Followers

Sunday, 2 August 2020

वेरुळचे वैभव!

वेरुळचे वैभव!


  • By Shantanu Paranjape

जायचे कसे:- वेरूळला जाण्यासाठी आपल्याला प्रथम औरंगाबाद गाठावे लागते. औरंगाबादवरून वेरूळ अवघे ३० किमी आहे. वेरूळला जाण्यासाठी सतत बसेस उपलब्ध आहेत तसेच रिक्षा आणि एस्टी महामंडळाच्या विशेष गाड्याही उपलब्ध असतात. जर नेहमीच्या लाल डब्बा गाडीने जायचे असेल तर गौताळा अभयारण्याला जाणारी गाडी पकडून वेरूळ येथे उतरणे.

जवळची प्रक्षणीय ठिकाणे- देवगिरीचा किल्ला, घृष्णेश्वरचे ज्योतिर्लिंग,खुल्ताबाद,गौताळा अभयारण्य आणि औरंगाबाद मधील इतर स्थळे.

      वेरूळ!! संपूर्ण भारताच्या (आणि त्यातल्यात्यात महाराष्ट्राच्या जास्त) जिव्हाळ्याचा विषय! देशातीलच काय पण विदेशातील पर्यटक सुद्धा इथे येऊन तोंडात बोट घातल्याखेरीज राहत नाहीत इतका ऐतिहासिक वारसा येथे पाहायला मिळतो. अजिंठा-वेरूळ खरे तर सक्खे भाऊच पण दोघात जमीन अस्मानाचा फरक. एक त्यातील चित्रांसाठी आणि दुसरा अप्रतीम अशा कोरीव कामासाठी. वेरूळला येणारे पर्यटक हे खासकरून कैलास लेण्यासाठीच आलेले असतात म्हणजेच १६ नंबरची लेणी पाहण्यासाठी. पण वेरूळ लेण्यांच्या समूहात एकूण ३४ लेणी आहेत.
    १ ते १२ बौद्धधर्मीय, १३ ते २९ ब्राह्मणी आणि ३० ते ३४ जैनपंथीय. यामध्ये लेणी नंबर १६ म्हणजेच कैलास लेणी ही सर्वात मोठी लेणी आहेत. कलादृष्टी असणाऱ्यांसाठी वेरूळ हे एक कलादालनच आहे. आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी ही कलासाधना सुरु झाली आणि साधारण ६ शतके सातत्याने हा शिल्प स्थापत्य अविष्कार होत राहिला. आजच्या सारखी अत्याधुनिक साधणे उपलब्ध नसताना सुद्धा हजार-दीडहजार वर्षापूर्वी हे सारे कसे घडले असेल हा विचार करतच आपण लेण्यांसमोर येवून पोहोचतो.
    क्रमांक एकच्या लेण्यांमध्ये लक्षणीय असे काही नाही पण क्रमांक दोन मधील ‘तारा’ ही बोधीसात्वाची मूर्ती मन मोहून टाकते. त्यानंतर आपण थेट लेणी क्रमांक पाच मध्ये जातो, येथे ११७ फूट लांबीचे व ५८ फूट रुंदीचे एक प्रशस्त दालन आहे. बौध्द कलेचा खरा अविष्कार दिसतो तो लेणी क्रमांक ६,१० आणि १२ मध्ये. यातील विशेष लक्षणीय शिल्पे म्हणजे महामयुरी आणि हरीतीची शिल्पे. अलंकरण आणि एकूणच रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. महामायुरीच्या एका बाजूला चवरीधारिणी आहे तर खालच्या बाजूला एक भिक्षु मेजावर ग्रंथ ठेवून वाचतो आहे असे दिसून येते.
     विश्वकर्मा किंवा सुतारलेणी या लेण्यांचे छत कार्ले किंवा भाजे लेण्यांसारखे आहे, पण येथे लाकडाऐवजी दगडातूनच तुळया खोदण्यात आल्या आहेत. ही लेणी म्हणजे हीनयान आणि महायान या दोन्ही परंपरेचा समन्वय आहेत, येथे हीनयान परंपरेतला स्तुपही आहे आणि त्यासमोर महायान परंपरेतील बुद्धांची धीरगंभीर अशी मूर्ती सुद्धा.
    लेणी क्रमांक ११ मध्ये तर तीनमजली इमारत खोदण्यात आली आहे आणि त्यातल्या तिसऱ्या मजल्यावर अतिभव्य असा सभामंडप खोदण्यात आला आहे. वेरूळ समूहातील लेणी क्रमांक १ ते १२ मधून स्थापत्याची दिव्यता आणि भव्यता दिसून येते तर कैलास सारख्या लेण्यांमध्ये असंख्य कोरीव मूर्तींचे गोष्टीरुपाने दर्शन होते. मजल दरमजल करत आपण मुख्य आकर्षण असलेल्या कैलास लेण्यापर्यंत येवून पोहोचतो. बरेसचे पर्यटक फक्त कैलास आणि त्याबाजुची एक दोन लेणी पाहून परत जातात पण आपण तसे करू नये.  
   वेरूळ समूहातील कैलास लेण्यांपर्यंत जाण्यासाठी थेट गाडीरस्ता आहे. इतर लेण्यांपेक्षा कैलासचा बाज थोडा वेगळा आहे. इतर लेण्या डोंगर पोखरून तयार झाल्या तर कैलास लेणी अखंड कातळ कोरून ‘आधी कळस मग पाया’ अशा अभूतपूर्व पद्धतीने तयार झाले आहेत. ही सारी वस्तूच एखाद्या प्रसादासारखी भासते. लेण्यांच्या भिंतीवर सर्वच ठिकाणी अप्रतिम शिल्पे आढळतात. गजलक्ष्मी,महिशासुरमर्दिनी,गोवर्धनगीरीधारी अशी एकाहून एक सरस शिल्पे आपणास येथे पाहायला मिळतात.
   कैलासाच्या शिल्पावैभावाचा सर्वश्रेष्ठ अविष्कार प्रदक्षिणापथातील शिल्पसज्जातून घडतो. रावणाची शिवोपासना, शिवपार्वती द्युतक्रिडा,मार्कंडऋषी कथा, अंधकासुरवध कथा, शिवपार्वती विवाह असे अनेक प्रसंग येथे कातळात कोरले आहेत. अशी अनेक शिल्पे पाहत आपण मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी निघतो. एका विशाल कातळात कोरलेले हे शिवमंदीर म्हणजे कलेचा अप्रतीम अविष्कार आहे. कैलासाचा मुख्य गाभाराही अती विशाल आहे. कैलासातील छतावर अजिंठा सारखे चित्रकाम असावे तसे सूचित करणारे काही पुरावे येथे आढळून येतात. कैलासाचा आणखीन एक कलाविष्कार म्हणजे रामायण आणि महाभारतातील कथा! कैलासाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूना हे दोन्ही शिल्पपट आहेत. चित्रकलेसारखी ही शिल्पकला आहे, सारे रामायण-महाभारत सांगणारी.
     कैलासातून बाहेर पाय निघतच नाही. पण इतर लेणी अजून पुढे असतात. शेवटच्या टप्यातील जैन लेणी साद घालत असतात. राष्ट्रकुटनृपती अमोघवर्ष याने जैन दैवत परंपरेतील ही लेणी खोदवून  घेतली.पार्श्वनाथ,वृषभनाथ,बाहुबली आणि इतर अनेक तीर्थकरांच्या धीरगंभीर मूर्तींचा अविष्कार येथे घडतो. एकूण काय तर वेरूळ हे एका प्रचंड मोठ्या कातळात रचलेले महाकाव्यच आहे. हे काव्य ज्याला वाचता येईल त्यालाच त्याचा आस्वाद घेता येईल, खरोखर या अत्यंत महान कारागीरांना कोपरापासून नमस्कार केल्याशिवाय आपण वेरूळ सोडत नाही.




















No comments:

Post a Comment