Followers

Sunday 11 July 2021

देवांगनांनी नटलेले पानगाव येथील अलक्षित विठ्ठल मंदिर

 











देवांगनांनी नटलेले पानगाव येथील अलक्षित विठ्ठल मंदिर

वारकरी संप्रदायाचे मोठ्या संख्येने मराठवाड्यातील खेडोपाडी वास्तव्य आहे व मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित किंवा विध्वंस झालेली मंदिरे लोकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवून पूजेत आणली आहे. जुन्या मंदिरांमधले प्रशस्त सभामंडप हेही वारकऱ्यांच्या हरिनाम पाठाला आणि भजन मंडळाला उपयोगी पडताना दिसतात. असेच एक अप्रतिम मंदिर आपल्याला पानगाव ह्या रेणापूर, लातूर मधील खेड्यात सापडते.
घरांच्या गर्दीत झाकले गेलेल्या मंदिराचा फक्त वाहन मंडप आपणांस बाहेरून दिसतो ज्याला आज लोकांनी पंढरपूरच्या धर्तीवर नामदेव पायरी असे नाव दिले आहे.
आत शिरल्यावर मोकळ्या जागेतून आपल्याला उत्तरेकडील मुखमंडप दिसतो व पूर्व आणि पाश्सिमेचे ही अर्धमंडप दृष्टीस पडतात. तीन मुखमंडप, मधलाचौरसाकृती सभामंडप आणि चौकोनी गाभारा असा केदारेश्वर आणि होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरासारखा ह्या विठ्ठल मंदिराचा सर्वसाधारण तलविन्यास आहे. मूळ शिखर पडलेले आहे.
तिन्ही मुख मंडपांना पायऱ्या चढून जावे लागते. वामनभिंतींवर उतरत्या पाठीचे कक्षासने (बसण्याचे कट्टे) आहेत आणि त्या कट्ट्यांच्या बाहेरील बाजूस विविध थरांमध्ये सुंदर कोरीव काम आहे. कणी, कुंभ थरांबरोबरच गज आणि रत्नथराची पट्टी सर्वत्र कोरलेली आहे. तिन्ही मुख मंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतींवर रत्नांची (शंकरपाळ्यासारखे )आरपार नक्षी केलेली जाल-वातायने (हवेसाठीच्या जाळीदार खिडक्या) कोरल्या आहेत. सभामंडपात समोरील भिंतीवर दोन कोनाडे असून एकात गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या कोनाड्यात एक नवीन देवीची मूर्ती बसवलेली आहे. अंतरालाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूस दोन विष्णूच्या स्थानकमूर्ती दुसरीकडून आणून बसवल्या आहेत.
देवळातील सर्व द्वारशाखा पंचशाखा आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवर ललाटबिंबावर गणपती आणि त्यावरील उत्तरंगावर नृवराह, विष्णू आणि आसनस्थ नारसिंहाच्या छोट्या प्रतिमा आहेत. आतील गर्भगृहाच्या द्वारेशाखेवर मकरतोरणात गजलक्ष्मीची मूर्ती आहे. गर्भगृहात आज उत्तर मध्ययुगात बसवलेली विठ्ठल रुक्मिणीची गोंडस मूर्ती आहे. येणारे वारकरी अगदी पायावर डोके ठेवुन विठ्ठलाचे दर्शन घेताना बघितल्यावर थेट पंढरपूरची आठवण येते.
गर्भगृह सप्तरथ असून तिन्ही दिशांना 3 देवकोष्ठे आहेत. दक्षिणेचे देवकोष्ठ रिकामे असून इतर देवकोष्ठात योग-नारायण आणि बसलेल्या भुवराहाची मूर्ती आहे. बसलेल्या वराहाने हातावर भुदेवी म्हणजे पृथ्वीला तोललेले दाखवले आहे. हया दोन मूर्तीखेरीज संपूर्ण गर्भगृहावर अर्धस्तंभांच्या रांगांमध्ये विविध मुद्रेतील सुस्वरूप सुरसुंदरी कोरल्या आहेत. ह्याखेरीज ऊस घेतलेल्या कामदेवाची आणि रतीची मूर्ती पाहायला मिळते.
ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे ते महाराष्ट्रात एकमेव असलेल्या मुखमंडपातील खांबांच्या तिरप्या हस्तांवर असलेल्या मोहक सुरसुंदरी! अश्या सुरसुंदरी आपल्याला होयसाळांच्या व काकतीयांच्या मंदिरावर दिसतात, पण होयसाळांच्या मूर्ती जास्त सौष्ठवपूर्ण आणि दागिन्यांनी नटलेल्या असतात तर काकतीयांच्या उंच आणि कमनीय असतात. इथल्या सुरसुंदरी ह्या कल्याणी चालुक्यांच्या मूर्तीच्या घाटाच्या आहेत.त्यातल्या काहीचे हात पाय भग्न झाले असले तरीही सौंदर्य अजूनही टिकून आहे. शिकार करणारी मारिचिका, भिक्षाटन शिवासारखी, डालमालिनी, आलस्यकन्या, दर्पणा, कापाल आणि नर मुंडमालेसहित नृत्य करणारी अशी अनेक रूपे दिसतात. ह्या खेरीज, पुत्रवल्लभा, आळता काढणारी, केस वाळवणारी कर्पूरमंजिरी, वस्त्रे सावरणारी स्खलित-वसना, साप-मुंगुस खेळावणारी अशी शिल्पांकने गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर आहेत.
कुठल्याही शिलालेख अभावी आपल्याला मंदिराचे नाव निश्चित करता येत नाही, ना ही कर्ता! वैष्णव मूर्तीच्या स्थानांवरून आणि संख्येवरून मूळ मंदिर वैष्णव असावे अशी खात्री पटते व बाहेरचा मंडप गरुडमंडप असू शकतो. शैली व बांधणी निश्चित कल्याणी चालुक्य काळातील दिसते. आज बांधलेले शिखर मात्र विजोड आहे व सभामंडपातील फरश्यांनी मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा पोहोचलेली आहे. मूळ मंदिरात कुठलेही बदल अभावानेच करावे व ते करताना तज्ज्ञांची मदत घेऊन अनुरुप डागडुजी केली तरच मराठवाड्याचा हा दुर्मिळ ठेवा चिरकाल टिकेल!

No comments:

Post a Comment