Followers

Tuesday, 26 January 2021

थिबा पॅलेस, रत्नागिरी

 






थिबा पॅलेस, रत्नागिरी
ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’ हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.
तालुका - रत्नागिरी
बस स्थानक - रत्नागिरी
रेल्वे स्थानक - रत्नागिरी
योग्य काळ - वर्षभर
थिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्याने पुन्हा उठाव करू नये म्हणून इग्रंजांनी थिबा राजाला त्याच्या कुटुंबासमवेत १८८५ साली म्यानमार ते मद्रास (आत्ताचे चेन्नई) व मद्रास ते कोकण असा प्रवास करून रत्नागिरीस आणले. त्यानंतर १९१० मधे सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला. स्वतःच्या मातृभूमीपासून दूर, आपल्या लोकांपासून तुटलेल्या या थिबा राजाचा तीस वर्षांच्या कैदेनंतर १९१९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. थिबा राजाची ही कहाणी मनाला विषण्ण करून जाते.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.
राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलारसिकांसाठी वरच्या मजल्यावरीलं चित्रप्रदर्शनाचं नेहेमीच आकर्षण राहिलं आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
इथून जवळच असलेल्या `थिबा पॉईंट` जवळ आता जिजामाता गाडर्न उभं आहे. या ठिकाणावरून मोठं सुंदर दृश्य दिसतं. अस्ताला जाणारा सूर्य बघण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते.
- अभिजित जगदाळे

No comments:

Post a Comment