कसबा, संगमेश्वर,रत्नागिरी
कोकणाला लाभलेल्या निसर्गाबद्दल,इथल्या प्राचीन मंदिराच्या अद्भुत स्थापत्यशास्त्राबद्दल बोलावं, लिहावं तेव्हढ कमीच. मागच्या पोस्ट मध्ये सोमेश्वर मंदिर राजवाडी आणि सप्तेश्वर मंदिराची भ्रमंती केली प्रत्येक मंदिराच एक वेगळेपण पाहायला मिळले.आज रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक, मुंबई -गोवा महामार्गापासून जवळ असलेल्या कसबा मधील प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिराची भ्रमंती करणार आहोत.
अलकनंदा,वरूणा व शास्त्री नदीच्या संगमावर बसलेले हे संगमेश्वर.महामार्गावरील येथून ३ कि.मी. आतमध्ये कसबा संगमेश्वर हा भाग आहे.सुरूवातीला गावात प्रवेश केल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे.त्या मागून सरळ गेलेल्या रस्ता थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो .श्री कर्णेश्वर शिवमंदिर २६ मीटर लांब व २३ मीटर रूंद असून दिड मीटर उंचीच्या जोत्यावर उभारले आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे. तर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही बाजूकडून मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकेक प्रवेशद्वार आहेत.पूर्वेच्या दारातून आत गेले की प्रवेशद्वाराच्या बाजूला व्दारपाल आहेत.मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकार घुमट कोरलेला आहे.त्यामधील दगडी झुंबर पाहण्यासारखे आहे.त्याच्या खाली अष्ट दिक्पाल त्यांच्या वाहनावर बसलेले दाखवले आहेत समुद्रमंथन, यशोदा दधीमंथन हे प्रसंग कोरलेले आहेत..दरवाजाच्या वरच्या बाजूला शेषशायी विष्णू असून त्यावर दशावतारी शिल्प कोरलेली आहेत.दरवाजा वर व्दारशाखा नक्षीकाम करण्यात आले आहे.सभामंडपात आल्यावर रंगशिळेवर नंदी विराजमान आहे. सभामंडपाच्या खांबावर विविध नक्षीकाम करण्यात आले आहे.इतर मंदिरा पेक्षा इथे जरा वेगळेपण पाहायला मिळते ते म्हणजे साधारण काही मंदिरातच्या खांब आणि तुळ्या च्या मध्ये यक्ष किन्नर मंदिराचा भार त्यांच्या खांद्यावर घेतलेले आहे असे दाखवण्यात येते परंतु या मंदिरात यक्षांच्या जागी गणपती, नृसिंह ,सरस्वती या देवताच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.मंदिरात ब्रह्मदेव,शेषदारी विष्णू,वरदलक्ष्मी या देवतांच्या मूर्ती आहेत.तसेच छतावर वेगवेगळे नक्षीकाम पहायला मिळते.एक गद्यगळ आहे.गाभार्याच्या व्दारावर पण नक्षीकाम करण्यात आले आहे.गाभार्यात श्री कर्णेश्वराचे शिवलिंग आहे.मंदीरात गेल्यावर मंदीरातील पुजारी भाविकांना मंदिरा बद्दलची माहिती सांगत असतात.मंदिराच्या उत्तर, दक्षिण दरवाजावर पण नक्षीकाम करण्यात आले आहे.इतर मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केल्यावर जे पवित्र जल बाहेर पडले त्याठिकाणी गायमुख पहायला मिळते परंतु इथे मकर मुख आहे.मंदिराच्या सभोवताली रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजूस उमा महेश्वराची मुर्ती आहे.मंदिराचे मूळ शिखर आता अस्तित्वात नाही. सध्याचे शिखर हे नंतर जीर्णोद्धार केला तेव्हा बांधलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात दिपमाळ तसेच सुर्यदेवाचे आणि गणपतीचे मंदिर आहे.
'संगमेश्वरमाहात्म्य' नावाचा एक जुना ग्रंथ आहे. त्यात या मंदिरनिर्मितीबद्दल एक कथा येते. त्यानुसार चालुक्य घराण्यातील धनुर्धारी राजाला नाग, कर्ण, सिंघण असे तीन शूर पुत्र होते. यांचा मांडलिक राजा मारसिंह हा शिलाहारवंशीय होता. करवीर क्षेत्री त्यांनी श्री केदारेश्वर पाहिला. तेव्हा राजा कर्णाच्या मनात आपणही असेच एक भव्य मंदिर बांधावे असा विचार आला. कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर बांधणाऱ्या स्थापतीकडून मग त्याने कोट्यावधी सुवर्णनाणी खर्चून हे मंदिर बांधून घेतलं, असे उल्लेख संगमेश्वरमाहात्म्य या ग्रंथात आलेले आहेत..पराक्रमी चालुक्य राजा कर्ण याने हजार वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. म्हणून कर्णेश्वर नाव पडले. मंदिराच्या निर्मात्याला कर्ण राजाने दहा हजार सुवर्ण मुद्रा दिल्या. या कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने कर्ण राजाने या भागात तब्बल तीनशे साठ मंदिरे बांधून घेतली. आज त्यातील सत्तर एक मंदिरे आजूबाजूला आहेत. संगमेश्वर दक्षिण काशी म्हणून नावारूपाला आले असते.
सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने श्री कर्णेश्वर मंदिराचा राज्य संरक्षित स्मारक म्हणून सामाविष्ट केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच फितुरीने मोगलांच्या हाती लागलेले दुर्दैवी सरदेसाई वाडा याच ठिकाणी आहे.कर्णेश्वराचे मंदिर सोडून इतरही छोटीमोठी मंदिरे या ठिकाणी आहेत. आवर्जून वेळात वेळ काढून नक्की बघा.
शैलेश ज्ञानदेव तुपे
No comments:
Post a Comment