Followers

Wednesday, 18 November 2020

#अंबागढ_किल्ला_तुमसर_भंडारा.

 
















#अंबागढ_किल्ला_तुमसर_भंडारा.

अंबागढ किल्ला हा भंडारा जिल्यातील तुमसर शहरा जवळील अंबागढ या गावी आहे. तुमसर पासून या किल्ल्याचे अंतर हे 15 किमी असून नागपूर पासून याचे अंतर हे 100 किमी आहे.
अंबागढ किल्ला हा गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या आदेशावरून त्यांचे शिवणी येथील "राजखान" नमक पठाण सुभेदार यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला जवळपास इ.स.1700 च्या सुमारास बांधण्यात आला. या किल्ल्यावर एकूण 9 बुरुज असून यातील किल्याच्या प्रवेशद्वारावरील 2 बुरुजांवर तोफ ठेवली जात असे. या किल्याची बनावट ही गोंड साम्राज्याच्या बाकी किल्यांसारखीच आहे. हा किल्ला बनवितांना भौगोलिक संरचनेची योग्यता बघूनच निर्माण केले गेले असावे. या किल्ल्याचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. गोंड साम्राज्या नंतर या किल्यावर भोसल्यानीं सुद्धा राज्य केले, त्यावेळी ते कैद्यांना ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करीत असे. या किल्ल्यात एक विहीर आहे, त्यातील घाणेरडे पाणी ते त्या कैद्यांना प्यायला देत असे. अशे घाणेरडे पाणी पिल्यामुळे कैद्यांचा बिमार होऊन मृत्यू होऊन जात असे. अशी आख्यायिका आहे.
या किल्ल्याच्या चहूबाजूने पर्वतरांगा आणि निसर्गाचे देखणे रूप या जंगल कपारीत आपल्याला बघायला मिळते आणि किल्ल्यावरून दिसणारे दृश्य आपले मन मोहून टाकते. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला 650 पायऱ्या चढून जावं लागेल. लहान मुलांसाठी हे कठीण काम आहे.त्यामुळे मुलांना आणतांना थोडी काळजी घ्यावी. या किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे.

Monday, 9 November 2020

बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला गोवा

 #कथा_आरमाराची











बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला
गोवा
पोर्तुगीजांना घाम आणणारा व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने बांधला गेलेला गोव्यातील एकमेव सागरीदुर्ग म्हणजे हा बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला होय. सन १६७९ मधे दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या बाळ्ळीच्या हवालदाराने हा किल्ला बांधला. बेतुल येथे साळ नदीजवळ मराठे व पोर्तुगीज यांच्या राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला भिडलेल्या होत्या. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती. मडगावजवळ वेर्णा येथे उगम पावणारी साळ नदी पुढे मडगाव, चिचोणे, असोळणा असा प्रवास करत बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. या पोर्तुगीजांच्या सागरी व्यापाराला चाप देण्यासाठी बेतुल येथे साळ नदीच्या मुखावर एका मोक्याच्या जागी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरवात केली.
१६६४ पूर्वी गोव्याचा पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी, अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता तर बारदेश, तिसवाडी व सालसेत (साष्टी) हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी हे आदिलशाही मुलखातील तालुके शिवाजी राज्यांच्या ताब्यात आले. त्यावेळी अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा गोव्याचा प्रदेश सोंधे संस्थानच्या ताब्यात होता. पण सोंधे संस्थानचा राजाने आदिलशाहचे मांडलिकत्व स्विकारले असल्याने हा प्रदेश एकप्रकारे आदिलशाहाकडेच होता. राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले व फोंड्यावर चालून गेले. त्यावेळी महाराजांनी फोंडा प्रांत घेतला व उरलेला आदिलशाही प्रदेश स्वराज्यात आणला. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत महाराजांनी स्वराज्य सीमा गंगावल्ली नदीपर्यंत नेली. आता सोंधे संस्थानच्या राज्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्विकारावे लागले. अश्याप्रकारे मराठ्यांचे बाळ्ळी व चंद्रवाडी हे दोन महाल पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या साष्टी प्रांताला भिडले. अशा योग्यवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची साळ नदीमार्गे चालणारी साष्टीतील जलवाहतूक संकटात आणण्यासाठी बेतुल येथे किल्ला बांधण्याची आज्ञा केली.
बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखीखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी म्हणजे राशोल किल्ल्याचा किल्लेदार याने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – "असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण?"
इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. पुढे राजाराम महाराजांनी कारवार, सिवेश्वर, काणकोण, खोलगड, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी व काकोडे हा सर्व प्रदेश सालाना बावीस हजार दोनशे होनास सोंधेचा राज्यास भोगवटयाने दिला. तेव्हा हा सर्व प्रदेश सोंधे राज्याच्या अंमलाखाली आला. नंतर इ.स. १७६३ मधे हैदरअली सोंधे संस्थानवर चालून गेला. पण सोंधेच्या राज्याची हैदरअलीसारख्या सरदाराशी झुंज देण्याची ताकद नसल्यामुळे सोंधेच्या राज्याने आपल्या मुलखातील अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला व त्यांच्या आश्रयाला गेला. पोर्तुगीजांनी सोंधेकर राजा आणि त्याचे कुटुंब यांना आश्रय दिला आणि उपरोक्त क्षेत्र आपल्या नियंत्रणाखाली आणून काबो-दी-राम (खोलगड) व बेतुल या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अशाप्रकारे १७६३-६४ च्या सुमारास बेतुल किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि अगदी १९६१ पर्यंत या परिसरावर त्यांचे नियंत्रण राहिले.
आज बेतुल परिसरात किल्ल्याचे खूपच कमी अवशेष शिल्लक आहेत. साळ नदीच्या मुखावर एक बुरूज आणि त्यावर साळ नदीकडे मोहरा करून ठेवलेली एक तोफ एवढेच काय ते थोडके अवशेष इतिहासाची साक्ष देत आजही पाहायला मिळतात. या बुरुजावर उभे राहिले असता समोर गोव्यातील प्रसिद्ध मोबॉर बीच व समुद्राला मिळणारी साळ नदी यांचा खूप सुंदर देखावा दिसतो. किल्ला दुर्लक्षित राहील्याने परिसरात भयंकर झाडी माजलेली आहे. या झाडीतच काही ठिकाणी किल्ल्याची शेवटच्या घटका मोजणारी तुरळक तटबंदी बघता येते. तसेच नंतरच्या काळात या किल्ल्याचा परिसर कोण्या एका अनामिक फॅक्टरीला दिला गेल्याने त्या फॅक्टरीची काही जुनी बांधकामे व मशिनरी किल्ल्याच्या परिसरात आढळते. बेतुल किल्ला दक्षिण गोव्याची राजधानी मडगावपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.
-Betul fort (गोमंतक शिव इतिहास. गोवा)

Sunday, 8 November 2020

पितळखोरे लेणी

 












पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.

पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्या आहेत.
उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.मराठवाडय़ामध्ये प्रबळ राजसत्ता राज्य करून गेल्या. सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या राजसत्ता इथे नांदल्या. सलग कार्यकाळ लाभल्यामुळे यांनी कलेला आश्रय दिला. प्रबळ, सामथ्र्यवान यादव राजघराण्याची राजधानी असलेले औरंगाबादजवळचे देवगिरी. इसवी सनाच्या १० व्या शतकापासून ते १४ व्या शतकापर्यंत यादव राजांनी या प्रदेशावर राज्य केले. भिल्लम, सिंघणदेव, कृष्णदेव, महादेव, रामचंद्रदेव असे सामथ्र्यशाली राजे या कुळात होऊन गेले. यादव नृपती शौर्य, कला आणि साहित्याच्या क्षेत्रातही प्रसिद्ध होते. ज्ञानेश्वर माऊ ली यांच्याबद्दल असे म्हणतात की,
‘‘तेथ यदुवंश विलासु,
जो सकळ कळा निवासु
न्यायाते पोषि क्षितिशु,
श्रीरामचंद्रु’’
संपन्न अशा मराठवाडय़ामध्ये मूर्तिकला, मंदिर स्थापत्य आणि साहित्याची भरभराट झाली होती. औरंगाबाद आणि त्याच्या परिसरामध्ये त्याच्या खुणा ठायी ठायी आढळतात. अजिंठा आणि वेरुळचे लयन स्थापत्य तर फारच प्राचीन आहे; परंतु त्याचबरोबर तेवढीच प्राचीन असलेली पितळखोरा लेणी, पाटणादेवी, कन्नड, ही ठिकाणेसुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरतात. औरंगाबादमध्ये मुक्काम करून एक-दोन दिवसांत ही आपला प्राचीन वारसा जपणारी स्थळे सहज पाहून होतात. काही अगदी वेगळी तरीसुद्धा न चुकता पाहायची स्थळे आपल्या सहलीमध्ये मुद्दाम समाविष्ट करून घेतली पाहिजेत. या प्रदेशात अत्यंत तीव्र उन्हाळा असतो, त्यामुळे ते दिवस सोडून वर्षभर केव्हाही इथे मनसोक्त फिरावे.

Monday, 2 November 2020

बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा

 बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा






















विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा नावाचे लहानसे खेडे आहे. संतश्रेष्ठ चोखामेळा ह्यांचे जन्मस्थानं असलेले हे ठिकाण इतिहासात राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतिल एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी आपले नाते सांगणाऱ्या जाधवांच्या दोन उध्वस्त गढ्या व या गावाचा नगरदुर्ग आजही ताठ मानेने उभा आहे. मेहुणा गाव बुलढाणा शहरापासुन ७० कि.मी.अंतरावर तर देऊळगाव राजा या तालुक्याच्या ठिकाणापासुन केवळ १५ कि.मी.अंतरावर आहे. मेहुणाराजा गाव मुख्य रस्त्याहुन १.५ कि.मी. आत असुन मुख्य रस्त्यावरून आत शिरल्यावर गाव येण्याआधी रस्त्याच्या डाव्या बाजुस २० फुट उंचीचा एक प्रशस्त दरवाजा दिसतो. घडीव दगडानी चुन्यात बांधकाम केलेल्या या दरवाजा शेजारी असलेले दोन्ही बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेले असुन या दोन्ही बुरुजांच्या आतील बाजुस कमानी असलेली सुंदर अशी दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या भिंतीवर पंजात दोन हत्ती पकडलेले शरभशिल्प या भिंतीत मुख्य दरवाजाच्या वरील बाजुस तसेच आतील इमारतीच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी कमान असलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस कोणतेही अवशेष नसुन केवळ लांबवर पसरलेल्या पडझड झालेल्या तटबंदीचा पाया आहे. हे बहुदा एखाद्या गढीचे अर्धवट झालेले बांधकाम असावे. येथुन ५ मिनिटात आपण मेहुणा गावात पोहोचतो. कधीकाळी तटबंदीच्या आत वसलेल्या या गावाची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीत असलेले दोन्ही दरवाजे मात्र शिल्लक आहेत. यातील आपण वाहनाने प्रवेश करतो तो दरवाजा पश्चिमाभिमुख असुन दुसरा दरवाजा उत्तराभिमुख आहे. आपण प्रवेश केलेला दरवाजा हा या कोटाचा मुख्य दरवाजा असुन हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाच्या कमानीची इमारत दुमजली आहे. यातील जिन्याने या इमारतीच्या वरील मजल्यावर तसेच दरवाजाच्या वरील भागात व बुरुजावर जाता येते. दरवाजा व बुरुज यांचे बांधकाम दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. फांजीवरील भागात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. या दरवाजाच्या पुढील भागात काही अंतरावर एक लहान दरवाजा आहे. हा या नगरदुर्गाच्या आत असलेल्या गढीचा दरवाजा असुन जाधवरावांची हि गढी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या गढीचे दोन दरवाजे व केवळ एक बुरुज शिल्लक आहे. गढीच्या बुरुजाला लागुनच गढीचा दुसरा लहान दरवाजा आहे. गढी परिसरात जाधवरावांच्या वंशजांची घरे आहेत. गढीच्या बुरुजाला वळसा मारून उत्तरेच्या दिशेने गेल्यावर काही मिनिटात आपण कोटाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. येथे आपली मेहुणा राजा कोटाची भटकंती पुर्ण होते. गावाभोवती फेरी मारल्यास काही ठिकाणी तुरळक तटबंदीचे अवशेष दिसतात मात्र स्थानिक माहीतगार सोबत असायला हवा. हा संपुर्ण परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. सिंदखेडराजा येथे त्यांची समाधी पहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा,किनगाव राजा व मेहुणा राजा या ठिकाणी विस्तारल्या आहेत. यातील मेहुणाराजा गावाला केवळ ऐतिहासिक नव्हे तर वारकरी संप्रदायाचा वारसा देखील लाभला आहे. वारकरी संप्रदायातील महत्वाचे संतकवी असलेले संत चोखामेळा यांची हि जन्मभुमी आहे.
( संदर्भ आणि फोटो - दुर्ग भरारी)