Followers

Saturday, 28 March 2020

#खुबलढा_बुरुज 🚩

#खुबलढा_बुरुज 🚩
#इतिहासाचे_मूक_साक्षीदार 🚩
प्रत्येक किल्ल्यावर आपण बुरुज पाहिलेच असतील, तर नेमका ह्या बुरुजांचा उपयोग काय? कशासाठी बांधला असेल?
संरक्षणाच्या दृष्टीने बुरुज हे महत्वाचे कार्य करतात. किल्ल्यावर होणारा तोफेचा मारा चुकवण्यासाठी किवा मारा-गिरीकरण्याची मुख्य जागा म्हणजे बुरुज होय. आत्तापर्यंत प्रत्येक लढाई मध्ये ह्या बुरुजांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक गनिमाला मुख्य प्रवेशद्वार किवा बालेकिल्ला गाठण्याआधी ह्या बुरुजांच्या आहारी जावे लागत असे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात असा उल्लेख केला आहे कि “दरवाजे बांधावे ते खालील मारा (तोफेचा) चुकवून, पुढे बुरुज देऊन, येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे."
बुरुज हे सफेद पेशी प्रमाणे काम करतात, ज्याप्रमाणे एखादे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीराला इजा पोचण्याच्या आधीच सफेद पेशी त्यांच्यावर आक्रमक होऊन त्या विषाणूंना मारून टाकतात त्याचप्रमाणे हे बुरुज देखील गनीम आत घुसल्यावर त्यांना बालेकिल्ल्याला हानी पोहोचवण्याच्या आधीच त्यांना तिथे अडवून मारले जाते.
पाचाड कोट येथुन वर चढत आल्यावर आपल्याला प्रथमदर्शी एक बुरूज आढळतो. त्या बुरूजाला "खुबलढा बुरुज" म्हणतात. हा बुरुज रायगड किल्ल्याचा रखवालाच जनु. गणिमास रोखुन धरणे आणि तेथेच त्यांस मारणे हे त्याचे मुख्य काम, म्हणुनच रायगड या बुरुजास बोले खुब लढा..
परंतु आज ह्या बुरुजांची अवस्था देखील ढासळत चालली आहे, ज्यावेळी हे सर्व बुरुज ढासळतील त्यावेळी कालांतराने किल्ले देखील मोडकळीस येतील. म्हणुनच संवर्धन करणे आणि त्यांची निगा राखणे हे आपले कर्तव्यच.
लेखन - मयुर खोपेकर ✍️


देवगिरी (दौलताबाद)





















देवगिरी (दौलताबाद)
जिल्हा:-छत्रपती संभाजी नगर
बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
इ.स. १३२७ ते इ.स. १३९७ संपादन करा
इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
इ.स.१३१० ते इ.स.१३४७ संपादन करा
अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुरेपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा मुहम्मद[ संदर्भ हवा ] या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.
देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे . त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे .या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे .
इ.स. १३४७ ते इ.स.१५०० संपादन करा
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.१७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.

भांगसाई माता गड


















भांगसाई माता गड
जिल्हा:-छत्रपती संभाजीनगर
या गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २,७०० फूट आहे. गडनिवासिनी भांगसाई देवीच्या अधिष्ठानाने या गडास भांगसाई गड असे म्हणतात. छत्रपती संभाजी नगर-देवगिरी रस्त्याने जाताना घाटाच्या अलीकडे उजवीकडे एक फाटा आहे, तेथून भांगशीमातागडाकडे जाता येते. गडाच्या उजवीकडच्या टोकावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या आहेत. पुढे काही कातळ कोरीव पायऱ्या दिसतात आणि खरा गड सुरू होतो. कातळाला मध्यभागी फोडून तयार केलेला जिना पार करत गडावर उजवीकडून प्रवेश होतो. किल्ला म्हणून गडावर फारसे अवशेष नसले तरी गडमाथ्यावर पाण्याचे जोड टाके आहे. यातील एका टाक्यात मध्यभागी आणखी एक लहान टाके खोदलेले दिसते. तसेच चार टाक्यांचे एक लहानसे संकुलही आहे. साधारण फुटबॉलच्या मैदानासारखा या गडाचा आकार आयताकृती असा आहे. गडावर कडेच्या बाजूने काही गुहा खोदलेल्या दिसतात, त्यांत पाण्याचे स्रोत आहेत. कातळ तासून कोरलेले खांब हे या गुहेरी टाक्यांचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय या गडावरून औरंगाबाद टेकड्या व पश्‍चिमेला देवगिरीचा मुलुख दिसतो. समोर दिसणाऱ्या डोंगररांगापासून हा गड जरा सुटावलेला दिसतो. त्यामुळे तो ओळखण्यास सोपा पडतो. गडाच्या पायथ्याशी वरती स्वामी परमानंदगिरीजी आश्रम व गोशाळा आहे.छत्रपती संभाजीनगर- पुण्याकडे जाताना एमआयडीसी जवळ राज्य महामार्गावरून या गडाचे एक वेगळेच दर्शन घडते.
#भांगसाई_माता_गड
#गडकील्ले
#जय_शंभुराजे_परीवार
!!जय शंभुराजे परीवार महाराष्ट्र राज्य!!

Saturday, 7 March 2020

किल्ले विजयदुर्ग . ( घेरिया )

किल्ले विजयदुर्ग . ( घेरिया ).



पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे 40 किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. १२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता.
पूर्वी हा किल्ला चारी बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला होता. म्हणूनच या किल्ल्याला जलदुर्ग म्हणत. किल्ल्याच्या पूर्व बाजूला बराच मोठा खंदक होता. तो पाण्याने भरलेला असायचा. किल्ल्यात जाण्यासाठी खंदकावर लाकडी पूल होता. रात्री तो काढून ठेवला जात असे. अलिकडे तो खंदक बुजवून रस्ता तयार केला आहे. सुमारे 800 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्राखाली बांधलेली संरक्षक भिंत हे एक आश्चर्य आहे. किल्ल्याजवळ मोठी जहाज (युध्द नौका) आल्यास त्यांचा तळ भिंतीला आपटून त्या नष्ट होत असत. नितांत सुंदर भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला, विविध घटनांचा साक्षिदार असलेला विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या गतवैभवाचे अवशेष अंगा खांद्यावर बाळगत उभा आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :- ह्या किल्ल्याचे सौंदर्य पहाणे, त्याचे ऐतिहासिक महत्व जाणून घेणे अभ्यासकांना, जिज्ञासूंना, संशोधकांना, पर्यटकांना एक मेजवानीच ठरते. सुमारे 1 किमी. अंतरावरून हा किल्ला पाहून डोळयाचे पारणे फिटते. विजयदुर्ग गावातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. त्याठिकाणी पूर्वीच्या काळी खंदक होता. समुद्राचे पाणी त्यात खेळवलेले होते. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी या खंदकावर उचलता येणारा लाकडी पूल होता. आज मात्र भराव घातल्यामुळे आपला थेट जमिनीवरून गडावर प्रवेश होतो. गडाचा पहिला दरवाजा "हनुमंत दरवाजा" आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे देउळ आणि एक तोफ़ पाहायला मिळते. हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले. या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो, दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. भव्य अशा "यशवंत" प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलिस चौकी समोर रचुन ठेवलेले तोफ़गोळे पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुने गडफ़ेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते. तेथुन पुढे सदरेची भव्य इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. पुढे बुरुजावरच बांधलेल्या दोन मजली इमारती दिसतात. त्यांना माडी म्हणतात. पुढे राणीवसाची इमारत एका भव्य बुरुजावर बांधलेली पाहायला मिळते. तटबंदीच्या आतल्या बाजूस खाली अनेक उध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. पुढे तटबंदीवर चढुन चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हणमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. बुरुज व तटबंदीतील जंग्या, तोफ़ांसाठी ठेवलेले झरोके व बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी डोणी पाहाण्या सारख्या आहेत. दर्या बुरुजाला असलेल्या पायर्‍यांवरुन खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर पाहायला मिळते. त्याच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा पाहून परत तटबंदीवर चढल्यावर अनुक्रमे तुटका, शिकरा, सिंदे, शहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन बुरुज पाहायला मिळतात. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. समुद्रापासून ३२ मीटर उंच असलेल्या या बुरुजाला "खुबलढा किंवा बारातोपा बुरुज" या नावाने ओळखतात. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे. त्यात काही तोफ़गोळे ठेवलेले आहेत. खुबलढा बुरुज पाहुन पुन्हा तटबंदीवर येउन पुढे गेल्यावर घनची, पान बुरुज पाहायला मिळतात. पुढे एक वास्तू पाहायला मिळते. त्यावर दारुकोठार अस नाव लिहिलेल आहे. परंतू तटबंदीला लागुनच दारुकोठार असण्याची शक्यता कमी आहे.
दारूकोठार पाहून झाल्यावर तटबंदीवरुन उतरून किल्ल्याच्या आत असलेल्या टेकडी भोवती बांधलेल्या तटबंदीच्या आत प्रवेश करुन चोर दरवाजाच्या दिशेने चालत गेल्यावर एक विहिर पाहायला मिळते. ती पाहून आखलेल्या मार्गावरून चालायला सुरुवात केल्यावर भग्न भवानी मंदिर पाहायला मिळते. त्यापुढे उध्वस्त वास्तुंचे काही चौथरे पाहायला मिळतात. पुढे उजव्या बाजूस काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात. त्याला "साहेबांचे ओटे" म्हणतात. इ.स. १८७८ मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी शास्त्रज्ञ लॉकियर याने विजयदुर्गावर खास चौथरे बनवून घेतले व सुर्याचे निरीक्षण केले. त्यावेळी त्याला हेलियम वायूचा शोध लागला.पायवाटेच्या डाव्या बाजूस एक लहान व एक प्रचंड मोठा हौद पाहायला मिळतो. मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. दोनही हौद कोरडे आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे हौद बांधण्यात आले होते. साठलेले पाणी जमिनीत मुरु नये म्हणुन हौद बांधताना शिश्याचा वापर केला होता. हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते. इमारत पाहुन पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर व त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ़ पाहायला मिळते. ती पाहुन पायवाटेने तोफ़गोळे ठेवलेल्या पोलिस चौकीकडे येताना वाटेत घोड्याच्या पागा, हौद, एक विहिर आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. इथेच तटबंदी जवळ खाली उतरणार्‍या पायर्‍या दिसतात. इथे एक भूयार असून ते आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे. किल्ल्याच्या गोमुखी दरवाजा जवळ आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यासाठी २ तास लागतात.
विजयदुर्ग पासून ७ किमी अंतरावर गिर्ये गाव आहे. या गावात १) बस स्थानका मागे आनंदराव धुळपांचा वाडा आहे. या वाड्यात माडीवरच्या दिवाणखाण्यात भिंतीवर बरीच जुनी रंगीत चित्रे आहेत. दीड-दोन शतके उलटून गेली असली तरी त्यांचे रंग अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत.
२) कान्होजी आंग्रेंच्या काळात विजयदुर्ग पासून ३ किमीवर
वाघोटन खाडीत दगड फ़ोडून आरमारी गोदी (Dry Dock) बांधण्यात आली होती. या ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्तीची कामे केली जात.
३) विजयदुर्ग पासून ३ किमीवर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्या जवळ संभाजी आंग्रे यांची समाधी आहे.
इतिहास -: कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे इ.स. ११९३ ते इ.स.१२०६ या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला.
इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६५३ साली विजयदुर्ग विजापूरच्या आदिलशाहीकडून जिंकून घेतला, तेव्हापासून विजयदुर्ग किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले. स्वत: शिवाजी महाराजांनी निशाण टेकडीवर भगवा ध्वज फडकाविला. महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी त्याची व्याप्ती फारशी नव्हती, तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.
सुरवातीला विजयदुर्ग घेरिया या नावाने ओळखला जात असे, विजयदुर्ग जवळ असणार्‍या गिर्ये या गावावरून घेरिया हे नाव पडले होते. पण महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती केली तेव्हा "विजय संवत्सर" चालू होते, म्हणून त्याचे नाव विजयदुर्ग ठेवण्यात आले.
इ.स. १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग येथे मराठी आरमाराची स्थापना केली,.पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात विजयदुर्गला आरमारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले. १६९८ साली छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना 'सरखेल' हा किताब बहाल केला. कान्होजीनी विजयदुर्गाच्या सहाय्याने समुद्रावर असा काही दरारा बसविला की बलाढ्य इंग्रजांच्या आरमारासही कित्येक वेळा पराभूत होवून माघार घ्यावी लागली. विजयदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रज्,डच्,पोर्तुगीज यांनी सातत्याने किल्ल्यावर स्वार्‍या केल्या पण त्यांना प्रत्येक वेळी हारच पत्करावी लागली.
कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू झाले. मुलगा तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानीसा झाला. तेव्हा त्याचा उच्छेद करावा हा हेतू मनात धरून पेशवे व इंग्रज एक झाले. इ.स. १७१७ मध्ये मराठ्यांनी इंग्रजांचे "ससेक्स" जहाज पकडून विजयदुर्ग बंदरात ठेवले. कान्होजींच्या समुद्रावरील वाढत्या प्रभावाने इंग्रजांचे धाबे दणाणले होते. इंग्रजांनी इ.स. १७१८ मध्ये प्रचंड आरमारानीशी विजयदुर्गावर हल्ला चढवला, पण किल्ल्यावरून तुळाजीचा भरवशाचा सरदार रुद्राजी धुळपने तो हल्ला परतवून लावला. प्रचंड दारूगोळा आणि २०० सैनिकांचे प्राण गमवून इंग्रजांचे आरमार मुंबईला परत गेले.
इ.स.१७२० मधे इंग्रज कॅप्टन ब्राऊनने अनेक लढाऊ जहाज घेऊन विजयदुर्गावर हल्ला केला. त्यांच्या ताफ़्यात "फ़्राम" नावाची प्रचंड युध्दनौका होती. तरीही इंग्रजांना हार पत्करावी लागली. मराठ्यांनी इंग्रजांचा पाठलाग चालू केल्यावर त्यांच्या हाती "फ़्राम" लागू नये म्हणून इंग्रजांनी ती युध्दनौका जाळुन बुडवली.
तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळजीची भीती प्रामुख्याने पाश्चिमात्यांना होती; तथापि नानासाहेबाने स्वार्थी हेतूने आंग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरूद्घच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणांतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आंग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरुद्धच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणामतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आंग्रेचा पनवेलजवळचा बिकटगड आणि इतर प्रदेशही नानासाहेब पेशवेने जिंकून घेतले. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला (१३ फेब्रुवारी १७५६). इंग्रजांनी किल्लावरील अमाप संपत्ती लुटली. तुळाजी पुढे पेशव्याच्या कैदेतच १७८६ मध्ये मरण पावला. बाणकोटच्या बदल्यात इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यास दिला. आंग्र्यांच्या अस्तानंतर विजयदुर्गचा प्रांत व आरमाराची सुभेदारी पेशव्यांनी आनंदराव धुळप यास दिली. मराठ्यांचे आरमार कमकुवत होण्यास येथूनच प्रांरंभ झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांचे कोकणपट्टीवरील विजयदुर्ग, रत्नागिरी वगैरे स्थळे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १७७३ च्या जानेवारीत त्र्यंबक विनायक व कृष्णाजी धुळप यांनी पोर्तुगीजांना विजयदुर्गातून हुसकावून लावले. पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) विजयदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रजांनी तो जिंकून घेतला. ........
माहिती संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था..
छायाचित्र साभार : Devendra's Photography व अन्य
संकलन - Dipesh Ghadigaonkar

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर “कुलाबा किल्ला”....🚩

🚩शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन प्रणित शिवकालीन इतिहास🚩

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर “कुलाबा किल्ला”....🚩

साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते...

कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली आणि आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही दुर्गनिर्मिती मधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला...

१९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्‍या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला....

-------------------
  जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा

खर्डा किल्ला.... (सुलतानगड) 🚩

🚩शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन प्रणित शिवकालीन इतिहास🚩

खर्डा किल्ला.... (सुलतानगड) 🚩

अहमदनगरच्या आग्नेयेला जामखेड तालुका आहे जामखेड तालुक्यातील प्रमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे चौकोनी आकाराची तटबंदी व चार प्रमुख दोन दुय्यम असे एकूण सहा बुरुज असलेल्या उत्तराभिमुख खर्डा किल्ल्याचा दरवाजा शाबूत असून त्यावर एक शिलालेख आहे..

इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई ही याच ठिकाणी झाली होती हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता जामखेड तालुक्यातील शिर्डी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो महादजी शिंदेचे वारस दौलतराव शिंदे याच्याशी नाना फडणवीसाचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्याची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला..

परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च इ.स १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने त्याने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला मराठ्यांनी ताबडतोब खर्डा किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारा अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा खंडित करुन तटबंदी भोवती भडीमारासाठी तोफा रचल्या शेवटी भयग्रस्त निजामाने १३ मार्च इ.स १७९५ रोजी तहाची याचना करुन लढाईतून माघार घेतली खर्डा येथेच दिनांक १३ मार्च इ.स १७९५ रोजी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले स्वत:च्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला दौलताबादचा किल्ला व त्याच्या सभोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला..

✍🏼 सह्याद्रीपुत्र दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे सर..

-----------------
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩मराठा

Thursday, 5 March 2020

यावल (निंबाळकर किल्ला)


यावल (निंबाळकर किल्ला)
saambhar :trekshitiz.com/marathi/Yawal_Fort_(Nimbalkar_Fort)-Trek-Jalgaon-District.html

(Yawal Fort (Nimbalkar Fort)) किल्ल्याची ऊंची : 1000 किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : जळगाव श्रेणी : सोपी चोपडा - बुऱ्हाणपूर मार्गावर यावल हे गाव वसलेले आहे . सातपुड्यातील घाटवाटांवरुन येणारा माल या सपाटीवरच्या गावातील बाजारापेठत येत असावा . त्यामुळे या व्यापारी मार्गावर यावल आणि सातपुड्यात असलेल्या पाल या दोन्ही ठिकाणी किल्ले बांधलेले होते. यावल गावातून वहाणार्‍या नदीच्या काठावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर यावल किल्ला उभा आहे. या किल्ल्याला निंबाळकर राजे किल्ला या नावनेही ओळाखले जाते. पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.

पहाण्याची ठिकाणे :यावल गावातून एक रस्ता थेट न्यायालया पर्यंत जातो . या न्यायालयाची इमारत किल्ल्याला खेटून उभी आहे . न्यायालयापाशी पोहोचल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन भव्य बुरुज आणि तटबंदी दिसते . किल्ल्याचे बुरुज व तटबंदी खालच्या बाजूला दगडात व वरच्या बाजूला विटानी बांधलेली आहे. झुडूपातून जाणाऱ्या पायवाटेने २ मिनिटे चढून गेल्यावर आपला उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश होतो . पुढे वाट काटकोनात वळते आणि आपण गडमाथ्यावर पोहोचतो . गडाची अवस्था अतिशय खराब आहे . गडावर झुडूपे माजलेली आहेत. गडाचा उपयोग गडाखालच्या वस्तीकडून प्रातर्विधीसाठी केला जातो . त्यामुळे गडावर फिरताना जपून फिरावे लागते . गडावर उध्वस्त वास्तूंचे चौथरे आणि दोन दगडात बांधलेली पाण्याची कोरडी टाकी पाहायला मिळतात.गडाला एकूण ७ बुरुज आहेत . गड पाहाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा : यावल जवळचे सर्वात मोठे गाव आणि रेल्वे स्टेशन भुसावळ येथे आहे . भुसावळ - यावल अंतर १९ किलोमीटर आहे. भुसावळहून एसटी बसने यावल गाठता येते. यावल गावत न्यायालया जवळ किल्ला आहे. राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही .
जेवणाची सोय : यावल गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत .
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी उत्तम कालावधी : वर्षभर

शिवपूर्वकाळातील ‘मनोहर-मनसंतोष’ गड!

शिवपूर्वकाळातील ‘मनोहर-मनसंतोष’ गड!

Mansantosh Fort घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत. पहिला आंबा, दुसरा बावडा, तिसरा दाजीपुर जंगलातून उतरणा फोंडा आणि सर्वात शेवटी आंबोली. या चारही घाटांचे वैशिष्ट म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत. यातील बहुतेक किल्ले हे शिवपूर्व कालखंडातील आहेत. या सर्वांमधील आंबोली घात तर चक्क महादेवगड फोडूनच बनविलेला आहे. याच्या घाटमाथ्यावर नारायणगड तर, पायथ्याशी मनोहर-मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत. यापैकी नारायणगड हा मुख्य सह्यधारेपासून थोडा सुटलेला आहे. एके काळच्या प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले. परंतु फार कमी गिर्यारोहकांचे पाय इकडे वळतात.
मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी पेठशिवापूर आणि शिरसिंगेजवळच्या गोथावेवादीतून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन एस.टी. ची सोय आहे. परंतु या एसटीच्या सेवा दुर्गभटक्यांसाठी उपयोगाच्या नाहीत. सावंतवाडीहुन पेठशिरापुरास मुक्कामाची एक एसटी जाते. या गाडीने रात्रीच गावात दाखल होत सकाळी गड जवळ करता येते. दुसरा मार्ग गोठवेवाडीतून जातो. या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरसिंगे गावातून वाट जाते. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये इथला निसर्ग आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारा असतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यामधून चालताना जलधारांचे प्रपात सतत कानावर पडत असतात. वाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते. ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा पसारा कमी तो मनसंतोषगड!
या गाठवेवाडीतूनच एक पायवाट या दोन्ही गडांच्या दिशेने झेपावते. वाट खड्या चढणीची असल्यामुळे छातीचा उये फाटतो की काय असे वाटते. जसेजसे आपण उंची गाठू लागतो, तसे आंबोली खोऱ्यामधील गावाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. साधारण तेथून दीड तासाच्या चढाईनंतर एक जंगलाचा पत्ता लागतो. मध्येच पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहचतो. तेथून डावीकडे जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहरगडाकडे जाते आधी आपले लक्ष मनोहरगडाकडे असल्यामुळे उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट लागते. साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाचे दर्शन होते. आत शिरल्यावर एक भक्कम बुरुजावर पोहचतो. इथून डावी उजवीकडे दोन वाट वळतात. यातील उजव्या वाटेवरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी पोहचतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाची वाट मात्र मोकळीस आलेली नाही. त्यामुळे दरवाजा दुरूनच बघावा लागतो.
डावीकडील वाटेने गेल्यास तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत गेलेली आहे. समोरील उंचवट्यावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. खाली भलामोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे एक झाड आहे. या झाडाच्या खाली भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’ म्हणतात. पश्चिमेकडच्या टोकावर गेल्यावर मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा दिसतो. हे पाहून पुन्हा औदुंबराच्या झाडाकडे यायचे आणि उत्तर तटाकडे येताना वाटेत एक विहीर लागते. विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने इथे थोडा इसावा मिळतो. नंतर गड उतरायला लागल्यास मनसंतोषगडाकडे जाणारी वाट मिळते. या वाटेने थोडे चालू लागले की, काही अंतरावर एक भली मोठी गुहा दिसते. या गुहेत मधमाशांचे पोळे असतात त्यामुळे इथे थोडी दक्षता बाळगणे महत्वाचे ठरते.
थोड्या वेळेचा प्रवास करून आपण मनोहर आणि मनसंतोष खिंडीपाशी पोहचतो. इथून मनसंतोष गडाचा सुळका अंगावर आल्यासारखा वाटतो. मनसंतोष गडाच्या उजव्या हातास लागून एक पायवाट पुढे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त पायऱ्या दिसतात. या पुढचा रस्ता जरा अवघड असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक दोर असणे आवश्यक आहे. या टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या माथ्यावर जाऊन पोहचतो. मनसंतोष गडाचा माथा निमुळता असून, तो पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. सध्या या माथ्यावर एक-दोन वाड्यांची जोती दिसतात. याठिकाणी दोन पाण्याच्या टाकी आहेत. याशिवाय वर फारसे अवशेष नाहीत. मात्र गडावरून आंबोली घाटाच्या खोऱ्यातील निसर्गाचे नयनरम्य दृश्य दिसते. धाडसी गिर्यारोहकांसाठी हे अतिशय मोहक ठिकाण आहे. Location Icon
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : सह्याद्री
जिल्हा :सिंधुदुर्ग
श्रेणी : मध्यम