उत्तर कर्नाटकातील विजापूर हे दक्षिण भारतातील वास्तुकलेचे माहेरघर समजले जाते.
सुलेखनकला आणि चित्रकला, विशेषतः लघुचित्रशैली यांना विजापूरच्या इस्लामी कलेत वेगळे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अफझलखान वधाच्या घटनेसह शहाजी महाराजांना झालेला दगाफटका अशा घटनांमुळे विजापूर विरुद्ध मराठा साम्राज्य हे संदर्भ सर्वांना परिचित आहेत.
इतिहासतज्ज्ञांमध्ये विजापूर नावाविषयी एकवाक्याता दिसून येत नाही. कोरीव शिलालेख, संस्कृत-कन्नड-फार्सी साहित्य यांतून विजयपूर, राय राजधानी, दक्षिण वाराणसी, बिज्जनहळ्ळी, बिज्जपूर, मुहम्मदपूर इत्यादी भिन्न नावे दिसून येतात. पूर्वी या जागी सात खेडी होती व तेथेच यादवांनी हे नगर वसविल्याचे सांगितले जाते. या सात खेड्यांपैकी बिजनहळ्ळी खेड्यावरून या नगराला विजापूर हे नाव पडल्याचे समजले जाते. या गावाच्या परिसरात काही देवालयांत चालुक्य व यादव वंशातील राजांचे शिलालेख आहेत. तज्ज्ञांच्या मते आर्क किल्ल्याच्या पूर्वद्वाराजवळील असलेल्या विजयस्तंभावरील शिलालेखात विजयपूर असा स्पष्ट उल्लेख आहे.
विजापूर किल्ला : संरक्षणाच्या दृष्टीने युसुफ आदिलखानाने आर्क नावाचा मातीचा किल्ला शहराच्या मध्यभागी बांधला. पहिल्या आदिलशाहने त्याच्या सभोवती सुमारे १० किलोमीटर घेराची दगडी तटबंदी ९६ बुरुज व सहा मोठ्या दरवाज्यांसह बांधली. या सहा मोठ्या दरवाज्यांना अलीपूर, बहामनी, शहापूर, मक्का, फत्तेह अशी नावेही ठेवण्यात आली. प्रत्येक दरवाज्याच्या आत दुसरा दरवाजा अशी संरक्षणात्मक व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण तटबंदीला सुमारे १२-१५ मीटर रुंदीचा खंदक खणण्यात आला होता. किल्ल्यात असर महाल, आनंद महाल, आरसे महाल, चिनी महाल, सातमजली महाल, गगनमहल, मक्का मशीद, चिंदडी मशीद अशा खास इमारती होत्या. त्यांतील फारच थोड्या सुस्थितीत आहेत.
गोलघुमट : याला बोलघुमट असेही म्हणतात. इ. स. १६२६मध्ये मोहम्मद आदिलशाह याने गोलघुमटाचे बांधकाम केले. याचे बांधकाम सुमारे ३३ वर्षे चालू होते. येथे खालच्या दालनात चबुतऱ्यावर मोहम्मद आदिलशाह, त्याच्या दोन बेगमा, रंभावती (अंगवस्त्र), मुलगी व नातू यांची थडगी आहेत. या ठिकाणी कबर नगारखाना, धर्मशाळा असून, नगारखान्यात अलीकडे वस्तुसंग्रहालय केले आहे. मशीद आणि ही वास्तू चौरस असून प्रत्येक बाजू ४३.५ मीटर लांबीची आहे. चारही कोपऱ्यांत अष्टकोनी घुमट असलेले सातमजली मनोरे आहेत. संपूर्ण वास्तूची उंची सुमारे ६८ मीटर असून, तिचे क्षेत्रफळ सुमारे १८९२ चौरस मीटर आहे. माथ्यावर मध्यभागी प्रचंड घुमट आहे. हा घुमट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भव्य घुमट आहे. त्याचा व्यास ३८ मीटर इतका आहे, व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्सच्या घुमटाचा पहिला क्रमांक लागतो. त्याचा व्यास ४२ मीटर आहे. लंडनमधील सेंट पोलचा तिसरा क्रमांक लागतो. त्याचा व्यास ३३ मीटर इतका आहे. यावरून गोलघुमटाच्या भव्यतेची कल्पना येईल.
घुमटाखालील दालनांमध्ये प्रशस्त गोलाकार सज्जा असून, या सज्ज्यातून भिंतीकडे तोंड करून उभे राहून पलीकडील बाजूस साधारण १२५ फुटांवर अगदी हळू आवाजात बोलले तरी स्पष्ट ऐकू जाते. म्हणून याला बोलघुमट असेही म्हणतात.
इब्राहिम रौजा : हे विजापूरमधील वास्तुकलेतील दुसरे मोठे आकर्षण आहे. इब्राहिम दिलशाह दुसरा (इ. स. १५८० ते १६२७) याने आपल्या चिरनिद्रेसाठी याची निर्मिती केली. ताजमहालच्या अगोदर ही इमारत पूर्ण झाली होती. ही इमारत संगमरवरी असती, तर छोट्या ताजमहालासारखी दिसली असती. असे म्हणतात, की ताजमहालाची कल्पना याचेवरूनच घेतलेली आहे. विजापूरचे सुलतान इस्तंबूल, तुर्कस्तानच्या तुर्क साम्राज्याचे वंशज होते. त्यामुळे या वास्तूवर तुर्की शैलीचा प्रभाव आहे. सुंदर आकर्षक बगीच्यामध्ये असलेल्या लॉनवर ही इमारत खुलून दिसते. पूर्वेकडील टोकाला मकबरा आहे आणि पश्चिमेकडील बाजूला मशीद आहे. मधील खुल्या जागेत कारंजे आहे.
जुम्मा मशीद : विजापूर शहराच्या आग्नेयेला ही मोठी मशीद आहे. सन १५६५मध्ये याचे बांधकाम सुरू झाले; पण थोडे अपुरे राहिले. अली आदिलशाहने तालिकोटच्या विजयानंतर तिचे बांधकाम केले. मशीद १० हजार ८१० चौरस मीटर क्षेत्रात पसरली आहे. मशिदीची इमारत १७० मीटर लांब, ७० मीटर रुंद, आयताकृती आहे. येथे दर शुक्रवारी खुतुबा वाचतात. मशिदीचा घुमट आकर्षक आहे. खालील कमानीवर पर्शियन भाषेत वचने लिहिली आहेत. औरंगजेबाच्या आदेशानुसार जमिनीवर पॉलिश केलेल्या सुंदर २२५० फरश्या बसविल्या आहेत. औरंगजेबाने पूर्वेकडे, दक्षिणेस व उत्तरेकडील वेस व व्हरांडा यांचे बांधकाम वाढविले.
बाराकमान : सन १६७२मध्ये बांधण्यात आलेला अली रोझाचा हा एक मकबरा आहे. सार्वजनिक उद्यानात मध्यभागी असलेल्या गगनमहलच्या उत्तरेस तो आहे. सुरुवातीला ते अली रोझा या नावाने ओळखले जात असे. परंतु शाह नवाब खान याने त्याचे नाव बाराकमान असे केले. कारण हे त्याच्या राज्यकाळातील १२वे स्मारक होते आणि त्याला १२ कमानी होत्या. एका उंच चबुतऱ्यावर ही इमारत बांधलेली आहे. यात गॉथिक शैलीमध्ये सात खांब आहेत. आत काही थडगी आहेत. तेथे बहुधा अलीखान आणि ११ स्त्रियांच्या कबरी आहेत.
गगनमहल : गगनमहल सन १५६१मध्ये आदिलशाहने बांधला असे म्हटले जाते. या महालाने राज्यातील महत्त्वाच्या घटना पाहिल्या आहेत. राणी चांदबीबी हिने येथूनच राज्यकारभार केला होता. सध्या या महालाची बऱ्याच अंशी पडझड झालेली आहे. या महालामध्ये तीन भव्य कमानी आहेत. आतील सर्वांत मोठी आहे. याच्या तळमजल्यावर दरबार हॉल होता आणि पहिल्या मजल्यावर राजाचे कुटुंब राहत असे....!
No comments:
Post a Comment