#दुर्लक्षित दुर्गांचा अपरिचित इतिहास :
किल्ले चाकण अथवा संग्रामदुर्ग
लेख क्र. -2
“दर्द कहाँ तक पाला जाए,
युद्ध कहाँ तक टाला जाए
तू भी है राणा का वंशज,
फेंक जहाँ तक भाला जाए”
वरील कवितेतील ओळी वाचल्या की डोळ्यापुढे उभा राहतो चाकणच्या संग्रामदुर्गाचा मराठ्यांनी मुघलांविरुद्ध दिलेला रणसंग्राम.
मित्रांनो, इतिहासाच्या पानापानांत आणि सह्याद्रीच्या कणाकणात इतिहास
दडलाय. फक्त गरज आहे शोध घेण्याची. 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र
माझा' हे उगीच नाही म्हटलं जात.
जसे की शांत झालेल्या निखा-यांना गरज
असते फक्त एकदाच फुंकर मारायची मग त्याच निखाऱ्यात पुन्हा अग्नी प्रज्वलित
होतो. अगदी तसंच काहीसे मराठ्यांचे रणांगणातील शौर्य आहे. चाकणचा किल्ला
उर्फ संग्रामदुर्गाचा इतिहास काहीसा असाच आहे आणि आजच्या ह्या लेखमालेच्या
दुसऱ्या लेखात याच दडलेल्या इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नमस्कार मित्रांनो,
मी तुषार भोर तुम्हां सर्वांचे स्वागत
करतो आपल्या आवडत्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात "दुर्लक्षित दुर्गांचा
अपरिचित इतिहास " किल्ले चाकण किंवा संग्रामदुर्ग.
संग्रामदुर्ग हा
स्थलदुर्ग किंवा भुईकोट या प्रकारात मोडतो. बरोबर आजपासून सुमारे ३६०
वर्षांपूर्वी हा संग्राम घडला होता.२१जुन १६६० रोजी सुरु झालेले युद्ध हे
नुसतेच मराठा विरुद्ध मुघल असे नव्हते तर धर्मांध विकृत सत्ताधीशांविरुद्ध
स्वधर्माच्या आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी एका कल्याणकारी राजाच्या
नेतृत्वाखाली लढलेले स्वराज्यातील अनेक लढायांपैकी महत्वपूर्ण युद्ध होते.
युद्धातील विजयाचे पारडे हे जर संख्या बळावर निश्चित होत असेल तर मला गर्व
आहे मी महाराष्ट्रात एक मराठा म्हणून जन्माला आल्याचा की या मातीने हा नियम
मराठ्यांच्या इतिहासात आपल्या मर्दुमकीने बदलला. आजच्या आपल्या देशावर
चीनरूपी संकटावर मात करण्यासाठी यापेक्षा वेगळे उदाहरण मला नाही वाटत शोधून
सापडेल.
तसं पहिलं तर हा दुर्ग बहमनी काळात बांधल्याचा उल्लेख मिळतो परंतु ह्या किल्ल्यास खरी प्रसिद्धी मिळाली ती शिवकाळात.
छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचे पारिपत्य करून अवघ्या १८ दिवसात
स्वराज्याचा विस्तार पन्हाळ्यापर्यंत केला. त्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने
महाराजांवर सिद्दी जोहर या हबशी सरदाराला नामजाद केले. महाराज पन्हाळ्यावर
वेढ्यात अडकल्याने मुघल सरदार शास्ताखान उर्फ शाहिस्तेखान २१००० सैन्यानिशी
चाकण वर चालून आला ती तारीख होती आजची म्हणजे २१जुन १६६०, चाकण च्या
दुर्गाला आपण एका दिवसात घेऊ हे स्वप्न पाहणाऱ्या खानाचा अहंकार मराठयांनी
संग्रामदुर्गाच्या तटबंदी पलीकडेच चिरडला. जवळ जवळ २१०००हजारांची फौज आणि
अनेक तोफा घेऊन आलेल्या खानाने आपली छावणी किल्ल्याच्या उत्तर दिशेला टाकली
जिथे आज बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले आहे. या दिशेला किल्ल्याची
सलग तटबंदी दिसते.
खानाने सुरुवातीचा हल्ला फोल गेल्यावर नेटाने
तोफांचा मारा चालू ठेवला, पण मराठे काही हटायला तयार नव्हते कारण
संग्रामदुर्गाच्या तटबंदी पेक्षा मराठ्यांच्या मनाची तटबंदी अभेद्य होती.
आणि तसाच कणखर, धीट मनाचा किल्लेदार फिरोंगोजीबाबा नरसाळा मराठ्यांना
लाभला होता,
युद्ध दोन्हीही बाजूने सुरु होते. दिवसभर लढलेले मुघल
सैनिक जेव्हा रात्री सुस्तावत तेव्हा मराठे गपचूप दिंडी दरवाज्यातून येऊन
कापाकापी करून परत पळून जात. जवळ जवळ ५४ दिवस झाले तरी किल्ला पडेना.
तिकडे महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले हे ऐकून तर खान अधिकच बैचैन
झाला.
शेवटी खानाने किल्ल्याच्या ईशान्य भागातील बुरुजाखाली भुयार
खणून त्यांत दारू ठासली आणि स्फोट घडवून आणला, बुरुजावरील सैनिक अक्षरशः
दगडांप्रमाणे हवेत भिरकावले गेले. किल्ल्याची ही बाजू ढासळली. मुघल आत
शिरले तरी मराठे आतील बालेकिल्ल्याच्या सहाय्याने दिवसभर लढले आणि किल्ला
झुंजता ठेवायचा प्रयत्न केला. किती अचाट हे धाडस एकवीस हजार विरुद्ध तिनशे
पन्नास मावळे. इतिहासाच्या काळपुरुषाला एकदा हिम्मत करून विचारा कुठून
आणतात मराठे हे जीवावर उदार होण्याचे सामर्थ्य? काय दिले होते महाराजांनी
या लोकांना? जहागीरी की वतने की सोन्या चांदीचे दागिने? काहीच नाही.
महाराजांनी या सर्वांना दिला होता एक विश्वास, स्वतःच्या राज्याचा,
हिंदूंच्या राज्याचा, भगव्याची आण घेऊन लाख मोलाचा मंत्र दिला होता
महाराजांनी. म्हणूनच तर हे सर्व लढत होते अगदी सह्याद्रीच्या कातळावाणी
कणखरपणे. या युद्धात दोन्हीकडचे असंख्य सैन्य मारले गेले, मुघलांची २६८
माणसे ठार झाली तर ६०० जखमी झाली
अखेर दुसऱ्या दिवशी चाकणचा
संग्रामदुर्ग मराठ्यांनी शास्ताखानाच्या हवाली केला. तर असा हा इतिहासात
अपरिचित असलेला छोटासा स्थलदुर्ग प्रकारातील किल्ला या मराठ्यांच्या
संग्रामानंतर प्रसिद्ध पावला आणि मराठ्यांच्या चिवट, मोडेन पण वाकणार नाही
या वृत्तीची चुणूक खानास दाखवून गेला.
१६६० मध्ये गमावलेला
संग्रामदुर्ग महाराजांनी १६७० मध्ये पुन्हा घेतला. परत मुघलांकडे १७०३
मध्ये असण्याची नोंद मिळते. त्यानंतर मराठ्यांचा साम्राज्य विस्तार होऊन
सुद्धा १७५५पर्यंत हा किल्ला स्वराज्यात नव्हता. २९नोव्हेंबर रोजी चाकणचा
दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला, पुढे १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल
डिकनने हा किल्ला मराठ्यांकडून घेतला.
चाकणच्या संग्रामदुर्गाचे वर्णन
श्री. बाबासाहेब पुरंदरेंनी फार सुरेख शब्दात केले आहे. ते म्हणतात, "
चाकणचा दुर्ग म्हणजे जणू काही मांडी घालून बसलेला बलदंड भीमच आहे !"
चाकणचा दुर्ग ३ एकरमध्ये पसरलाय, पन्नासफूटी तटबंदी आणि १०ते १२ फुटी
रुंदी असलेल्या भक्कम तटबंदी आणि बाहेरून असलेल्या खंदकामुळे हा किल्ला
सामरिक दृष्ट्या अवघड होता, त्यामुळे स्थलदुर्ग प्रकारातील असून सुद्धा
कणखर नेतृत्वाच्या भरोशावर सहजासहजी पडणारा नव्हता.
परंतु काळाच्या
ओघात आणि वाढत्या अतिक्रमणामुळे सदर खंदक नसल्यात जमा झालाय. श्री. सतीश
अक्कलकोट सरांच्या दुर्ग नामक पुस्तकातील उल्लेखानुसार "दुर्गामध्ये
पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर वाट उजव्या हाताकडे वळते
थोडे पुढे गेल्यावर या वाटेने येणारा शत्रू तटावरील सैनिकांकडून घेरला जाईल
अशी अनोखी पद्धत या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे यास रणमंडळ असे म्हटले जाते.
आत एक तोफागाडा पाहण्यास मिळतो आणि बालेकिल्ल्याच्या खाणाखुणा सुद्धा
पाहण्यास मिळतात. शासनाची उदासीनता आणि स्थानिक गावकऱ्यांच्या
निष्काळजीपणाची मोठी किंमत आज चाकणचा संग्रामदुर्ग चुकवत आहे. वेगाने
विकसित होणाऱ्या चाकण शहराच्या विकासाची झळ किल्ल्याला बसलेली आहे.
किल्ल्याच्या मधून शहरातील रस्ता नेऊन कुठेतरी अधिकृतरीत्या या ऐतिहासिक
स्थळाच्या नामशेषाची मुहूर्तमेढ रोवली आहे. आज तटबंदी वगळता किल्ल्यात एक
विष्णू मंदिर आणि एक मस्जिद आहे. तसे पहिले तर किल्ल्याचे ''अवशेष" आता
"शेष" राहिलेच नाहीत असे म्हणावे लागेल शिल्लक राहिलाय तो फक्त
मराठ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर संग्रामदुर्गाचा संग्राम जो
ओरडून ओरडून हेच सांगत आहे माझे नाव सार्थ केले ते मराठ्यांनीच. म्हणून तर
संग्रामदुर्गाच्या इतिहासात मराठ्यांची ही अभूतपूर्व लढाई अमर झाली. सदर
लढाईने मराठ्यांच्या धीरोदत्त आणि वीरोचित सामर्थ्याचे दर्शन मुघलांना
दिले, आणि पुन्हा एकदा हे निर्देशित झाले की, मराठ्यांचे किल्ले जिंकणे
जितके कठीण त्यापेक्षा जास्त मराठ्यांना युद्धात पराभव करणे दुर्धर.
मित्रांनो दुर्लक्षित दुर्गांच्या अपरिचित इतिहास या लेखमालेत या
किल्ल्याची निवड करण्याचा हाच हेतू आहे की अशाप्रकारे आपणच आपला इतिहास हळू
हळू पुसत चाललोय आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला यापासून वंचित करत चाललो
आहोत. हे जर होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येक दुर्गाचे संवर्धन झालेच पाहिजे,
हे नुसते दुर्ग नाहीत तर महाराजांपर्यंत पोहचण्याची एक कडी आहे हे विसरून
चालणार नाही.
या दुर्लक्षित दुर्गांच्या उत्थानासाठी सखा सह्याद्री तर्फे हा छोटासा प्रयत्न.
तर मित्रांनो सदर लेख कसा वाटला जरूर कळवा आणि आपल्या सखा सह्याद्री page
ला like, share आणि comment करा. लवकरच भेटू पुढील भागात एका नव्या
किल्ल्यासोबत तोपर्यंत
लेखनसिमा.
श्री शिव सेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
No comments:
Post a Comment