चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.
चालुक्य कालीन वेळापूर चे अर्धनारीनटेश्वर मंदिर.. स्थापत्य,रचना,महादेवाचं एक वेगळं रूप...प्रसन्न आणि भारावणारं वातावरण!!!!!
चालुक्य साम्राज्य हे भारतातील एक महान साम्राज्य . अतीशय शूर, पराक्रमी आणि हुशार राजे हे या चालुक्यांच्या वंशात होऊन गेले.जसे की पहिला पुलकेशी,दुसरा पुलकेशी, विनायदीत्य,विजयादित्य,विक्रमादित्य दुसरा,सोमेश्वर, अशी भली मोठी यादी आहे चालुक्यांची.
ई.स. 6 व्या ते जवळपास 12 व्या शतकापर्यंत साधारण 600 वर्षे चालुक्य राजांची भारतातील विविध भागावर सत्ता होती.चालुक्य राजा पहिला पुलकेशी याने चालुक्य साम्राज्याची स्थापना केली.एके काळी कदंब राजाचे मंडलिक असलेलं चालुक्य कुटुंब नंतर च्या काळात पूर्ण भारताचे सत्ताधीश झाले व संपूर्ण भारतावर राज्य केलं.
चालुक्यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या वंशाचा उत्पत्ती ही ब्रम्हा पासून झाली आहे आणि त्यांचे पोषण सप्तमात्रुकांच्या स्थनपानावर झाले आहे.
चालुक्य हे सुरवातीला फक्त यज्ञ आणि कर्मकांड करायचे.ते अगोदर विष्णू पूजक होते.त्यांचे राजचिन्ह हे ही विष्णूचा अवतार असलेले "वराह" हे आहे.दक्षिणेमध्ये सगळ्यात अगोदर मंदिर बांधायला सुरुवात चालुक्यांनी केली.वातापी म्हणजेच आजच्या काळातील कर्नाटकातील बदामी हे शहर होय. ही चालुक्यांची राजधानी होती.अगोदर विष्णू भक्त असणारे चालुक्य काही काळानंतर हे कट्टर शिव भक्त झाले.त्यानंतर 600 वर्षाच्या एकूण कारभारात चालुक्यांनी हजारो शिव मंदिर बांधली.त्यापैकी काही काळाच्या ओघात नष्ट झाली आणि काही अप्रतिम मंदिर आजही 1500 वर्षानंतर मजबुतीने उभी आहेत.विशेष म्हणजे चालुक्यांनी त्याकाळात जैन मंदिर ही बांधली.ती ही बदामी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.त्यातील काही मंदिर ही कर्नाटकातील बदामी, पटडक्कल ,एहोळ,याठिकाणी आजही आहेत.
त्यातील एक चालुक्यांनी बांधलेलं आणि नंतर देवगिरीच्या यादवांनी व नंतर अहिल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला. हे असं शिव मंदिर सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या ठिकाणी आहे.इथेच आज सहकुटुंब भेट दिली.
साधारणतः एका आयतामधून निघणार दुसरा आयत आणि असे अनेक स्तर अशी एकंदरीत या मंदिरांची बांधायची पद्धत असते.या वेळापूरच्या मंदिराचे स्थापत्य असेच आहे.चालुक्यांच्या शिव मंदिरात सप्तमातृका यांचे शिल्प नक्कीच बघायला मिळते.ते इथेही आहे.
मंदिराच्या प्रवेश द्वारातून आत गेल की एक प्रसन्नता मनात भरते आणि आपण चालुक्य काळात प्रवेश केला आहे , असं वातावरणात जाणवायला लागतं.प्रत्येक ऐतिहासिक मंदिरात एक वेगळीच ऊर्जा असते व ती या मंदिरात आल्यावर चटकन आपल्याला जाणवते.आत गेल्या गेल्या त्या काळातील बारव दरवाजातच आहे.या मंदिराच विशेष म्हणजे या मंदिरात एक बाहेर आणि एक अर्धनारी नटेश्वराच्या मूर्ती समोर असे दोन मोठे नंदी आहेत.
यादवकालीन 2 शिलालेख या मंदिरात आहेत.एक शिलालेख बारवेच्या प्रवेशालाच एका दगडावर आहे आणि दुसरा मंदिरच्या बाहेरच्या व्हरांड्यात ठेवलेल्या दगडावर आहे.
या मंदिराच आणखी एक विशेष म्हणजे इथे शंकराच्या पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती आहे ती म्हणजेच अर्धनारी नटेश्वराची मूर्ती.
हीच मूर्ती जी चालुक्य कालीन आहे .त्याच काळातील आहे.एवढी जुनी कलाकृती आपल्या जवळपास कदाचितच कुठे तरी तुम्हाला पाहायला मिळेल.गाभार्याच्या प्रवेश द्वारावर गणपती नसून गजलक्ष्मीची सुंदर छोटी मूर्ती कोरलेली आहे .
यामध्ये शंकराची चतुर्भुज मूर्ती आहे.पार्वती चा एक हात शंकराच्या उजव्या खांद्यावर आहे ,तिच्या दुसऱ्या हातात शस्त्र आहे.महादेवाच्या जटांमध्ये सूर्य चंद्र आहेत.महादेवाच्या पायात भृगु ऋषी आहेत. दोन्ही मूर्त्यांच्या अंगावर संपूर्ण दागिने कोरलेले आहेत. पार्वतीच्या उजव्या पायात एक चक्र आहे, त्यामुळेही या वेळापुर गावाला अगोदर एकचक्र नगर असेही नाव होते.महादेवाची अनेक मंदिरांमध्ये फक्त पिंड च आहे.पण मी पाहिलेलं ज्यामध्ये पिंडीवर महादेव आणि पार्वतीची मूर्ती असलेलं एकमेवद्वितीय मंदिर आहे.परिसर एकदम स्वच्छ आणि प्रसन्न आहे.
मंदिराच्या वातावरणातील प्रसन्नता आपल्याला चालुक्यांच्या काळात घेऊन जाते...बाकी सगळं स्थापत्य हे थोडस यादवकालीन आणि बाकी चालुक्य कालीन असं मिक्स आहे. परिसरात अनेक पिंडी आणि छोटी मंदिर आहेत. काही मंदिरांची आणि पिंडीची अवस्था वाईट आहे.हा परिसर Archeological Survey Of India च्या ताब्यात आहे.
मंदिराच्या सभा मंडपात असणार सप्तमातृकांचं शिल्प आपल्याला हे मंदिर चालुक्यांच आहे असं ओरडून सांगत राहतं. बाहेर दगडाची असणारी जी आजकाल विरळ झालेली आहे अशी दगडांची दीपमाळ इथे पाहायला मिळते.
वातावरणातील प्रसन्नता,झिमझीम ,हलका पाऊस,हवेतील गारवा आणि अप्रतिम वास्तुकला असलेलं चालुक्य कालीन मंदिर ...वा जगायला अजून काय पाहिजे... अन्न, वस्त्र आणि इतिहास!!!!
वेळात वेळ काढून नक्की भेट द्या...
कुणी येणारं नसेल बरोबर तुमच्या,सोबत पाहिजे असेल,चालुक्यांचा इतिहास पण तुम्हाला ऐकायचा असेल तर मला घेऊन जा बरोबर...मलाही आवडेल परत एकदा यायला...फक्त चहा आणि वडापाव ची सोय करावी लागेल...
हर हर महादेव
No comments:
Post a Comment