Followers

Friday, 19 July 2019

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

 

 

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------4

बागकारखाना:

बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.

बालेकिल्ला:

बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.

बुरूज:

बुरूज ही पहाऱ्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकऱ्याची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
Image: Vijaydurg Fort
Image: Vijaydurg Fort

भुयार:

काही किल्लयांवर किल्ल्यातून पळून जाण्यासाठी भुयारे आहेत.

माची:

माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.

राजमंदिर:

हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी मामलेदार ते सारवून धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकऱ्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.

शिलेखाना:

शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

सदर:

सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय. रायगडावर अंधारकोठड्यांच्या पुढे उजव्या हाताच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर फडाच्या कचेरीचा ओटा आहे. इथेच सदर असे. राजगडावरची सदर पद्‌मावती माचीवर आहे.

सरपणखाना:

गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.

स्तंभ आणि दीपमाळा:

रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.

रथखाना:

रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.

No comments:

Post a Comment