Followers

Thursday, 27 June 2019

किल्ले मानगड


ता. माणगाव, जि. रायगड














किल्ले मानगड
प्रकार - गिरीदुर्ग
उंची - २३५ मीटर समुद्रसपाटीपासून
किल्ले पन्हाळेदुर्गची मोहिम पुर्ण करून आम्ही तडक किल्ले मानगडच्या पायथ्याशी असलेल्या मशिदवाडी मध्ये पोहचलो. जर पिंपरी-चिंचवड मधून किल्ले मानगडला जायचे असल्यास मुळशी - ताम्हिणी घाट मार्गे निजामपूर गाठायचे. निजामपूर मधून किल्ले रायगडला जाणारा रोड पकडायचा. पुढे बोरवाडी गावच्या फाट्यावरून बोरवाडी गाठायची. बोरवाडीतून बाहेर पडलेकी लगेचच उजवीकडे मशिदवाडीला फाटा फुटतो. मशिदवाडी ही बोरवाडी पेक्षा उंचावर असून किल्ले मानगडच्या पायथ्याला आहे. मशिदवाडीच्या थोड अलीकडे उजव्या हाताला शिवशंभोच्या मंदिराचा चौथरा आपले लक्ष वेधून घेतो. तो पहायला परत येऊ असे ठरवून आम्ही सरळ मशिदवाडीत पोहोचलो. गावातील एका घराच्या शेणाने सारवलेल्या ओट्यावर घरमालकाच्या परवानगीने जेवायला बसलो. भेळफरसाण, बिस्किटे आणि खजूर यावर ताव मारला. आजीने पाण्याची कळशी दिली, गावातील थंडगार पाण्याची चव मस्त होती. आजीचे आभार मानुन आम्ही गडाकडे निघालो.

मशिदवाडीची पाण्याची टाकी गडाच्या डोंगरावर बांधलेली आहे. पाण्याच्या टाकी जवळून पायवाट विंजाई (इंजाई) खिंडीत जाते. वाट चढणीला लागल्यावर रचिव दगडांच्या पायऱ्या लागतात. नागमोडी वळने घेत वाट खिंडीत पोहोचते. खिंडीच्या तोंडावर दगडी तटबंदी आडवी येते. इंंग्रजी कौलाचे डागडुजी केलेले विंजाई देवीचे मंदिर बरोबर खिंडीच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या परिसरात काही भग्न मंदिरे, मुर्ती, समाधीची दगडे, पीराचे ठाणे आणि काही घरांची जोती दिसतात. विंजाई देवीची मुर्ती अप्रतिम आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर गडावर चढणारी कातळ कोरीव पायऱ्यांची वाट आणि बुरूज तटबंदी युक्त दरवाजा दिसतो. साह्यकडाच्या गिर्यारोहकांनी गडासोबत एक ग्रुप फोटो काढून गड चढाईला सुरूवात केली. सुरूवातीस पाच पायऱ्या बांधलेल्या आहेत. पुढे कातळकोरीव पायऱ्या, नंतर काही खोबण्या आणि पुढे वळसा घेऊन कातळकोरीव पायऱ्या चढल्याकी आपण दरवाजात पोहोचतो. गोमुखी वळणाच्या पुर्वाभिमुख प्रवेश द्वाराची थोडी पडझड झालेली आहे. प्रवेशद्वारात पडलेल्या कमानीच्या दगडांवर मासे आणी कमळाची शिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या डावीकडे अलीकडील काळात बांधलेला बुरूज दिसतो. त्याचे बांधकाम आणी मुख्य दरवाज्याचे बांधकाम यात फरक दिसतो. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर समोरच वीरमारूतीची स्थापना केलेली दिसते. पवनपुत्रास वंदन करून डावीकडे गेल्यावर एक प्रशस्त गुहा आहे. गुहेत मुक्काम करता येईल. तसेच गुहेत धान्य साठवण्याची दोन कोठारे आहेत. गुहेच्या शेजारीच पाण्याचे खोदीव टाके असून त्यात पाणी आहे. गुहेच्या समोर दरवाजाला चिटकून बांधीव पाणी टाके आहे, यात मात्र पाणी नाही.

गुहे पासून वर चढणार्या वाटेने सरळ गडाच्या माथ्यावर गेल्यास पीराचे ठाणे दिसते. त्याच्या पुढे किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची बरीच घरटी दिसतात. गडाच्या दक्षिण कड्यास दोन खोदीव टाकी आहेत. त्याच्या शेजारी ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभात भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष केला. गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या पटांगणावर दांडपट्टा, कुस्ती, लाठी, बोथाटी सारखे लष्करी प्रशिक्षण दिले जात असे. याच टोकावरून मशिदवाडी गाव अप्रतिम दिसते. किल्ले मानगड हा किल्ले रायगडच्या वाटेवर टेहळणीसाठी बांधलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस जोर खोरे, नैऋत्येस गांगवली हे छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान, पुर्वेस कोकणदिवा किल्ला आहे. गडमाथ्यावरील अवशेष पाहून माघारी फिरताना गडाच्या पश्चिमेस असलेल्या खोदीव टाक्यापासून एक वाट गडाच्या उत्तरेस जाते. या वाटेने पुढे गेल्यावर घरांची जोती आणि एक गुप्त दरवाजा (चोर दरवाजा) दिसतो. या दरवाज्यातून खाली कड्याला चिटकून वाट वळसामारून मुख्य दरवाज्याकडे येते. येथून पुढे मुख्य दरवाज्याकडे येताना उत्तर कड्यावर दोन खोदीव टाकी आणि त्याच्या आणखी खाली एक चौरस टाके आहे. यात पाणी असून ते पिण्यायोग्य नाही. त्यांच्या पर्यंत जाणारी वाट ही अवघड आहे. तसेच वळसा मारत पुढे सरकल्यावर दोन प्रशस्त खांबटाकी आहेत. या टाक्यांवर छत असून आत कातळकोरीव खांब आहेत. यातील एका टाक्यास सांडवा आहे. अजून दरवाज्याकडे सरकल्यावर आणखीन दोन पाणी टाकी असून त्यात पाणी नसून दगड माती भरलेली आहे. पुढे मुख्य दरवाज्यात येताच आपली गडफेरी पुर्ण होते. गड भटकंतीस दोन तास भरपूर होतात.

किल्ले पुरंदरच्या प्रसिद्ध तहामध्ये किल्ले मानगडचा उल्लेख आहे. पेशवाईच्या अखेरच्या काळात मे १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी प्रॉफेट याने गड जिंकल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. मानगडाच्या सरनैबतीचे आधिकार ठुले या मराठा घराण्याकडे होते, तसे हवलदारीचे अधिकार गोविंदराव मोरे यांच्याकडे होते. या गडाचे कारखानिस प्रभू हे होते तर किल्लेदार जयवंतराव माणकर हे होते. मशिदवाडी गावातील मुळ वतनदार जाधव यांच्याकडे आजही इतिहास काळातील सनदा उपल्ब्ध आहेत. किल्ले मानगडच्या नावावरूनच तालुक्याला माणगड हे नाव दिले आहे. गावा बाहेरील भैरवनाथाच्या मंदिरा समोर खुप वीरगळी जमिनीत रोवलेल्या दिसतात. त्याच्या मागे प्राचीन शिवमंदिराच्या चौथऱ्याचे प्रशस्त अवशेष दिसतात. चौथऱ्यावरील दगडांवर नक्षीकाम केलेले आहे. दोन शिवलिंग असून त्यातील शिवचैतन्य लिंग गायब आहे. पिंडी समोरील प्रशस्त नंदी ही अप्रतिम आहे. नंदीच्या अंगावर झूल असल्यासारखी नक्षी कोरलेली आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार होणेे खुप गरजेचे आहे. एकंदरीत पावसाळ्यात एक दिवसाच्या भटकंतीसाठी हा किल्ला अवश्य पहावा ....
जय शिवराय! जय शंभुराजे!!
बाबाजी चौधरी
साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment