Followers

Sunday 20 September 2020

#त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

 


#त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

#त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि. मी. अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - वाडा मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे.

#दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..
ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे. डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.

#नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥

#ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

#त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे.
#साभार: विकिपीडिया
------------------------------------------------------------------------------
*सह्याद्री संस्कृती TOURISM*
मनसोक्त भटकंती...
*शैलेश मराठे: 8080908053/8452840059*
sahyadrisanskruti@gmail.com
*विरार, वसई, पालघर.*

No comments:

Post a Comment