Followers

Sunday, 19 September 2021

पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी.

 


पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी.
डोंगररांगेत दडलेली निसर्गसंपन्न आणि तीन हजार वर्षांची पुरातन प्राचीन रूद्रेश्वर लेणी.
Rudreshwar caves (temple), Dakala, Maharashtra.
अवघ्या विश्वाला अजिंठ्याच्या चित्र शिल्पांनी मोहिनी घातलेल्या या लेणीच्या मागील बाजूस तीन हजार वर्षांचे पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी आहे. सोयगावच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत हे महादेव मंदिर व गणेश लेणी आहे. शहरापासून गलवाडा, वेताळवाडी मार्गाने गणेश लेणीच्या पायथ्यापर्यंत जाता येते. गणेश लेणीत प्रवेश करताच मोठा ४० ते ५० फूट लांब व १२ फूट उंचीचा सभामंडप आहे. भिंतीत ४ फूट उंचीवर भव्य व प्रसन्न मुद्रेतील मंगलमूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची व पाच बाय पाच फुटांची आहे. या मूर्तीच्या मागील भुयार अजिंठा लेणीपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प तीन फूट उंचीच्या आकारात कोरलेले आहे. अंगारकी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. पर्वताच्या मधोमध कोरलेल्या या गणेश लेणीत एका प्रशस्त दगडी बैठकीवर महादेवाची पिंड आहे. तसेच पिंडीसमोर भव्य आकाराचा नंदी आहे.
 

अजिंठा डोंगररांगेच्या कुशीत वसलेली रुद्रेश्वर लेणी पर्यटक-भाविकांसाठी भ्रमंतीची अद्भूत पर्वणी ठरली आहे. श्रावण महिन्यात लेणीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. उपद्रवी पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे लेणी परिसराचे अजिंठा डोंगररांगेच्या कुशीत वसलेली रुद्रेश्वर लेणी पर्यटक-भाविकांसाठी भ्रमंतीची अद्भूत पर्वणी ठरली आहे. श्रावण महिन्यात लेणीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते. उपद्रवी पर्यटकांची झुंबड नसल्यामुळे लेणी परिसराचे निसर्गसौंदर्य अबाधित आहे, पण धबधबा, हिरवेगार डोंगर आणि लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सुविधा देण्याची गरज आहे.

 जगप्रसिद्ध अजिंठा डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी आहे. स्थापत्य आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पर्यटक-भाविकांची गर्दी झाली आहे. लेणीत ६० फूट लांब आणि १२ फूट उंच सभामंडप आहे. लेणीच्या मध्यभागी आकर्षक गणेशमूर्ती आहे. डाव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येतात. मूर्तीशेजारी उजव्या बाजूस नरसिंह व डाव्या बाजूस नटराजाचे शिल्प आहे. लेणीत चौथऱ्यावर महादेवाची पिंड असून, समोर नंदीची देखणी मूर्ती आहे. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. यानिमित्त लेणीजवळ बेल-फूल व प्रसादाची दुकाने आहेत. लेणीत पुरेसा प्रकाश नसल्यामुळे कोरीव काम पाहता येत नाही. पूर्वीच्या कोरीव कामाचे अवशेष भिंतीलगत दिसतात, मात्र नक्षीची बरीच झीज झाली आहे. लेणीवरून तीर्थकुंडात पडणारा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात दुर्घटना घडत असल्यामुळे गर्दीच्या वेळी पोलिस बंदोबस्त आहे. उपद्रवी पर्यटकांना रोखल्यामुळे धबधब्याच्या वरील बाजूस अनुचित प्रकार थांबले आहेत. धबधब्याचे पाणी भाविक-पर्यटक पिण्यासाठी वापरतात. लेणीजवळून सोयगावचे धरण आणि वेताळवाडी किल्ला दिसतो. हा निसर्गरम्य परिसर ‘टिपण्यासाठी’ हौशी छायाचित्रकारांची गर्दी असते. लेणीला २००६-०७मध्ये तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे, मात्र याअंतर्गत कोणतेही काम झाले नाही, असे स्थानिकांनी सांगितले

 लेणी पाहताना काळजी घ्या
अजिंठा लेणीपूर्वी रुद्रेश्वर लेणी कोरली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. मोठ्या डोंगरात लेणी कोरल्यामुळे तिची भव्यता अधिक अधोरेखित होते. उंडणगाव, हळदा रस्त्याने गेल्यास हळद्यापासून रुद्रेश्वर लेणीकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्यालगत वाहने उभी करून दोन-तीन किलोमीटर पायी अंतर आहे. डोंगर उतरून लेणीपर्यंत जाण्याचा रस्ता बिकट आहे. त्यामुळे पर्यटक-भाविकांनी लेणीपर्यंत जपून जाणे आवश्यक आहे.


Friday, 17 September 2021

#कुलाबा_किल्ला

 








#कुलाबा_किल्ला
हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे दोन दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वेशिष्टय आहे. इसवी सन १७१३ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासाहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले.
शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३०० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे.
समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशव्दारा पासून सुमारे १५ फूटा पर्यंत भरातीचे पाणी येत नाही. मुख्य भागात पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. मुख्य व्दारातुन आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो, तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते. तसेच तेथे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे. गणपती मंदिरा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी आहे.
किल्ल्यावरील पुष्करणी समोर १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी सुरेख गणपती मंदिर उभारले. मंदिरातील सिध्दीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ती असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान ठरली आहे. गाभार्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सुर्य, विष्णु यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे 'श्री गणेश पंचयतन' म्हणून ओळखले जाते. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोडया पाण्याचा एक तलाव आहे, तसेच गोडया पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत.

Thursday, 16 September 2021

गोंदेश्वर मंदिर

 

गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.
हे मंदिर पुरातन [[भूमिज स्थापत्यशैली|बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बाधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराच एक आचार्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.
या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.

Saturday, 11 September 2021

किल्ले आड - आडवाडी

 












किल्ले आड - आडवाडी
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील आडवाडी या गावात आड वाटेवरचा किल्ले आड आहे. आडवाडी हे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील सिन्नर या गावापासून ठाणगाव मार्गे २६ कि.मी अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी तीन आडवाडी आहेत पण किल्ल्याकडे जाण्यासाठी वरची आडवाडी विचारायचे तिथूनच गडाकडे जाणारी वाट आहे. गडाच्या पायथ्याशी गोसावी गुरूंचा आश्रम आहे. आड किल्ला समुद्रसपाटीपासून १२३४ मी उंचीवर आहे. पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर पोचण्यासाठी पाऊण ते एक तासाचा वेळ लागतो. गडाकडे जाताना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.
आड म्हणजे विहीर किंवा पाण्याची जागा असा अर्थ होतो. गडावर भरपूर पाण्याच्या टाक्यांचा समूह असल्याने गडाला आड असे नाव पडले हे स्थानिकांकडून समजले. गडावर अनेक टाक्यांचा समूह आहे. एक शिवलिंग पहायला मिळते. गडाचा माथा सपाट आणि विस्तीर्ण आहे. चौकी पहार्यासाठी या गडाचा वापर होत असावा. गडावरून औंढा, पट्टा, बितनगड, कळसूबाई, डुबेरा, पर्वतगड-सोनगड असा सह्याद्रीतील परिसर दिसतो.
टीम - पुढची मोहीम

गणपतीपुळेचा इतिहास

 


गणपतीपुळेचा इतिहास
मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.
कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.
अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, "मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल." असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली.
गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.

Thursday, 2 September 2021

शारदापीठ जम्मू आणि काश्मीर (POK).

 









शारदापीठ जम्मू आणि काश्मीर (POK).
Shardapeeth Jammu and Kashmir (POK)
शारदा मंदिर हे भारतातील सगळ्यात प्राचीन मंदिरा पैकी एक आहे. हे मंदिर सुमारे 5 हजार वर्ष जुने मंदिर आहे आणि त्याबद्दल अनेक मान्यता आहेत. असे म्हटले जाते की सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत शारदा पीठाची स्थापना 237 ईसा पूर्व मध्ये झाली. हिंदू शिक्षण देवीला समर्पित हे मंदिर अभ्यासाचे प्राचीन केंद्र होते. काही समजुतींनुसार, हे मंदिर पहिल्या शतकाच्या सुरुवातीला कुशाणांच्या राजवटीत बांधण्यात आले होते.
शारदा पीठ मंदिर हे एक प्राचीन मंदिर आणि पीओके मध्ये स्थित एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे. हे 18 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. याला बरीच ओळख आहे. शारदा पीठ मुजफ्फराबादपासून सुमारे 140 किमी आणि कुपवाडापासून सुमारे 30 किमी अंतरावर पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) नीलम नदीच्या काठावर आहे. काही प्राचीन वृत्तांनुसार, मंदिराची उंची 142 फूट आणि रुंदी 94.6 फूट आहे. मंदिराच्या बाह्य भिंती 6 फूट रुंद आणि 11 फूट लांब आहेत. तटबंदी उंची 8 फूट आहेत. पण आता बहुतांश रचना खराब झाली आहे. हे मंदिर शक्तीपीठ म्हणूनही मानले जाते, जेथे देवी सतीचे शरीराचे अवयव भगवान शिव आणत असताना पडले होते. म्हणूनच, हे 18 महाशक्तीपीठांपैकी एक आहे. संपूर्ण दक्षिण आशियातील शक्तीपीठ. शारदा पीठ म्हणजे "शारदाची जमीन किंवा आसन किंवा आसन" जे हिंदू देवी सरस्वतीचे काश्मिरी नाव आहे. शारदा पीठ हे शिक्षणाचे प्राचीन केंद्र असल्याचेही म्हटले जाते जेथे पाणिनी आणि इतर व्याकरणकारांनी लिहिलेले ग्रंथ साठवले होते. म्हणून, हे ठिकाण वैदिक कामे, शास्त्रे आणि भाष्ये यांच्या उच्च अभ्यासाचे प्रमुख केंद्र मानले जाते. शारदा पीठ, देशातील सर्वात जुनी विद्यापीठांपैकी एक, जी शारदा विद्यापीठ म्हणून ओळखली जाते, त्याच्या लिपीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि असे म्हटले जाते की पूर्वी या विद्यापीठात सुमारे 5,000 विद्वान होते आणि त्या काळातील सर्वात मोठे ग्रंथालय होते इथे होते . शारदा पीठाचा पाया हा तोच काळ मनाला जातो जेव्हा काश्मिरी पंडितांनी त्यांच्या नैसर्गिक सौंदर्याची भूमी शारदा पीठ किंवा सर्वज्ञानपीठ मध्ये बदलली. देवी शारदाला काश्मिरा-पूर्वसानी असेही म्हणतात. 1947 च्या फाळणीनंतर मंदिर पूर्णपणे ओसाड झाले आहे. मंदिराला भेट देण्यास बंदी घटली गेली, त्या नंतर कट्टर मुस्लिम आतंकवादी संघटनांनी मंदिर आणि परिसर उद्ध्वस्त करून प्राचीन दरोहर जमीनदोस्त केली. म्हणजेच 1947 पर्यंत लोक येथे दर्शनासाठी जात असत, पण त्यानंतर काय झाले, याचा तुम्हीच अंदाज घ्या.
मागच्या आठवड्यात प्राचीन वास्तुकला समूहाच्या वतीने नारनाग मंदिर, काश्मीर या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. या लेखातहि काश्मीर राज्यातील प्राचीन हिंदू मंदिराची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तसेच येणार्या काळात आपण संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्यातील सर्व प्राचीन मंदिरांचि माहिती ग्रुप मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. वरील सर्व माहिती वेग वेगळ्या ठिकाणावरून संग्रहित करण्यात आली आहे.
गोरक्ष घावटे...