#किल्ले_अंजनेरी
अंजनेरी (Anjaneri)
किल्ल्याची ऊंची : 4200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतल्या ऋषी पर्वत या नावाने ओळखल्या जाणार्या डोंगरावर आहे. या पर्वतावर अंजनी मातेने १०८ वर्षे तप केले. वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला अशी लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या किल्ल्याला "अंजनेरी" नाव देण्यात आले असावे. त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा एक महत्त्वाचा किल्ला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही १६ पूरातन मंदि्रे आणि शिलालेख पाहाता येतात. यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची असून १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. मुंबई, नाशिक आणि पुण्याहून एका दिवसात अंजनेरी किल्ला आणि मंदिरे पाहून होतात.
पहाण्याची ठिकाणे :
अंजनेरी गावातून
किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या
(इ.स.२०१७) जीप सारखे वहान या रस्त्याने जाऊ शकते. नाशिक - त्र्यंबकेश्वर
एसटी बसने आल्यास अंजनेरी फ़ाट्यावर उतरुन १५ मिनिटात गावातील हनूमान
मंदिरापाशी पोहोचता येते.. येथून नवरा नवरीचे दोन सुळके आणि त्यामागे
पसरलेला अंजनेरी किल्ला नजरेत भरतो. गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत
जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे.
कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला
मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. हनुमान
मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट
दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो.
या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन
विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. या ठिकाणी काही खाण्याचे पदार्थ विकणारी
दुकाने आहेत. चौकी पासून पायर्यांची वाट सुरु होते. प्रथम वन विभागाने
बांधलेल्या पण आता उध्वस्त झालेल्या पायर्या लागतात. त्या पार केल्या की
आपण एका घळीत पोहोचतो. याठिकाणी कमी अधिक उंचीच्या पायर्या कातळात
कोरलेल्या आहेत. त्यावर कॉंक्रीट ओतून मुळ पायर्यांचे सौंदर्य तर घालवले
आहेच पण त्यांची उंचीही वाढलेली आहे. या पायर्या अर्ध्या उंची पर्यंत चढून
गेल्यावर डाव्या बाजूला एक जैन लेण आहे. लेण्यात दोन दालने असून त्यात
पार्श्वनाथांची मुर्ती आणि इतर मुर्ती आहेत. लेण्याच्या बाजूला पाण्याचे
कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे लेणे पाहून उरलेल्या पायर्या चढून
गेल्यावर आपण एका विस्तिर्ण पठारावर पोहोचतो.
पठारा वरून आपल्याला अंजनीमातेचे मंदिर आणि त्यामागील बालेकिल्ला दिसतो. अंजनी मातेच्या मंदिरा पर्यंत पोहोचण्यास १५ मिनिटे लागतात. मंदिर बर्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. मंदिरा समोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी याठिकाणी आहेत . पण दोन्ही टाकी कोरडी आहेत. मंदिरा जवळ खाण्याचे आणि पूजा साहित्याची दोन दुकाने आहेत. मंदिरा पासून बालेकिल्ल्याकडे जातांना डाव्या बाजूला पावलाच्या आकाराचा तलाव दिसतो. त्याला त्याला हनुमान तलाव आणि इंद्र कुंड या नावाने ओळखले जाते. हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे तलावाचा आकार पाऊलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रध्दा आहे. (तलावाचा आकार दिसण्यासाठी बालेकिल्ल्याचा डोंगर चढुन जावा लागतो) किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा सध्या हा एकमेव स्त्रोत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात. एक वाट डावीकडे वळून सीता गुंफ़ेकडे जाते, तर दुसरी वाट समोरच्या बालेकिल्ल्यावर चढत जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. येथे एका साधूने आश्रम बनवलेला आहे. आश्रमाच्या बाहेरच्या बाजूस ३ देवळ बांधलेली आहे. या देवळाच्या मागच्या बाजूला थोडे वर चढून गेल्यावर एक कातळात कोरलेले लेणे आहे. लेण्याच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस दोन व्दारपाला कोरलेले आहेत. लेणे दोन खोल्यांचे आहे. लेण्याच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहे.
सीता लेणे पाहून परत पायर्यांच्या वाटे पर्यंत येऊन बालेकिल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात करावी. साधारणपणे पाऊण उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट जाते. या पायवाटेने पुढे गेल्यावर एक गुहा पाहायला मिळते. टेहळणीसाठी या गुहेचा उपयोग होत असावा . सध्या एका साधूने यात आपले बस्तान बसवलेले आहे. गुहेच्या पुढे एक पाण्याचे टाकेही त्याने बनवलेले आहे. गुहा पाहून परत पायर्यांपाशी येऊन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. माचीच्या पठाराप्रमाणे बालेकिल्ल्याचे पठारही विस्तिर्ण आहे. पठारावरून १० मिनिटे चालल्यावर आपण हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या बाजूला एक पाण्याचा छोटा बांधिव तलाव आहे. मंदिराच्या मागे उघड्यावर काही मुर्ती आणि पिंड ठेवलेली आहे. याठिकाणी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत.
अंजनेरी किल्ल्यावरून ब्रम्हगिरी (त्र्यंबकगड), हरीहर, गडगडा (घरगड), डांग्या सुळका दिसतात.
अंजनेरी गावात १६ पूरातन मंदिरे आणि शिलालेख पाहाता येतात. यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची असून १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. सध्या (इ.स. २०१७) या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे.
पोहोचण्याच्या वाटा :१२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. अंजनेरी किल्ल्यावर नाशिक - त्र्यंबकेश्वर एसटी बसने आल्यास जाण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि मी अंतरावरील अंजनेरी फाट्यायावर उतरावे. या फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण अंजनेरी गावातील हनूमान मंदिरापाशी पोहोचता येते. अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या (इ.स.२०१७) जीप सारखे वाहान या रस्त्याने जाऊ शकते. . हनुमान मंदिरापासून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे. कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. हनुमान मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. चौकी पासून पायर्यांची वाट सुरु होते. पायर्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर आणि तेथून पुढे बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दॊन तास लागतात.राहाण्याची सोय :१) पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.
२) सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :गडावरील दुकानांमध्ये , त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेलात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :गडावर पाण्याचा तलाव आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :अंजनेरी गावातून २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुन ते फ़ेब्रुवारी
No comments:
Post a Comment