Followers

Sunday 27 September 2020

#कावनई_किल्ला”.

 

नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ किमी अंतरावर असलेल्या कावनई या गावातला निसर्गरम्यतला “


#कावनई_किल्ला”...🚩

ह्या किल्ल्याचा माथा साधारण त्रिकोणी असुन ६ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे गडमाथ्यावर आल्यावर डावीकडील वाटेने गड पहाण्यास सुरवात करावी वाटेच्या सुरवातीला सर्वप्रथम काही उध्वस्त घरांची जोती व भिंतीचे अवशेष दिसुन येतात येथील टोकाच्या बुरुजावरून आपल्याला समोरच कोथळीगडाच्या आकाराचा डोंगर दिसुन येतो या वाटेच्या उजव्या बाजुस पाण्याने भरलेला मोठा तलाव असुन या तलावाची एक बाजु विटांनी बांधुन काढलेली आहे तलावाच्या डाव्या बाजुस एक छप्पर नसलेली वास्तु असुन या वास्तुच्या पुढ्यात एका चौथऱ्यावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे तलावाच्या काठावर एक लहानसे कावनई (कामाक्षी) देवीचे मंदिर आहे या मंदिरात एक जुनी व एक नवीन संगमरवरी मुर्ती अशा देवीच्या दोन मुर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजुस दोन बुरुज आहेत यात कपिलधारा तीर्थाच्या दिशेने एक बुरुज असुन या बुरूजावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा संपुर्ण परीसर दिसतो बुरुजाच्या अलीकडे एक खडकात अर्धवट कोरलेले टाके व एक साचपाण्याचे टाके दिसुन येते. या भागातील बुरुजाची तटबंदी आजही शिल्लक आहे. बुरुजाकडून एक पायवाट थोडी खाली उतरताना दिसते. येथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसुन येतात. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला व मंदिराच्या मागील बाजुस साचपाण्याचा एक कोरडा पडलेला तलाव असुन या तलावाच्या एका बाजुस खडकात कोरलेले एक टाके आहे यातील पाणी गडावर पिण्यासाठी वापरले जाते याच ठिकाणी वाटेच्या डाव्या बाजुस दरीच्या काठी डोंगरउतारावर खडकात कोरलेले एक भलेमोठे टाके दिसुन येते. येथुन पुढे आल्यावर आपण ज्या सोंडेवरून वर आलो त्या सोंडेच्या वरील बाजुस असलेल्या बुरुजावर पोहोचतो. हा बुरुज पाहुन आपण मंदिराशेजारी असलेल्या उंचवट्यावर आलो असता एका वाड्याचे अवशेष दिसतात त्याच वाटेने थोडे पुढे उजवीकडे अजुन एका वाड्याचे अवशेष दिसतात या उंचवट्यावर एक ध्वजस्तंभ दिसुन येतो. या उंचवट्यावरून दक्षिणेकडे कळसुबाई डोंगराची रांग दिसते तर उत्तरेकडे डाव्या बाजूला भास्करगड, हरिहर, त्रिंबककगड, त्रिंगलवाडी आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो. समोर उत्तरेला अंजनेरी दिसतो. हि वाट पुढे आपण प्रवेश केला त्या मुख्य दरवाजा जवळ जाते व आपली गडफेरी पुर्ण होते गडावर बघण्यासाठी एवढेंच अवशेष असल्याने साधारण एक तासात आपला संपुर्ण गड फिरून होतो..

कावनई किल्ल्याची बांधणी नेमकी कोणत्या काळात झाली हे माहित नसले तरी कावनई गावाशी असलेली त्याची जवळीक पहाता हा किल्ला पुरातन काळापासून अस्तित्वात असावा असे वाटते कावनई किल्ल्या जवळ कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी या कुंभमेळ्याचे विभाजन केल्यापासुन शिवउपासकांचा मेळा त्रिंबकेश्वर येथे तर राम उपासकांचा मेळा नाशीक येथे भरू लागला आजही कपिलधारा येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो राम-रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्तीप्रहार झाला असता तो शुद्धीवर यावा यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असता त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला व त्यामुळे या गावाला कावनई नाव पडले अशी आख्यायिका प्रचलित आहे..

कावनईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री कामाक्षी माता मंदिर आहे या मंदिरालाही पौराणिक माहात्म्य आहे रामाची कामेच्छा पाहण्यासाठी आलेली पार्वती कामाक्षी देवी रूपात येथेच राहिली असे रामायणात म्हटले आहे..

निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स १६३५-३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकुन घेतला यानंतर इ.स १६७०-७२ च्या सुमारास शिवकाळात हा किल्ला मराठ्यांनी जिंकुन घेतला पुढे इ.स १६८८ च्या सुमारास हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला यानंतर हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला याची नोंद सापडत नाही पण चिमाजी अप्पांच्या एका पत्रात याचा उल्लेख येतो कामाक्षी पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार पेशव्यांनी १७५० ते १७६५ या कालखंडात केला असुन पेशव्यांनी कामाक्षी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण केल्याचा उल्लेख पेशवे बखर मध्ये आहे मंदिराकडे आजही हे दागिने उपलब्ध असुन नवरात्रोत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात कावनई हे पुर्वी तालुक्याचे ठिकाण होते पण १८६१ मध्ये इंग्रजांनी हे ठिकाण इगतपुरीला हलवले...

माहिती : गडवाटकरी अविनाश गोवर्धने (नाशिक)...


फोटोग्राफी : @flying_wanderer27

https://www.instagram.com/_shivkalyanraja_/

No comments:

Post a Comment