Followers

Tuesday, 26 January 2021

किल्ले अकलूज

 








किल्ले अकलूज
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावी भुईकोट किल्ला आहे.अकलूज गाव नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि किल्ला पण नदी किनारी आहे. अकलूज हे नाव गावात असलेली ग्रामदेवता अकलाई देवीच्या नावावरून पडले. सद्यस्थितीत किल्ल्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. शिवसृष्टी उभारताना किल्ल्याचे पडलेले बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार यांची डागडुजी करून बळकट केले. शिवसृष्टी पहाण्यासारखी आहे शिवरायांच्या जन्मापासून त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतच्या कालावधीत गाजवलेल्या शौर्याचे प्रसंग साकारले आहेत.
किल्ल्याची उभारणी १३ व्या शतकात यादवांच्या राजवटीत झाली होती. पुढे मोगलांच्या काळामध्ये अकलूज हे "अदसपूर" या नावाने ओळखले जात होते. इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान आणि छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये ४ महिन्यांसाठी वास्तव्यास होते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर ३ महिन्यांसाठी किल्ल्यात मुक्कामी होते.

सरदार अंताजी माणकेश्वरांनी वसवलेले ऐतिहासिक. गढीचे कामरगांव!

 






सरदार अंताजी माणकेश्वरांनी वसवलेले ऐतिहासिक. गढीचे कामरगांव!
अहमदनगर -पुणे महामार्गावर नगरपासून वीस कि मी अंतरावरील कामरगांव हे गांव 1730 मधे थोरले छत्रपती शाहू महाराज यांचे मराठा साम्राज्यातील विश्वासू सरदार व श्रीमंत पेशवे यांच्या दिल्लीतील मराठा फौजेचे सेनापती अंताजी माणकेश्वर यांनी वसवलेले गांव. 21 वर्षे हिन्दुस्तान चा कारभार या गावातून पाहिला गेला. अंताजी माणकेश्वर यांनी अनेक मोहिमांची योजना या गांवात त्यांनी बांधलेल्या गढी व इतर ऐतिहासिक वास्तुतून राबवली गेली. या गांवातील तटबंदी, बुरूज युक्त त्यांच्या गढीचा जिर्णोद्धार व त्यात त्यांचे स्मारक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ शासनाने मंजूर केले आहे. कामरगावात राजे अंताजी माणकेश्वर व त्यांच्या पुढील गादीपतींनी बांधलेले वाडे, बारव, बेलबाग महादेव मंदिर इत्यादी वास्तु 18व्या शतकाचा इतिहास सांगणाऱ्या आहेत.
- योगेश्वर गंधे

श्रीमंत गायकवाड सरकार गढी- दावडी

 








श्रीमंत गायकवाड सरकार गढी- दावडी
सन १७१६ साली खंडेराव दाभाडे यांना शाहू महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केल्यावर त्यांनी आपल्या खेड तालुक्यातील दावडी गावच्या दमाजी गायकवाड यांना आपल्या लष्करात सामील केले.
सन १७१९ साली बाळापूर येथे निजामाशी झालेल्या लढाईत सरदार दमाजी गायकवाडांनी मोठा पराक्रम केल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना 'समशेर बहाद्दर' हा किताब व सम्पूर्ण 'दावडी' गाव इनाम दिले.
याच दावडी गावात त्यांनी गायकवाड घराण्याची पहीली गादी स्थापन केली.
पुढे १७२० सरदार दमाजी गायकवाडांच्या मृत्यूनंतर त्र्यंबकराव दाभाडेंसोबत पिलाजीराव गायकवाडांनी गुजरात व राजस्थान या प्रांतात आपला वचक ठेवला,सन १७२७ साली पिलाजींनी डभई आणि बडोदा ही शहरे हस्तगत केली.
पुढे पिलाजी पुत्र दमाजी(दुसरे)पानिपतच्या लढाईत सामील होते. सन १७६२ मधील निजामाविरुद्धच्या घोडनदीच्या लढाईत दमाजींनी केलेल्या कामगिरीवर खुश होऊन रघुनाथरावांनी त्यांना दाभाडेंचा 'सेनाखासखेल' हा 'किताब मिळवून दिला. व गुजरातेवरील अधिकार पूर्णपणे गायकवाडांच्या स्वाधीन केले. दमाजींना गुजरातेत मराठ्यांचे राज्य वाढविण्याचे श्रेय जाते.मोठया पराक्रमाने गुजराथ मधील बडोद्यात आपली गादी स्थापन करून 'बडोद्याचे गायकवाड' म्हणून प्रसिद्ध झाले. या घराण्याची पहिली गादी मात्र आपल्या खेड तालुक्यातील दावडी येथे आहे.
गायकवाड घराण्यातील 'सरदार दमाजी गायकवाड' यांच्या निधड्या छातीप्रमाणे भक्कम बुरुजात भक्कम प्रवेशद्वार असलेली गढी दावडी गावात आपला इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहे...!!!
- स्वप्नील घुमटकर

पवनी शहरातील ऐतिहासिक घाट, भंडारा

 

#VidarbhaDarshan -





पवनी शहरातील ऐतिहासिक घाट, भंडारा
दोन हजार वर्षापूर्वीचे धार्मिक, ऐतिहासिक व प्राचीन पद्मावतीनगर म्हणजेच आजचे पवनी शहर होय. येथील शेकडो मंदिरे, अभेद्य परकोट, गरूड खांब, सम्राट अशोककालीन बौद्धस्तूप या नगराच्या भव्यदिव्यतेची व संपन्नतेची साक्ष देतात. या वैभवशाली वारशात भर पाडणारे वैनगंगा नदीकाठावरील इतिहासकालीन सहा घाट आज मात्र आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. पवनी नगरावर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकारक, गोंडराजे, भोसले राज्यांनी राज्य केले, त्यामुळे नेमक्या कोगत्या राजाच्या कालखंडात या घाटांचे बांधकाम झाले हे सांगणे कठीण आहे. नगरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या दक्षिण काटावर वैजेश्वर घाट, पाटे घाट, ताराबाईचा घाट, घोडेघाट, पान खिडकी घाट, दिवाण घाट पवनीच्या इतिहासाची साक्ष देतात .
रुपेरी वाळू अन् शंख - शिंपले असलेला पवनीचा परिसर फक्त घोडेघाटावरच आहे. घोडेघाट हा अतिशय छोटा आहे. या पारावर आजही गावातील लोक आपल्या घरची जनावरे अंघोळीसाठी नेतात. लहान मुलेसुद्धा अंघोळीसह वाळूच्या गालिच्यावर खेळण्याचा, शंख - शिंपले वेचण्याचा आनंद लुटतात. घाटांच्या ठराविक अंतरावर बुरूज बांधले आहेत. पोहणारे त्या उंच बुरुजावर चवून वरून नदीत उडी मारुन पोहण्याचा आनंद घेतात.
दिवान घाट, पान खिडकी घाट दुर्लक्षित
पान खिडकी घाट दुर्गा मंदिराजवळ आहे. या घाटावर राजा, राणी स्नान करायचे अशी आख्यायिका आहे. येथेच एक शिवलिंग (पिंड) आहे. नदीच्या पुलाच्या पलिकडे हत्तीच्या आकाराचा दगड (गोटा) आहे. त्याला हत्तीगोटा असे म्हटले जाते. पान खिडकीकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या सम्पूर्णतः जीर्णावस्थेत आहेत. जाण्याचा मार्गावर दगड पडले आहेत.
भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच पायऱ्यांवरून जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु कालौघात या घाटाच्या वैभवाला उतरती कळा लागली आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजसुद्धा ढासळले आहेत.एका दरवाज्याची भिंत पडली असून तेथे झाडे झुडपे वाढलीत. त्यामुळे हा दरवाजा बंद आहे. सद्या ही जागा माध्यपींसाठी मेजवानीचे ठिकाण बनले आहे.
आरक्षित घाट
राजमहाराजांच्या काळात समाजातील विविध जाती, वर्गाच्या लोकांसाठी तसेच प्राण्यांसाठी देखील नदीघाट आरक्षित होते. यातील अनेक घाट आजही सुस्थितीत आहेत. तर काहींची पडझड झाली आहे. घोड्यांना पाणी पिण्यासाठी घोडेघाट, राज्यातील दिवाणासाठी दिवाण घाट होते. फक्त पाटेघाटावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाते.
वैजेश्वर घाट
वैजेश्वर घाटाला धार्मिक महत्व आहे. या घाटावर नदीपात्रात असे एक ठिकाण आहे. जिथे बेलाचे पान टाकल्यानंतर ते तळाशी जाते आणि इतरत्र टाकले तर तरंगत राहते. येथे वैजेश्वर महादेव व बारा ज्योर्तिलिंगाच्या प्रतिमा असणारे मंदिर आहे. याच घाटावर विदर्भातील विविध ठिकाणाहून लोक अस्थिविसर्जनासाठी येतात, तसेच येथे दशक्रिया केली जाते.
ऋषीपंचमीच्या स्नानाचे महात्म्य
वैजेश्वर घाटाला लागूनच ताराबाईचा घाट आहे. या ठिकाणी पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे. ऋषोपंचमीच्या दिवशी नागपूर, भडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयातून अनेक स्त्रियाः स्नानाकरिता वैजेश्वर मंदिरालगतच्या वैजेश्वर घार, ताराबाईचा घाटांवर येतात. नदीत पवित्र स्नान, पूजाविधी व स्वयंपाक करून ऋषीपंचमीच्या व्रताची सांगता करतात. कार्तिकी पौणिमेला रात्रीला वैजेश्वर , ताराबाईच्या घाटावरून नदीपात्रात दिवे सोडले जातात. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने हा घाट उजळून निघतो. हे दृश्य मनोहारी आणि नयनरम्य असते. जणू आकाशातौल लुकलुकणारे चांदणेच नदीत अवतरल्याचा भास होतो. श्री वासुदेवानंद सरस्वती यानी त्यांच्या पवनी वास्तव्यादरम्यान येथील वैनगंगा नदीवर 'वैन्यास्तोत्र' रचले. ते दत्तमंदिर परिसरातील पान खिडकीच्या घाटावर दररोजस्नानाला जात.
पुनरुज्जीवन व सौदर्याकरण अपेक्षित
पवनी हे प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. येथील वैभव पाहण्यासाठी पर्यटक व इतिहासप्रेमी येतात. पुरातत्वविद व इतिहास संशोधकांनीसुद्धा येथे अभ्यास व संशोधन केले आहे. त्यातून या नगराची गरीमा व महत्व अधोरेखित करणाऱ्या अनेक चाबी समोर आल्या. परंतु, लोकप्रतिनिधी, प्रशासनाला या गोष्टीचे महत्व अधापही उमगलेले नाही. काळाच्या ओघात नष्ट होऊ पाहणारे, दृष्टीआड होणारे हे वैभव जपण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन, सौदयीकरण व विकासकामे होने अनिवार्य आहे.
माहिती व प्रतिमा साभार- नितेश बावनकर (पवनी)
संकलन- डिजिटल भंडारा

किल्ले टेंभुर्णी

 










किल्ले टेंभुर्णी
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात भुईकोट किल्ला आहे. टेंभुर्णी गाव हे पुणे- सोलापूर महामार्गावर पुण्यापासून १६० कि.मी अंतरावर आहे. महामार्गावरूनच भुईकोटाची तटबंदी दिसते. टेंभुर्णीला मराठवाड्याचे प्रवेशद्वार असे म्हणतात. सद्यस्थितीत भुईकोटाचे भव्य प्रवेशद्वार आणि बाजूचे दोन बुरूज भक्कम स्थितीत आहेत. आतमध्ये वीरगळ, मंदिरे, नागशिल्पे आहेत. भुईकोटात महादेवाचे एक मंदिर आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी शिवलिंग. किल्ल्यात आत सदाशिवराव माणकेश्वर यांचा वाडा आहे. याची नोंद बाॕम्बे प्रेसिडेन्सीच्या गॕजेटमध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जेव्हा दक्षिणेकडे लक्ष केंद्रित केले तेव्हा औरंगजेबाचा मुलगा शहाजादा आज्जम मराठ्यांचा पाठलाग करत टेंभुर्णी येथे इ.स. २ आॕक्टोबर १६८२ ला येवून पोचला अशी नोंद आहे. पुढे उत्तर पेशवाई काळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव माणकेश्वरांमुळे टेंभुर्णी प्रसिद्धीस आली. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर माणकेश्वरांनी दुसरा बाजीरावांची बाजू घेतली व ते पेशवा बनले आणि त्यांचे विश्वासू बनले. इ.स.१८०० च्या काळात दुसऱ्या बाजीरावातर्फे माणकेश्वरांनी निजामाबरोबर शिष्टाई केली. निजामाने त्यांना टेंभुर्णी गाव इनाम दिले. त्यांनी तिथे तीन मजली वाडा बांधला. पुढे होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले तेव्हा दुसरे बाजीराव वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पुढे बाजीरावांना गादीवर बसवायला माणकेश्वरांनी मोलाची मदत केली होती. पुढे इ.स. ८ आॕक्टोबर १८१७ ला सदाशिवराव माणकेश्वरांचा मृत्यू झाला.

थिबा पॅलेस, रत्नागिरी

 






थिबा पॅलेस, रत्नागिरी
ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’ हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.
तालुका - रत्नागिरी
बस स्थानक - रत्नागिरी
रेल्वे स्थानक - रत्नागिरी
योग्य काळ - वर्षभर
थिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्याने पुन्हा उठाव करू नये म्हणून इग्रंजांनी थिबा राजाला त्याच्या कुटुंबासमवेत १८८५ साली म्यानमार ते मद्रास (आत्ताचे चेन्नई) व मद्रास ते कोकण असा प्रवास करून रत्नागिरीस आणले. त्यानंतर १९१० मधे सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला. स्वतःच्या मातृभूमीपासून दूर, आपल्या लोकांपासून तुटलेल्या या थिबा राजाचा तीस वर्षांच्या कैदेनंतर १९१९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. थिबा राजाची ही कहाणी मनाला विषण्ण करून जाते.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.
राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलारसिकांसाठी वरच्या मजल्यावरीलं चित्रप्रदर्शनाचं नेहेमीच आकर्षण राहिलं आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
इथून जवळच असलेल्या `थिबा पॉईंट` जवळ आता जिजामाता गाडर्न उभं आहे. या ठिकाणावरून मोठं सुंदर दृश्य दिसतं. अस्ताला जाणारा सूर्य बघण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते.
- अभिजित जगदाळे

Tuesday, 5 January 2021

श्रीमंत गायकवाड सरकार गढी- दावडी

 








श्रीमंत गायकवाड सरकार गढी- दावडी
सन १७१६ साली खंडेराव दाभाडे यांना शाहू महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केल्यावर त्यांनी आपल्या खेड तालुक्यातील दावडी गावच्या दमाजी गायकवाड यांना आपल्या लष्करात सामील केले.
सन १७१९ साली बाळापूर येथे निजामाशी झालेल्या लढाईत सरदार दमाजी गायकवाडांनी मोठा पराक्रम केल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना 'समशेर बहाद्दर' हा किताब व सम्पूर्ण 'दावडी' गाव इनाम दिले.
याच दावडी गावात त्यांनी गायकवाड घराण्याची पहीली गादी स्थापन केली.
पुढे १७२० सरदार दमाजी गायकवाडांच्या मृत्यूनंतर त्र्यंबकराव दाभाडेंसोबत पिलाजीराव गायकवाडांनी गुजरात व राजस्थान या प्रांतात आपला वचक ठेवला,सन १७२७ साली पिलाजींनी डभई आणि बडोदा ही शहरे हस्तगत केली.
पुढे पिलाजी पुत्र दमाजी(दुसरे)पानिपतच्या लढाईत सामील होते. सन १७६२ मधील निजामाविरुद्धच्या घोडनदीच्या लढाईत दमाजींनी केलेल्या कामगिरीवर खुश होऊन रघुनाथरावांनी त्यांना दाभाडेंचा 'सेनाखासखेल' हा 'किताब मिळवून दिला. व गुजरातेवरील अधिकार पूर्णपणे गायकवाडांच्या स्वाधीन केले. दमाजींना गुजरातेत मराठ्यांचे राज्य वाढविण्याचे श्रेय जाते.मोठया पराक्रमाने गुजराथ मधील बडोद्यात आपली गादी स्थापन करून 'बडोद्याचे गायकवाड' म्हणून प्रसिद्ध झाले. या घराण्याची पहिली गादी मात्र आपल्या खेड तालुक्यातील दावडी येथे आहे.
गायकवाड घराण्यातील 'सरदार दमाजी गायकवाड' यांच्या निधड्या छातीप्रमाणे भक्कम बुरुजात भक्कम प्रवेशद्वार असलेली गढी दावडी गावात आपला इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहे...