयनगरच्या हिंदुसाम्राज्याचा दारुण पराभव केला आणि राजधानी हम्पी लुटून, जाळून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. स्वतः सम्राट रामराया या लढाईत मारला गेला. राजवंशातले उरलेसुरले लोक पेनुकोंडा या किल्ल्यातून नाममात्र राज्यकारभार पाहू लागले; पण विजयनगरचं साम्राज्य तर लयाला गेलंच होतं; त्यामुळे ठिकठिकाणी जे राज्याचा कारभार पाहणारे नायक होते त्यांनी, छोटी का होईना; पण स्वतंत्र राज्ये निर्माण केली.मदुराई, जिंजी, इक्केरी, तंजावर इत्यादी स्वतंत्र राज्ये अशीच निर्माण झाली.इक्केरीबद्दल सांगायचं तर, बिदनूरचा बसप्पा हा या घराण्याचा मूळ नायक. त्यानं प्रथम काही सैन्य जमवून आसपासची गावं आपल्या ताब्यात घेतली व तो पाळेगार झाला. त्याचा मुलगा सदाशिव हा अत्यंत शूर होता. त्यानं विजयनगरच्या राजाला लढाईमध्ये खूप मदत केली, त्याबद्दल त्याला ‘रायनायक’ ही पदवी मिळाली. त्यानंच आपली राजधानी केळदीहून इक्केरीला हलवली. त्याचा किल्ला आणि राजवाडा एकेकाळी इक्केरीत होता; पण आज मात्र या गावात एकच जुनी इमारत शिल्लक आहे व ती म्हणजे, सदाशिव नायकाचा धाकटा मुलगा चिक्क संकण्णा या नायक राजानं सोळाव्या शतकात बांधून घेतलेलं अघोरेश्वराचं मंदिर. माडा-सुपाऱ्यांच्या गर्द रायांनी वेढलेलं अघोरेश्वराचं हे सुंदर मंदिर कदंब, होयसळ आणि कर्णाट-द्रविड अशा मिश्रशैलीतलं आहे. प्रवेशद्वारावर मोठं रायगोपुर हे खास विजयनगरशैलीचं वैशिष्ट्य मात्र इथं दिसत नाही. भव्य गोपुराऐवजी अघोरेश्वरमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी ग्रॅनाईटची एक साधी अनलंकृत कमान आहे. त्या कमानीखालून आपण गेलो की काही पायऱ्या चढून मंदिराच्या भव्य प्राकारात आपण प्रवेश करतो.मंदिरप्राकारात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतो तो अतिशय भव्य असा चौकोनी आकाराचा स्वतंत्र नंदीमंडप. हा नंदीमंडप मंदिराशी जोडलेला नाही. लालसर ग्रॅनाईट दगडात उभारलेल्या या नंदीमंडपाच्या दर्शनी भिंतीवर सुरेख कोरीव काम आहे. बाहेरच्या लालसर दगडाच्या पार्श्वभूमीवर आतला काळा कुळकुळीत नंदीश्वर चांगलाच उठून दिसतो. आपल्या देवाकडे, म्हणजे शिवाकडे, एकटक दृष्टी लावून डौलात बसलेला हा नंदी त्याच्या गळ्यातल्या घंटांच्या माळांमुळे खूपच गोड दिसतो. हा नंदी एकाच काळ्या पाषाणातून कोरलेला आहे. नंदीमंडपाच्या महिरपी कमानीवर इस्लामी वास्तुशैलीचा थोडासा प्रभाव दिसतो. नंदीमंडप आणि मुख्य मंदिराच्या मध्ये नैवेद्य किंवा बळी अर्पण करण्यासाठी वापरले जाणारे बळीपीठ आहे.नंदीमंडपासमोर मुख्य मंदिराचं उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजांच्या दर्शनी भिंतींवर उत्तम कोरीव काम आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागांत मंदिर विभागलेलं आहे. सभामंडप भव्य अशा १२ खांबांवर तोललेला आहे. खांबांवरदेखील उत्तम कोरीव काम आहे. सभामंडपाच्या बरोबर मध्यावर छतावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूंना दोन छोटी देवकोष्ठे आहेत, ज्यांत श्रीगणेश आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा आहेत. भिंतीवर अजून दोन देवकोष्ठे आहेत, जिथं महिषासुरमर्दिनी आणि भैरवाची शिल्पं आहेत. सभामंडपाच्या भिंतीच्या वरच्या भागात दगडात कोरलेली जालवातायनं आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा कोरीव कामानं नटलेली आहे. दोन्ही बाजूंना शैव द्वारपाल आहेत. गर्भगृहात अघोरेश्वराची सध्या शिवलिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते; पण एकेकाळी इथं अघोरेश्वराची चोवीस हातांची भव्य मूर्ती होती. पुढं मुसलमानी आक्रमकांनी त्या मूर्तीचा विध्वंस केला. आज आपल्याला त्या मूर्तीचे केवळ तुटलेले पाय दिसतात, तेही बाजूच्या हिरवळीवर नुसतेच ठेवलेले!दक्षिणी स्थापत्यानुसार आणि आगमशास्त्रानुसार, अघोरेश्वर शिवाच्या मुख्य मंदिराशेजारी शिवपत्नी पार्वतीचं अखिलांडेश्वरी या स्वरूपात स्वतंत्र छोटंसं मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच्या स्तंभांवर व्याळ या काल्पनिक पशूची सुंदर शिल्पं कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. सागर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे अघोरेश्वराचं सुंदर मंदिर मुद्दाम जाऊन बघण्यासारखं निश्चित आहे.(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)Edited By - Prashant Patil.

No comments:

Post a Comment