किल्ले असावा .....
ठाणे जिल्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी डहाणू, तारापूर, ठाणे, कल्याण इत्यादी बंदरातून मोठया प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणार माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक असावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणाऱ्या मार्गांवर प्राचीनकाळी बांधण्यात आला. ठाण्यातील पुरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा रज दिवसाचा ट्रेक आल्हाददायक होतो.
पाहण्याची ठिकाणे :
गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड रकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली 2 टाक्या आहेत. त्यापैकी मोठ्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाक आहे. या टाक्यांची लांबी 59 फूट व खोली 15 फुट आहे. या टाक्याचे वैशिष्ठ म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. या टाक्यांची भिंत फुटल्याने यात आता पाणी साठत नाही.
हे टाक पाहून उत्तरेकडे चालत जाताना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वाराची जागा दिसते. प्रवेशद्वार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतींचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायऱ्याही मिळतात.
प्रवेशद्वार पाहून किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहार. हे लहान असून त्याची रचना मोठ्या टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी खोदलेली आहे.या पन्हालीतून येणारे पाणी टाकायला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायऱ्या कोरलेल्या आहेत.
याशिवाय किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेल्या गुहा व टाक आहे. ते पाहण्यासाठी मोठ्या टाक्या जवळून खाली उतरून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळसा घालून पूर्वेकडे जावे लागते. गुहा पाहिल्यावर आपली गडफेरी संपते. गुहे जवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. पण ती फारशी वापरात नसल्यामुळे वाटाड्या बरोबर असेल तरच या वाटेने उतरावे.
गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा:
रेल्वेने : - बोईसर हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे स्थानक आहे. असावा किल्ला पाहण्यासाठी बोईसर हे जवळचे स्थानक आहे. मुंबई सेंट्रलहुन सुटणाऱ्या काही पेसेंजर गाड्या बोईसरला थांबतात. तसेच विरार - डहाणू या दर तासाला सुटणाऱ्या गाड्या बोईसरला थांबतात. डोंबिवलीहून 5.33 ला सुटणारी गाडी मध्य रेल्वेवरील सर्वांसाठी सोईची आहे. असावा किल्ला बोईसर पुर्वेकडे आहे, पण किल्ल्यावर जाण्यासाठी बसेस व टमटम पश्चिमेला मिळतात. बोईसर पासून किल्क्यच्या पायथ्याचे वारंगडे गाव 8 किलोमीटरवर आहे.
रस्त्याने :- मुंबई -अहमदाबाद महामार्गावर मुंबई पासून 92 किलोमीटरवर बोईसरला जाणारा चिल्हार फाटा आहे. या फाट्यावरून बोईसरला जाताना 10 किलोमीटर वारंगडे हे गाव आहे.
वारंगडे गावात विराज फॅक्टरी आहे. वारंगडे गावातून विराज फॅक्टरीकडे जातांना फॅक्टरीच्या अगोदर उजव्याबाजूस बारीपाडा गावाकडे जाणार रास्ता जातो. या फॅक्टरीच्या कम्पाउंडला लागून जाणार रास्ता 850 मीटरवरील किल्ल्याच्या पायथ्याच्या बारीपाडा गावात जातो. गाव सुरू होण्यापूर्वीच अंगांवडीची बैठी इमारत डाव्या बाजूला दिसते. या इमारतीच्या बरोबर समोर एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. पावसाळ्यात एक छोटा ओहोळ ओलांडून जावे लागते. या कच्च्या रस्त्याने 5 मिनिटे चालल्यावर डोंगर व रस्ता यांच्या मधून आडवा जाणारा नाला लागतो. या नाल्यावर 3 फूट पूल आहे. येथून गडावर जाण्यासाठी 3 वाट आहेत.
१)पहिला पूल पार करून सरळ चालत गेल्यास आपण असावा किल्ला व त्याला लागून असलेला डोंगर या मधील खिंडीतून गडावर जातो. पुढे ही वाट मुख्य वाटेला मिळते. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते. वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. या वाटेने साधारणतः पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचता येते.
२)पहिला पूल पार करून डाव्या बाजूस चालत गेल्यास आपण असावा किल्ल्याच्या डोंगराजवळ पोहोचतो. हि वाट खड्या चढणीची असून दाट जंगलातून जाते व किल्ल्याखाली असलेल्या गुहे जवळून गडावर जाते. हि वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्या घेऊनच या वाटेने जावे. पावसाळ्यात ही वाट टाळावी. या वाटेने साधारणतः पाऊण तासात किल्ल्यावर पोहोचतो.
३)पहिल्या पुलापाशी आल्यावर तो पूल न ओलांडता उजव्या बाजूच्या कच्चा रस्ता पकडावा. थोड्या अंतरावर दुसरा पूल लागतो. त्यापुढे तिसरा पूल आहे. हा तिसरा पूल पार केल्यावर समोरच्या टेकडीकडे जाणारी पायवाट दिसते. हि किल्ल्यावर जाणारी राजवाट आहे. किल्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला वळसा घालून ही वाट हळूहळू चढत किल्ल्यावर जाते. हि वाट दाट झाडीतून जात असल्याने थकवा जाणवत नाही. किल्ल्याच्या डोंगरावर आल्यावर मात्र वाट खड्या चढणीची आहे. या वाटेने साधारणतः 1 ते 1.5 तासात आपण किल्ल्यावर पोहोचतो. हि वाट मळलेली व रुंद असल्यामूळे या वाटेने गडावर जाण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.
राहण्याची सोय :- गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :- गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :- फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :- पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १.३० तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :- जुने ते मार्च.
ट्रेकिंगकडे वळणारी तरुणाई आता हळूहळू गडसंवर्धनासाठी सुद्धा झटत आहे. दुर्गप्रेमींच्या माध्यमातून संघटन करुन सातत्याने मोहिमा घेत आहेत. या मोहिमांमुळेच किल्ल्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली किंवा टाक्यांतील गाळात गाडले गेले अवशेष पुन्हा बाहेर येऊ लागतात. 'बा रायगड परिवाराने' रविवारी आयोजित 'किल्ले असावा' संवर्धन मोहिमेत असाच ऐतिहासिक ठेवा आढळून आला. किल्ल्यावरील सुकलेल्या पाण्याच्या टाक्यातील गाळ साफ करत असताना त्या गाळात गाडली गेलेली एक भरभक्कम चांगल्या स्थितीतील तोफ सापडली.
बोईसरजवळ असलेल्या 'असावा' किल्ल्याच्या संवर्धनासाठी जोशपूर्ण वातावरणात गाळ काढायला सुरुवात केली. पुढच्या ३० ते ४० मिनिटांनी तोफेचा पुढील भाग सर्वांना दिसला. त्यामुळे सगळ्यांनाच स्फुरण चढले. छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणांनी गडाचा कानाकोपरा दुमदुमून गेला. गेले वर्षभर चाललेल्या कार्याचे फळ या तोफेच्या रूपाने मिळाले असून यात प्रत्येक मोहिमेस हजर असलेल्या सर्व सहभागींचा मोलाचा वाटा आहे.
तज्ज्ञांच्या मते ही तोफ ब्रिटिशकालीन असावी. तोफेची लांबी १४० सेमी, तोफेच्या तोंडाचा व्यास ८.५ सेमी, मागचा परीघ ७४ सेमी तर पुढचा परीघ ५४ सेमी इतका आहे. तोफेवर इंग्रजी अक्षर 'बी' सदृश अक्षर कोरलेले आहे. पुढील मोहिमेत ही तोफ टाक्यातून वर काढून व्यवस्थितपणे साफ करण्यात येईल. पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली नीट जतन केली जाईल.
माहिती साभार - किल्ले महाराष्ट्र