Followers

Friday, 30 July 2021

गोंधनापूर किल्ला, खामगाव, जि. बुलढाणा

 #VidarbhaDarshan -

























गोंधनापूर किल्ला, खामगाव, जि. बुलढाणा

सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेले गिरीदुर्ग सह्याद्रीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचामुळे बलदंड व अजिंक्य राहिले होते. पण जसजसे आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून सपाटीकडे जातो तसतसे या किल्ल्यांचं स्थापत्य बदलत डोंगरी किल्ल्याचे रुपांतर भुईकोटात होते. मराठवाडा व विदर्भात असे भक्कम भुईकोट आणि गढी मोठय़ा प्रमाणात दिसुन येतात. भुईकोट हे जमिनीवर असल्यामुळे सहजपणे होणारे आक्रमण लक्षात घेऊन या किल्ल्यांची बांधणी केली जात असे. विदर्भातील अशा भुईकोटापैकी विस्मृतीत गेलेला एक भुईकोट म्हणजे गोंधनापुरचा किल्ला. अतिशय सुंदर बांधणी असलेला हा किल्ला विस्मृतीत जाणे हेच एक आश्चर्य आहे. गोंधनापुर गावात असलेला हा किल्ला आजही मोठय़ा दिमाखात उभा असुन परकोट व त्यात दुहेरी बांधणीचा बालेकिल्ला अशी वैशिष्टपुर्ण रचना या किल्ल्याला लाभली आहे. खामगाव या बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासुन हा किल्ला केवळ ७ कि.मी.अंतरावर आहे. खामगाव येथुन गोंधनापुरला जाण्यासाठी एस.टी.तसेच रिक्षाची सोय आहे. एस.टी.ने उतरल्यावर चालत पाच मिनिटात आपण किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. परकोटाचे प्रवेशद्वार विटांनी बांधलेले असुन दरवाजा शेजारील दोन्ही बुरुज मात्र दगडात बांधलेले आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटाला लागुनच दरवाजावर व बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. परकोटाच्या तटबंदीत दरवाजाशेजारी दोन,चार टोकाला चार व तटबंदीच्या मध्यावर प्रत्येकी एक अशी आठ बुरुजांची रचना असुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीत सहा असे एकुण १४ बुरुज किल्ल्याला आहेत. या सर्व बुरुजावर तसेच बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बंदुकीचा व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुन येतात. परकोटाची तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली असुन दरवाजाच्या तटबंदीच्या टोकाला असलेला पाकळीच्या आकाराचा षटकोणी बुरुज आवर्जुन पाहण्यासारखा आहे. गोंधनापुर गावाच्या मध्यभागी असलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला चार एकरपेक्षा जास्त परीसरात पसरला असुन परकोटाच्या आत लहान आकाराच्या अनेक विहिरी तसेच तटाला लागुन असलेल्या जुन्या वास्तु पहायला मिळतात. परकोटाच्या आत असलेला मुख्य किल्ला म्हणजे बालेकिल्ला दोन भागात विभागलेला असुन त्याचा परीसर साधारण अर्धा एकर इतका आहे. परकोटातुन आत शिरल्यावर बालेकिल्ल्याला वळसा मारत आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजासमोर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या या दरवाजावर नगारखान्याची इमारत असुन दोन बुरुजामध्ये घडीव दगडात बांधलेल्या या दरवाजावर नक्षीकाम केले आहे. किल्ल्याचे ४० फुट उंचीचे बुरुज व तटबंदी मात्र ओबडधोबड दगडात बांधलेली असुन फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. बालेकिल्ल्याच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी माजली असुन गावकरी त्याचा फायदा घेत किल्ल्याचा वापर शौचालयासाठी करत असल्याने थोडे सांभाळूनच किल्ल्यात फिरावे लागते. किल्ल्यात शिरल्यावर दरवाजाला लागुनच एक चौथरा असुन उजव्या बाजुच्या तटबंदीला लागुन दुसरा चौथरा आहे. या चौथऱ्याखाली भलेमोठे तळघर असुन त्यात हवा व उजेड येण्यासाठी बाहेरील तटबंदीत झरोके आहेत. तळघरात शिरण्यासाठी चौथऱ्याखाली लहान दरवाजा असुन दुसरा दरवाजा बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजातील पहारेकऱ्याच्या देवडीतुन आत शिरतो. याच तटबंदीमधील भिंतीत तटावर जाण्यासाठी जिना बांधला आहे. या जिन्याने समोरील बुरुजावर गेले असता या बुरुजावर तोफ ठेवण्यासाठी असलेला चौथरा व ती फिरवण्यासाठी उखळ पहायला मिळते. डाव्या बाजुच्या तटबंदीत बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी दरवाजा असुन समोरील तटबंदीत असलेल्या एका खोलीत विहीर आहे. या तटबंदीत किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोरदरवाजा असुन तटबंदी व बुरुज यामधुन बाहेर निघणारा हा मार्ग सध्या दगडांनी बंद केला आहे. हे सर्व पाहुन झाल्यावर डावीकडील दरवाजातुन बालेकिल्ल्याच्या आतील भागात जावे. या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आतील बाजुस देवड्या आहेत. बाहेरील आवारातुन या भागातील काही दिसू नये यासाठी दरवाजासमोर आडवी भिंत घातलेली आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर उजवीकडील पायऱ्यांनी तटावर जाऊन संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येते. तटबंदी मधील एका बुरुजावर झेंडा फडकविण्याची जागा असुन तेथुन खामगाव पर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. बाहेरील रचनेप्रमाणे या भागातही दरवाजाच्या उजव्या बाजुस तटबंदीला लागुन एक चौथरा आहे. या बाजुच्या तटबंदीत वासे रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. या चौथऱ्याखाली भलेमोठे तळघर असुन त्यात हवा व उजेड येण्यासाठी बाहेरील तटबंदीत झरोके आहेत. तळघरात शिरण्यासाठी चौथऱ्याच्या अलीकडे एक भूमिगत लहान दरवाजा असुन या दरवाजाने तळघरात जाता येते. किल्ल्याच्या आत असलेला हा दरवाजा सध्या झुडुपात बंदिस्त झाला असुन हे तळघर व आतील भाग पहाण्यासाठी किल्ल्याबाहेरून चोर दरवाजाने आत शिरावे लागते. तळघरात असलेल्या चोर दरवाजाने तटबंदी व बुरुज यामधील लहान दरवाजाने किल्ल्याबाहेर पडता येते. या चोरदरवाजाच्या तटबंदी बाहेरील बाजूस एक लहान विहीर व बळद पहायला मिळते.दरवाजा समोर तटबंदीत दोन शौचकुप असुन तटबंदीच्या टोकाला एक विहीर आहे. या विहिरीशेजारी तटबंदीच्या आत दोन खोल्या असुन त्यात किल्ल्याचा मुदपाकखाना असल्याचे सांगण्यात येते. या विहिरीचे पाणी थेट तटावरून काढण्याची सोय आहे. किल्ल्याच्या या आवाराच्या मध्यभागी कारंजे बांधलेले असुन दरवाजासमोरील दुमजली अवशेष पहाता या भागात किल्ल्याची राजसदर असावी असे वाटते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. बाहेरील परकोट व आतील बालेकिल्ला पहाण्यास दिड तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन गावाबाहेरील लक्ष्मी नारायण मंदिर पहायला जाताना वाटेत खडकात खोदलेली कमान असलेली पायऱ्यांची विहीर पहायला मिळते. लक्ष्मीनारायण मंदिरात विष्णुची प्राचीन मुर्ती पहायला मिळते. किल्ल्याच्या बांधकामाचे नेमके वर्ष माहित नसले तरी नागपूरकर रघुजी भोसल्यांच्या काळात हि गढी बांधली गेली. भोसल्यांच्या चिटणीसांच्या ताब्यात या गढीचा कारभार असल्याने हि गढी चिटणीसांची गढी म्हणुन ओळखली जाते. गढी पाहण्यासाठी गोंधनापुर गावचे सरपंच श्री.त्रिंबक बनगर व लक्ष्मण वानखेडे गुरुजी यांचे विशेष सहकार्य लाभले.
माहीती संकलन व छायाचित्र
- श्री सुरेश निंबाळकर

Wednesday, 21 July 2021

किल्लेकोट व तटबंदी

 


किल्लेकोट व तटबंदी
-

 देशाच्या किंवा प्रांताच्या रक्षणार्थ किल्ला अगर गड वगैरे बांधण्याची चाल बरीच जुनी आहे. वेदांमध्येंहि किल्ले या अर्थी पुर शब्द योजिला आहे; (ज्ञानकोश विभाग ३ पृ. ३४७ पहा). त्यावरून वेदकालीं किल्ले असावेत असें दिसतें. रामायणांत तर लंकेचें वर्णन देतांना तिच्या तटबंदीचें, बुरुजांचें, वेशींचें वगैरे किल्ल्याच्या स्वरूपाचें वर्णन दिलेलें आहे; त्यामुळें रामायणकाळीं किल्ल्याची कल्पना चांगलीच अस्तित्वांत होती असें ठरतें. रामायणांतील सुवेळा, निकुंभिला, किष्किंधा हीं ठिकाणें तटबंदीचीं होतीं. महाभारतांतील कूटयुद्धाच्या वर्णनांत; किल्ल्यांचा उपयोग सांगितला आहे, तो असा: - “राजानें प्रथम आपल्या मुख्य दुर्गाचा आश्रय करावा; श्रीमंत लोक जेथें किल्ले असतील तेथें आणून ठेवावें व तेथें फौजेंतील पाहारे ठेवावे; किल्ल्याभोंवतालचें सर्व जंगल तोडून टाकावें; किल्ल्यावर टेहळणीच्या उंच जागा कराव्या व मारा करण्यासाठीं संरक्षित जागा व छिद्रें करावीं; किल्ल्यांतून बाहेर पडण्याचे गुप्त रस्ते असावेत; दरवाज्यावर यंत्रें व शतघ्री रोंखून ठेवाव्यात; नवीन विहिरी पाडाव्यात; रात्रींच फक्त अन्न शिजवावें” (शांतीपर्व अ. ६९). श्रीकृष्णाच्या द्वारकेला तटबंदी फार उत्कृष्ट होती; जरासंघाच्या राजधानीसहि तशीच होती. त्याच्या राजधानींत कृष्ण, भीम व अर्जुन या तिघांनीं प्रवेश केला तो तटावरून चढून केला व तटावरील दुंदुभी फोडल्या असें त्या वेळचें वर्णन आहे. द्वारकेवर शाल्वानें हल्ला केला त्यावेळच्या वर्णनांत तट, बुरुज, मोर्चे वगैरेंचा उल्लेख येतो. चाणक्याच्या अर्थशास्त्र त किल्ल्याचें महत्व वर्णिलेलें आहे. राज्याच्या सरहद्दीवर प्रत्येक दिशेस मजबूत किल्ले असावेत असें त्यांचें म्हणणें आहे. त्यानेंहि औदक (जंजिरा), पार्वत (गड), धानवन (भुईकोट) व वनदुर्ग असे प्रकार सांगितले आहेत. किल्ल्यांचे आकार गोल, लंबचौरस व चौरस असून भोंवतीं खंदक, नदी किंवा कालवे असावेत; खंदक एकापुढें एक असे तीन ठेवून त्यांतील अंतर ६ फूट व खंदकाची रुंदी १०, १२, १४ फूट असावी व खोली रुंदीच्या निम्मी असावी; खंदकांत सुसरी, मगर व कमळाचे वेल असावेत (यांची गुंतागुंत फार असते, त्यामुळें या वेलांत माणूस अडकल्यास लवकर बाहेर पडत नाहीं). तट व पहिला खंदक यांत २४ फूट अंतर ठेवून, तटाची उंची ७२ फूट व रुंदी ३६ फूट ठेवावी आणि पायथ्याशीं निवडुंग व कांटेरी झुडपांची लागवड करावी व पुढें खड्डे, उंचवटे ठेवावेत. तटावर १२ हातांगणीक जंग्या ठेवाव्यात. बुरुज चौकोनी असावेत (ख्रिस्तपूर्व व ख्रिती शकांतील पहिल्या काळच्या रोमन व ग्रीशियन किल्ल्यांचेहि बुरुज चौकोनी होते असें त्यांच्या चित्रांवरून दिसतें.) किल्ल्यांत तटाइतकी उंच अशीं एक शिडी तयार करून ठेवावी. दोन बुरुजांत अंतर १८० फूट असावें. तटावरील मार्ग झांकलेला असावा. या मार्गावर इंद्रकोष म्हणून झांकलेल्या उंच बैठका असाव्यात. (यावरून बहुधां तोफांचा अगर बाणांचा मारा शत्रूवर करीत असावेत.) तटात एक गुप्त जिना व एक बाहेर पडण्याचें गुप्त द्वार व एक विहीर असावी (याचें प्रत्यक्ष उदाहरण पुण्याच्या शनिवारवाड्याच्या दक्षिणेच्या पहिल्या बुरुजांत दृष्टीस पडतें). किल्ल्याच्या महाद्वाराला हत्तीनें तें फोडूं नये म्हणून २४ अंगुळांचे अणकुचीदार लोखंडी इंद्रकील (खिळे) असावेत. त्याला चार अडसर असावेत, दाराची रुंदी ५ हात असावी. दारावर एक मनोरा (नगारखाना?) सुसरीच्या आकाराचा असावा. किल्ल्यात एकंदर बारा वेशी असाव्यात. तटाच्यावर कुमारीदेवीचें एक देऊळ असावें व पाण्याचे लहान लहान पाट व एक कमळानें भरलेलें कुंड असावें. या पाटांत (लपवून ठेवण्यासाठीं?) शस्त्रें ठेवावीं; तीं म्हणजे कुदळी, कुर्‍हाडी, दगड, मुद्गर, सोटे, चक्र, यंत्रें, शतघ्नी (तोफा), भाले वगैरे. किल्ल्यांत इमारती बांधतांना प्रथम पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर असे तीन तीन राजमार्ग चोवीस फूट रुंदीचे तयार करावेत. फौजेसाठीं जे रस्ते असतात त्यांची रुंदी ४८ फूट ठेवावी. किल्ल्यांत मजबूत जागीं चारी बाजूंस इतरांचीं घरें ठेवून उत्तरदिशेस उत्तराभिमुखी अगर पूर्वाभिमुखी किल्ल्यांतील सर्व जमीनीचीं १/९ जमीन व्यापणारा असा राजवाडा बांधावा. पुरोहित, यज्ञशाळा, पाण्याचा खजिना, प्रधानांचीं घरें, मुदबकखाना, गजशाला, कोठी हीं राजवाड्याच्या डावीकडे असावीं. व्यापारी, कारागीर, योद्धे, खजीना, खजीनदारकचेरी, इतर अठरा कारखाने, दारुगोळ्याचें कोठार, सेनापतींचे घर वगैरे राजवाड्या या उजवीकडे असावी. यांच्या शिवाय उष्ठ्रखाना, रथशाळा, अश्वशाळा, शस्त्रशाळा, दवाखाने, दुकानें, गोशाळा, राज्याची कुलदेवता (तिथें देऊळ) वगैरे इमारती किल्ल्यांत असाव्यात. वेशींचीं नावें ब्रह्मा, इंद्र, यम, सेनापति अशीं असावीं. प्रत्येक दहा घरास एक विहीर खोदावी. सरकारी लष्करी अधिकारी, निरनिराळ्या खात्यांवरचे अनेक (एकाच खात्यांत अनेक) असावेत. तसे असले म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर दाब असतो व ते सहसा फितूर होत नाहींत. किल्ले घेतांना सुरुंगाचा उपयोग करावा खंदक भरून काढून हल्ले करावे ज्यांचीं घरटीं किल्ल्यांत असतील अशा पक्ष्यांनां पकडून त्यांच्या शेंपट्यांस स्फोटक द्रव्यें बांधून त्यांनां आंत सोडावें. तसेच किल्ल्यांत नौकर म्हणून आपले लोक ठेवावेत अगर फितूर करून त्याच्याकडून मुंगूस, वानरें माजरें, कुत्रीं यांच्या शेंपट्यांनां स्फोटके द्रव्यें बांधवून आंतील गवती छपरांच्या घरावर सोडावीं. (येथें स्फोटक द्रव्यांच्या गोळ्यांत कोणतीं द्रव्यें कशीं घालून गोळे तयार करावेत तें चाणक्यानें दिलें आहे) व अग्नीचे बाणहि सोडावेत. यापुढें हल्ले कसे व केव्हां करावेत, फितूर कसा करावा व किल्ला काबीज केल्यावर काय करावें यासंबंधानेंहि चाणक्यानें बरेंच विवेचन केलें आहे.

मध्ययुगांत कालंजर, कनोज, मान्यखेत दिल्ली मयुरखण्डि, कपिश, त्रैकूटक, उज्जनी, राजगृह वगैरे किल्ले अगर तटबंदीच्या राजधान्यांचीं नांवें आढळतात. राजपुतान्यांतील प्रसिद्ध चितोडगड याच्या नंतरच्या काळात बांधला गेला. मुसुलमानी अंमलाच्या प्रारंभीं उत्तर हिंदुस्थानांत प्रख्यात किल्ले थोडे होते. मुसुलमानी अंमल झाल्यानंतर व त्याचें आणि रजपुतांचें व इतर हिंदूचें युद्ध जुंपल्यानंतर राजपुताना, पंजाब, काश्मीर, बंगाल, बहार व ओरिसा इकडे किल्ले जास्ती बांधले गेले. उत्तरहिंदुस्थानांत डोंगर थोडे असल्यानें डोंगरी किल्ले फार थोडे असून भुईकोट, किल्लेच फार आहेत. दक्षिणेंत तसे नाहींत. इकडे सह्याद्री, सातपुडा, चांदवड वगैरे डोंगर असल्यानें बहुतेक किल्ले डोंगरीच होते आणि त्याचमुळें मुसुलमानांनां जितक्या लवकर सपाट उत्तरहिंदुस्थान जिंकितां आला, तितका डोंगराळ दक्षिणहिंदुस्थान जिंकितां आला नाहीं व जरी जिंकिला तरी सतत तो त्यांच्या ताब्यांत राहिला नाहीं. दक्षिणेंतील-त्यांतल्या त्यांत महाराष्ट्रांतील- किल्ले फार बळकट असत. भोजराजांनीं, शिलाहारांनीं व चालुक्यांनीं हे किल्ले बांधिले होते. सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, सातारा, माहुली, तोरणा वगैरे प्राचीन किल्ले असून शिवाजीमहाराजांनीं व इतर मराठी राजसत्ताधार्‍यांनीं अनेक नवीन किल्ले बांधिले.

डोंगरी व भुईकोट या किल्ल्यांच्या दोन प्रकारांप्रमाणेंच जंजिरा- पाणकिल्ला-हाहि एक तिसरा प्रकार होता. शिवछत्रपतीनें सिंधुदुर्ग हा प्रख्यात पाणकिल्ला बांधिला होता. त्यास मराठे ‘शिवलंका’ असें मोठ्या अभिमानानें म्हणत. मराठ्यांनीं अर्नाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, अलिबाग व हबशानें जंजिरा हे किल्ले बांधल्याचें प्रसिद्धच आहे. हे जलदुर्ग फार थोडे होते. मराठी राज्यांतील या जलदुर्गाचें व आरमाराचें आधिपत्य प्रथम आंग्रे व नंतर धुळप या सरदारांकडे होतें.

राज्यव्यवहारकोशांत दुर्ग, गड व जंजिरा असे तीन प्रकार सांगितले आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठीं तट बांधीत. तटास मधून मधून मजबुतीसाठी व युद्धोपयोगी सामान ठेवण्यासाठीं बुरुज बांधीत. या बुरुजांनां व तटाला भोकें (यांना जंगी म्हणत) ठेवून त्यांतून शत्रूंवर बंदुकांच्या गोळ्या सोडीत असत. बुरुजांवर तोफा असत. कांहीं किल्ल्यांनां दोन दोन तट असून किल्ल्याच्या आंत बालेकिल्ला असे. किल्ल्याच्या निरनिराळ्या भांगांना फांजी, रेवण, पडकोट, चर्या, जीभ, अर्गळा, मेट, सफैली वगैरे नांवे असत. तटाच्या पुढें (भुईकोट किल्ला असल्यास) खंदक असे, खंदकावर एक लांकडी पूल असे; त्यास साकू म्हणत. किल्ल्यांत धान्य साठविण्याचीं कोठारें, पाण्याचीं टांकीं, विहिरी, पागा, रहाण्याच्या कोठड्या, राजवाडा, दारूगोळा ठेवण्याचा बारुदखाना वगैरे जागा असत.

भुईकोट किल्ले गंगा व सिंधुनदीच्या कांठीं बरेच आहेत. दिल्ली, आग्रा, प्रयाग, भरतपूर वगैरे कल्ले विस्तारानें फार मोठे व मजबूत आहेत, पण ते सारे भुईकोट आहेत. यांच्या भोंवतीं खंदक अगर नद्यांचें पात्र आहे. आग्र्याच्या किल्ल्यांत राजवाडे दिवाणई-खास व आम आणि मशिदी वगैरे आहेत. विजापूरच्या आर्क किल्ल्यांतहि अद्यापि मोठमोठे पडके राजवाडे पहावयास सांपडतात. हाहि भुईकोटच आहे. किल्ल्याचें महाद्वार ओलांडल्यावर,  दुसरी वेस जी असे ती उजवी अगर डावीकडे ठेवीत; महाद्वाराच्या समोर केव्हांहि ठेवीत नसत. किल्ला एकाएकीं हस्तगत होऊं नये म्हणून ही खबरदारी असे. रस्तेहि नागमोडी व त्यावर तोफा रोखलेल्या असे असत. खंदकाच्या पुढें कांटेरी निवडुंग अगर बांबूंचीं बनेंहि लावीत असत. त्यामुळें शत्रूंच्या तोफेचा मारा निकामी होई.

किल्ल्याच्या खालील १०।१५ कोसांचा भोंवतालचा मुलूख त्या किल्ल्याच्या दिमतीस असे. त्या प्रांताचा वसूल किल्लेदारानें गोळा करून आपल्या (किल्ल्याच्या फौजेच्या व इतर) खर्चाइतका ठेऊन घेऊन बाकीचा मुख्य सरकारकडे पाठविण्याची चाल असे. किल्ल्यावर मुख्य किल्लेदार हा असून त्याचे हाताखाली जामदार, कारखाननीस, हवालदार, मुजुमदार, सबनीस वगैरे लष्करी व मुलकी अधिकारी असत. किल्ल्याच्या महत्वाप्रमाणें कमजास्ती फौज असे. किल्ल्यामुळें शत्रूंपासून बचाव व शत्रूला अडथळा या दोन्ही गोष्टी करितां येतात. तोफा निघण्यापूर्वी (बाणाच्या युद्धकालांत) डोंगरी किल्ल्यांचें महत्व फार असे, कारण बाणांचा मारा इतक्या उंचीवर जात नसे. परंतु हल्लीं लांब पल्ल्याच्या प्रचंड तोफा व अगदीं अलीकडे निघालेलीं विमानें यांच्यापुढें या भुईकोट व डोंगरी किल्ल्यांचें महत्व फारसें राहिलें नाहीं हें परवांच्या यूरोपीय महायुद्धांत सिद्ध झालेंच आहे. तोपर्यंत जगांतील अजिंक्य समजले जाणारे नामूर, अँटवर्प, मेत्झ, वगैरे किल्ले जर्मन लोकांनीं हाविट्झर तोफांच्या व विमानांच्या साहाय्यानें अगदीं अल्पावधींत काबीज केले. सारांश, यापुढील काळांत किल्ल्यांचें महत्व कमी होत जाईल असें दिसतें.

किल्ला बांधितांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात;  लढायांत उपयोगांत येणारीं हत्यारें, जमीनीची पहाणी, शत्रूची व आपली ताकत, पाण्याची व दाण्याची सोय, चोर मार्ग वगैरे लक्ष्यांत न घेतल्यास फार दिवसांच्या वेढ्यानें आंतील लोकांचें नुकसान होतें. किल्ले बांधण्यापूर्वीं नुसता तटह गांवाभोंवतीं घालीत. आशा प्रकारें निनेव्ही आणि बाबिलोन येथील तटबंदी होती. मात्र ती फक्त संरक्षणाच्या (बचावाच्या) स्वरूपाची होती. शत्रूस तोंड द्यावयाचें झाल्यास आंतील सैन्यास या तटाबाहेर जावें लागे. चीनमधील प्रचंड भिंतहि तटबंदीचें एक अलौकिक उदाहरणच होय. हिंदुस्थानांत व यूरोपमध्येंहि मध्ययुगांत जहागीरदार व सरंजामदार हे लहान लहान गढ्या बांधून आपल्या जहागिरींचे (त्यांतील रस्ते, नदीचे उतार, पूल वगैरे) संरक्षण करीत असत. तोफा उपयोगांत आल्यानंतर १७ व्या व १८ व्या शतकांत या यूरोपियन जमीदारांच्या गढ्यांचें महत्व संपलें. आपल्या इकडे महाराष्ट्रांत खुद्द शिवाजी महाराजांनीं, हे जमीदार गढ्या बांधून शिरजोर होतात म्हणून, त्यांच्या गढ्या पाडून टाकिल्या. मध्यवर्ती सरकारास या बंडखोरांपासून त्रास होतो म्हणून त्यांनीं कोण्याहि इनामदारास गढी बांधूं दिली नाहीं. हल्लीं लष्करीदृष्ट्या नाजूक व महत्वाचीं ठाणीं जेथें असतील तेथें किल्ले बांधितात. उदाहरणार्थ राजधानी, लष्करी, कोठारें, दर्यावरील गोद्या, आगगाड्याचीं जंक्शनस्टेशनें वगैरे.

किल्ल्यांच्या कल्पनेपूर्वी प्रथम कांट्याचीं कुंपणें गांवाभोंवतीं ठेवीत असत. शिकंदराने हिरक्यानिअन लोकांच्या खेड्यांभोवतीं असलीं कुंपणें असल्याचें लिहिलें आहे. हल्लीं अरबस्तानांत व हिंदुस्थानांत कर्नाटकांत निवडुंगाचें कुंपण असलेलीं खेडीं आढळतात. यानंतर मातीचा तट बांधण्याची युक्ती निघाली. जर्मनींत मध्ययुगांत हे तट मातीचे होते. आपल्याकडे जुने तट नुसत्या मातीचे बांधलेले कोठें कोठें आढळतात. यांत तोफेचा गोळा घुसला तरी (दगडी बांधकामाच्या तटापेक्षां) फारच थोडें नुकसान होतें. भरतपूरच्या किल्ल्याचा प्रसिद्ध तट व कुंभेरीचा तट मातीचाच आहे असें म्हणतात. मातीच्या भिंतींनंतर दगड विटांचा बांधीव तट उपयोगांत आला. तट उंच (म्हणजे शत्रूस शिड्या लावितां येऊं नयेत इतका) व रुंद (म्हणजे आपल्याला त्यावर सामानासह सुलभतेनें फिरतां येईल असा) असावा. तटानंतर बुरुज प्रचारांत आले. यांचा उपयोग शत्रूंवर मारा करण्यास होई मागें सांगितलेल्या निनेव्हीचा तट १२० फूट उंच व ३० फूट रुंद व १५०० बुरुजांचा असून तो खि. पू. २ हजार वर्षांपूर्वीं बांधलेला होता. असल्या तटांना शिड्या लावून किल्ले काबीज करीत. तें नच जमल्यास तटास सुरुंग लावीत व तट उडवून देत. क्वचित (सिंहगडसारख्या) प्रसंगीं घोरपडीचाही उपयोग करीत; अगर सभोंवार मोर्चें देऊन सतत तोफांचा मारा करून तो जमीनदोस्त करीत असत. यरुशलेमवर झालेल्या ख्रि. पू. ८ व्या व ६ व्या शतकांतील शत्रूच्या हल्ल्यांत ३०० शेर वजनाचे दगडे गोळे फेंकणारीं यंत्रें, तोफा, झुलते घण यांचा उपयोग केला होता. रोमन लोकांनीं ही कला ग्रीक लोकांपासून घेतली. रोमन किल्ले बहुधा उंच ठिकाणीं बांधिलेले असत. याचें कारण त्याचे तट २० फूट रुंदीचे असत; त्यावेळचीं तटबंदीचीं कांहीं वर्णनें आढळतात. कारकासोने येथील बुरुज, गैलार्ड येथील किल्ला, माँटार्जीसचा किल्ला यांचीं प्रत्यक्ष पाहून लिहिलेलीं वर्णनें आहेत; त्यावरून त्यांच्या बांधणीची कल्पना येते. यानंतर १५ व्या शतकांत जेव्हां तोफांचा व दारूगोळ्याचा प्रचार सुरू झाला तेव्हां किल्ल्यांच्या प्राचीन बांधणींत फरक पडूं लागला. यूरोपांत प्रथम फ्रान्समध्यें या शस्त्रांचा मारा करण्यास सुरुवात झाली. स. १४२८ त इंग्रजांनीं आर्लिअन्सला घातलेल्या वेढ्यांत किल्लेदारांनीं तोफांच्या मार्‍यानेंच इंग्रजांचा पुरता फडशा पाडला. पुढें १४५० त सातव्या चार्लसनें तोफखान्याच्या जोरावरच नार्मंडींतील सर्व इंग्रजी किल्ले पाडाव केले.

या शास्त्रावर यूरोपमध्यें डूरर, पेगन मार्टिनी, सेबास्टियन ग्यालो, स्पेकल, म्याकिआव्हेली वगैरे लोकांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पुढें १७ व्या शतकांत रेखागणिताच्या आधारावर किल्ल्यांची बांधणी करण्यास सुरुवात झाली. याचा पुरस्कर्ता मार्चीं नांवाचा एक इटालियन होता. अठराव्या शतकांत कॉर्मोन्टेन म्हणून एका फ्रेंच माणसानें तटबंदी व खंदक यांत कांहीं सुधारणा केल्या त्या फ्रँको-जर्मन युद्धापर्यंत (१८७०) अंमलांत होत्या. जर्मनींत फ्रान्सच्या सरहद्दीवरील मोठमोठ्या किल्ल्यांत जी एक नवीन (निरनिराळे १०।१२ किल्ले मिळून एक मोठा किल्ला बनविणें) रीत उपयोगांत आलेली गेल्या महायुद्धांत दृष्टीस पडली, ती व्हाउबन नांवाच्या एका फ्रेंचानें मूळ शोधून काढलेली आहे (१७००). मात्र तिचा विस्तार जर्मनीनें केला. असल्या प्रकारचे किल्ले म्हणजे अँटवर्प, पोसेन, पोर्टआर्थर, मेट्झ, व्हर्डुन वगैरे होत. यांत मुख्य किल्ल्याभोंवतीं अनेक लहान लहान किल्ल्यांची एक रांग (माळ) असते. अँटवर्पच्या मुख्य किल्ल्याभोंवतीं असे सतरा किल्ले आहेत. मुख्य किल्ल्यापासून किती अंतरावर (त्रिज्या) हे छोटे किल्ले असावेत तें त्या त्या ठिकाणच्या जमीनीच्या स्वरूपावर अवलंबून असतें. पारीसच्या मुख्य किल्ल्यापासून हे छोटे किल्ले १८ हजार यार्डांवर आहेत. व्हर्डून येथील हें अंतर १२ पासून २।।  हजार यार्ड, मेट्झ येथें २।। ते ४।। हजार यार्ड व स्टास्सबर्गं येथें ५ ते १० हजार यार्ड अंतर आहे. या किल्ल्याच्या संरक्षणार्थ अर्थातच सैन्य जास्त लागतें. मात्र त्याबरोबरच शत्रूला पुष्कळ दिवस थोपवूनहि धरतां येतें. पण गेल्या महायुद्धांत विमानांनीं व मोठ्या हॉविट्झर तोफांनीं व ६० शेरी गोळ्यांनीं या किल्ल्यांचा भ्रम फेडला. असे किल्ले हिंदुस्थानांत कांहीं आहेत. पुरंधर, जिंजी, राजमाची, पन्हाळा, ग्वाल्हेर, पेशावर, चितोड, वगैरे किल्ले साधारणतं: वरील जातीचेच (थोड्या प्रमाणांत) होत. असल्या किल्ल्यांमध्यें आंत लहान तोफा ठेवण्याची व मैदानी व महांकाळी (हॉविट्झर) तोफांच्या बातेर्‍या किल्ल्यांच्या बाहेर (छपवून) ठेवण्याची चाल सांप्रत प्रचारांत आहे. मुख्य किल्ल्याचा संबंध या लहान लहान किल्ल्यांशीं आगगाडी अगर पायरस्त्यांनीं (झाडांनीं आच्छादित अशा) जोडलेला असतो. बाँबपासून नुकसान होऊं नये म्हणून बातेर्‍याजवळ अगर किल्ल्यांत वाळूच्या पोत्यांचे धमधमे तयार करतात. शत्रू रात्रीं सुरुंग वगैरे खोदीत असल्यास शोधकदीप (सर्च लाइट) उपयोगांत आणतात. या शोधकदीपांपासून नफ्याबरोबर तोटेहि होतात; शत्रूला आपलीहि जागा दाखविली जाते. तसेंच धुक्यांत यांचा कांहीं उपयोग होत नाहीं. इ. स. १८५०च्या पुढें क्रिमियन लढाई व यांत्रिक तोफा यांच्यामुळे किल्ल्यांच्या बांधणींत पुन्हां सुधारणा झाली. किल्ल्यांचें संरक्षण जसें इतर साधनसामुग्रीवर अवलंबून असतें तसें किल्लेदारावरहि असतें. तो विश्वासू व शूर असला तर आणि अन्नपाण्याचा मुबलक पुरवठा असला तर, शत्रूस किल्ला घेण्यास फार प्रयास पडतात. मुरारबाजी (पुरंदर), विसाजीराम (धारवाड), परशुराम त्रिंबक (सातारा), राजाराममहाराज (जिंजी), चांदबिबी (नगर), मादण्णापंत (गोंवळकोंडा), लक्ष्मीबाईसाहेब (झांशी), मुरारराव घोरपडे (गुत्ती), संगराणा (चितोड), टॉडलेबेन (सेवास्तोपोल), फेनविक (कार्स), उस्मानपाशा (प्लेव्हना) हीं असल्या शूर किल्लेदारांचीं नांवें होत. यांनीं कंसांत दिलेले किल्ले अनेक दिवस लढविले होते. आपल्या महाराष्ट्रांतील असल्या किल्ल्यांचीं व किल्लेदारांचीं (मराठी साम्राज्यांत) उदाहरणें अनेक आढळतील. किल्लेदाराच्या फितुरीनें अजिंक्य किल्ले शत्रूंच्या हस्तगत झाल्याचींहि उदाहरणें आढळतात. सूर्याजी पिसाळ (रायगड), सुभानजी लांवघरे (सातारा), कामवेलनें वेढां दिलेल्या ब्लेचिंगडचा किल्लेदार (१६४५) हीं असलीं उदाहरणें होत. किल्ल्यांतील सर्व शिपाई मरेपर्यंत शत्रूच्या हातीं किल्ला पडूं द्यावयाचा नाहीं अशा गोष्टी रजपुतांच्या व मराठ्यांच्या इतिहासांत अनेक घडलेल्या आहेत. यूरोपमध्यें असलें उदाहरण क्वचितच आढळतें. खडें सैन्य पुष्कळ व युद्धोपयोगी सामुग्रीनें जय्यत तयार असलें तर हल्लींच्या काळीं या किल्ल्यांचा फारसा उपयोग होण्यासारखा नाहीं म्हणून काहीं तज्ज्ञांच्या मतें किल्ल्यांच्या फायद्याप्रमाणें थोडे तोटेहि (हल्लीच्या काळीं) पदरांत पडतात. किल्ले बांधण्यांत जो असंख्य पैका घातला जातो तितक्याचा उपयोग, सैन्य व साधनसामुग्री सर्व जय्यत ठेवण्यांत केल्यास भागण्यासारखें आहे, असें याचें म्हणणें आहे.

[संदर्भग्रंथ- शामशास्त्री- कौटिल्य अर्थशास्त्र; डूरर, स्पेकल, फ्रिट्च, पेगन कार्नाट, झस्ट्रौ, ब्रिलमॉन्ट, ब्रूनर, क्लार्क वगैरे ग्रंथकाराचे ग्रंथ; एन्सायक्लो ब्रिटा. व्हॉ. १०; वाल्मिकिरायायण; महाभारत; भागवत; मराठी रिसायत].

Monday, 19 July 2021

किल्ल्यांच्या कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती

 *मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा




किल्ल्यांच्या कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती*

*अंधारकोठड्या*
अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन अंधारकोठड्या आहेत.
*अंबरखाने*
अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.
*उष्ट्रखाना*
उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा
पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.
*औषधिखाना*
आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधिखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.
*कडा*
कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणार्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.
कडेलोटाची जागा
रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.
*कलारगा*
कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्नपूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.
*कुरणे*
ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.
*कुसू*
किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
*कोठी आणि जिन्नसखाना*
गडावरील वस्तीस लागणार्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणार्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.
*खंदक*
किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.
*खासगी वस्तुसंग्रह*
पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.
*गुहा*
अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.
*झरोके किंवा छिद्रे*
किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.
*जंग्या*
या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.
*जामदारखाना*
सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात तत्ने, हिरे, पाच, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.
*टांके, तलाव, विहीर*
पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणार्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत.
सिंहगडावरचे देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा गडावर कोटितीर्थ(रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत. रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
रायगडावर गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी वापरला जात असे.
*टोक*
गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणार्या जोरदार वार्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोर्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोर्यात उडणार्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
*ढालकाठी*
ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्मावती माचीवर आहे.
*तट*
तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.
*तवा*
देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागर्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
*थट्टी (पागा)*
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
*दगडी जिने*
किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायर्यांचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.
*दरवाजे*
मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.
*उपदरवाजे*
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणार्या जंग्यांच्या मार्यातून सुटणे कठीणच.
सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या मार्यात दुसरा आणि त्याच्या मार्यात तिसरा.
*दिंडी दरवाजा*
मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.
*चोर दरवाजा*
रायगडाला असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला अशा चोरवाटा आहेत.
चाकणच्या किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक जंग्यांच्या मार्यायात सापडतात.
*दारूची कोठारे*
दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंथी नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.
*देवड्या*
देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकर्यांची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.
देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी
प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर शिवाजीची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत.
रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.
*धान्यकोठ्या*
या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठी ठेवला जाई.
*नगारखाना*
नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात.
राजगडावरील अंबरखाना पद्मावती माचीवर आहे.
*पागा (थट्टी)*
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
*पीलखाना*
पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड ,
पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.
*पुस्तकशाळा*
क्वचित एखाद्या किल्ल्यावर पुस्तकशाळा होती. ग्रंथ बहुधा हस्तलिखित असत.
*पेठा (पेठ-कारखाना)*
किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे.
अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि मु्रूड जंजिर्यावर होते.
*प्रवेशद्वार*
हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि *चोरदिंड्या* असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.
*प्रवेशमार्ग*
किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बर्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसर्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.
*फरासखाना*
हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.
*बागकारखाना*
बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.
*बालेकिल्ला*
बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.
*बुरूज (Bastion)*
बुरूज ही पहार्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकर्यांची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
*माची*
माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.
*राजमंदिर*
हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी मामलेदार ते सारवून धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकर्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.
*शिलेखाना*
शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.
*सदर*
सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय. रायगडावर अंधारकोठड्यांच्या पुढे उजव्या हाताच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर फडाच्या कचेरीचा ओटा आहे. इथेच सदर असे. राजगडावरची सदर पद्मावती माचीवर आहे.
*सरपणखाना*
गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.
*स्तंभ आणि दीपमाळा*
रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.
*रथखाना*
रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.
Post By...Ganesh Narayanrao Phalke
टिप .कृपया नम्र विनती हे आहे की पोस्ट काॅपी करते वेळी कोणत्याही ग्रुपवर किव्हा स्वाताच्या वाॅल वर
कापी करूण टाकतानी मेन लेखचे किव्हा ज्याची पोस्ट असेल त्याचे नांव टाकावे ही विनंती

Wednesday, 14 July 2021

येल्लुरगड(राजहंसगड)

 

बेळगाव जिल्ह्यातील येल्लुर गावी असलेल्या या किल्ल्याला ‘येल्लुरगड’ असेही म्हणतात आणि ‘

राजहंसगड’...🚩
हा किल्ला अनेक शतकांपूर्वी इतिहासात परत आला होता त्यात यादव, होयसलास, बहामनी, आदिलशाही, पेशवा मराठ्यांसह विविध राज्य आणि त्याचे शासक होते....
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिर्याच्या हबशांच्या फौजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणार्या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडा वरून दुसर्या गडावर सांकेतिकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे...
बेळगावीच्या जवळजवळ सर्व भागातून टेकडीच्या वरचा किल्ला दिसतो असेही मानले जाते की प्राचीन काळातील राजगुनगडापर्यंत बेळगावी किल्ल्यापासून एक गुप्त सुरंग अस्तित्वात आहे या किल्ल्यात 'भगवान शिव' एक सुंदर मंदिर आहे...
➖➖➖➖➖➖➖➖

पिंगळसई गावा जवळ “किल्ला अवचितगड”..

 


पिंगळसई गावा जवळ “किल्ला अवचितगड”....🚩
अवचितगड हा मुंबई-गोवा रस्त्यावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो... कोकणातील कुंडलिका नदीच्या तीरावरील या रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये अवचितगड हा गर्द रानाने वेढलेला किल्ला आहे महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते रोह्यापासून ५ किमी वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फूट आहे...
घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता अवचितगडाचे प्रवेशद्वार आणि दक्षिण दरवाजा...
अवचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्या मधोमध असल्यामुळे संदेशवहन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त किल्ला मानला जात.. नागोठणे बंदर, रोहे बंदर, तळा, घोसाळा या परिसरातील धारा-वसुलीचे काम अवचितगडा वरून होत असे.. मौर्य, सातवाहन, शक, क्षत्रप, अभीर, त्रैकुटक, वाकाटक, अश्मक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी कदंब, शिलाहार, यादव, मोगल, मराठे, पेशवे या निरनिराळ्या राजवटींमध्ये किल्ल्यांची वहिवाट होती इसवी सनपूर्व पाचशेेच्या आसपास सुरू झालेली किल्ले संस्कृती पुढे उत्तरोत्तर प्रगत होत गेली ती सतराव्या शतकापर्यंत.. जवळपास दोन अडीच हजार वर्षांचा हा इतिहास आहे...
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : @flying_wanderer27 👌🏼♥️

Sunday, 11 July 2021

देवांगनांनी नटलेले पानगाव येथील अलक्षित विठ्ठल मंदिर

 











देवांगनांनी नटलेले पानगाव येथील अलक्षित विठ्ठल मंदिर

वारकरी संप्रदायाचे मोठ्या संख्येने मराठवाड्यातील खेडोपाडी वास्तव्य आहे व मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित किंवा विध्वंस झालेली मंदिरे लोकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवून पूजेत आणली आहे. जुन्या मंदिरांमधले प्रशस्त सभामंडप हेही वारकऱ्यांच्या हरिनाम पाठाला आणि भजन मंडळाला उपयोगी पडताना दिसतात. असेच एक अप्रतिम मंदिर आपल्याला पानगाव ह्या रेणापूर, लातूर मधील खेड्यात सापडते.
घरांच्या गर्दीत झाकले गेलेल्या मंदिराचा फक्त वाहन मंडप आपणांस बाहेरून दिसतो ज्याला आज लोकांनी पंढरपूरच्या धर्तीवर नामदेव पायरी असे नाव दिले आहे.
आत शिरल्यावर मोकळ्या जागेतून आपल्याला उत्तरेकडील मुखमंडप दिसतो व पूर्व आणि पाश्सिमेचे ही अर्धमंडप दृष्टीस पडतात. तीन मुखमंडप, मधलाचौरसाकृती सभामंडप आणि चौकोनी गाभारा असा केदारेश्वर आणि होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरासारखा ह्या विठ्ठल मंदिराचा सर्वसाधारण तलविन्यास आहे. मूळ शिखर पडलेले आहे.
तिन्ही मुख मंडपांना पायऱ्या चढून जावे लागते. वामनभिंतींवर उतरत्या पाठीचे कक्षासने (बसण्याचे कट्टे) आहेत आणि त्या कट्ट्यांच्या बाहेरील बाजूस विविध थरांमध्ये सुंदर कोरीव काम आहे. कणी, कुंभ थरांबरोबरच गज आणि रत्नथराची पट्टी सर्वत्र कोरलेली आहे. तिन्ही मुख मंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतींवर रत्नांची (शंकरपाळ्यासारखे )आरपार नक्षी केलेली जाल-वातायने (हवेसाठीच्या जाळीदार खिडक्या) कोरल्या आहेत. सभामंडपात समोरील भिंतीवर दोन कोनाडे असून एकात गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या कोनाड्यात एक नवीन देवीची मूर्ती बसवलेली आहे. अंतरालाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूस दोन विष्णूच्या स्थानकमूर्ती दुसरीकडून आणून बसवल्या आहेत.
देवळातील सर्व द्वारशाखा पंचशाखा आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवर ललाटबिंबावर गणपती आणि त्यावरील उत्तरंगावर नृवराह, विष्णू आणि आसनस्थ नारसिंहाच्या छोट्या प्रतिमा आहेत. आतील गर्भगृहाच्या द्वारेशाखेवर मकरतोरणात गजलक्ष्मीची मूर्ती आहे. गर्भगृहात आज उत्तर मध्ययुगात बसवलेली विठ्ठल रुक्मिणीची गोंडस मूर्ती आहे. येणारे वारकरी अगदी पायावर डोके ठेवुन विठ्ठलाचे दर्शन घेताना बघितल्यावर थेट पंढरपूरची आठवण येते.
गर्भगृह सप्तरथ असून तिन्ही दिशांना 3 देवकोष्ठे आहेत. दक्षिणेचे देवकोष्ठ रिकामे असून इतर देवकोष्ठात योग-नारायण आणि बसलेल्या भुवराहाची मूर्ती आहे. बसलेल्या वराहाने हातावर भुदेवी म्हणजे पृथ्वीला तोललेले दाखवले आहे. हया दोन मूर्तीखेरीज संपूर्ण गर्भगृहावर अर्धस्तंभांच्या रांगांमध्ये विविध मुद्रेतील सुस्वरूप सुरसुंदरी कोरल्या आहेत. ह्याखेरीज ऊस घेतलेल्या कामदेवाची आणि रतीची मूर्ती पाहायला मिळते.
ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे ते महाराष्ट्रात एकमेव असलेल्या मुखमंडपातील खांबांच्या तिरप्या हस्तांवर असलेल्या मोहक सुरसुंदरी! अश्या सुरसुंदरी आपल्याला होयसाळांच्या व काकतीयांच्या मंदिरावर दिसतात, पण होयसाळांच्या मूर्ती जास्त सौष्ठवपूर्ण आणि दागिन्यांनी नटलेल्या असतात तर काकतीयांच्या उंच आणि कमनीय असतात. इथल्या सुरसुंदरी ह्या कल्याणी चालुक्यांच्या मूर्तीच्या घाटाच्या आहेत.त्यातल्या काहीचे हात पाय भग्न झाले असले तरीही सौंदर्य अजूनही टिकून आहे. शिकार करणारी मारिचिका, भिक्षाटन शिवासारखी, डालमालिनी, आलस्यकन्या, दर्पणा, कापाल आणि नर मुंडमालेसहित नृत्य करणारी अशी अनेक रूपे दिसतात. ह्या खेरीज, पुत्रवल्लभा, आळता काढणारी, केस वाळवणारी कर्पूरमंजिरी, वस्त्रे सावरणारी स्खलित-वसना, साप-मुंगुस खेळावणारी अशी शिल्पांकने गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर आहेत.
कुठल्याही शिलालेख अभावी आपल्याला मंदिराचे नाव निश्चित करता येत नाही, ना ही कर्ता! वैष्णव मूर्तीच्या स्थानांवरून आणि संख्येवरून मूळ मंदिर वैष्णव असावे अशी खात्री पटते व बाहेरचा मंडप गरुडमंडप असू शकतो. शैली व बांधणी निश्चित कल्याणी चालुक्य काळातील दिसते. आज बांधलेले शिखर मात्र विजोड आहे व सभामंडपातील फरश्यांनी मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा पोहोचलेली आहे. मूळ मंदिरात कुठलेही बदल अभावानेच करावे व ते करताना तज्ज्ञांची मदत घेऊन अनुरुप डागडुजी केली तरच मराठवाड्याचा हा दुर्मिळ ठेवा चिरकाल टिकेल!