Followers

Monday 6 July 2020

लासूर चे आनंदेश्वर

लासूर चे आनंदेश्वर
मंदिर डॉ. जयंत वडतकरAnandeshwar Temple Lasur, Daryapur लासूरचे ...
विदर्भातील काही प्राचीन व महत्त्वपूर्ण मंदिरांच्या यादीत लासूरचे आनंदेश्वर मंदिर महत्वाचे आहे, स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्याचे ठिकाणाहून दर्यापूर ते अकोला या रस्त्यावर दर्यापूर पासून सुमारे १२ किमी अंतरावर लासूर गावाच्या दक्षिणेस आहे. लासूर गावाच्या पूर्वेला काही अंतरावरुन चंद्रभागा नदी वाहते, तर आग्नेय दिशेस चंद्रभागा व पूर्णा नदीचा संगम असून येथून पुढे हि नदी पूर्णा बनून लासूरच्या दक्षिणेकडून वाहत पुढे जाते. या नदीच्या व लासूर गावाच्या मध्ये एका उंच भागावर आनंदेश्वर मंदिर स्थित आहे. या हेमाडपंती मंदिराचा निर्मिती काळ हा तेराव्या शतकातील, देवगिरीच्या यादवांचा सत्तेच्या अस्ताच्या काळातील असावा असा अनुमान आहे. यादवांच्या काळात त्यांचा प्रधान व कुशल स्थापत्यतज्ञ हेमाद्रीपंत याने वऱ्हाडात अनेक ठिकाणी मंदिरे बांधलीत. त्याच श्रेणीतील हे मंदिर असावे. लासूर चे मंदिर निर्मितीनंतर अनेक वर्ष एका मातीच्या उंचवट्याखाली दबून होते, या उंचवट्यावरील माती हळूहळू वाहून गेल्यामुळे मंदिराची वरची बाजू, म्हणजेच सभामंडपाचा गोल भाग उघडा पडला. जमिनीतून हे विहिरी प्रमाणे काय वर यात आहे म्हणून लोकांची उत्सुकता वाढली. त्यानंतर ब्रिटीश अधिकाऱ्याने तेथे उत्खनन करविले व त्यातून हे मंदिर बाहेर आले. आशा या काळाच्या अंधारात गुडूप असलेल्या मंदिराचा शोध लागल्यानंतर याची ओळख अंधारी बुवाचे मंदिर अशी झाली व त्यावरूनच आनंदेश्वर मंदिर नाव पडले असे जुने लोक सांगतात. मात्र याबाबत काही पुरावे सापडू शकले नाहीत. अमरावती च्या ग्याझेटीअर मध्ये या मंदिराबद्दल अवघ्या तीन ओळी लिहिलेल्या असून यामध्ये सदर मंदिर काळ्या पाषानात बांधलेले सुंदर कोरीव असे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे ज्यावर देव देवतांच्या व असुरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत व हे मंदिर ढासळण्याच्या स्थितीत आहे, इतकेच लिहिले आहे. प्रवेशव्दारा पर्यंत पोहोचण्यास एकूण सात पायऱ्या असून यावरून मंदिर किती उंच आहे ते लक्षात येते. सभामंडपाचे प्रवेशव्दार कमी उंचीचे असून आत प्रवेश करतांना वाकून जावे लागते. आनंदेश्वर मंदिर हे प्राकार भिंतीच्या आत व उत्तर मुखी असून उंच जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा आकार हा त्रिदल पद्धितीत म्हणजेच मध्ये मुख्य गाभारा व दोन बाजूला दोन उपगाभारे असा आहे. आनंदेश्वर मंदिर हे शिव मंदिर असून मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. शिवलिंगाचे प्रणाल उत्तरेस असून प्रवेशव्दार उत्तरेस असल्यामुळे शंकूळी किंवा गोमुख पूर्वेस काढण्यात आले आहे. इतर दोन उप गाभाऱ्यातील मुर्त्या उपलब्ध नाहीत. मुख्य व उप गाभाऱ्याच्या व्दार शाखा पाच भागात विभाजित असून मध्य शाखेतील उठावदार असून तो अलंकृत आहे. पूर्व मुखी व उत्तर मुखी गाभाऱ्याच्या ललाट बीम्बावर गणेश विराजमान असून पच्छिम मुखी गाभाऱ्याच्या ललाट बीम्बावर गरुड विराजमान आहे. मंदिराचा सभामंडप गोल आकाराचा असून सभामंडप अतिशय सुंदर नक्षीयुक्त व मजबूत काळ्या दगडात एकूण १२ खांबावर खांबावर तोलून धरलेला आहे. खांब अतिशय मजबूत पाषाणात कोरलेले असून त्यावर सुंदर नक्षी व गणपती, कीर्तिमुख, नरसिंह, गरुड, व्यास आदींच्या कोरीव मुर्त्या सुद्धा आहेत. अतिशय सुंदर नक्षीयुक्त व मजबूत काळ्या दगडातील खांबाच्या वरच्या भागाला यक्ष मूर्ती असून त्यांनी मंदिराचा वरचा भार तोलून धरला असे दर्शविले आहे. सभामंडपास वरून छत नसून मंदिरावर शिखर सुद्धा बांधलेले नाही. या उघड्या गोल आकाराच्या सभामंडपातून येणारा उजेड किंवा उन जेव्हा आतमध्ये येते ते बघून हि प्रकाशयोजना मुद्दामहून केली असावी अशी शंका येते. मंदिरात उजेडासाठी व संकटसमयी दूरवरचे दिसण्याच्या दृष्टीने तीन बाजूंनी नक्षीयुक्त झरोके ठेवलेले असून या झरोक्यांच्या खोलीवरून भिंतींची रुंदीची कल्पना करता येते, बाहेरील बाजूने बघितल्यास मात्र आतील फारसे काही दिसत नाही. मंदिराचा बाहेरील भाग साधारणता सहा फुट उंच मजबूत जोत्यावर उभारलेला असून त्यावर कोरीव नक्षीयुक्त दगडाचे स्थर व त्यावरील भागात विविध नक्षीयुक्त स्तरांनी मंदिर सजलेले आहे. मंदिराभोवताल प्रदक्षिणा घालण्यासाठी जोत्यावर प्रशस्त जागा आहे. मंदिरावर विविध देव देवतांच्या सुबक अशा मुर्त्या असून त्यामध्ये दशावतारी मुर्त्यां च्या समावेशामुळे हे विष्णूचे मंदिर असावे असेही वाटते. इतर मूर्त्यांमध्ये नरसिंह, लक्ष्मी, भैरव, हिरण्यकश्यपूचा वध आदींचा समावेश आहे. एका पट्टीकेमध्ये वादक व नृत्यांगना तर एका पट्टीकेमध्ये विविध पक्षी विहार करताना दर्शविण्यात आले आहेत. काही सुंदर नक्षी कोरलेल्या आहेत. मंदिरावरील सर्वात वैशिष्टपूर्ण चर्चेत असलेली मूर्ती आहे ती म्हणजे गोपिकांसह कृष्ण. या गोपीकृष्ण शिल्पाबद्दल स्थानिक भागात मात्र काही लोककथा प्रसिद्ध आहेत. एका भावाने बहिणीला लाथ मारली व त्यामुळे त्याच्या पायात किडे पडलेत व बहिण खाली बसून ते किडे चिमट्याने काढत आहे, या शिल्पाचे असे वर्णन लोक करतात. या कथेवर काही लोकगीते सुद्धा या भागात रचली गेली आहेत. मंदिरावर खजुराहो व मार्कंडा मंदिराच्या धर्तीवर काही कामशिल्पे आहेत, यामध्ये स्त्री पुरुष मैथुन दर्शविण्यात आले असून सध्या त्या शिल्पांची झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत. येथील आणखी आख्यायिका म्हणजे मंदिराच्या विशिष्ट दगडाला येणारा मसाल्याचा सुगंध. मंदिराच्या काही दगडाला मसाल्याचा सुगंध येतो असे लोक सांगतात. सांगितल्यावर अनेकांना तो येतो, किंवा तसा भास होत असावा, मात्र या तर्काला काहीही आधार नाही. डॉ. जयंत वडतकर 9822875773

No comments:

Post a Comment