Followers

Monday, 22 June 2020

विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.

दुर्ग क्रमांक : ३.
विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.

#छत्रपती_शिवरायांच्या_झुंजाराची_रीत...
#विश्रामगड_ʼपट्टाकिल्लेʼ.
इ.स २२ नोव्हेंबर १६७९ रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पट्टा किल्ल्याची हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासात नोंद झाली आणि हर हर महादेव गर्जनेत “विश्रामगड गाथा” सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात रुजली...
या ऐतिहासिक पर्वाची साक्ष देणारा पट्टाकिल्ला...

इ स १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले दरम्यान महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनीती निश्चित करण्यात आली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्याकडे रवाना झाले संगमनेर जवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २२ नोव्हेंबर इ स १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणार्या अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ल्या वर आले त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले...

आभार :
● छत्रपती फाउंडेशन, भिगवण.
● विश्रामगड (पट्टाकिल्ला)
● गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
● पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

किल्ले रायगड.

दुर्ग क्रमांक : २.




किल्ले रायगड.

#नाव : #रायगड.
किल्ला उंची : ८२० मीटर/२७०० फूट.
प्रकार : गिरिदुर्ग.
चढाई ची श्रेणी : सोपी.
ठिकाण : रायगड, महाराष्ट्र.
जवळचे गाव : महाड.
डोंगररांग : सह्याद्री.
सध्याची अवस्था : व्यवस्थित.
स्थापना : १०३०.

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. इतिहासलेखन
प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
सभासद बखर म्हणते -
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”

याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. :-
१.रायगड
२.रायरी
३.इस्लामगड
४.नंदादीप
५.जंबुद्वीप
६.तणस
७.राशिवटा
८.बदेनूर
९.रायगिरी
१०.राजगिरी
११.भिवगड
१२.रेड्डी
१३.शिवलंका
१४.राहीर
आणि
१५.पूर्वेकडील जिब्राल्टर.

'देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि' हे बघून महाराज खुशीने म्हणाले… 'तख्तास जागा हाच गड करावा'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.
गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.
शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.

- योगेश सोनवणे ( गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र. )

किल्ले लोहगड.

दुर्ग क्रमांक : १.


किल्ले लोहगड.

नाव : लोहगड 🚩🚩🚩
उंची : ३४२० फूट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव : लोणावळा,मळवली
डोंगररांग : मावळ
सध्याची अवस्था : व्यवस्थित

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

योगेश सोनवणे - गड-किल्ले संवर्धन समिती, पुणे.

किल्ले देवगिरी / दौलताबाद चा किल्ला.

दुर्ग क्रमांक : २७.









किल्ले देवगिरी / दौलताबाद चा किल्ला.

दौलतींचे शहर म्हणून विख्यात असलेल्या दौलताबादला भेट द्यावी, असा विचार केला. इतिहास आमचा कच्चा असल्यामुळे, काही चुकीचे लिहिले असेल तर ते आपण तपासून घ्यावे (शक्यतो नसेल). या शहराने आणि किल्ल्याने अनेक वंशाचे उत्थान पाहिले. यादव, खीलजी, मोगलवंश हे त्यापैकी आहेत, असे म्हणतात.
दौलताबाद (जुने नाव देवगिरी) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.

• नाव : किल्ले देवगिरी (दौलताबादचा किल्ला).
• उंची : २९७५ फूट.
• प्रकार : गिरीदुर्ग.
• चढाईची श्रेणी : सोपी.
• ठिकाण : औरंगाबाद, महाराष्ट्र.
• जवळचे गाव : औरंगाबाद.
• डोंगररांग : औरंगाबाद.
• सध्याची अवस्था : व्यवस्थित.

महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.

• किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली आहेत. इथेच हत्ती हौद आहे. तसेच जैन मंदिरही आहे. पुढे त्याची तोडफोड करुन येथे मशिद उभारलेली आहे, आणि नंतर त्याचीही तोडफोड करुन तेथे आता एका भारतमातेचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे बद्ल स्वातंत्र्यानंतर झाले असावेत.

या मंदिरातून म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे तर उजव्या बाजूला चांद मिनार आहे. दोनशे दहा फूट उंचीचा एक गोलाकृती मीनार येथे आहे. आता तो प्रवेशासाठी बंद करण्यात आलेला आहे.चांदमीनाराच्या पुढे कालाकोट प्रवेशाद्वारानजिक हेमांडपंथी मंदिराचे भग्नावशेष सापडतात. पण आता या किल्यावरुन ते हटवण्याचे काम चालू आहे, पुरातत्वे विभागाला त्याच्याशी काही घेणे नाही. अशा अविर्भावात ते सर्व रस्त्याच्या कडेला पडून आहेत.

• भिंतीचा तिसरा भक्कम भाग कालाकोटचे प्रवेशद्वार, पुढे एका डोंगरावर आहे, यावर पोचण्यासाठी पाय-या बांधण्यात आलेल्या आहेत. इथे तीन दरवाजे समकोन स्थितीत आहेत. शत्रुसैनिकावर समोरुन आणि मागच्या बाजूस हल्ला करता यावा या उद्देशाने तशी रचना असावी असे वाटते. याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चीनी महल म्हटल्या जती. यातील सजावटीसाठी चीनी टाइल्स वापरण्यात आल्या होत्या. औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते.

• रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.(इथेही आता प्रवेश करु देत नाही. काही रुपयाची लाच देऊन इथे प्रवेश करता येतो. लोकांना याची उत्सुकता असत नाही. आणि लोक इथे प्रवेशाचा हट्टही करत नाही. कारण तिथे पाहण्यासारखे काय आहे, असे म्हणतात.)

• मेंढा तोफ या तोफेचे मुळ नाव शिकन तोफ होती असे म्हणतात. पण तिच्या आकारावरुन तिला मेंढा तोफ असे आता नाव प्रचलीत आहे. या तोफेवर दोन उल्लेख आहे, संपूर्ण खिताबासहीत एक औरंगजेबाचा आणि दुसरा तोफ निर्मात्याचे नाव मुहमद-हुसेन अमल-ए-अरब असे लिहिलेलं आहे. असे मार्गदर्शकाराने सांगितले. बुरुजाच्या मध्यभागी तोफेचे तोंड फिरवण्याची व्यवस्था आहे.जेणेकरुन दुर-दुर मारा करण्यात यावा.

दरी महालाच्या सभोवताली डोंगर पोखरुन केलेली दरी दिसते ते साधारणतः पन्नास ते शंभर फूट खोल असावी. इथे या किल्ल्यात वरच्या बाजुला प्रवेश करण्यासाठी एकमेव रस्ता आहे. आणि सर्व बाजूंनी दरी आहे. आता किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एक आधुनिक पुल लोखंडाचा पर्यटकांसाठी केलेला आहे. आणि जुना पुल काहिसा विटा आणि दगडाचा वापर करुन बांधलेला आहे. हाच पुल पुर्वी पर्यायी रस्ता म्हणून वापरण्यात येत होता. दरीतील पाण्याची पातळी उभयबाजूंवरील बंधा-यावरुन नियंत्रीत करण्यात येत असे. धोक्याचे प्रसंगी शत्रुसैन्याला थोपवून धरण्यासाठी कोणत्याही एका धरणातून पाणी दरीत सोडण्यात येत असे आणि दुसरे धरण बंद करण्यात येई. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असे. या प्रकारे धोक्याच्या वेळेस हा पूल पाण्याखाली जात असे. आणि जो आधुनिक पूल दिसतो त्याचा उपयोग क्वचित प्रसंगी करतही असतील असे वाटते. म्हणून या किल्ल्यावर हल्ला करणे केवळ अशक्य असे वाटते. अर्थात फितुरीमुळे या किल्ल्याची वाट लागली हे सांगण्याची काही गरज नाही.

• या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.

डोंगराळ वाटेवरच पाय-याची रांग लागली की तिथे एक गणपतीचे मंदिर आहे, तेव्हा केव्हापासून आहे, हे कोणासही निश्चित सांगता येत नाही.

• बारादरी, दमलेले पर्यटक जेव्हा पाय-यावरुन वर पोहचतात तेव्हा इथला बारादरीतले भव्य महालाच्या दर्शनाने जराशी विश्रांती घेतल्यावर सुखावतो. बारा कमाणी असलेली ही इमारत आहे, इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. त्यालगतच्या खोलीत लोखंडी खिडक्या आहेत. प्रत्येक दारावर एक खिडकी असून त्यातून मनोरम देखावे बघता येतात. बारादरीचे बांधकाम दगड-चुन्याने केलेले दिसते. चुन्याच्या थराचे डिझाईन मोहक आहे. इथून पुढे गेले की, पुढे शिखर बुरुज आहे. शिखराकडे कडे जातांना डोंगर पोखरुन एक गुहा इथे दिसते.

एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.

◆ निवडक भाग :

• १२वे शतक.
बदामीचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.

पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.

• इ.स. १३२७ ते इ.स. १३९७.
इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्लाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.

• इ.स.१३१० ते इ.स.१३४७.
अल्लाउद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुरेपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा मुहम्मद या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.

देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे . त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे .

• इ.स. १३४७ ते इ.स.१५००.
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

बहादूरवाडी गड.









बहादूरवाडी गड.

• किल्ल्याची ऊंची : ०.
• किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले.
• डोंगररांग : डोंगररांग नाही.
• जिल्हा : सांगली.
• श्रेणी : सोपी.
बहादूरवाडी गड हा भूईकोट सांगली जिल्ह्यात आहे पण तो कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे तर विलासगड आणि मच्छींद्रगडापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे खाजगी वहानाने हे तीनही किल्ले एकाच दिवसात पाहून होतात.

• पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर चारही बाजूंनी खंदक खोदलेला होता. त्यात आत्ता झाडी माजलेली आहे. मुख्य प्रवेशव्दार समोरील खंदक बुरुजवरुन किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत त्यांची डागडूजी केलेली आहे. त्यातील उजव्या बुरुजाच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. त्यामुळे या जागेचे सुशोभिकरण करुन फ़रशा बसवलेल्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शीरल्यावर पाहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना आहे. किल्लाला दोन तटबंद्या आहेत. बाहेरील तटबंदीत १८ बुरुज आहेत तर आतील तटबंदीत ८ बुरुज आहेत. बुरुज आणि तटबंदी जमिनीपासून १२ फूट पर्यंत दगडांनी बांधलेले असून त्यावर वीटांचे बांधकाम आहे. तटबंदी आणि बुरुजामध्ये झरोके आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मोकळी जागा आहे. त्यासमोरील तटबंदीत खोल्या आहेत त्यांना चार दरवाजे आहेत. या ठिकाणी घोड्यांच्या पागा होत्या असे सांगतात. आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी माजलेली दिसते, त्यात किल्ल्याचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत. प्रवेशव्दारापासून सरळ पुढे गेल्यावर एक दरवाजा लागतो. तो ओलांडून गेल्यावर एक पायऱ्या असलेली खोल विहिर आहे. या विहिरीच्या बाजूला हौद आणि तुळशी वृंदावन आहे. विहिरीच्या पुढे बाहेरच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. या विहिरी भोवती तटबंदी बांधून आणि प्रवेशव्दार आणि चोर दरवाजा ठेवून विहिरीचा भाग संरक्षित केलेला आहे. चोर दरवाज्यातून विहिरीच्या भागात येऊन पाणी नेण्यासाठी ही सोय केली असावी. किल्ल्याच्या आत पडझड झालेल्या काही वास्तू आहेत. हे सर्व पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड फ़ेरीला अर्धा तास लागतो.

• पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ते बहादूरवाडीगड अंतर ३५५ किलोमीटर आहे. बहादूरवाडीगड सांगली जिल्ह्यात असला तरी कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटरवर आहे. बहादूरवाडीगड जाण्यासाठी मुंबई - कोल्हापूर महामार्गाने पेठ नाका त्या पुढील कामेरी गाव, तांदुळवाडी ओलांडल्यावर बहादूरवाडीला जाणारा फ़ाटा आहे, या फ़ाट्यावरुन बहादूरवाडीगड २ किलोमीटरवर आहे. खाजगी वहानाने थेट किल्ल्या पर्यंत जाता येते.

• राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
• जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
• पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.
• जाण्यासाठी उत्तम कालावधी : वर्षभर

• निवडक माहिती :
कोल्हापूर आणि सातारा ह्या मराठ्यांच्या दोन गाद्या होत्या. त्यांच्या सीमेवर संरक्षणासाठी बहादूरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी बहादूरवाडी किल्ला बांधला आणि तो सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुधोळकर घोरपडे यांच्या ताब्यात हा किल्ला दिला.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

Sunday, 21 June 2020

किल्ले चाकण अथवा संग्रामदुर्ग

#दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास :





किल्ले चाकण अथवा संग्रामदुर्ग
लेख क्र. -2

“दर्द कहाँ तक पाला जाए,
युद्ध कहाँ तक टाला जाए
तू भी है राणा का वंशज,
फेंक जहाँ तक भाला जाए”

वरील कवितेतील ओळी वाचल्या की डोळ्यापुढे उभा राहतो चाकणच्या संग्रामदुर्गाचा मराठ्यांनी मुघलांविरुद्ध दिलेला रणसंग्राम.
मित्रांनो, इतिहासाच्या पानापानांत आणि सह्याद्रीच्या कणाकणात इतिहास दडलाय. फक्त गरज आहे शोध घेण्याची. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' हे उगीच नाही म्हटलं जात.
जसे की शांत झालेल्या निखा-यांना गरज असते फक्त एकदाच फुंकर मारायची मग त्याच निखाऱ्यात पुन्हा अग्नी प्रज्वलित होतो. अगदी तसंच काहीसे मराठ्यांचे रणांगणातील शौर्य आहे. चाकणचा किल्ला उर्फ संग्रामदुर्गाचा इतिहास काहीसा असाच आहे आणि आजच्या ह्या लेखमालेच्या दुसऱ्या लेखात याच दडलेल्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नमस्कार मित्रांनो,
मी तुषार भोर तुम्हां सर्वांचे स्वागत करतो आपल्या आवडत्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात "दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास " किल्ले चाकण किंवा संग्रामदुर्ग.
संग्रामदुर्ग हा स्थलदुर्ग किंवा भुईकोट या प्रकारात मोडतो. बरोबर आजपासून सुमारे ३६० वर्षांपूर्वी हा संग्राम घडला होता.२१जुन १६६० रोजी सुरु झालेले युद्ध हे नुसतेच मराठा विरुद्ध मुघल असे नव्हते तर धर्मांध विकृत सत्ताधीशांविरुद्ध स्वधर्माच्या आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी एका कल्याणकारी राजाच्या नेतृत्वाखाली लढलेले स्वराज्यातील अनेक लढायांपैकी महत्वपूर्ण युद्ध होते. युद्धातील विजयाचे पारडे हे जर संख्या बळावर निश्चित होत असेल तर मला गर्व आहे मी महाराष्ट्रात एक मराठा म्हणून जन्माला आल्याचा की या मातीने हा नियम मराठ्यांच्या इतिहासात आपल्या मर्दुमकीने बदलला. आजच्या आपल्या देशावर चीनरूपी संकटावर मात करण्यासाठी यापेक्षा वेगळे उदाहरण मला नाही वाटत शोधून सापडेल.
तसं पहिलं तर हा दुर्ग बहमनी काळात बांधल्याचा उल्लेख मिळतो परंतु ह्या किल्ल्यास खरी प्रसिद्धी मिळाली ती शिवकाळात.
छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचे पारिपत्य करून अवघ्या १८ दिवसात स्वराज्याचा विस्तार पन्हाळ्यापर्यंत केला. त्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने महाराजांवर सिद्दी जोहर या हबशी सरदाराला नामजाद केले. महाराज पन्हाळ्यावर वेढ्यात अडकल्याने मुघल सरदार शास्ताखान उर्फ शाहिस्तेखान २१००० सैन्यानिशी चाकण वर चालून आला ती तारीख होती आजची म्हणजे २१जुन १६६०, चाकण च्या दुर्गाला आपण एका दिवसात घेऊ हे स्वप्न पाहणाऱ्या खानाचा अहंकार मराठयांनी संग्रामदुर्गाच्या तटबंदी पलीकडेच चिरडला. जवळ जवळ २१०००हजारांची फौज आणि अनेक तोफा घेऊन आलेल्या खानाने आपली छावणी किल्ल्याच्या उत्तर दिशेला टाकली जिथे आज बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या दिशेला किल्ल्याची सलग तटबंदी दिसते.
खानाने सुरुवातीचा हल्ला फोल गेल्यावर नेटाने तोफांचा मारा चालू ठेवला, पण मराठे काही हटायला तयार नव्हते कारण संग्रामदुर्गाच्या तटबंदी पेक्षा मराठ्यांच्या मनाची तटबंदी अभेद्य होती. आणि तसाच कणखर, धीट मनाचा किल्लेदार फिरोंगोजीबाबा नरसाळा मराठ्यांना लाभला होता,
युद्ध दोन्हीही बाजूने सुरु होते. दिवसभर लढलेले मुघल सैनिक जेव्हा रात्री सुस्तावत तेव्हा मराठे गपचूप दिंडी दरवाज्यातून येऊन कापाकापी करून परत पळून जात. जवळ जवळ ५४ दिवस झाले तरी किल्ला पडेना. तिकडे महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले हे ऐकून तर खान अधिकच बैचैन झाला.
शेवटी खानाने किल्ल्याच्या ईशान्य भागातील बुरुजाखाली भुयार खणून त्यांत दारू ठासली आणि स्फोट घडवून आणला, बुरुजावरील सैनिक अक्षरशः दगडांप्रमाणे हवेत भिरकावले गेले. किल्ल्याची ही बाजू ढासळली. मुघल आत शिरले तरी मराठे आतील बालेकिल्ल्याच्या सहाय्याने दिवसभर लढले आणि किल्ला झुंजता ठेवायचा प्रयत्न केला. किती अचाट हे धाडस एकवीस हजार विरुद्ध तिनशे पन्नास मावळे. इतिहासाच्या काळपुरुषाला एकदा हिम्मत करून विचारा कुठून आणतात मराठे हे जीवावर उदार होण्याचे सामर्थ्य? काय दिले होते महाराजांनी या लोकांना? जहागीरी की वतने की सोन्या चांदीचे दागिने? काहीच नाही. महाराजांनी या सर्वांना दिला होता एक विश्वास, स्वतःच्या राज्याचा, हिंदूंच्या राज्याचा, भगव्याची आण घेऊन लाख मोलाचा मंत्र दिला होता महाराजांनी. म्हणूनच तर हे सर्व लढत होते अगदी सह्याद्रीच्या कातळावाणी कणखरपणे. या युद्धात दोन्हीकडचे असंख्य सैन्य मारले गेले, मुघलांची २६८ माणसे ठार झाली तर ६०० जखमी झाली
अखेर दुसऱ्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग मराठ्यांनी शास्ताखानाच्या हवाली केला. तर असा हा इतिहासात अपरिचित असलेला छोटासा स्थलदुर्ग प्रकारातील किल्ला या मराठ्यांच्या संग्रामानंतर प्रसिद्ध पावला आणि मराठ्यांच्या चिवट, मोडेन पण वाकणार नाही या वृत्तीची चुणूक खानास दाखवून गेला.
१६६० मध्ये गमावलेला संग्रामदुर्ग महाराजांनी १६७० मध्ये पुन्हा घेतला. परत मुघलांकडे १७०३ मध्ये असण्याची नोंद मिळते. त्यानंतर मराठ्यांचा साम्राज्य विस्तार होऊन सुद्धा १७५५पर्यंत हा किल्ला स्वराज्यात नव्हता. २९नोव्हेंबर रोजी चाकणचा दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला, पुढे १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल डिकनने हा किल्ला मराठ्यांकडून घेतला.
चाकणच्या संग्रामदुर्गाचे वर्णन श्री. बाबासाहेब पुरंदरेंनी फार सुरेख शब्दात केले आहे. ते म्हणतात, " चाकणचा दुर्ग म्हणजे जणू काही मांडी घालून बसलेला बलदंड भीमच आहे !"
चाकणचा दुर्ग ३ एकरमध्ये पसरलाय, पन्नासफूटी तटबंदी आणि १०ते १२ फुटी रुंदी असलेल्या भक्कम तटबंदी आणि बाहेरून असलेल्या खंदकामुळे हा किल्ला सामरिक दृष्ट्या अवघड होता, त्यामुळे स्थलदुर्ग प्रकारातील असून सुद्धा कणखर नेतृत्वाच्या भरोशावर सहजासहजी पडणारा नव्हता.
परंतु काळाच्या ओघात आणि वाढत्या अतिक्रमणामुळे सदर खंदक नसल्यात जमा झालाय. श्री. सतीश अक्कलकोट सरांच्या दुर्ग नामक पुस्तकातील उल्लेखानुसार "दुर्गामध्ये पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर वाट उजव्या हाताकडे वळते थोडे पुढे गेल्यावर या वाटेने येणारा शत्रू तटावरील सैनिकांकडून घेरला जाईल अशी अनोखी पद्धत या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे यास रणमंडळ असे म्हटले जाते. आत एक तोफागाडा पाहण्यास मिळतो आणि बालेकिल्ल्याच्या खाणाखुणा सुद्धा पाहण्यास मिळतात. शासनाची उदासीनता आणि स्थानिक गावकऱ्यांच्या निष्काळजीपणाची मोठी किंमत आज चाकणचा संग्रामदुर्ग चुकवत आहे. वेगाने विकसित होणाऱ्या चाकण शहराच्या विकासाची झळ किल्ल्याला बसलेली आहे. किल्ल्याच्या मधून शहरातील रस्ता नेऊन कुठेतरी अधिकृतरीत्या या ऐतिहासिक स्थळाच्या नामशेषाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आज तटबंदी वगळता किल्ल्यात एक विष्णू मंदिर आणि एक मस्जिद आहे. तसे पहिले तर किल्ल्याचे ''अवशेष" आता "शेष" राहिलेच नाहीत असे म्हणावे लागेल शिल्लक राहिलाय तो फक्त मराठ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर संग्रामदुर्गाचा संग्राम जो ओरडून ओरडून हेच सांगत आहे माझे नाव सार्थ केले ते मराठ्यांनीच. म्हणून तर संग्रामदुर्गाच्या इतिहासात मराठ्यांची ही अभूतपूर्व लढाई अमर झाली. सदर लढाईने मराठ्यांच्या धीरोदत्त आणि वीरोचित सामर्थ्याचे दर्शन मुघलांना दिले, आणि पुन्हा एकदा हे निर्देशित झाले की, मराठ्यांचे किल्ले जिंकणे जितके कठीण त्यापेक्षा जास्त मराठ्यांना युद्धात पराभव करणे दुर्धर.
मित्रांनो दुर्लक्षित दुर्गांच्या अपरिचित इतिहास या लेखमालेत या किल्ल्याची निवड करण्याचा हाच हेतू आहे की अशाप्रकारे आपणच आपला इतिहास हळू हळू पुसत चाललोय आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला यापासून वंचित करत चाललो आहोत. हे जर होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येक दुर्गाचे संवर्धन झालेच पाहिजे, हे नुसते दुर्ग नाहीत तर महाराजांपर्यंत पोहचण्याची एक कडी आहे हे विसरून चालणार नाही.
या दुर्लक्षित दुर्गांच्या उत्थानासाठी सखा सह्याद्री तर्फे हा छोटासा प्रयत्न.

तर मित्रांनो सदर लेख कसा वाटला जरूर कळवा आणि आपल्या सखा सह्याद्री page ला like, share आणि comment करा. लवकरच भेटू पुढील भागात एका नव्या किल्ल्यासोबत तोपर्यंत
लेखनसिमा.

श्री शिव सेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.

Tuesday, 2 June 2020

वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट)

वैभव महाराष्ट्राचे!

होळकरांचा वैभवशली इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी


वाफगावचा स्थलदुर्ग (भुईकोट) प्रत्यक्ष पहावे. सध्या हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रूपात दिलेला आहे. राजगुरूनगर पासून बारा कि. मी. अंतरावर वाफगाव आहे. गावातच प्रशस्त किल्ला असून त्याच्या एका बाजूस नदी आहे. वाफगावात उतरल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वोभव स्मृती असे नाव असलेली वेस नजरेस पडते. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेश द्वरावर शिक्षण संस्थेचे नाव लिहिलेले आहे. महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव. किल्ल्याची तटबंदी व बुरूज मजबुत दगडात असून प्रवेशद्वारावर लोखंडी सुळे असलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारा बाहेर तटबंदीच्या कडेला चुन्याचा घाणा दिसतो. गडाला दोन प्रशस्त प्रवेशद्वारे आहेत, त्यास लाकडी दरवाजे आणी दिंडी दरवाजा ही आहे. गडाची तटबंदी दोन टप्प्यात आहे. किल्ल्याच्या आत राजदरबार, राजमहाल, अंधारी विहीर, होळकर कालीन तोफा, काही मंदिरे (विष्णू - लक्ष्मी, विष्णू पंच्याती, मांगीर बुवा), बावडी, राजमहालाची तटबंदी, होळकर कालीन भव्य गुफा पाहाण्यास मिळतात. राजदरबाराचा आतून काही भाग पडला असून राजमहाल हा दुमजली असून मजबूत स्थितीत आहे. राजमहालाच्या आत होळकर कालीन सुबक लाकडी काम पाहावयास मिळते. या महालास राणीचा महाल म्हणून ओळखला जातो. तटबंदीमधील एका विशाल बुरूजात बांधलेली खोल विहिर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. हा किल्ला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचे जन्मस्थान आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या राज्यकाळामध्ये सुरू होऊन राणी अहिल्यादेवी यांच्या राज्यकाळात पूर्ण झाले असे सांगतात.

होळकरकालीन किल्ल्याच्या बाहेर राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराची बांधनी राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे. या मंदिरासमोर दगडी मेघडबरीमध्ये नंदीची भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गळ्यातील घंटा व रेखीव काम सुरेख आहे. हे मंदिर बंदिस्त स्वरूपात आहे. या मंदिरच्या नक्षीदार बांधकामात महेश्वर किल्ल्याची समरूपता पाहवयास मिळते. मंदिराच्या बाजूच्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकर कालीन पूजेच्या पुरातन वास्तू पाहावयास मिळतात. एका कलशावर "तुकोजी होळ"अशी अक्षरे दिसतात. एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीची कुलूप कशी असतात तशी कुलुपाची पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.
किल्ले वाफगाव, ता. खेड, जि. पुणे

# आम्हास वेड सह्याद्रीचे!