Followers

Monday, 24 August 2020

राजांचा रायगड...!

 राजांचा रायगड...!

Raigad Fort (रायगड किल्ला) - Historical Places of ...

रायगड हा किल्ला स्वराज्याची दुसरी राजधानी. मिर्झा राजे जयसिंग हा दक्षिणेत पुरंदर येथे येऊन पोहोचला तीच स्वराज्यासाठी धोक्याची घंटा होती. स्वराज्याच्या इतक्या आतमध्ये सैन्य हे सहज येऊ शकते हे शिवाजी राजांना कळून चुकले. जर ते सैन्य पुरंदर पर्यंत येते तर त्यांच्यासाठी राजगडजवळ येणे हे सुद्धा सोपे आहे. त्यामुळे राजगड सारखी मैदानी प्रदेशात असणारी राजधानी ठेवून यापुढे चालणार नाही हे राजांच्या लक्षात आले. म्हणूनच आग्रा भेटीवरून आले की राजधानी हलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कुठे हलवायची तर त्यासाठी दोन पर्याय होते. एक म्हणजे सुधागड आणि दुसरा म्हणजे जावळीच्या खोऱ्यात वसलेला उत्तुंग रायरी!!

दिल्लीभेटीनंतर राजा प्रत्यक्ष गड पाहून आले आणि गड पाहून समाधानी झाले. त्यांनी काढलेले उद्गार हे सभासद बखरीत दिले आहेत. सभासद लिहितो,
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो* उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”

महाराजांनी राजधानी ही रायगड येथे हलवली. हिरोजी इंदुलकर यांनी रायगड हा अक्षरशः नटवला. तो भक्कम तर केलाच परंतु इस्लामी पद्धतीचे मनोरे बांधून त्यास सौंदर्य सुद्धा दिले. सन १६७३ मध्ये इंग्रजांना राजांशी तह करायचा होता म्हणून १९ मे १६७३ रोजी टॉमस निकल्स नावाचा एक इंग्रज अधिकारी मुंबईवरून रायगड येथे जाण्यास निघाला. मजलदरमजल करत २१ मे रोजी तो गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडी येथे येऊन पोहोचला. २३ मे रोजी तो रायगड चढून गेला त्यावेळेस त्याने रायगडचे वर्णन केले आहे. तो लिहितो,

“(गडाच्या) वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत. दरवाजाजवळील पायऱ्या पक्क्या खडकांत खोदल्या आहेत. जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही, तेथे २४ फूट उंचीचा तट बांधला आहे. चाळीस फुटावर दुसरी भिंत (दुसरी तटबंदी) बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे, की अन्नधान्याचा पुरवठा भरपूर असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाच्याविरुद्ध लढू शकेल. पाण्यासाठी मोठे तलाव असून ते पावसाळ्यांत भरल्यावर पाणी वर्षभर पुरून उरेल. टेकडीच्या माथ्यावर मोठें शहर वसलें आहे. घरें सामान्य प्रतीची आहेत. अत्युच्च भागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. त्याच्या मध्यभागी मोठी इमारत आहे. ‘तींत बसून तो कारभार पाहतो.”

रायगडाची ही अशी वर्णने वाचली की वाटते राजांची निवड किती सार्थ होती. राजे हे मनुष्याची पारख तर उत्तम प्रकारे करत असतच परंतु गड सुद्धा त्याच नजरेने पारखून घेतलेला असे.

Saturday, 22 August 2020

*⭕मंगळवेढे किल्ला ⭕*

 

*⭕मंगळवेढे किल्ला ⭕*
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
किल्लाचा प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: मंगळवेढा
⛳किल्ल्याचा इतिहास --इ.स. १७०० नंतर मोगल अंमल संपून मंगळवेढे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. श्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.स. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल होता. त्यांनी सध्या उभी असलेली चौबुरुजी (चार बुरुज) इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौबुरुजी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. इ. सन. १७४२ ते १७५० पर्यंत पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते.इ.स. १७५० पासून प्रथक कमाविसदार म्हणून मंगळवेढ्यास आले.https://bit.ly/2DNsB9W नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.स. १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. गोविंद हरी पटवर्धन यांच्यावर पेशवे दरबारची इतराजी झाली. त्यावेळी ते मंगळवेढे येथे किल्ल्यात येऊन राहीले होते. त्यावेळी त्यांनी श्री संत दामाजी महाराज यांची सेवा केली म्हणून त्यांना त्यांच्या कृपा प्रसादांमुळे जहागिर परत मिळाली अशी त्यांची श्रध्दा होती. पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे मघ:श्याम याचे नातू होते. ते मंगळवेढे येथे राहत असत. इ.स. १७५५ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत भाऊसाहेब पेशवे व श्रीमंत दादासाहेब पेशवे हे मंगळवेढे येथे येऊन काही दिवस राहीले होते. त्यावेळी मंगळवेढे परगणा होता व आंबेगाव (सध्या आंबे-चळे म्हणुन असलेला गाव) मंगळवेढे परगण्याखाली होता. तो गांव त्यावेळी श्रीमंत पेशव्यांनी नारायण कृष्ण व पुरुषोत्तम कृष्ण यांना इनाम करुन दिला. श्री. पुरुषोत्तम दाजी हे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून झाला त्यावेळी मंगळवेढ्यास राहात होते.दाजी मोठे शुर असून त्याचे वक्तृत्व चांगले होते. ते धाडसी असून पराक्रमी होते. म्हणून श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या वधानंतर त्यांच्या पत्नी गंगांबाईसाहेब या गरोदर असताना त्यांना संभाळण्याकरीता मुद्दाम श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांना नाना फडणिसांनी पुण्यास बोलावून नेले होते. दाजी मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी आंब्यास राहावयास गेल्या. इ.स. १७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला होता. पण मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले, पहिली सरदारकी मिळाली. इ.स. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धण घराण्याकडे होते. 🚩माहीती संकलन:-विकास गवळी🙏🏻

Monday, 17 August 2020

*सिंधुदुर्ग_किल्ला*

 

*सिंधुदुर्ग_किल्ला*

{ रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा }

किल्ल्याचे नाव : सिंधुदुर्ग किल्ला
किल्ल्याची ऊंची : २०० फूट
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांग : डोंगररांग नाही
चढाईची श्रेणी : सोपी
जवळचे गाव : सिंधुदुर्ग, मालवण
तालुका : मालवण
जिल्हा : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

हाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

◆ गडाचा इतिहास :

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते.

दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.

राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला.
मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘ कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

“चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”

◆ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. प्रवेशद्वार नेमके कोठे आहे, ते निश्चितपणे सांगता येत नाही. प्रत्यक्ष दरवाजासमोर छोटे प्रांगण असते; पण शत्रुच्या हत्तीला किंवा लाकडी ओंडक्याने दरवाजावर धडक मारण्यासाठी मागे जाण्या एवढी जागा ठेवलेली नसते. दरवाजाच्या बाजूला असणारे बुरुज घडीव दगडाचे आणि चिरेबंदी बांधणीचे असतात. बुरुजात जागोजागी जंग्यांची रचना केलेली असते. त्यातून शत्रूवर सहज मारा करता येतो. शत्रुला मात्र मारा चूकवण्यासाठी आडोसा नसतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे. महाद्वाराच्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर उजव्या बाजूस असणार्या पायर्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. किल्ल्याच्या बांधकामाची पाहाणी करतांना ओल्या चुन्यात महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटला होता. त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या. २१ नोव्हेंबर १७६३ ला संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.

प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. डाव्या हाताला दोन फाटे(फांद्या) फुटलेला एकमेवद्वितीय असलेला माड पाहायला मिळतो. या माडावर वीज कोसळल्याने आता त्याचा फक्त सांगाडा पाहावयास मिळतो. पुढे गेल्यावर महाराष्ट्रात एकमेव असलेले श्रीशिवराजेश्वराचे मंदिर लागते. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांनी नावाड्याच्या वेशातील वीरासनात बसलेली शिवप्रतिमा येथे स्थापन केली आहे. मूर्तीची पूजाअर्चा संकपाळ घराण्याकडे आहे. मूर्तीला पूजेनंतर चांदीचा मुखवटा व वस्त्र चढवतात. त्यामुळे मुळ मुर्ती दिसत नाही. देवळात असलेल्या फोटोवरच समाधान मानावे लागते.

शिवराजेश्वर मंदिराच्या मागे श्री महादेव मंदिर व मंदिरातच असलेली विहीर आहे. त्याच पदपथावरुन पुढे गेल्यावर साखरबाव, दुधबाव व दहीबाव ह्या गोड्या पाण्याच्या विहीरी लागतात. चारही बाजूंनी समुद्र असून सुध्दा ह्या विहीरींचे पाणी गोड आहे. त्यामुळेच शिवरायांनी कुरटे बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. ह्या विहीरींच्या पुढे शिवरायांच्या वाड्याचे जोते आहे. वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे. बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी याठिकाणी समुद्रस्नानास येत असत अशी वदंता आहे.

या दरवाजाच्या समोरच्या बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद पाहायला मिळतात. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेल्या जीन्याने फ़ांजीवर चढुन पुढे गेल्यावर बुरुजात असलेली खोली पाहायला मिळते. फ़ांजी वरुन चालत चोर दरवाजाच्या पुढे आल्यावर तटबंदीत असलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर एक वाट भगवती देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिर पाहून परत फ़ांजीवर येऊन किल्ल्याच्या प्रवशव्दाराकडे चालत जातांना प्रवेशव्दार पासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आलेला आहे. पुन्हा फ़ांजीवर येऊन पुढे चालत गेल्यावर पुढच्याच बुरुजाच्या भिंतीवर गणपती कोरलेला आहे. त्याच्या पुढे दरवाजापासून दुसरा बुरुज हा चिलखती बुरुज आहे. या बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. येथून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. यशिवाय किल्ल्यावर महापुरुष मंदिर पाहाता येतात. किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची रूंदी ३ ते ४ मीटर आहे. नागमोडी तटबंदीची लांबी अंदाजे ४ किमी आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ४५ अरुंद जिने आहेत व ४० शौचकुप (संडास) आहेत.

◆ गडावर पोहोचण्याच्या वाटा :

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मालवणहून बोटी मिळतात. मालवण शहर रस्त्याने सर्व महाराष्ट्राशी जोडलेले आहे. मुंबई - पुणे शहरातून एसटी तसेच खाजगी बसेस मालवणला जातात. कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग किंवा कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षाने किंवा एसटीने मालवणला (अंतर २६ किमी) जाता येते.

◆ गडावर राहाण्याची सोय : निवास गणपतीपुळे आणि तारकर्ली MTDC आश्रयस्थान येथे उपलब्ध आहे.

◆ गडावरील जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. मालवण शहरात आहे.

◆ गडावरील पाण्याची सोय :

मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

◆ गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ :

मालवणहून बोटीने १५ मिनिटांत किल्ल्यावर जाता येते.
जाण्यासाठी योग्य कालावधी ऑक्टोबर ते मे

◆ सूचना :

१) मालवणहून बोटीने गडावर सोडल्यावर एक तासाने तीच बोट परत मालवणला नेण्यासाठी येते, त्यामुळे खाण्यापिण्यात वेळ न घालवता पाऊण तासात किल्ला पाहून घ्यावा.
२) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी...||⚔️🚩

Tuesday, 11 August 2020

#किल्ले_अंजनेरी

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_

 



#किल्ले_अंजनेरी

अंजनेरी (Anjaneri)
किल्ल्याची ऊंची : 4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या ऋषी पर्वत या नावाने ओळखल्या जाणार्या डोंगरावर आहे. या पर्वतावर अंजनी मातेने १०८ वर्षे तप केले. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला अशी लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या किल्ल्याला "अंजनेरी" नाव देण्यात आले असावे. त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा एक महत्त्वाचा किल्ला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही १६ पूरातन मंदि्रे आणि शिलालेख पाहाता येतात. यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची असून १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. मुंबई, नाशिक आणि पुण्याहून एका दिवसात अंजनेरी किल्ला आणि मंदिरे पाहून होतात.

पहाण्याची ठिकाणे :
अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या (इ.स.२०१७) जीप सारखे वहान या रस्त्याने जाऊ शकते. नाशिक - त्र्यंबकेश्वर एसटी बसने आल्यास अंजनेरी फ़ाट्यावर उतरुन १५ मिनिटात गावातील हनूमान मंदिरापाशी पोहोचता येते.. येथून नवरा नवरीचे दोन सुळके आणि त्यामागे पसरलेला अंजनेरी किल्ला नजरेत भरतो. गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे. कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. हनुमान मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. या ठिकाणी काही खाण्याचे पदार्थ विकणारी दुकाने आहेत. चौकी पासून पायर्यांची वाट सुरु होते. प्रथम वन विभागाने बांधलेल्या पण आता उध्वस्त झालेल्या पायर्या लागतात. त्या पार केल्या की आपण एका घळीत पोहोचतो. याठिकाणी कमी अधिक उंचीच्या पायर्या कातळात कोरलेल्या आहेत. त्यावर कॉंक्रीट ओतून मुळ पायर्‍यांचे सौंदर्य तर घालवले आहेच पण त्यांची उंचीही वाढलेली आहे. या पायर्या अर्ध्या उंची पर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक जैन लेण आहे. लेण्यात दोन दालने असून त्यात पार्श्वनाथांची मुर्ती आणि इतर मुर्ती आहेत. लेण्याच्या बाजूला पाण्याचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे लेणे पाहून उरलेल्या पायर्या चढून गेल्यावर आपण एका विस्तिर्ण पठारावर पोहोचतो.

पठारा वरून आपल्याला अंजनीमातेचे मंदिर आणि त्यामागील बालेकिल्ला दिसतो. अंजनी मातेच्या मंदिरा पर्यंत पोहोचण्यास १५ मिनिटे लागतात. मंदिर बर्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. मंदिरा समोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी याठिकाणी आहेत . पण दोन्ही टाकी कोरडी आहेत. मंदिरा जवळ खाण्याचे आणि पूजा साहित्याची दोन दुकाने आहेत. मंदिरा पासून बालेकिल्ल्याकडे जातांना डाव्या बाजूला पावलाच्या आकाराचा तलाव दिसतो. त्याला त्याला हनुमान तलाव आणि इंद्र कुंड या नावाने ओळखले जाते. हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे तलावाचा आकार पाऊलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रध्दा आहे. (तलावाचा आकार दिसण्यासाठी बालेकिल्ल्याचा डोंगर चढुन जावा लागतो) किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा सध्या हा एकमेव स्त्रोत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात. एक वाट डावीकडे वळून सीता गुंफ़ेकडे जाते, तर दुसरी वाट समोरच्या बालेकिल्ल्यावर चढत जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. येथे एका साधूने आश्रम बनवलेला आहे. आश्रमाच्या बाहेरच्या बाजूस ३ देवळ बांधलेली आहे. या देवळाच्या मागच्या बाजूला थोडे वर चढून गेल्यावर एक कातळात कोरलेले लेणे आहे. लेण्याच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस दोन व्दारपाला कोरलेले आहेत. लेणे दोन खोल्यांचे आहे. लेण्याच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहे.

सीता लेणे पाहून परत पायर्यांच्या वाटे पर्यंत येऊन बालेकिल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात करावी. साधारणपणे पाऊण उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट जाते. या पायवाटेने पुढे गेल्यावर एक गुहा पाहायला मिळते. टेहळणीसाठी या गुहेचा उपयोग होत असावा . सध्या एका साधूने यात आपले बस्तान बसवलेले आहे. गुहेच्या पुढे एक पाण्याचे टाकेही त्याने बनवलेले आहे. गुहा पाहून परत पायर्यांपाशी येऊन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. माचीच्या पठाराप्रमाणे बालेकिल्ल्याचे पठारही विस्तिर्ण आहे. पठारावरून १० मिनिटे चालल्यावर आपण हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या बाजूला एक पाण्याचा छोटा बांधिव तलाव आहे. मंदिराच्या मागे उघड्यावर काही मुर्ती आणि पिंड ठेवलेली आहे. याठिकाणी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत.

अंजनेरी किल्ल्यावरून ब्रम्हगिरी (त्र्यंबकगड), हरीहर, गडगडा (घरगड), डांग्या सुळका दिसतात.

अंजनेरी गावात १६ पूरातन मंदिरे आणि शिलालेख पाहाता येतात. यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची असून १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. सध्या (इ.स. २०१७) या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे.

पोहोचण्याच्या वाटा :१२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. अंजनेरी किल्ल्यावर नाशिक - त्र्यंबकेश्वर एसटी बसने आल्यास जाण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि मी अंतरावरील अंजनेरी फाट्यायावर उतरावे. या फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण अंजनेरी गावातील हनूमान मंदिरापाशी पोहोचता येते. अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या (इ.स.२०१७) जीप सारखे वाहान या रस्त्याने जाऊ शकते. . हनुमान मंदिरापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे. कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. हनुमान मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. चौकी पासून पायर्‍यांची वाट सुरु होते. पायर्‍यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर आणि तेथून पुढे बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दॊन तास लागतात.राहाण्याची सोय :१) पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.

२) सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय :गडावरील दुकानांमध्ये , त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेलात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :गडावर पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :अंजनेरी गावातून २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुन ते फ़ेब्रुवारी


अंमळनेर (Amalner)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_

अंमळनेर (Amalner)
किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : जळगाव
श्रेणी : सोपी

अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.

इतिहास :अंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.

पहाण्याची ठिकाणे :अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे.

पोहोचण्याच्या वाटा :अंमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने व रेल्वेमार्गाने देशाशी जोडलेल आहे.

#किल्ले_अजमेरा

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_

 



#किल्ले_अजमेरा

अजमेरा (Ajmera)
किल्ल्याची ऊंची : 2854
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: दुंधेश्वर रांग
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.

खाजगी वहानाने दोन दिवसात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. पहिल्या दिवशी सकाळी कोट्बारी या बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचावे. गावातून गाईड घेऊन बिष्टा किल्ला पाहावा. बिष्टा किल्ल्याला जाऊन परत गावात येण्यास ४ ते ५ तास लागतात. बिष्टा पाहून झाल्यावर जेवण करुन कर्‍हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. पायथ्यापासून कर्‍हा किल्ला पाहून परत येण्यास ३ तास लागतात. कर्‍हा किल्ला पाहून झाल्यावर देवळणेचे जोगेश्वर मंदिर पाहावे. महादेवाचे दर्शन घेऊन दुंधा किला गाठावा. तो पाहाण्यास एक तास लागतो. दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा किंवा पहाडेशवर येथे जाऊन अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा . यापैकी कुठल्याही ठिकाणी जेवणाची सोय होत नाही. आपला शिधा बरोबर बाळगावा.

Ajmera

Ajmera

पहाण्याची ठिकाणे :अजमेर सौंदाणे गावातून एक रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिरा शेजारी अजमेरा किल्ल्याचा डोंगर आहे. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. याठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व आपल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेऊन मंदिराच्या परिसराच्या बाहेर यावे. पहाडेश्वराच्या कपाउंडला लागून एक कच्चा रस्ता डोण्गराला लगटून पुढे जातो. या रस्त्याने चालत गेल्यावर १० मिनिटात उजव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसते. त्यात शेंदुराचे ठिपके आणि त्रिशुळ काढलेला मोठा खडक आहे. त्याला माऊली म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला एक खडक आहे. त्याला म्हसोबा म्हणतात. या म्हसोबाच्या मागे जो डोण्गर आहे त्याच्या अर्ध्या उंचीवर गुहा आहेत. त्यात आदिवासींचा डोंगरदेव आहे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगदेवाचा डोंगर ठेउन पायवाट पुढे दाट झाडीत शिरते. या झाडीतून १० मिनिटे चालल्यावर दोन डोंगरांच्या घळीतून डोंगर चढायला सुरुवात होते. साधारण अर्ध्या ते पाऊअण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर प्रवेश केल्यावर प्रशस्त गडमाथा दिसतो.प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस उंचावर झेंडा लावलेला दिसतो. झेंद्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. तर डाव्या बाजूला एक कोरडा तलाव आहे. पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला महादेवाचे उध्वस्त मंदिर आहे. या ठिकाणी नंदी आणि पिंड आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्य बाजूला दुसरा तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक टाक बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही. टाक पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथून आजूबाजूचा परिसर, कर्‍हा , बिष्टा हे किल्ले दिसतात. गडमाथा फ़िरण्यास अर्धा तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून ८ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे अजमेर सौंदाणे हे गाव आहे. अजमेर सौंदाणे गावातून रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो. हे अंतर ४ किमी आहे. पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे.

राहाण्याची सोय :गडावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :जेवणाची सोय सटाणा येथे आहे.
पाण्याची सोय :गडावर पिण्याचे पाणी नाही. पहाडेश्वर मंदिरातून भरुन घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :पहाडेश्वर, (अजमेर सौंदाणे) पासून १ ते १.५ तास
जाण्यासाठी उत्तम कालावधी :ऑगस्ट ते फ़ेब्रुवारी

अचला (Achala)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_




अचला (Achala)
किल्ल्याची ऊंची : 4040
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथिदार आहे. अचला गडाचे स्वरुप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने ओळखतात, तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.

पहाण्याची ठिकाणे :दगड पिंप्री हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावात ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. गड चढायला सुरुवात केल्यावर अचला गडाची सोंड खाली उतरते. त्या खिंडीत एक पत्र्याचे देऊळ आहे. त्या देवळाला सतीचे देऊळ म्हणतात. तेथून एक टप्पा चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणार्‍या कातळ कोरीव पायर्‍या पाहायला मिळतात. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर कातळात वरच्या बाजूला एक ३ फ़ूट लांब आणि ३ फ़ूट रुंद आकाराची चौरस प्रवेशव्दार असलेली गुहा पाहायला मिळते. गुहेत जाण्यासाठी पायर्‍या सोडून थोड चढुन जाव लागत. गुहा १० फ़ुट लांब आहे. या गुहेतून दूरवरचा परीसर चांगला दिसतो. याची योजना टेहळणीसाठी केलेली असावी. गुहा पाहून परत पायर्‍या चढायला सुरुवात करावी. पायर्‍या संपतात तेथे पाण्याचे बुजलेले एक टाक आहे. पुढे एक छोटा टप्पा चढुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे बुजलेले एक टाक आहे.

गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नविन कपडे घालून जातात. आज मात्र हे टाक सुकलेल आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत. त्यामागे घरांची जोती आहेत. तिथून उजव्या बाजूला वळून किल्ला आणि बाजूचा डोंगराच्या घळीत उतरायला सुरुवात केली की दोन टाकी दिसतात त्याच्या खालच्या बाजूस दोन टाकी आहेत. त्याच्या खाली एका पुढे एक पाच टाकी आहेत. अशी ८ टाक्यांची अनोखी रचना पाहायला मिळते. हि टाकी पाहून परत किल्ल्यात प्रवेश केला तेथे येऊन विरुध्द दिशेला (प्रवेश केला तेथून डावीकडे) डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठ पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते. त्यात दगड पडून ते बर्‍याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा असल्यामुळे गडफ़ेरीस अर्धा तास पुरतो. अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग अचला वरुन पाहायला मिळते.पोहोचण्याच्या वाटा :मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला "अचला", तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट "अहिंवत" गडाला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. पहिल्या टप्प्यावर मारूतीचे मंदिर आहे. पुढे ही वाट कातळ कड्यापर्य़ंत उभी चढत जाते. कड्याच्या नाकाडा खाली आल्यावर उजवीकडे वळून , कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.

दगड पिंपरी ते बेलवाडी असा कच्चा रस्ता झालेला आहे. काही वर्षात गाडीने थेट सतीचे देऊळ असलेल्या सोंडेपर्य़ंत पोहोचता येईल. तेथून गडमाथा १ तासात गाठता येईल.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :जेवणाची व्यवस्था आपण स्वत…: करावी.
पाण्याची सोय :गडावर पिण्या योग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :दगड पिंप्री मार्गे दिड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुलै ते फेब्रुवारी

औंढा (अवंध) (Aundha)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_



औंढा (अवंध) (Aundha)
किल्ल्याची ऊंची : 4400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत कठीण

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.

इतिहास :इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली होती.
पहाण्याची ठिकाणे :औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच आहे. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चारपाच टाक्या आहेत. एका गुहेत पाणी आहे. खड्‌कात खोदलेला दरवाजा आहे. गडावरुन समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग,मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :औंढा किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) निनावी मार्गे :-
मुंबई मार्गे इगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी ७.०० वाजता भगूर कडे जाणारी एसटी पकडून साधारणत… दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर (साधारणत: नाक्या पासून ४५ मिनिटांत) आपण निनावी गावात पोहोचतो. निनावी गावातून औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
पहिली वाट गावातून समोरच दिसणाया उभ्या कड्याच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुसया हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी, पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. या वाटेने किल्ल्याचे पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढा किल्ल्याचा सुळका ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पायर्‍यांपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून गेल्यावर कडा उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर शेवट्च्या ट्प्प्यात थोडे प्रस्तरारोहण करुन गडमाथा गाठता येतो.

२) पट्टा किल्ला मार्गे :-
अनेक जण औंढा - पट्टा - बितनगड असा ट्रेक करतात. औंढा किल्ल्याहून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पायर्‍या असणार्‍या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवा झेंडा फडकतांना दिसतो, येथून पुढे जाणारी वाट थेट पट्टा किल्ल्यावर जाते.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, औंढावाडीत राहता येते. औंढा - पट्टा असा ट्रेक असल्यास, औंढा पाहून पट्टा किल्ल्या वरील गुहेत मुक्कामाला जावे.

जेवणाची सोय :गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :गडावरील टाक्यांत पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :निनावी मार्गे २ तास आणि पट्टा किल्ला मार्गे २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुलै ते फेब्रुवारी
सूचना :पावसाळ्यात प्रस्तरारोहण करणे धोकादायक (अतिकठीण) आहे.

अर्जूनगड (Arjungad)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_






अर्जूनगड (Arjungad)
किल्ल्याची ऊंची : 400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : वलसाड (गुजरात)
श्रेणी : मध्यम

एका दंतकथेनुसार अर्जुनाने या ठिकाणीहून सुभद्राहरण केले म्हणून या किल्ल्याचे नाव अर्जूनगड पडले. चिमाजी आप्पांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. काही काळ हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. अर्जूनगडावर महालक्ष्मीचे देऊळ आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. गडावर भाविकांची ये जा चालू असते.

Arjungadपहाण्याची ठिकाणे :पायर्‍यांच्या मार्गाने एका मोठ्या बुरुजाला वळासा घालून १० मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशव्दार, तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटा घेर दिसतो. किल्ल्याच्या मधोमध महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ६ बुरुज आहेत. तटबंदी वरुन फ़िरताना दक्षिणेकडे कोलाक नदी दिसते. किल्ला फ़िरायला १० मिनिटे पुरतात.

पोहोचण्याच्या वाटा :वापी - सुरत रेल्वेमार्गावर बगवाडा नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने बगवाडाला जाता येते. बगवाडा स्थानकातून अर्जूनगड किल्ला अंतर २ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापी पासून ६ किलोमीटरवर अर्जूनगड किल्ला आहे.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुलै ते मार्च

अणघई (Anghai)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले_



अणघई (Anghai)
किल्ल्याची ऊंची : 1350
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अणघई
जिल्हा : पुणे
श्रेणी : अत्यंत कठीण

रायगड जिल्ह्यात जांभूळपाड्या जवळ मृगगड आणि अणघई हे दोन किल्ले आहेत. या भागातून सव आणि निसणी या दोन घाटवाटा जातात. या घाटवाटांवर आणि अंबा नदीच्या खोर्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी मृगगड आणि अणघई या दोन किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे टेहळणीचे किल्ले असल्याने त्यावर फ़ारसे अवशेष नाहीत.

अणघई किल्ल्याचे पायथ्याचे गाव कळंब हे रायगड जिल्ह्यात येत असले तरी अणघई किल्ला आणि डोंगररांग मात्र पुणे जिल्ह्यात येत. कळंब व आजूबाजूच्या गावातले काही माणसे ही डोंगरांग ओलांडून लोणावळा भागात नोकरीसाठी जातात.

अणघईचा किल्ला हा अल्पपरिचित आहे. या किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४ कातळटप्पे चढून जावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत गिर्यारोहणाचे साहित्य, रोप इत्यादी असणे आवश्यक आहे.

Anghai

Anghaiपहाण्याची ठिकाणे :

कळंब गावाच्या मागे असलेल्या डोंगररांगेत ३ शिखरे दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूचे बाहेर आलेले शिखर म्हणजे अणघई किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून बाहेर पडल्यावर पायवाटेने शेतातून, बांधावरुन चालत १५ मिनिटात आपण अंबा नदीवरील पूला पर्यंत पोहोचतो. या पुलाच्या डाव्या बाजूला एक डोह आहे त्याला बुरुना डोह या नावाने गावकरी ओळखतात. पूल पार केल्यावर समोर एक झाडीने भरलेला डोंगर लागतो. त्या डोंगरावर ५ मिनिटे चढून गेल्यावर एक आमराई आणि त्यामध्ये बांधलेले घर दिसते. या घरा समोरुन जाणारी पायवाट अनघईचे शिखर व त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराचे शिखर याच्या मधील घळीतून वर जाते. आमराईच्या पुढे सागाचे दाट जंगल आहे. ते १५ मिनिटे चढून पार केल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथून पठार पार केल्यावर वाट परत दाट जंगलात शिरते. येथे काही ठिकाणी दगडांवर , झाडांवर दिशादर्शक बाण काढलेले आहेत. त्या बाणांच्या सहाय्याने आपण अनघई किल्ल्याच्या घळीच्या पायथ्याशी पोहोचतो. या ठिकाणी साधारणपणे १५ फ़ूट उंच कातळ भिंत आहे. भिंतीवर चढण्यासाठी होल्ड आहेत. त्याच्या आधारे भिंत चढून जाता येते. दुसरा पर्याय म्हणजे भिंत संपेपर्यंत उजव्या बाजूला जावे. या ठिकाणी चढाई करण्यासाठी होल्ड आहेत आणि बाजूच्या झाडांचा आधारही घेता येतो. हा कातळटप्पा चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा पाहून पुन्हा आपण गुहेच्या उजव्या बाजूला आल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण अनघईवर जाणार्‍या नळीच्या खालच्या तोंडापाशी येतो.

नळीत अनेक लहान मोठे खडक पडलेले आहेत. हा नळीतला ७०-८० अंशातला चढ चढून आपण नळीच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचतो. पुढे वाट बंद झालेली असल्याने उजव्या बाजूच्या कातळावर जावे लागते. या कातळाला तीव्र उतार आहे त्यामुळे हा १० फ़ूटी कातळ जपून चढून जावा लागतो. कातळाच्या शेवटच्या टप्प्यात डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या ६ सुबक पायर्‍या दिसतात. ( याठिकाणी अजूनही पायर्‍या आहेत पण त्या माती खाली बुजलेल्या आहेत.) या पायर्‍या चढून गेल्यावर आपण कातळ टप्प्याच्या वरच्या भागात पोहोचतो. (पहिल्या कातळ टप्प्या पासून नळीचा दुसरा टप्पा आणि पुढे तिसरा कातळ टप्पा पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.) पुढे घळीतून चढत १५ मिनिटात अणघईचा डोंगर आणि उजव्या बाजूचा डोंगर यामधल्या खिंडीत पोहोचतो. शेवट़च्या टप्प्यात दाट झाडी आहे. खिंडीत आल्यावर अणघईवर जाणार्‍या कातळात खोदलेल्या खोबण्या दिसतात. या खोबण्यातील अंतर जास्त असल्याने पूर्ण हाताचा भार देऊन शरीर वर ओढून घ्यावे लागते. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍यांनी वर चढून गेल्यावर पुन्हा एक कातळटप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार केल्यावर आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. गडमाथा आटोपशीर आहे. माथ्यावर अणघई देवीचे मंदिर आणि ३ पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावरून तैलबैला, सुधागड दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा :कळंब हे अनघई किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. मुंबई - खोपोली - कळंब हे अंतर ८७ किलोमीटर आहे. मुंबईहून खोपोली गाठावे . खोपोली पाली रस्त्यावर खोपोली पासून २९ किलोमीटर अंतरावर जांभूळपाड्याला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्यावरून एक रस्ता ६ किलोमीटर वरील कळंब गावात जातो.

मुंबई - खोपोली प्रवास ट्रेनने आणि खोपोली - पाली प्रवास एसटीने केल्यास परळी गावात उतरावे. या गावतून सहा आसनी रिक्षा कळंब गावात जातात.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय :जेवणाची व्यवस्था पाली खोपोली रस्त्यावरील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :कळंब गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी ३ ते ३.३० तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :ऑक्टोबर ते मार्च

संदर्भ:-
http://trekshitiz.com/mar…/Forts_in_Maharashtra_Marathi.html

अलंग (Alang)

 

#महाराष्ट्रातील_किल्ले

फोटो साभार -: प्रथमेश शंकर घोणे
( ig | @jiddimaratha )





अलंग (Alang)
किल्ल्याची ऊंची : 4500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: कळसूबाई
जिल्हा : नाशिक
श्रेणी : अत्यंत कठीण

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.

पहाण्याची ठिकाणे :किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला,पट्टा ,बितनगड,उत्तरेला हरिहर ,त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

पोहोचण्याच्या वाटा :१) आंबेवाडी मार्गे :-
अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे.

आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

अ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणार्‍या तिसर्‍या घळीपाशी पोहोचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.

ब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

२) घाटघर मार्गे :-
किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्‍या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहोचतो.

३) उदडवणे गावातून :-
किल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे. ती भंडारदरा मार्गे उदडवणे गावातून पठारावर येते. पुढे क्रं २ च्या वाटेला येऊन मिळते.
राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.सूचना :
१) अलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.
२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.
३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोणाचे तंत्र अवगत असणे व साहित्य असणे आवश्यक आहे.

संदर्भ:-
http://trekshitiz.com/mar…/Forts_in_Maharashtra_Marathi.html

अजिंक्यतारा (Ajinkyatara)

 





अजिंक्यतारा (Ajinkyatara)
किल्ल्याची ऊंची : 950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली, सातारा
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम

अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो.

Ajinkyatara

इतिहास :सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.

ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत…:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्‍या शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

पहाण्याची ठिकाणे :सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे, मात्र गडावर पाण्याची सोय नाही. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे " असे तिथे लिहिलेले आढळते.

या वाटेत ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा आहे. येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते.

किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत… दीड तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणार्‍या थेट वाटेने आपण गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १ किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.
राहाण्याची सोय :गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात.
जेवणाची सोय :जेवणाची व्यवस्था आपण स्वत…: करावी.
पाण्याची सोय :सातार्‍यापासून साधारणत…: १ तास लागतो.
सूचना :सातार्‍यात २ दिवस राहुन अजिंक्यतारा, सज्जनगड, यवतेश्वर, पाटेश्वर ही ठिकाणे पाहता येतात.

संदर्भ:-
http://trekshitiz.com/mar…/Forts_in_Maharashtra_Marathi.html

आड (Aad)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले 

#भाग_१





आड (Aad)
किल्ल्याची ऊंची : 4050
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही.
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. त्यामुळे सिन्नर जवळ आड, डुबेरगड या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असावा. आड किल्ल्यावरुन एका बाजूला डुबेरगड, सिन्नर व दुसर्‍या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.

खाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे चार किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहाता येतात.

पहाण्याची ठिकाणे :आड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण बाजूला किल्ल्याच्या डोंगराजवळ एक छोटा डोंगर आहे. आडवाडीतून आड किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेवर मातीचे धरण आहे. या धरणाच्या बाजूने शेतातून वाट किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरा पर्यंत जाते. या कौलारु हनुमान मंदिरात हनुमानाची मुर्ती, पिंड आणि २ वीरगळी आहेत. हनुमान मंदिर किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या पायथ्याशी आहे. हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्य भागातून डोंगराच्या पाऊण उंचीवर असलेल्या कातळातील गुहेपाशी जाते. हनुमान मंदिरापासून गुहे पर्यंत पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे. गुहेत एक बाक आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाक कोरलेले आहे. ते टाक सध्या कोरडेच आहे. गुहेत आडूबाईचे ठाण आहे. येथे काही नव्या जुन्या मुर्ती आहेत.

गुहेत थोडावेळ आराम करुन किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरधारेकडे चालायला सुरुवात करावी. ५ मिनिटात आपण डोंगर धारेवर पोहोचतो. याठीकाणी कातळात कोरलेल्या १० पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवरुन जपून चढावे लागते. पायर्‍या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर समोरच एक बुजलेले पाण्याचे टाक आहे. त्याच्या थोडे पुढे एकमेकांना काटकोनात असलेली दोन पाण्याची मोठी टाकी आहेत. या टाक्यांच्या डाव्या बाजूला ५ टाक्यांचा समुह आहे. या सर्व टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या पुढे गडावरील उंचवटा आहे. पण त्या उंचवट्याकडे न जाता डाव्या बाजूने किल्ल्याच्या कडेकडेने प्रदक्षिणा चालू करावी.

गड प्रदक्षिणेत प्रथम एक कोरडा तलाव दिसतो. पुढे कड्यावर वास्तूचे अवशेष दिसतात. त्यापुढे एक कोरडे पाण्याचे टाके आहे. पुढे १५ मिनिटे चालत जाऊन वळसा मारल्यावर आपण किल्ल्याच्या मागिल बाजूस येतो. याठिकाणी एक पडकी वास्तू आहे. तिच्या भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेत. या वास्तूच्या पुढे पाच टाक्यांचा एक समुह आहे. यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून झाल्यावर मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चढून जावे. याठिकाणी २ वीरगळी आहेत. माथ्यावर वास्तूंचे चौथरे आहेत. ते सर्व पाहून परत टाक्यांपाशी उतरावे आणि पुढे चालायला सुरुवात करावी. मधल्या टेकाडाला वळसा घातल्यावर कड्या जवळ असणार्‍या एका खाचेत किल्ल्याचा उध्वस्त प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार वरुन चटकन नजरेस पडत नाही त्यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. प्रवेशव्दाराच्या दरवाजीची कमान तुटलेली आहे. बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत. दरवाजातून खाली उतरणारी वाट मोडलेली आहे. त्यामुळे या वाटेने खाली उतरता येत नाही.

किल्ल्याचे प्रवेशव्दार पाहून पुन्हा वर येऊन गड प्रदक्षिणा चालू करावी. ५ मिनिटात आपण एका कोरड्या टाक्यापाशी पोहोचतो. हे टाक पाहून पुढे गेल्यावर आपण काटकोनात असलेल्या दोन टक्यांपाशी पोहोचतो. येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यास एक तास लागतो.

आड किल्ल्यावरुन पश्चिमेला अवंधा (औंधा), पट्टा, बितनगड आणि त्यामागे कलसूबाईचे शिखर दिसते. तर ईशान्येला डुबेरगड (डुबेरा) दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :सिन्नर हे आड किल्ल्या जवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून आडवाडी गावात जाण्यासाठी दिवसातून ५ एसटी बसेसची सोय आहे. याशिवाय खाजगी जीप (वडाप) सिन्नर ते ठाणगाव अशा धावतात. ठाणगावहून जीपने आडवाडी गाठता येते.

मुंबई नाशिक महामार्गाने घोटी पर्यंत येऊन पुढे घोटी सिन्नर रस्त्याने हरसुल गावापर्यंत यावे. हरसूल गावातून ठाणगावला गावाला जाणारा रस्ता आहे. ठाणगाव ते आडवाडी अंतर ७ किलोमीटर आहे. आडवाडीतून धरणा जवळून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत जातो. या रस्त्याने आडवाडीतून किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी २० मिनिटे लागतात. किल्ल्याचा पायथा ते गडमाथा जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. मुंबई ते आडवाडी अंतर २०० किमी आहे.

राहाण्याची सोय :किल्ल्यावरील गुहेत २० जणांची राहाण्याची सोय आहे.

जेवणाची सोय :जेवणाची सोय ठाणगाव / सिन्नरला आहे.

पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :पायथ्यापासून ३० मिनिटे, आडवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यास १ तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुन ते फ़ेब्रुवारी

संदर्भ:-
http://trekshitiz.com/mar…/Forts_in_Maharashtra_Marathi.html