Followers

Wednesday, 24 July 2019

निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला








निजामशाहीचा प्रमुख सत्ताकेंद्र असलेला अहमदनगरचा अभेद्य भुईकोट किल्ला
कोट बाग निजाम (अहमदनगरचा किल्ला )
अहमद निजामशहा याने ता.३ रज्जब हिजरी (२८ मे १४९० – अहमदनगर शहर स्थापना दिवस ) रोजी अजमखान वगैरे सरदार बरोबर घेऊन बहामनी सैन्यावर एकाएकी छापा घातला व सेनापती जहांगीर खान व सरदारांची हत्या करून विजय मिळवला.ज्या जागी जय मिळाला तेथे एक इमारत बाग तयार करून त्यास ‘बाग निजाम’ असे नाव दिले.हा अहमदनगर किल्ल्याचा प्रारंभ आहे.पुढे अहमदशहाने अहमदनगर शहराची स्थापना करून तेथे आपली राजधानी केली.त्यावेळी ही इमारत आपली मुख्य राहण्याची जागा करून त्याभोवती एक दगडाचा व विटांचा तट तयार केला.त्यावेळेपासून त्यास ‘कोट बाग निजाम’ हे नाव पडले.हेच अहमदनगरच्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते.
पुढे नवीन नवीन इमारती बनू लागल्या व निजामशाही बादशहांचे रहाण्याचे ठिकाण येथे झाले.पक्का किल्ला बांधताना बऱ्याच ठिकाणावरून आयते घडलेले दगड आणले.त्यासंबंधी दंतकथा नगरच्या आसपासच्या गावात प्रचलित आहेत. इ.स.१४९०मध्ये ज्या जागेवर पुढे किल्ला बांधला ती जागा कायम करण्यात आली.पुढे हुसेनशहाने सध्याचा अस्तिवात असलेला दगडी तट बांधला.
किल्ल्यातील इमारती व बुरुज
अहमदनगर किल्ल्याचा एक जुना नकाशा ‘मुजदे अहमदनगर’ नावाच्या एका उर्दू पुस्तकात प्रसिद्ध आहे.त्यामध्ये किल्ल्यासंबंधी चोवीस बुरुजांची नावे,आतील पहारा,मध्य भागाचा राजवाडा,जुन्या इमारती,मद्रेसा,गगन महाल,मुल्क आबाद,दिलकशाद महाल,हबशीखाना,चाऊसखाना वगैरे सैनिकांच्या इमारती,विहिरी या सर्वांचा स्थलनिर्देश सापडतो.
बुरुजांची नावे
I. अरबी बुरुज
II. नारंगी बुरुज
III. राज बुरुज
IV. छजा बुरुज
V. दौलतखानी बुरुज
VI. आतषखानी बुरुज
VII. शहा बुरुज
VIII. रहमानी बुरुज
IX. हुसेनी बुरुज
X. कासमखानी बुरुज
XI. बदडी बुरुज
XII. सुभानी बुरुज
XIII. युसुफखानी बुरुज
XIV. जहांगीरखानी बुरुज
XV. फरासखानी बुरुज
XVI. दौलत बुरुज
XVII.फतयावर बुरुज
XVIII.गावसजी बुरुज
XIX. डवरखान बुरुज
XX. अशरफखानी बुरुज
XXI. पोलाद्खानी बुरुज
XXII.अकबरखानी बुरुज
XXIII.कमालखानी बुरुज
ही नावे हुसेन निजामशहाने अहमदशहाच्या,बुऱ्हाणशहाच्या व स्वतःच्या वेळच्या प्रसिद्ध मुत्सद्दी प्रधान व सेनापती यांच्या नावावरून दिली असावीत.निशाणाचा बुरुज ज्याला ‘सोंडबुरुज’ किंवा ‘फत्ते बुरुज’ म्हणतात त्याचे नाव ‘हुसेनी बुरुज’ ते नाव हुसेन निजामशहा यांचे नावावरून दिलेले दिसते.
या किल्ल्याचा दरवाजा एका बुरुजात असून इतर किल्ल्यांप्रमाणे येथे दरवाज्याला दोन्ही बाजूंस २ बुरुज नाहीत.किल्ल्यात जाण्यास पूर्वी एकच दरवाजा होता.खंदक ओलांडण्यास एक पूल असून पुढे गेल्यावर त्याच पुलावरून एका पूर्वेकडील विस्तीर्ण बुरुजास वळसा दिल्यास उत्तराभिमुखी दरवाजा आहे.याच बुरुजाचे नाव ‘अरबी बुरुज’ आहे.एका बुरुजावर बाहेरच्या बाजूने एका दगडावर वाघाचे चित्र दिसून येते;परंतू सुक्ष्म अवलोकन केल्यास ते वास्तविक चित्र नसून मुसलमानी शिलालेख आहे.त्या लेखातील अक्षरांची जुळणी इतकी सुबक व खुबीने केली आहे की,त्यामुळे अक्षरांचा वाघाच्या चित्रांचा आकार आला आहे.अजूनही या शिलालेखाचा अर्थ मिळालेला नाही.
महालांची नावे
I. सोन महाल
II. गगन महाल
III. मुल्क आबाद
IV. मीना महाल
V. रूप महाल
VI. बगदाद महाल
विहिरींची नावे
I. गंगा
II. जमना (यमुना)
III. मछलीबाई
IV. शक्करबाई
किल्ल्यात झालेल्या लढाया
चांदबिबीच्यावेळी किल्ल्यास जे दोन वेढे पडले ते सर्वांत महत्त्वाचे आहेत.पहिला वेढा इ.स.१५९५ च्या नोव्हेंबर महिन्यापासून इ.स.१५९६च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत शहजादा मुराद यांनी दिला होता.त्यावेळी सुलताना चांदबिबी हिने अतुलनीय पराक्रम गाजवून वेढा उठवून मोगलांना तह करण्यास भाग पाडले.अहमदनगरच्या इतिहासात-किंबहुना सर्व हिंदुस्थानच्या इतिहासात हा प्रसंग अत्यंत बहारीचा आहे.दुसरा वेढा इ.स.१६३०च्या जुलै महिन्यात शहजादा दानियल यानी दिला.त्यावेळी आपसातील भाऊबंदकीमुळे चांदबिबीचा खून झाला व अहमदनगरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तो तसाच इ.स.१७५९ पर्यंत होता.मध्यंतरी मलिक-अंबर यांनी तो काही दिवस तो आपल्या ताब्यात घेऊन निजामशाही राज्य चालविले.इ.स.१७५९ मध्ये कविजंग किल्लेदार असताना बंदुकीचा आवाज न निघता किल्ला पेशव्यांच्या ताब्यात गेला.पुढे इ.स.१९९७ मध्ये किल्ला शिंदे यांचे ताब्यात गेला व त्यांच्या ताब्यात असताना अहमदनगरच्या किल्ल्यासंबधी तिसरी महत्वाची गोष्ट घडली.१२ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली,जे पुढे ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ या नावाने प्रसिद्धीस येऊन ज्याने नेपोलियनास जिंकले,त्याने हा किल्ला सर केला.त्याचवेळी भिंगारचे रघुराव बाबा देशमुख यांनी चार हजार रुपये घेऊन किल्ल्याची मारा करन्याची जागा दाखविली.ड्यूक ऑफ वेलिंग्टननी किल्ला सर केल्यानंतर ज्या चिंचेच्या झाडाखाली उपहार केला ती जागा सरकारने कायम ठेवली आहे व या गोष्टींचे कायम स्मारक म्हणून तेथे तोफा रोवून ठेवल्या आहेत.यानंतर तहनाम्याप्रमाणे किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.परंतू १८१८मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर तो इंग्रज सरकारच्या ताब्यात गेला.
किल्यातील राजकीय बंदिवान
निजामशाही नष्ट झाल्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.तेव्हापासून राजकीय बंदिवानांचे ते एक स्थान झाले. ऐतिहासिक कागदपत्रावरून येथे खालील बंदिवान असल्याचा उल्लेख येतो.
१.छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई
२.तुळाजी आंग्रे
३.सदशिवरावभाऊ पेशव्यांचा तोतया
४.छत्रपती प्रतापसिंह महाराज (सातारकर) यांचे चिरंजीव शाहू महाराज(काशीराजे) दुर्वासिंग,परशरामबाबा,भाईसाहेब
५.छत्रपती शिवाजी महाराज (चौथे – कोल्हापूर)
६.दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी आणलेले जर्मन कैदी
७.भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील १९४२च्या ‘चले जाव’ या चळवळीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना अबुल कलाम आझाद,ब.असफअली,डॉ.सय्यद महंमद,पं.गोविंद वल्लभ पंत,शंकरराव देव,पी.सी.घोष,डॉ.पट्टाभी सीतारामअय्या,आचार्य कृपलानी,आचार्य नरेंद्र देव,डॉ.हरेकृष्ण मेहताब.पंडित नेहरूंनी जगद्विख्यात ग्रंथ ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा या बंदिवासात किल्ल्यात लिहिला.
किल्ल्यातील अवशेष
किल्ल्यात हल्ली एक मोठा दरवाजा व एक दिवाणखाना इतकेच एका राजवाड्याचे भाग राहिले आहेत.याशिवाय जमिनीत काही तळघरे सापडली आहेत.या ठिकाणी अहमदनगरचा राजवाडा,चांदबिबीचे महाल,गगन महाल पूर्वी मोठमोठ्या इमारती होत्या,असे एका पर्शियन हस्तलिखित पुस्तकावरून दिसून येते.अहमदनगरचा राजवाडा तांबड्या रंगाचा होता,असे इतिहासात वर्णन आहे.चांदबिबीचा गगन महाल हि सर्वांत उंच इमारत असून,तिच्यावरून शहराचा व आसपासच्या मुलुखाचा सर्व देखावा दिसत असे,अशी दंतकथा आहे. बागरोजा (बाग-इ-रौझा),शहा ताहीरची कबर,नेता कक्ष हे किल्ल्यात पाहण्यास मिळते.
किल्ला संरक्षण खात्याच्या अख्यारीतीत असल्यामुळे किल्ला पाहण्यास ओळखपत्र (आधारकार्ड) आवश्यक आहे.मध्यंतरी महाराष्ट्रातील गडकिल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समविष्ट व्हावीत यासाठी युनेस्कोने किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली.किल्ल्याचे खंदक स्वच्छ करून त्यात जलपर्यटन करण्याचे कामही अद्यापही प्रतीक्षेत आहे.
संदर्भ : अहमदनगर शहराचा इतिहास | सरदार ना.य.मिरीकर
सुल्ताना चांदबिबी | डॉ.शशी धर्माधिकारी
फोटो साभार : Dinesh Ishwar Nangare & Amit Rane
संकलन : पीयूष रजनी अविनाश गांगर्डे
#दुर्गजागर
#दुर्गजागर_२
#जागर_इतिहासाचा

No comments:

Post a Comment