Followers

Monday, 21 August 2023

नागेश्वर शिवमंदिर, कर्जत

 











नागेश्वर शिवमंदिर, कर्जत
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे एक तालुक्याचे ठिकाण असून नगर जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. अलीकडच्या काळात कर्जत शहराची ओळख शिक्षण पंढरी अशी होत असली तरी प्राचीन काळापासून या शहराला ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आपणास दिसून येते. येथील पुरातन मंदिरे पाहिल्यानंतर शहराच्या समृद्ध व वैभवशाली इतिहासाची आपल्याला जणू खात्री पटते.
शहरातील पूर्वेकडील भागात नकटीचे देऊळ म्हणून ओळखले जाणारे यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. समोरच मल्लिकार्जुन या नावाने ओळखले जाणारे आणखी एक पुरातन मंदिर असून दोन्ही मंदिरापासून साधारण शंभर मीटर अंतरावर नागेश्वर नावाने ओळखले जाणारे शिवमंदिर आहे. ही सर्व मंदिरे आजही शहराच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत आहेत.
नागेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आपल्या नजरेस पडते. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे तसेच गर्भगृहावरील शिखर नव्याने बांधले गेले आहे. मुखमंडप कक्षासनयुक्त असून दोन वामन स्तंभावर तोललेला आहे. सभामंडपात चार स्तंभ आहेत. गर्भगृहात आपल्याला दक्षिणोत्तर नागेश्वर महादेवाचे शिवलिंग नजरेस पडते.
मंदिराच्या डाव्या बाजूला सतीशिळा, वीरगळ, नागशिल्पं व काही शिल्पांवशेष आपल्याला दिसतात. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात आपल्याला अनेक नागशिल्पं नजरेस पडतात. गावोगावी दिसणाऱ्या ह्या नागशिल्पांचा नेमका अर्थ आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळतो.
नागवंशीय लोक जेव्हा आपल्या धर्मप्रचारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी आपल्या राजांची आठवण म्हणून मोठ्या मोठ्या शिळांवर या राजांची प्रतिमा कोरली. मध्ययुगीन काळात याच नागशिल्पांचा वापर मंदिरावर देखील करण्यात येऊ लागला. ह्यात काळानुसार अनेक बदल होत गेले आणि नागपंचमी ह्या सणाला हीच नागशिल्प जी कधीकाळी नागराजांची आठवण होती नागपंचमीच्या सणाला पुजली जाऊ लागली.
- रोहन गाडेकर

Sunday, 20 August 2023

जबरेश्वर मंदिर फलटण जिल्हा सातारा

 











जबरेश्वर मंदिर
फलटण जिल्हा सातारा
फलटण शहरात यादव काळात बांधलेले "जरबेश्वर मंदिर" फलटण शहरात आजही राजवाडा आणि श्रीराम मंदिरा यांच्या समोरच रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे हेमांडपंथी शैलीतील तारकाकृती मंदिर आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहिती फलकानुसार जरबेश्वर हे मूळचे जैन मंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर चोवीस जैन तीर्थकरांच्या मूर्ती व गणेश पट्टीतील जैन तीर्थंकर मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. यवनांच्या टोळधाडीत या सुंदर मंदिराचीही तोडफोड आणि नासधूस केली आहे. प्रत्येक सुंदर मुर्तीचे अवयव तोडले गेले आहेत. यवनांच्या तोडफोडी नंतर हे मंदिर ओसाड पडले होते ‌. फलटण चे राजे चौथे मुधोजीराव निंबाळकर १८५३ - १९१६ यांनी रिकाम्या जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे असे सांगितले जाते. मंदिरच्या बाह्य अंगावर विविध अप्रतिम शिल्प सौंदर्यने नटलेल्या सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाचे द्वार खूपच सुंदर आणि कलाकुसरयुक्त आहे . मंदिरात उजव्या बाजूला देवकोष्टात विठ्ठल-रुक्मीणीची प्रतिमा स्थापित असून मंदिरात नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्यातील महादेवाची पिंड चौकोनी आकाराची असून खूपच सुंदर आहे.

पुरंधमधील श्री पांडेश्वर महादेव मंदिर

 

तुम्हाला हे विशाल शिवपिंड असलेले



पुरंधमधील श्री पांडेश्वर महादेव मंदिर माहितेय का?
श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक सासवड किंवा मोरगाव सारख्या मुख्य रस्त्यावरील मंदिराकडे वळतात, परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास अद्वितीय वास्तुकला असलेली मंदिरे पहावयास मिळते. जेजुरी पासून साधारण दहा ते बारा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे, महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात, अशी लोकधारणा आहे .
या मंदिराला गौरवशाली वारसा आहे. शिखर, दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे, रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.इतर देवतांची शिल्पेही येथे आहेत ,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यक्ष नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.
जेजुरी परिसरातील या अद्वितीय शिल्पकलेने समृद्ध असलेल्या मंदिराला किमान एकदा तरी भेट द्यावी.