Followers

Thursday, 22 February 2018

दुर्गयात्रा महाराष्ट्राची भाग ९

दुर्गयात्रा महाराष्ट्राची
भाग ९
महाराष्ट्राचे वैभव – ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा (पुणे) --------६
भुईकोट किल्ला (स्थलदुर्ग)
पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१,४०२ हिरे, ११,३५२ माणके, २७,६४३ पाचू १,७६,०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडूर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १,५६२ पिरोजा, १,९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्यांचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांनी हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्यकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्यावेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
२७ फेब्रुवारी १८२८ रोजी वाड्याला लागलेल्या भीषण आगीत इमारत भस्मसात झाली आणि पेशव्यांच्या विशाल साम्राज्याच्या एकमेव निशाणीचा काळाच्या पडद्याआड दुर्दैवी अंत झाला. ही आग सतत सात दिवस चालू होती. आता केवळ काही मोजकेच अवशेष आपणास पहावयास मिळतात. ज्या वास्तूने मराठेशाहीच्या गौरवाचे, त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले तो नगारखाना आज पुणे शहराचे लाडके प्रतिक व पुणेकरांचा मानबिंदू बनला आहे.

No comments:

Post a Comment