Followers

Monday 22 June 2020

बहादूरवाडी गड.









बहादूरवाडी गड.

• किल्ल्याची ऊंची : ०.
• किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले.
• डोंगररांग : डोंगररांग नाही.
• जिल्हा : सांगली.
• श्रेणी : सोपी.
बहादूरवाडी गड हा भूईकोट सांगली जिल्ह्यात आहे पण तो कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे तर विलासगड आणि मच्छींद्रगडापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे खाजगी वहानाने हे तीनही किल्ले एकाच दिवसात पाहून होतात.

• पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर चारही बाजूंनी खंदक खोदलेला होता. त्यात आत्ता झाडी माजलेली आहे. मुख्य प्रवेशव्दार समोरील खंदक बुरुजवरुन किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन बुरुज आहेत त्यांची डागडूजी केलेली आहे. त्यातील उजव्या बुरुजाच्या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. त्यामुळे या जागेचे सुशोभिकरण करुन फ़रशा बसवलेल्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शीरल्यावर पाहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारावर जाण्यासाठी जीना आहे. किल्लाला दोन तटबंद्या आहेत. बाहेरील तटबंदीत १८ बुरुज आहेत तर आतील तटबंदीत ८ बुरुज आहेत. बुरुज आणि तटबंदी जमिनीपासून १२ फूट पर्यंत दगडांनी बांधलेले असून त्यावर वीटांचे बांधकाम आहे. तटबंदी आणि बुरुजामध्ये झरोके आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर मोकळी जागा आहे. त्यासमोरील तटबंदीत खोल्या आहेत त्यांना चार दरवाजे आहेत. या ठिकाणी घोड्यांच्या पागा होत्या असे सांगतात. आतल्या तटबंदीतून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर सगळीकडे प्रचंड झाडी माजलेली दिसते, त्यात किल्ल्याचे सगळे अवशेष हरवून गेलेले आहेत. प्रवेशव्दारापासून सरळ पुढे गेल्यावर एक दरवाजा लागतो. तो ओलांडून गेल्यावर एक पायऱ्या असलेली खोल विहिर आहे. या विहिरीच्या बाजूला हौद आणि तुळशी वृंदावन आहे. विहिरीच्या पुढे बाहेरच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. या विहिरी भोवती तटबंदी बांधून आणि प्रवेशव्दार आणि चोर दरवाजा ठेवून विहिरीचा भाग संरक्षित केलेला आहे. चोर दरवाज्यातून विहिरीच्या भागात येऊन पाणी नेण्यासाठी ही सोय केली असावी. किल्ल्याच्या आत पडझड झालेल्या काही वास्तू आहेत. हे सर्व पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड फ़ेरीला अर्धा तास लागतो.

• पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई ते बहादूरवाडीगड अंतर ३५५ किलोमीटर आहे. बहादूरवाडीगड सांगली जिल्ह्यात असला तरी कोल्हापूरपासून केवळ ३५ किलोमीटरवर आहे. बहादूरवाडीगड जाण्यासाठी मुंबई - कोल्हापूर महामार्गाने पेठ नाका त्या पुढील कामेरी गाव, तांदुळवाडी ओलांडल्यावर बहादूरवाडीला जाणारा फ़ाटा आहे, या फ़ाट्यावरुन बहादूरवाडीगड २ किलोमीटरवर आहे. खाजगी वहानाने थेट किल्ल्या पर्यंत जाता येते.

• राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
• जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
• पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी नाही.
• जाण्यासाठी उत्तम कालावधी : वर्षभर

• निवडक माहिती :
कोल्हापूर आणि सातारा ह्या मराठ्यांच्या दोन गाद्या होत्या. त्यांच्या सीमेवर संरक्षणासाठी बहादूरवाडी येथे माधवराव पेशव्यांनी बहादूरवाडी किल्ला बांधला आणि तो सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुधोळकर घोरपडे यांच्या ताब्यात हा किल्ला दिला.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment