Followers

Sunday 15 October 2023

.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !

 









.अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या देवींचे दर्शन !
( गाढव, कोंबडा, घुबड, मांजर, उंट, मगर )
आपल्या देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की नंतरच्या काळामध्ये, विविध सण साजरे केले जातात. गणपती उत्सवानंतर नवरात्रोत्सव हे स्त्रीशक्तीला अधिक प्राधान्य देणारे पर्व आहे. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी, याकाळात शक्तीची आराधना केली जाते. सप्तशतीच्या पाठातील देवीच्या युद्धाची वर्णने ही साहित्यात एकत्रितपणे अभावानेच आढळणाऱ्या रौद्र, भीषण, वीर, अद्भुत आणि बीभत्स रसाचा आविष्कार करणारी आहेत. एका स्त्रीच्या नेतृत्वाने, पराक्रमाने इतक्या क्रूर आणि शक्तिवान मायावी शक्तींना हरविले हे महत्वाचे आहे. जगामध्ये स्त्रीशक्तीचे असे उदाहरण प्रत्यक्षात सोडा पण वाङ्मयातसुद्धा आढळणार नाही. आपल्याकडे स्त्रीला कमी लेखले जाते असे म्हणण्यावर हे पूर्ण वेगळे उदाहरण आहे. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकतवान, बलदंड, क्रूर, असुरी शक्ती जर कुणी संपविल्या असतील तर त्या स्त्री शक्तींनी, देवींनी ! असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष-असुरांना संपविण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर, मायावी युद्धात लीलया हरविले, ठार मारले. म्हणूनच नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. नवरात्रीत देवी नऊ विविध रूपांमध्ये पुजली जाते. तसाच सप्तमातृका, ६४ योगिनी, सात आसरा, देवीची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे, देशभरातील आणि शेजारील देशातील देवी सतीची ५१ शक्तिपीठे यासह देवीच्या सर्व मंदिरांमधून नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
सर्वसाधारणपणे आपण देवीच्या ज्या मूर्ती पाहतो त्यात तिचे वाहन म्हणून वाघ, सिंह, मोर, हंस इत्यादी प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. पण आपल्या धर्मामध्ये अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. त्याची थोडी माहिती घेऊ या. देवी आणि वाहने या प्रतीकात्मक, सांकेतिक गोष्टी आहेत. विविध देवी म्हणजे विविध प्रकारच्या लहरी असल्या पाहिजेत. या लहरी वाहून नेणारी माध्यमे म्हणजे ही वाहने ! एकाच प्रकारचे प्रक्षेपणास्त्र बोट, रॉकेट लॉंचर, विमान अशा वेगवेगळ्या वाहनांवरून डागल्यास त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. तशीच या देवी लहरींची वाहनानुसार शक्ती बदलत असलेली पाहिजे. ( यावर माझ्या कुवतीनुसार माझा अभ्यास सुरु आहे. त्याचा तपशील पुन्हा केव्हातरी देईनच ! )
पण या सर्वपरिचित वाहनांपेक्षा अत्यंत विचित्र वाहनांवर आरूढ झालेल्या अनेक देवी आहेत. कांही वेळा एकच देवी वेगवेगळी वाहने वापरते असेही दिसते. तिच्या शक्तीचे आणि लढ्याचे स्वरूप, कारण, तिचा सहकारी, जागा, तिचा शत्रू इत्यादींनुसार वाहन बदललेले दिसते. नेहेमीच्या आयुष्यात आपण ज्यांना अत्यंत अपवित्र, अशुभ, त्याज्य प्राणी / पक्षी मानतो त्यांनासुद्धा देवीने आपले वाहन बनविले आहे. साप हे कामाख्या देवीचे वाहन मानले गेले आहे. तारिणी देवीचे बदक, सप्तमातृकांतील एक चामुंडा देवीचे कुत्रा, कारकरी योगीनीचे खेकडा, गौरी योगिनींची घोरपड,जलकामिनी योगिनीचा बेडूक, रतीचे कबुतर अशी आश्चर्यकारक वाहन मालिका आहे. संबंधित देवीच्या शक्तीनुसार पूरक वाहनांची निवड करण्यात आली आहे. आपली पुराणातील कथांमध्ये कल्पिलेली अशीच अन्य कांही वाहने, देवी आणि माहिती --
घुबड ----- हा पक्षी अशुभ, अपवित्र मानला जातो. तरीही देवी लक्ष्मीने त्याला आपले वाहन मानले आहे. लक्ष्मीला सर्वात भीती चोरीची असते आणि चोरीची शक्यता रात्री अधिक असते.घुबड हा अत्यंत बुद्धिवान पक्षी आहे. घुबड अत्यंत सूक्ष्म आवाज ऐकू शकते. केवळ आवाज ऐकून ते शिकार करते. त्याच्या पंखांचा आवाज येत नाही इतके ते उडताना सावध असते. असे वाहन हे रात्रीसुद्धा लक्ष्मीचे अधिक सक्षमतेने रक्षण करते असे मानले जाते. त्याच्या हुशारीचा एक गंमतीदार पुरावा म्हणजे घुबडांच्या समूहाला पार्लमेंट म्हटले जाते. लक्ष्मीच्या घुबड या वाहनामुळे तिला उलूकवाहिनी असे नाव पडले आहे.
कोंबडा -- किन्नर ( तृतीयपंथी ) पंथाची पूजनीय बहुचरा देवी ही कोंबड्यावर आरूढ झाली आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात तिचे मंदिर आहे.
मांजर --- मुलाच्या जन्मानंतर सठी / षष्ठीची पूजा केली जाते. ही षष्ठी देवी लहानमुलांची रक्षणकर्ती आहे. या षष्ठीदेवीचे वाहन चक्क मांजर आहे. मांजर हे वाहन असलेली " षष्ठी " ही एकमेव देवी आहे.
गाढव---- स्कन्द पुराणानुसार देवदेवतांनी भगवतीच्या आराधनेसाठी जेव्हा यज्ञ केला त्यातून शितलादेवी प्रकटली. ही देवी गोवर, कांजिण्या, देवी, ज्वरजन्य विकार यांचा नाश करते. या देवीचे वाहन चक्क गाढव हे आहे. नवरात्रीतील सातव्या दिवशीचे देवीचे रूप असलेली कालरात्री या देवीचे वाहनसुद्धा गाढव आहे.
उंट ------ गुजरात व राजस्थानमध्ये मोमाई माँ, उंटेश्वरी किंवा दशा माँ या नावांनी ओळखली जाणारी देवी ही उंटावर विराजमान झालेली आहे. आपले आरोग्य, पिकाचे आणि पशुधनाचे संरक्षण या साठी शेतकरी तिची भक्ती करतात. तिला माती पासून बनविलेला छोटा उंट अर्पण केला जातो. नल राजा आणि दमयंती यांनीही हिची भक्ती केल्याची कथा आहे.
मगर ---- महानदी गंगेचे देवी स्वरूपात पूजन केले जाते. क्षमाशीलता आणि पावित्र्य यांची ती अधिपती आहे. या रूपामध्ये गंगेचे वाहन मगर आहे.
कासव --- यमुना नदीलाही देवता स्वरूपात पुजतात. तिला यामिनी, कालिंदी असेही संबोधले जाते. ती मृत्यूच्या भयापासून रक्षण करते. गोड्या पाण्यातील कासव हे तिचे वाहन कल्पिलेले आहे.
एकंदरीत काय, तर माणसाने कितीही भेदभाव उभे केले असले तरी देव मात्र त्याने बनविलेल्या कुठल्याही प्राण्याला, माणसाला, पक्षाला अपवित्र, अशुभ, त्याज्य, निरुपयोगी मानत नाही. त्या प्रत्येकात त्याने कांही ना कांही असामान्य शक्ती घातलेली आहे. त्यातून देवी म्हणजे मातृशक्ती ! तिने अशा तऱ्हेने प्रत्येकाला दिलेले स्थान, केलेला सन्मान हा याच महत्वाच्या गोष्टीचा प्रत्यय आहे. विज्ञान सुद्धा सर्व प्राणी हे जैव साखळीच्या महत्वाच्या कड्या आहेत असे मानते.
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौजन्य -- सर्व चित्रे आणि कांही माहिती -- विकिपीडिया,गुगल
©( हा लेख व चित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत )
***** मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

No comments:

Post a Comment