Followers

Monday 17 August 2020

*सिंधुदुर्ग_किल्ला*

 

*सिंधुदुर्ग_किल्ला*

{ रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा }

किल्ल्याचे नाव : सिंधुदुर्ग किल्ला
किल्ल्याची ऊंची : २०० फूट
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग
डोंगररांग : डोंगररांग नाही
चढाईची श्रेणी : सोपी
जवळचे गाव : सिंधुदुर्ग, मालवण
तालुका : मालवण
जिल्हा : सिंधुदुर्ग, महाराष्ट्र

हाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

◆ गडाचा इतिहास :

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्घ सागरी किल्ला व पर्यटनस्थळ. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु. १·६० किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची चिरा २५ नोव्हेंबर १६६४ रोजी प्रथम बसविली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्याजवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते.

दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.

राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला.
मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘ कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :

“चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”

◆ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. प्रवेशद्वार नेमके कोठे आहे, ते निश्चितपणे सांगता येत नाही. प्रत्यक्ष दरवाजासमोर छोटे प्रांगण असते; पण शत्रुच्या हत्तीला किंवा लाकडी ओंडक्याने दरवाजावर धडक मारण्यासाठी मागे जाण्या एवढी जागा ठेवलेली नसते. दरवाजाच्या बाजूला असणारे बुरुज घडीव दगडाचे आणि चिरेबंदी बांधणीचे असतात. बुरुजात जागोजागी जंग्यांची रचना केलेली असते. त्यातून शत्रूवर सहज मारा करता येतो. शत्रुला मात्र मारा चूकवण्यासाठी आडोसा नसतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे. महाद्वाराच्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर उजव्या बाजूस असणार्या पायर्या चढून गेल्यावर दोन छोट्या घुमट्या दिसतात. त्यातील खालच्या घुमटीत महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा व वरच्या घुमटीत उजव्या हाताचा ठसा आहे. किल्ल्याच्या बांधकामाची पाहाणी करतांना ओल्या चुन्यात महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा उमटला होता. त्यावर घुमट्या उभारण्यात आल्या. २१ नोव्हेंबर १७६३ ला संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती.

प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. डाव्या हाताला दोन फाटे(फांद्या) फुटलेला एकमेवद्वितीय असलेला माड पाहायला मिळतो. या माडावर वीज कोसळल्याने आता त्याचा फक्त सांगाडा पाहावयास मिळतो. पुढे गेल्यावर महाराष्ट्रात एकमेव असलेले श्रीशिवराजेश्वराचे मंदिर लागते. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांनी नावाड्याच्या वेशातील वीरासनात बसलेली शिवप्रतिमा येथे स्थापन केली आहे. मूर्तीची पूजाअर्चा संकपाळ घराण्याकडे आहे. मूर्तीला पूजेनंतर चांदीचा मुखवटा व वस्त्र चढवतात. त्यामुळे मुळ मुर्ती दिसत नाही. देवळात असलेल्या फोटोवरच समाधान मानावे लागते.

शिवराजेश्वर मंदिराच्या मागे श्री महादेव मंदिर व मंदिरातच असलेली विहीर आहे. त्याच पदपथावरुन पुढे गेल्यावर साखरबाव, दुधबाव व दहीबाव ह्या गोड्या पाण्याच्या विहीरी लागतात. चारही बाजूंनी समुद्र असून सुध्दा ह्या विहीरींचे पाणी गोड आहे. त्यामुळेच शिवरायांनी कुरटे बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. ह्या विहीरींच्या पुढे शिवरायांच्या वाड्याचे जोते आहे. वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे. बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे. बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी याठिकाणी समुद्रस्नानास येत असत अशी वदंता आहे.

या दरवाजाच्या समोरच्या बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद पाहायला मिळतात. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेल्या जीन्याने फ़ांजीवर चढुन पुढे गेल्यावर बुरुजात असलेली खोली पाहायला मिळते. फ़ांजी वरुन चालत चोर दरवाजाच्या पुढे आल्यावर तटबंदीत असलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर एक वाट भगवती देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिर पाहून परत फ़ांजीवर येऊन किल्ल्याच्या प्रवशव्दाराकडे चालत जातांना प्रवेशव्दार पासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आलेला आहे. पुन्हा फ़ांजीवर येऊन पुढे चालत गेल्यावर पुढच्याच बुरुजाच्या भिंतीवर गणपती कोरलेला आहे. त्याच्या पुढे दरवाजापासून दुसरा बुरुज हा चिलखती बुरुज आहे. या बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. येथून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. यशिवाय किल्ल्यावर महापुरुष मंदिर पाहाता येतात. किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची रूंदी ३ ते ४ मीटर आहे. नागमोडी तटबंदीची लांबी अंदाजे ४ किमी आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ४५ अरुंद जिने आहेत व ४० शौचकुप (संडास) आहेत.

◆ गडावर पोहोचण्याच्या वाटा :

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मालवणहून बोटी मिळतात. मालवण शहर रस्त्याने सर्व महाराष्ट्राशी जोडलेले आहे. मुंबई - पुणे शहरातून एसटी तसेच खाजगी बसेस मालवणला जातात. कोकण रेल्वेने सिंधुदुर्ग किंवा कुडाळ स्थानकात उतरुन रिक्षाने किंवा एसटीने मालवणला (अंतर २६ किमी) जाता येते.

◆ गडावर राहाण्याची सोय : निवास गणपतीपुळे आणि तारकर्ली MTDC आश्रयस्थान येथे उपलब्ध आहे.

◆ गडावरील जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. मालवण शहरात आहे.

◆ गडावरील पाण्याची सोय :

मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

◆ गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ :

मालवणहून बोटीने १५ मिनिटांत किल्ल्यावर जाता येते.
जाण्यासाठी योग्य कालावधी ऑक्टोबर ते मे

◆ सूचना :

१) मालवणहून बोटीने गडावर सोडल्यावर एक तासाने तीच बोट परत मालवणला नेण्यासाठी येते, त्यामुळे खाण्यापिण्यात वेळ न घालवता पाऊण तासात किल्ला पाहून घ्यावा.
२) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी...||⚔️🚩

No comments:

Post a Comment