Followers

Wednesday 6 December 2023

खारेपाटणची सूर्यमूर्ती !!

 



खारेपाटणची सूर्यमूर्ती !!
आशुतोष बापट
खारेपाटण एक प्राचीन बंदर. काही ठिकाणी बळीपट्टण असाही याचा उल्लेख आलेला. खारेपाटण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेचे प्रवेशद्वार. पूर्वीची ही अत्यंत गजबजलेली बाजारपेठ. याच खारेपाटण इथे आहे एक कपिलेश्वराचे मंदिर. लहानसे टुमदार देवालय. बाहेरच एक मोठा नंदी देवाकडे टक लावून बघत बसलेला. आतल्या गाभाऱ्यात शिवपिंड. पण खरे नवल इथे गाभाऱ्याच्या बाहेर आहे. छोट्याश्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीला दोन बाजूंना दोन मूर्ती टेकवून उभ्या केलेल्या आहेत. त्यातली एक आहे विष्णूची जी काहीशी अर्धवट घडवलेली कळते. तर दुसरी आहे नितांतसुंदर अतिशय देखणी अशी सूर्यदेवाची मूर्ती.
उंचीला साधारण ३ फूट. पाठीमागे प्रभावळ. प्रभावळीत मकरतोरण आणि त्यात केलेले पानाफुलांचे नक्षीकाम. समचरण उभ्या असलेल्या देवाच्या दोन्ही हातात कमळे धारण केलेली. डोक्यावर किरीट मुकुट, तो सुद्धा आभूषणांनी नटलेला. देवाचा गळा त्रिवलायांकित. गळ्यात एकावली, फलकहार असे सुंदर दागिने. कानात कुंडले, खांद्यावर वैकक्षक, छातीला उदरबंध. कमरेला वस्त्र नेसलेले त्यावर देखणी मेखला. पायात पादांगद अशी दागदागिन्यांनी मढवलेली ही रेखीव सूर्यमूर्ती. नजर शांत आणि चेहरा हसरा. बघत बसावी अशी ही मूर्ती इथे आडबाजूला वसलेली आहे. देवाच्या पायाशी देवाच्या पत्नी संज्ञा आणि राज्ञी. त्यांनी हातात कमळ धारण केलेले. त्यांच्या बाजूला सूर्याचे सेवक दंड आणि पिंगल. दंडाच्या हातात लांब दंड आणि पिंगलाच्या दोन हातात दौत आणि टाक. पायाशी सात घोडे कोरले असावेत मात्र आता ते अतिशय अस्पष्ट.
अशी ही साग्रसंगीत घडवलेली सूर्यमूर्ती शिलाहारकालीन आहे. कोकणच्या मूर्तीवैभवात भर घालणारी ही मूर्ती मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जेमतेम ५०० मीटर आतमध्ये आहे. मुळात सूर्यमूर्ती कमी प्रमाणात आढळतात. त्यात कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐन उंबऱ्यावर वसलेल्या ह्या सर्वांगसुंदर सूर्यमूर्तीच्या दर्शनाने प्राचीन भारतीय शिल्पश्रीमंतीचा अवश्य अनुभव घ्यावा.

No comments:

Post a Comment