किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------2
अशा
मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या
किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा किल्ल्यांच्या
कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती.
अंधारकोठड्या:
अंधारकोठडी
म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक
झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली
सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन
अंधारकोठड्या आहेत.
अंबरखाने:
अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.
उष्ट्रखाना:
उष्ट्रखाना
म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि
सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी
उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.
औषधिखाना:
आयुर्वेदप्रवीण
वैद्यांसाठी गडांवर औषधिखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि
अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात
करून ठेवलेला असे.
कडा:
कडा
म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत
तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला
होण्याची अजिबात शक्यता नसते.
कडेलोटाची जागा:
रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.
कलारगा:
कलारगा
म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्न्पूर्वक झाडी वाढवली
जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची
आज्ञा होती.
कुरणे:
ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.
कुसू:
किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
कोठी आणि जिन्नसखाना:
गडावरील
वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड,
खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणाऱ्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.
खंदक:
किल्ल्याभोवती
खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे
सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या
किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक
होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि
१३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि
बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.
खासगी वस्तुसंग्रह:
पानदाने,
पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक
घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.
गुहा:
अनेक
किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर
लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब
आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या
मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.
झरोके, छिद्रे किंवा जंग्या:
किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी
खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर
रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच
वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते
तेथे छिद्र अधिक तिरके असते.
जामदारखाना:
सिंहगड,
रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे
जामदारखाने होते. जामदारखान्यात रत्ने, हिरे, पाचू, माणके आणि सोन्याचे होन
ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.
टांके, तलाव, विहीर:
पिण्याच्या
पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत
खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी
टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणाऱ्या
पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत. सिंहगडावरचे
देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा
गडावर कोटितीर्थ (रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत.
रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची
उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
रायगडावर
गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि
हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी
वापरला जात असे.
No comments:
Post a Comment