सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे तालुक्यात भीमानदी तीरावर माचणूर येथे मोगल बादशहा औरंगजेबाने १६९६ मधे भुईकोट किल्ला निर्माण केल्याचे बोलले जाते. सोलापूर शहरापासून सुमारे ४५ कि.मी.अंतरावर तर मंगळवेढे या तालुक्याच्या गावाहून सुमारे १२ -१३ कि.मी.अंतरावर हा इतिहासाचे अवशेष सांभाळून उभा आहे.तर शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवालयाचा अप्रतिम शिल्पकलायुक्त परिसर भाविकांना भक्तिरसात तल्लीन करतो. भीमानदी तीरावर वसलेले माचणूर हे लहान खेडेगाव जरूर आहे पण याला नदीपात्राने घातलेला वळसा व वृक्षाच्या घनदाट अस्तित्वाने वातावरणात शितलता जाणवते. भीमा नदीच्या तीराकडे जाताना वेगवेगळ्या वृक्षाच्या पटांगणाच्या नदी बाजूला समांतर अशी घडीव तटबंदीतील भव्य मंदिर समुहाचे प्रवेशद्वार दिसून येते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर नदी प्रवाहाच्या दिशेने उतरत जाणारा दगडी फरसबंदी मार्ग लागतो. डाव्या बाजूला साधू पुरूषाचे समाधिस्थळ तर उजव्या बाजूला दगडी बांधकामातील मंदिर दृष्टीस पडते. दोन्हीहि बाजूला चुनाव वीटांमधे बांधलेले मिनार आहेत. या मिनारातून अंतर्गत भागातून टोकाकडे जाणारा जिना आहे. त्यानंतर दगडी फरसबंदी उतरत असताना श्री भवानीमाता मंदिर तुळजापूरच्या मंदिर परिसरात असल्याचा भास होतो कारण दोन्हीहि मंदिराच्या स्थापत्यशैलीत कमालीचे साम्य आहे.समोर दक्षिणोत्तर तटबंदीतील दुसरे प्रवेशद्वार असून उत्तरेस तटबंदीच्या समांतर असे नदीप्रवाहकडे जाणारे द्वार आहे. डाव्या बाजूच्या तटबंदीतील देवकोष्टकात विशाल शिवलिंग पाहून नकळतच भक्ती व श्रद्धेने दोन्ही कर जोडले जातात. दगडी कमानी प्रवेशद्वारातून प्रवेश करतानाच चौबाजूंच्या दगडी तटबंदीतील मोकळ्या फरसबंदीच्या मध्यवर्ती ठिकाणी उत्तरामुखी हेमाडपंति शैलीतील दृष्टीस पडते. शांत वातावरण, परिसरातील प्राचीन पिंपळवृक्षाचा गोलाकार पार, शिवभक्तांचा वावर एक वेगळी अनुभूती देण्यास पुरेसा आहे.चारहि बाजूच्या तटबंदीत भक्तांच्या विसाव्यासाठी निर्माण केलेल्या दगडी कमानी ओव-या. याच प्रवेशद्वाराच्या दक्षिणोत्तर तटबंदीत दुमजली भक्तनिवास वा साधूंच्या निवासाची देखणी व्यवस्था दिसून येते. श्री सिद्धेश्वर मंदिर उत्तराभिमुखी असून सभामंडप व गर्भगृह अशा रचनेत आहे.सभामंडपाच्या पूर्वेकडील तीन कमानीचा भाग आहे तर पश्चिमेकडील बंदिस्त भिंत असून याच भिंतीत शेंदूर लेपनातील प्रसन्न गणपतिची मूर्ती विराजमान आहे. मंदिरासमोरील आभुषणांनी युक्त नंदी असून शिंगांच्या अग्रावर सोनेरी शेंभ्या चित्त वेधून घेतल्याखेरीज राहत नाही. श्री सिद्धेश्वराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी दोन अडीच फुटाचा मार्ग असून उत्तरेस पन्हळी असलेले शिवलिंग दर्शनाने आत्मिक समाधान मिळते. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बंदिस्त काचेत श्री सिद्धेश्वराचा धातूचा मुखवटा ठेवलेला आहे. दर्शन घेऊन आल्यावर समोरच्या ओव-यातून नदीपात्राकडे जाणारा दरवाजा असून या दरवाजातून नदीपात्रातील जटाशंकराचे दगडी बांधकामातील मंदिराकडे जाणारा भव्य कठडायुक्त पायरीमार्ग आहे. चौहोबाजूंनी भीमानदीच्या पाण्याने वेढलेल्या जटाशंकर मंदिराचा नेत्रसुखकारक देखावा पाहून पूर्वजांच्या उच्चदर्जाच्या स्थापत्यकलेचा अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. श्री सिद्धेश्वर मंदिर समुहातील देवदर्शन झाल्यावर जवळच असलेला माचणूर किल्ला पाहाण्यासाठी आपली पावले वळतात.
मंदिर व किल्ला यांच्या दरम्यान गावातील वसाहत असून गावाची वसाहत संपल्यावर श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समांतर भीमानदीच्या तीरावर हा भुईकोट निर्माण केलेला आहे. औरंगजेबाची दक्षिण मोहीम सुमारे अखंड पंचवीस वर्षाची होती. दक्षिणेतील मराठशाही संपविण्यासाठी लाखोंची फौज, खजिना घेऊन आलेला आलमगीर स्वतः येथील मातीत मिळाला पण दख्खन जिंकू शकला नाही. भीमा नदीच्या विशाल पात्रा लगतच सपाट माळरानावर साधारणतः अंडाकृती आकाराचा माचणूरचा भुईकोट किल्ला आपला ऐतिहासिक कालखंड व्यक्त करण्यास उत्सुक आहे. किल्ल्याला पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या बाहेरील चौबाजूस भिंतींनी बंदिस्त केलेले असल्याने ते लक्षात देखील येत नाही. साधारणतः पंधरा फूट उंचीचे दगडी प्रवेशद्वार तर आतील दोन्हीहि बाजूला सुरक्षारक्षकांच्या देवड्या आहेत. किल्ल्याची सुमारे तीन फूट रूंदीची व पंधरा फूट उंचीच्या तटबंदीची बरीचशी पडझड झालेली आहे. संपूर्ण तटबंदीला वापरलेला दगड हा लहान काचळीचा असून चौकोनी अथवा आयताकृती दगड अजिबात नाही. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस किल्ल्यात असणारी एकमेव विहीर दगड मातीने भरून गेली असून तेथे झुडुपांचे साम्राज्य झाले आहे. तटबंदी अनेक बुरूज असून इतर भुईकोट अथवा डोंगरी किल्ल्याच्या तुलनेने अतिशय लहान आहेत. अस्तित्वात असलेल्या तटबंदीवर चढ उतार करण्यासाठी सहा ठिकाणी अरूंद पायरी मार्ग आहे.नदी तीराच्या बाजूची तटबंदी नदीपात्रात ढासळलेली आहे. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराखेरीज दक्षिण व उत्तरेस लहान तटबंदीतील दरवाजे असल्याचे दिसून येते तर नदीपात्राच्या ढासळलेल्या तटबंदीतून नदीपात्रात उतरणा-या काही दगडी पायऱ्या अस्तित्वात असल्याने तेथे देखील किल्ल्याबाहेर पडण्याचा मार्ग असल्याची शक्यता वाटते. किल्ल्याच्या नैऋत्येस उत्तराभिमुख मुस्लिम प्रार्थनास्थळ असावे, तर त्याच्या शेजारीच पूर्वाभिमुख घडिव दगडी बांधकामातील वास्तू सुस्थितित असून प्रमुख राज्यकर्त्याच्या किंवा सेनापतिच्या वास्तव्यासाठी निर्माण केली असावी. तीनचार एकर भूभागावरील किल्ल्यात इतर कोणते बांधकाम असल्याचे आढळून येत नाही. मुळात मोगलांनी ह्या किल्ल्याची निर्मिती ही सैन्याच्या छावणीसाठी केली असावी. औरंगजेबाने मराठ्यांशी जो झगडा सुरू केला होता त्यासाठी लागणारा पैसा हा देणे त्याचीच जबाबदारी असल्याने संताजी घोरपडे, धनाजी जाधव व इतर मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या सैन्यावर अचानक छापा घालून संपत्ती लूटण्याचे प्रकार होत होते म्हणूनच आपली संपत्ती व दारूगोळा सुरक्षित रहावा म्हणून माचणूर किल्ल्याची निर्मिती संभवनिय वाटते. अज्ञात ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या माचणूर किल्ला पाहाण्यासाठी एक तासाचा वेळ पुरेसा असून मराठ्यांच्या पराक्रमाचा अबोल पुरावा एकदा नक्कीच पाहिला पाहिजे.
©® सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
No comments:
Post a Comment