Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग १२ अचलपूरचा किल्ला

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग १२
अचलपूरचा किल्ला ----------------१
(सांभार : सह्याद्री प्रतिष्ठान )

'अचलपूरचा इतिहास म्हणजेच वर्‍हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) शहर. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील 'इल' नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणार्‍या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणार्‍या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुर्‍यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वर्‍हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वर्‍हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.

No comments:

Post a Comment