Followers

Wednesday, 8 July 2020

किल्ले प्रचितगड

किल्ले प्रचितगड
----------------------------
आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता.छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले. पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला.
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात छत्रपती संभाजी महाराजांमधील लेखक , कवी जागा झाला. त्यांनी "बुधभूषणम" हा संस्कृत ग्रंथ लिहिला. "नायिकाभेद", "नखशिक", "सातसतक" हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले.

★ #भास्करगड_किल्ला ( बसगड)★


★ #भास्करगड_किल्ला ( बसगड)★

{ नाशिक जिल्हा }

किल्ल्याचे नाव : भास्करगड ( बसगड ) किल्ला
किल्ल्याची उंची : ३५०० फूट समुद्र सपाटी पासून
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : नाशिक , महाराष्ट्र
जवळचे गाव : निरगुड पाडा
डोंगररांग : त्रम्बकेश्वर डोंगररांग

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘भास्करगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

◆ इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.

इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

◆ गडावरील पहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

◆ गडावर जाण्याच्या वाटा :
खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाताना "निरगुडपाडा" या गावाच्या अलिकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी पोहचतो. बसगडच्या पायथ्याशी पोहचण्यापूर्वी एक नाला ओलांडावा लागतो. नाला ओलांडल्यावर भास्करगडच्या चढाइला सुरुवात होते. दिड तास मळलेल्या पायवाटेवरुन केलेल्या चढाइ नंतर आपण कातळकड्याच्या पायथ्याशी येतो. येथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी येते. पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.

"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

३) कसारा किंवा नाशिक मार्गे :- कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे भास्करगडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. भास्करगडाच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

◆ रहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, निरगुडपाड्यात होऊ शकते.

◆ जेवणाची सोय व पाण्याची सोय :
गडावर किंवा गावात जेवणाची व पाण्याची सोय नाही. आपण स्वतःच करावी.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा

शिवाजी महाराजांचे एक मंदिर नाही तर तीन मंदिर आहेत.

अपरिचित इतिहास..........





शिवाजी महाराजांचे एक मंदिर नाही तर तीन मंदिर आहेत.

---------------------------------------------

1)आंध्र प्रदेशच्या श्रीशैलममध्येही शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. नुसतं मंदिरच नाही तर आपल्या इकडच्या मंदिरांपेक्षा हे मंदिर आकर्षक आणि देखणं आहेच शिवाय या मंदिरात शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र भिंतींवर लावण्यात आलं आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन आहे. मंदिराला भेट देणाऱ्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसेल तर तो बाहेर पडताना त्याला माहीत झालेला असतो.

1983 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन झालं. संपूर्ण ब्रॉन्झचा पुतळा याठिकाणी बसवण्यात आलेला आहे. इथं शिवाजी महाराज अतिथी केंद्रही उभारण्यात आलं आहे, जिथं पाहुण्यांना राहता येतं. एसी आणि नॉन एसी रुमची इथं सुविधा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशनसाठी हे केंद्र प्रसिद्ध आहे

2)नाशिकचं मंदिर बांधण्यापूर्वी किल्ले सिंधुदुर्गवर शिवाजी महाराजाचं मंदिर बांधण्यात आलं होतं. श्री शिवराज्येश्वर मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. 1695 साली खुद्द राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधल्याची नोंद आहे.

3)अहमदनर येथील पारनेरकर महाराज यांनी देशभरात शिवाजी महाराजांची 1 हजार मंदिरं स्थापन्याचा संकल्प केला होता. त्याची मुहुर्तमेढ नाशकातून झाली आणि तब्बल 17 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदीर उभारण्याचा मान नाशिकला मिळाला, असा दावा येथील पुजाऱ्यांनी केलाय. शिवाजी महाराज वंदनीय आणि पूजनीय आहेत, वर्षांतून एकदा त्यांच्या पुतळ्याला हार घालून भागणार नाही, तर त्यांची रोज पुजा व्हायला हवी, असंही ते म्हणतात🚩🚩

डुबेरा_किल्ला देविगड ★ { नाशिक जिल्हा }

डुबेरा_किल्ला देविगड ★

{ नाशिक जिल्हा }

किल्ल्याचे नाव : किल्ले डुबेरा /देविगड
किल्ल्याची उंची : -----  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
श्रेणी : सोपी.
जिल्हा : नाशिक.

नाशकातल्या सिन्नर तालुक्यात ठाणगाव सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या थोडेसे अलीकडे, ४ किलोमीटर अंतरावर डूबेरा नावाचे छोटेसे गाव आहे. गावाच्या मागच्या बाजूस देवीच्या देवळाचा कळस घेऊन उभा असलेला डूबेरगड दिसतो. गावाला एक प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी आहे. डूबेर गडाला देविगड असेही संबोधले जाते.

◆इतिहास :
डूबेरा हे गाव पहिल्या बाजीरावाचे आजोळ आहे. येथील बर्वे घराण्यातील मुलगी बाळाजी विश्वनाथांची पत्नी झाली व इ.स १७०० मध्ये बाजीरावाचा जन्म इथेच बर्वेंच्या वाड्यात झाला. तिथे आजही त्यांचे वंशज राहतात. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंच्या वाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत व गावाला दोन भव्य वेशीही बांधलेल्या आहेत. शिवशाहीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव सोपवले गेले. त्यानंतर हे घराणे इथेच स्थायिक झाले. तटबुरुजाचा वाडा पाहयचा असल्यास जरूर यावे.

◆गडावर पाहण्यासारखे  ठिकाणे :
डूबेरगडावर जाण्यासाठी अंजनेरी किल्ल्याप्रमाणे सिमेंटच्या पाचशे पायऱ्या बनवलेल्या आहेत. किल्ल्यावर एक तलाव आहे, तलावाच्या बाजूलाच सप्तशृंगी देवीचे एक मंदिर आहे, या मंदिरातील मूर्ती वाणीच्या मूर्तीसारखी असून गडावर बंद पडलेल्या टॉवरची इमारत आणि पाण्याची दोन टाकी आहेत.
गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला वणीचा सप्तश्रुंगगड, मार्कंडेय पर्वत, रावळ्या – जावळ्या हे जोड किल्ले इ. शिखरे दिसतात.
 
◆गडावर जाण्याचे वाटा :
सिन्नरच्या पश्चिमेला घोटी गावच्या रस्त्यावर डूबेरा हे गाव आहे. सिन्नर वरून दर तासाला एक एस.टी या गावात जाते. या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.

◆राहाण्याची सोय : गडावर राहाण्याची सोय नाही.

◆पाण्याची सोय : गडावर पिण्यास पाणी नाही ते सोबत न्यावे लागते.

◆जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा

शिवकालीन किल्ला कन्हेरगड

कन्हेरगड चाळीसगाव तालुक्यातील निसर्गरम्य अशा पाटणादेवी अभयारण्यातील हेमाडपंती महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर असलेला हा
शिवकालीन किल्ला कन्हेरगड अत्यंत दुर्लक्षित आणि फार कमी लोकांना माहित असलेला किल्ला किल्ल्यावर आजही जवळपास पाच पडक्या वाड्यांचे अवशेष पाण्याचे टाके दरवाजा बुरुज हनुमानाचे मंदिर असे अवशेष असून किल्ल्यावरून सभोवतालचा परिसर म्हणजेच पाटणादेवी चे मंदिर धवल तीर्थ केदार कुंड धबधबा यांचे सुंदर दृश्य पाहावयास मिळते याच किल्ल्यावरुन किल्ले पेडका किल्ले राजधेर किल्ले मल्हारगड अंकाई टंकाई हे किल्ले पाहावयास मिळतात निसर्गसौंदर्याने नसलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी अवघड वाट होती परंतु मागील वर्षी सह्याद्री प्रतिष्ठानने येथे दगडामध्ये कोरून जवळपास 70 पायऱ्या केल्याने आता किल्ल्यावर जाण्याची वाट सोपी झाली आहे सह्याद्रीच्या कुशीतील या गडकोटांच्या दर्शनाने आपला दिवस सुंदर आणि सुखकर होवो

Monday, 6 July 2020

लासूर चे आनंदेश्वर

लासूर चे आनंदेश्वर
मंदिर डॉ. जयंत वडतकरAnandeshwar Temple Lasur, Daryapur लासूरचे ...
विदर्भातील काही प्राचीन व महत्त्वपूर्ण मंदिरांच्या यादीत लासूरचे आनंदेश्वर मंदिर महत्वाचे आहे, स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्याचे ठिकाणाहून दर्यापूर ते अकोला या रस्त्यावर दर्यापूर पासून सुमारे १२ किमी अंतरावर लासूर गावाच्या दक्षिणेस आहे. लासूर गावाच्या पूर्वेला काही अंतरावरुन चंद्रभागा नदी वाहते, तर आग्नेय दिशेस चंद्रभागा व पूर्णा नदीचा संगम असून येथून पुढे हि नदी पूर्णा बनून लासूरच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. या नदीच्या व लासूर गावाच्या मध्ये एका उंच भागावर आनंदेश्वर मंदिर स्थित आहे. या हेमाडपंती मंदिराचा निर्मिती काळ हा तेराव्या शतकातील, देवगिरीच्या यादवांचा सत्तेच्या अस्ताच्या काळातील असावा असा अनुमान आहे. यादवांच्या काळात त्यांचा प्रधान व कुशल स्थापत्यतज्ञ हेमाद्रीपंत याने वऱ्हाडात अनेक ठिकाणी मंदिरे बांधलीत. त्याच श्रेणीतील हे मंदिर असावे. लासूर चे मंदिर निर्मितीनंतर अनेक वर्ष एका मातीच्या उंचवट्याखाली दबून होते, या उंचवट्यावरील माती हळूहळू वाहून गेल्यामुळे मंदिराची वरची बाजू, म्हणजेच सभामंडपाचा गोल भाग उघडा पडला. जमिनीतून हे विहिरी प्रमाणे काय वर यात आहे म्हणून लोकांची उत्सुकता वाढली. त्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्याने तेथे उत्खनन करविले व त्यातून हे मंदिर बाहेर आले. आशा या काळाच्या अंधारात गुडूप असलेल्या मंदिराचा शोध लागल्यानंतर याची ओळख अंधारी बुवाचे मंदिर अशी झाली व त्यावरूनच आनंदेश्वर मंदिर नाव पडले असे जुने लोक सांगतात. मात्र याबाबत काही पुरावे सापडू शकले नाहीत. अमरावती च्या ग्याझेटीअर मध्ये या मंदिराबद्दल अवघ्या तीन ओळी लिहिलेल्या असून यामध्ये सदर मंदिर काळ्या पाषानात बांधलेले सुंदर कोरीव असे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे ज्यावर देव देवतांच्या व असुरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत व हे मंदिर ढासळण्याच्या स्थितीत आहे, इतकेच लिहिले आहे. प्रवेशव्दारा पर्यंत पोहोचण्यास एकूण सात पायऱ्या असून यावरून मंदिर किती उंच आहे ते लक्षात येते. सभामंडपाचे प्रवेशव्दार कमी उंचीचे असून आत प्रवेश करतांना वाकून जावे लागते. आनंदेश्वर मंदिर हे प्राकार भिंतीच्या आत व उत्तर मुखी असून उंच जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा आकार हा त्रिदल पद्धितीत म्हणजेच मध्ये मुख्य गाभारा व दोन बाजूला दोन उपगाभारे असा आहे. आनंदेश्वर मंदिर हे शिव मंदिर असून मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. शिवलिंगाचे प्रणाल उत्तरेस असून प्रवेशव्दार उत्तरेस असल्यामुळे शंकूळी किंवा गोमुख पूर्वेस काढण्यात आले आहे. इतर दोन उप गाभाऱ्यातील मुर्त्या उपलब्ध नाहीत. मुख्य व उप गाभाऱ्याच्या व्दार शाखा पाच भागात विभाजित असून मध्य शाखेतील उठावदार असून तो अलंकृत आहे. पूर्व मुखी व उत्तर मुखी गाभाऱ्याच्या ललाट बीम्बावर गणेश विराजमान असून पच्छिम मुखी गाभाऱ्याच्या ललाट बीम्बावर गरुड विराजमान आहे. मंदिराचा सभामंडप गोल आकाराचा असून सभामंडप अतिशय सुंदर नक्षीयुक्त व मजबूत काळ्या दगडात एकूण १२ खांबावर खांबावर तोलून धरलेला आहे. खांब अतिशय मजबूत पाषाणात कोरलेले असून त्यावर सुंदर नक्षी व गणपती, कीर्तिमुख, नरसिंह, गरुड, व्यास आदींच्या कोरीव मुर्त्या सुद्धा आहेत. अतिशय सुंदर नक्षीयुक्त व मजबूत काळ्या दगडातील खांबाच्या वरच्या भागाला यक्ष मूर्ती असून त्यांनी मंदिराचा वरचा भार तोलून धरला असे दर्शविले आहे. सभामंडपास वरून छत नसून मंदिरावर शिखर सुद्धा बांधलेले नाही. या उघड्या गोल आकाराच्या सभामंडपातून येणारा उजेड किंवा उन जेव्हा आतमध्ये येते ते बघून हि प्रकाशयोजना मुद्दामहून केली असावी अशी शंका येते. मंदिरात उजेडासाठी व संकटसमयी दूरवरचे दिसण्याच्या दृष्टीने तीन बाजूंनी नक्षीयुक्त झरोके ठेवलेले असून या झरोक्यांच्या खोलीवरून भिंतींची रुंदीची कल्पना करता येते, बाहेरील बाजूने बघितल्यास मात्र आतील फारसे काही दिसत नाही. मंदिराचा बाहेरील भाग साधारणता सहा फुट उंच मजबूत जोत्यावर उभारलेला असून त्यावर कोरीव नक्षीयुक्त दगडाचे स्थर व त्यावरील भागात विविध नक्षीयुक्त स्तरांनी मंदिर सजलेले आहे. मंदिराभोवताल प्रदक्षिणा घालण्यासाठी जोत्यावर प्रशस्त जागा आहे. मंदिरावर विविध देव देवतांच्या सुबक अशा मुर्त्या असून त्यामध्ये दशावतारी मुर्त्यां च्या समावेशामुळे हे विष्णूचे मंदिर असावे असेही वाटते. इतर मूर्त्यांमध्ये नरसिंह, लक्ष्मी, भैरव, हिरण्यकश्यपूचा वध आदींचा समावेश आहे. एका पट्टीकेमध्ये वादक व नृत्यांगना तर एका पट्टीकेमध्ये विविध पक्षी विहार करताना दर्शविण्यात आले आहेत. काही सुंदर नक्षी कोरलेल्या आहेत. मंदिरावरील सर्वात वैशिष्टपूर्ण चर्चेत असलेली मूर्ती आहे ती म्हणजे गोपिकांसह कृष्ण. या गोपीकृष्ण शिल्पाबद्दल स्थानिक भागात मात्र काही लोककथा प्रसिद्ध आहेत. एका भावाने बहिणीला लाथ मारली व त्यामुळे त्याच्या पायात किडे पडलेत व बहिण खाली बसून ते किडे चिमट्याने काढत आहे, या शिल्पाचे असे वर्णन लोक करतात. या कथेवर काही लोकगीते सुद्धा या भागात रचली गेली आहेत. मंदिरावर खजुराहो व मार्कंडा मंदिराच्या धर्तीवर काही कामशिल्पे आहेत, यामध्ये स्त्री पुरुष मैथुन दर्शविण्यात आले असून सध्या त्या शिल्पांची झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत. येथील आणखी आख्यायिका म्हणजे मंदिराच्या विशिष्ट दगडाला येणारा मसाल्याचा सुगंध. मंदिराच्या काही दगडाला मसाल्याचा सुगंध येतो असे लोक सांगतात. सांगितल्यावर अनेकांना तो येतो, किंवा तसा भास होत असावा, मात्र या तर्काला काहीही आधार नाही. डॉ. जयंत वडतकर 9822875773

Saturday, 4 July 2020

सिंधुदुर्गचं वैभव... किल्ले रामगड.

सिंधुदुर्गचं वैभव... किल्ले रामगड.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील रामगड या नावानेच असलेल्या गावात अजुनही सुस्थितीत असलेली तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, तोफा,आणि काही वाड्यांचे अवशेष असलेला रामगड किल्ला. होय ज्याची कल्पना आम्हाला काम करतानाही आली नव्हती की या गडावर इतकं काही गर्द झांडीच्या मागे हे सर्व लपलेय.७ वर्षांपूर्वी गुढीपाडवा साजरा करायच्या निमित्ताने कोकणातील मालवण तालुक्यातील या रामगडाची निवड झाली.गडपाहणी केली मग कळलं की तो गड आजही अभय प्रभुदेसाई या स्थानिक महत्वाच्या प्रतिष्ठित अश्या घराण्याकडे आहे.त्यांना भेटून आम्ही आमच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.तेही खूप आनंदित झाले की असे कोणी लोक आहेत की जे स्वयंस्फूर्तीने गडसंवर्धन करतात.त्यांनी लागलीच होकार दिला.आणि वर म्हणाले की मीही स्वतः तुमच्या सोबत सर्व उपक्रमात कायम सहभागी होईन.

त्या दिवसापासून आजगायत गडावर असंख्य श्रमदान मोहिमा झाल्या बऱ्याच वास्तू मोकळ्या केल्या..इतकंच नाही तर गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन ,दसरा हे सर्व सण दोन - दोन दिवस थांबुन मशाली,पणत्या,रांगोळ्या काढून अशी विविध सजावट करून मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरे होऊ लागले.आजूबाजूच्या भागातून बरेच तरुण तरुणी यात आता सहभागी होऊ लागलेत.जो गड काहीशे वर्षांपासून गर्द झाडीत झाकून गेला होता.तो आता मात्र आपलं वैभव दिमाखात दाखवत उभा आहे.या कार्याची माहिती मिळताच "गाव गाता गझाली" या कार्यक्रमाचे लेखक रुपेश नेवगी यांनी भेट दिली.अभय प्रभुदेसाई यांनी जो विश्वास दाखवून आम्हाला सहकार्य केले तेही आम्हला ऊर्जा देणारं होतं.

आज आपल्या या कोकणात गडकोटांची साखळी बरीच आहे.पण काही गडकोटांकडे सोडलं तर कित्येक गडांची अवस्था बिकट आहे.काही मालकी तर काही कायद्याच्या कचाट्यात अडकेलत.आपले हे गडकोट कोकणाचा हजारो वर्षांपासूनचा इतिहास सांगण्यासाठी उभे आहेत.फक्त त्याला मजबूत आधाराची गरज आहे.व त्यासाठी असंख्य हात हवेत मग ते शासनासोबत किंवा संस्थेसोबत...

आपल्याला इथवरच थांबायचं नाही.कोरोना लॉक डाऊन संपला की नियमात राहून अजून खूप काम करायचं आहे.त्यासाठी वेगवेगळ्या अंगाने सहकार्याची अपेक्षा आहे.आम्हां दुर्गवीरांच्या सिंधुदुर्ग जिल्हा सभासद नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. नक्कीच भविष्यात या गगडाचे चांगल्या पध्दतीने संवर्धन होईल त्याकडे आमचा कल असेल.आपण सर्व या कार्यात सहभागी व्हा जमेल तिथं आणि जमेल तसं..

धन्यवाद
दुर्गवीर प्रतिष्ठान
www.durgveer.com
9833458151/8097519700