Followers

Friday, 19 July 2019

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------3

 

 

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते?-------3

टोक:

गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोऱ्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोऱ्यात उडणाऱ्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
Image: Ajinkyatara Darvaja
Image: Ajinkyatara Darvaja

ढालकाठी:

ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्‌मावती माचीवर आहे.

तट:

तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.

तवा:

देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.

दगडी जिने:

किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.

दरवाजे:

मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.

उपदरवाजे:

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणाऱ्या जंग्यांच्या माऱ्यातून सुटणे कठीणच.
सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या मार्यायत दुसरा आणि त्याच्या माऱ्यात तिसरा.
Jidhnesh Khandkhar Pune Sinhagd Darvaja

No comments:

Post a Comment