Followers

Saturday, 27 July 2019

शिवडीचा किल्ला

 मेंटॉस जिंदगी        🤓
🏰🏰




शिवडीचा किल्ला🏰🏰


या हिंदुस्तानला शौर्याचा अन तेजस्वी पराक्रमाचा अखंड वारसा लाभला आहे. आसेतु हिमालय पसरलेला हा राष्ट्रपुरुष आपल्या देहावर अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जिवंतपणे जपत आहे. या खुणांच्या रेघोट्यावरच तर हा देश घडत गेला, बनत गेला अन वाढत गेला. आजतर याची कीर्ती "वाढता-वाढता वाढे, भेदीले शून्यमंडळा" अशीच झाली आहे. काही खुणा येथील स्थानिक राज्यकर्त्यांच्या, राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या आहेत तर काही या राष्ट्रावर राज्य केलेल्या विविध परदेशी राजवटींच्या. या मुंबईतही तत्कालीन फिरंगी राज्यकर्त्यांच्या म्हणजेच पोर्तुगिजांच्या अनेक कलाकृती नजरेस पडतात. आपल्या लेकीला लग्नाचे आंदण म्हणा किंवा इंग्रजांनी मगितलेला हुंडा म्हणा ही मुंबई इंग्रजांच्या हाती गेली. मग या बेटाच्या संरक्षणासाठी इंग्रज राज्यकर्त्यांनी येथील किल्ले आणखी बळकट करण्यास सुरुवात केली. त्यापैकीच मुंबापुरीतील "शिवडी" किल्ल्यास भेट दिली.

पनवेल किंवा त्या आसपासच्या इतर बंदरातून सिंधूसागरामार्फत होणाऱ्या व्यापारी मार्गावर देखरेख ठेवणे अन पूर्वेकडील सागरी सीमेचे संरक्षण अशा दुहेरी भूमिकेसाठी हा किल्ला बांधला.

 आपल्या भूतकाळातील काही रम्य तर काही युद्धाचे, लढाईचे प्रसंग डोळ्यांत साठवून हा किल्ला जड अंगाने आजही या स्वप्ननगरीत आपले अस्तित्व टिकवून आहे. जगाला जंटलमन वाटणाऱ्या गोऱ्या इंग्रजांचे अनेक काळे डाव, धूर्त चाली, कपटी कावे इथल्या रिकाम्या खोल्यांमध्ये घुमतात.  इथल्या तटा-बुरूजावर त्यांच्या इंग्रजीचे टणात्कार होतात.  "हा सुसंस्कृत मुंबईकर किल्ला आहे बरं का!" असे कसोशीने इथला परिसर सांगतो.

आजच्या सुधारित मुंबईत नवीन इमारतींचे कितीही मजले उभे राहिले तरीही या किल्ल्याच्या कर्तुत्वापर्यंत यांची मजल जाणे अशक्य होय.  या इमारतींची उंची गगनाला भिडली तरीही या दुर्गाच्या कामगिरीची उंची त्यांना कदापि गाठणे शक्य नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील त्रिकोणी बुरुजावरून दिसणाऱ्या मध्य मुंबईतील उंचच उंच इमारती या काळ्याकुट्ट किल्ल्याला हिणवत असतीलही पण या "म्हाताऱ्या" झालेल्या किल्ल्यामुळेच हे "तरुण" मनोरे आपण पाहत आहोत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
प्रतापगडावरील अफझलखान कबरीप्रमाने येथील अवस्था भविष्यात न होवो हीच अपेक्षा.
आपल्या तरुणांचे पाय या किल्ल्याकडे वळत असतीलही पण फक्त प्रेमाचा हुंकार भरण्यासाठी. सागराच्या साक्षीने प्रेमामध्ये भरती येण्यासाठी. काही गड- दुर्गप्रेमी याला अपवाद आहेत बरं का!

या मुंबईत रोजीरोटीसाठी थेट पश्चिम बंगालहुन म्हणजेच भारतमातेच्या डाव्या हाताच्या बोटापासून येऊन उजव्या अंगठ्यावरील हा किल्ला पाहण्यास रुची दाखवणाऱ्या माझ्या मित्राचे आभार.
आमच्या पोरांच्या मनात येवो अथवा राहो पण "मनोज मन्ना"च्या मना(न्ना)त आले अन हा बेत सुफल संपन्न झाला.  पण निघताना मात्र एक प्रसंग घडलाच.
 किल्ल्याच्या मुख्य प्रवेशाकडे पाठ करून आम्ही पाठमोरे, किल्ल्याचा काही भाग पाहत बाहेर येत असतानाच येथील दर्ग्यात आलेल्या एका मुस्लिम बांधवाने जरा दरडावूनच विचारले,
"किधर जा रहे हो?"
मी म्हणालो,"ये किला देखने का है भाय! देख सकते है ना?"
तो जरा गुश्यातच म्हणाला,
"नही, एक सालभर के लिये किला सबको बंद है। बाहर आ जाव।"
मी जरा जोरातच म्हणालो,
"भाय जरा देखने देते तो अच्छा होता। हमे देखना था।"
तो बोलला,"अब नही। बाद में कभी आव।"

मी मनातल्या मनात म्हणालो,
"मेंटॉस आम्ही पण खातो कधी- कधी. आहा!!!!!"


मेंटॉस जिंदगी
शिवडीचा किल्ला.



✍🏼
।। यशवंतपुत्र ।।

No comments:

Post a Comment