Followers

Saturday, 31 March 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग 30 दौलतमंगळ



दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग 30
दौलतमंगळ
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पायऱ्यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपडी आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीरूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते तर समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार..हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडांचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसूकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात भुलवून सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.

No comments:

Post a Comment