Followers

Monday 24 August 2020

राजांचा रायगड...!

 राजांचा रायगड...!

Raigad Fort (रायगड किल्ला) - Historical Places of ...

रायगड हा किल्ला स्वराज्याची दुसरी राजधानी. मिर्झा राजे जयसिंग हा दक्षिणेत पुरंदर येथे येऊन पोहोचला तीच स्वराज्यासाठी धोक्याची घंटा होती. स्वराज्याच्या इतक्या आतमध्ये सैन्य हे सहज येऊ शकते हे शिवाजी राजांना कळून चुकले. जर ते सैन्य पुरंदर पर्यंत येते तर त्यांच्यासाठी राजगडजवळ येणे हे सुद्धा सोपे आहे. त्यामुळे राजगड सारखी मैदानी प्रदेशात असणारी राजधानी ठेवून यापुढे चालणार नाही हे राजांच्या लक्षात आले. म्हणूनच आग्रा भेटीवरून आले की राजधानी हलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कुठे हलवायची तर त्यासाठी दोन पर्याय होते. एक म्हणजे सुधागड आणि दुसरा म्हणजे जावळीच्या खोऱ्यात वसलेला उत्तुंग रायरी!!

दिल्लीभेटीनंतर राजा प्रत्यक्ष गड पाहून आले आणि गड पाहून समाधानी झाले. त्यांनी काढलेले उद्गार हे सभासद बखरीत दिले आहेत. सभासद लिहितो,
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो* उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”

महाराजांनी राजधानी ही रायगड येथे हलवली. हिरोजी इंदुलकर यांनी रायगड हा अक्षरशः नटवला. तो भक्कम तर केलाच परंतु इस्लामी पद्धतीचे मनोरे बांधून त्यास सौंदर्य सुद्धा दिले. सन १६७३ मध्ये इंग्रजांना राजांशी तह करायचा होता म्हणून १९ मे १६७३ रोजी टॉमस निकल्स नावाचा एक इंग्रज अधिकारी मुंबईवरून रायगड येथे जाण्यास निघाला. मजलदरमजल करत २१ मे रोजी तो गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडी येथे येऊन पोहोचला. २३ मे रोजी तो रायगड चढून गेला त्यावेळेस त्याने रायगडचे वर्णन केले आहे. तो लिहितो,

“(गडाच्या) वाटेत पायऱ्या खोदल्या आहेत. दरवाजाजवळील पायऱ्या पक्क्या खडकांत खोदल्या आहेत. जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही, तेथे २४ फूट उंचीचा तट बांधला आहे. चाळीस फुटावर दुसरी भिंत (दुसरी तटबंदी) बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे, की अन्नधान्याचा पुरवठा भरपूर असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाच्याविरुद्ध लढू शकेल. पाण्यासाठी मोठे तलाव असून ते पावसाळ्यांत भरल्यावर पाणी वर्षभर पुरून उरेल. टेकडीच्या माथ्यावर मोठें शहर वसलें आहे. घरें सामान्य प्रतीची आहेत. अत्युच्च भागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. त्याच्या मध्यभागी मोठी इमारत आहे. ‘तींत बसून तो कारभार पाहतो.”

रायगडाची ही अशी वर्णने वाचली की वाटते राजांची निवड किती सार्थ होती. राजे हे मनुष्याची पारख तर उत्तम प्रकारे करत असतच परंतु गड सुद्धा त्याच नजरेने पारखून घेतलेला असे.

No comments:

Post a Comment