Followers

Sunday, 4 November 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ७

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------४
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
थोरल्या बाजीरावांना ही वास्तू उभारण्यासाठी १६,१२०/- रु. एवढा खर्च आला. पहिले बाजीराव पेशवे यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी तट व त्यांचे बुरुज आणि दरवाजे, दिवाणखाने व इतर इमारती, कारंजे व पाण्याचे हौद आदि वास्तू बांधल्या. हे सर्व काम पूर्ण होण्यास १७६० साल उजाडले. सध्या शनिवारवाड्याच्या चारही बाजूंना ९५० फूट लांबीची तटबंदी आहे. ही तटबंदी आणि बुरुज आजही पुण्यात मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतींना पाच मोठे दरवाजे व नऊ बुरुज आहेत. या बुरुजांवर तोफा बसवण्याची चांगली सोय केलेली आहे. यापैकी ‘पागेचा बुरुज’ आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. असे म्हणतात तो खड्डा तोफांचे गोळे ठेवण्यासाठी तयार करण्यात आला होता. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली दरवाजा, अलिबहाद्दर किंवा मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा ही नावे आहेत. दिल्ली दरवाजा हा वाड्याचा मुख्य दरवाजा असून त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे. या दरवाजातून सर्वांनाच येण्यास परवानगी पेशवेकाळात नव्हती. या दिल्ली दरवाजाची उंची २१ फूट व रुंदी १४फूट आहे. हा सर्वात मोठा दरवाजा आहे. वाड्यावर सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.
Shaniwarwada_1860 शनिवारवाड्यात एक सात मजली सात खणी इमारत होती. वाड्यातील महत्त्वाच्या इमारतीत थोरल्या रायांचा दिवाणखाना, नाचाचा दिवाणखाना, गणेश महाल, जुना आरसे महाल आदींचा समावेश होता. वाड्यामध्ये असलेले हजारी कारंजे (एक हजार फवारे उडवणारे) म्हणून ओळखले जाणाऱ्या षोडशदलीय कमळाच्या आकाराच्या कारंज्याची शोभा आता कल्पनेनेच केवळ जाणता येईल. वाड्यात दिवाणखाने व त्यातील अतिसुंदर कोरीवकामाने नटलेल्या कमानींना सुरूच्या झाडांचा आकार दिलेले खांब होते. छतांना मनोहारी लाकडी वेलबुट्ट्या आणि सुंदर वेली व फुले कोरलेली होती तर भिंतीवर रामायण व महाराभात या महाकाव्यातील प्रसंगांचे देखावे चित्रित केलेले होते. वाड्याच्या इमारतींच्या आखणीत बांधकाम आणि त्यातील कलाकुसरीची कामे करण्यात ज्या प्रमुख कारागिरांचा वाटा होता त्यात शिवराम कृष्ण, देवजी व कोंडाजी सुतार, मोराजी पाथरवट, मीनकामात निष्णात असलेल्या जयपूरचा भोजराज व चित्रकार राघो इत्यादींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment