Followers

Saturday, 15 June 2019

#बाजारपेठेतील_शिळेवरील_शेषनाग

#बाजारपेठेतील_शिळेवरील_शेषनाग 🐍
किल्ले रायगडवर हुजूरबाजाराची म्हणजेच बाजारपेठ बसवून नुकतीच सुरुवात झाली होती, आता हिंदुस्तानातील अनेक व्यापारांना अभय देऊन आणि सन्मानाने आमंत्रण देऊन त्यांना या बाजारपेठेत स्थायिक करणे गरजेचे होते. कारण तसे न केल्यास परकीय शत्रुंना यांचा गैरफायदा घेणे सोयीचे झाले असते. यासाठी महाराजांना कोणीतरी सन्माननीय आणि भरवशाचा व्यक्ती आवश्यक होता जो ह्या बाजारपेठेचा संपूर्ण कारभार बघेल आणि सर्व व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून घेईल, तेव्हा शिवरायांना आठवण झाली ती म्हणजे बाबाजीनाईक पुंडे यांची. नगर जिल्हातील श्रीगोंदे येथील परंपरागत सावकार घराण्यातील बाबाजी शिवरायांच्या पदरी सन्मानाने आश्रित होते. विजापूरच्या आदिलशाहीशी शिवरायांच्या झालेल्या तहानुसार ते विजापूर दरबारी १६६७ पासून स्वराज्याचे वकील म्हणून काम पाहत होते. १६७२ मध्ये तह मोडल्यामुळे ते पुन्हा विजापूर येथून निघून रायगडावर येण्यास निघाले. श्रीगोंदे येथील नाईक यांचा परंपरागत सावकारीचा पेशा असल्यामुळे महाराजांना यांची बाजारपेठेसाठी सावकार किवा महाजन पदी नियुक्ती करणे सोयीस्कर ठरले. कारण कोणा लबाड लांडगा, शत्रूचा हेर यास गाळा देऊन बाजारपेठेत निवास देणे धोक्याचे होते. त्यावेळी बाबाजीनी विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयाखाली त्यांना हे सोन्याचे दिवस लाभले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या आजोबांमुळे “शेषाबानाईक पुंडे”. बाबाजीना ही आपल्या आजोबांची पुण्यायी वाटू लागे. त्यामुळेच बाबाजीनी आपल्या आजोबांचे ऋण लक्षात घेऊन ७ व्या किवा ८ व्या दुकानाच्या मधल्या शिळेवर शेशाबाची स्मृती म्हणून त्यांनी “शेषनाग” कोरवुन घेतला. यापुढे बाबाजीनाईक यांचे अस्तित्व दर्शवणारा तो शेषनाग हुजुरबाजाराचे वैभव दर्शवू लागला. आजही आपण त्या बाजारपेठेत फेरफटका मारताना त्या शेषनागाच्या शिळेजवळ क्षणभर थांबतो आणि त्याचे दर्शन घेतो. आपण जर नीट निरीक्षण करून पाहिल्यास असे दिसते कि हा एक फणा असलेला साधा नाग नसून छोटे छोटे असे सात फणे असलेला शेषनाग आहे. भोसले घराण्याशी प्रामाणिकता दर्शवणाऱ्या शेषाबानाईक यांची ती स्मृती आहे...!

No comments:

Post a Comment