Followers

Friday, 10 April 2020

#एकमराठाराजा #जोहवालदिलरूग्णांसाठीस्वतःचबनला_डॉक्टर

#एकमराठाराजा
#जोहवालदिलरूग्णांसाठीस्वतःचबनला_डॉक्टर
तंजावरच्या भोसले मराठा राजघराण्यात जन्मलेले राजा सरफोजी द्वितीय हे विलक्षण बुध्दीमान आणि ज्ञानी राजा होते जनतेच्या भल्यासाठी आणि तंजावर राज्याच्या विकासासाठी त्यांनी भरघोस योगदान दिल आहे
जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सरफोजींना आपल्या जनतेला रोगराईमुळे मरताना पाहून खूपच दुखः होत असे यासाठी त्यांनी स्वतःच वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि स्वतःच डॉक्टर बनले
त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये चांगलेच नाव कमावले ते सर्व मोतीबिंदू पिडीत रूग्णांची अॉपरेशन स्वतः करत असत अशाप्रकारे कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर न करता फक्त जनतेच्या भल्यासाठी जिद्दीने डॉक्टर होणारा "राजा" ही फक्त भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे
तंजावर राज्यामधील हजारो मोतीबिंदू रूग्णांची अॉपरेशन्स राजा सरफोजींनी केली होती या शिवाय हाड जोडणे, घातक जखमेवर उपचार करणे, जखमेला टाके घालणे सारखी डॉक्टरी पेशातील कामे राजा सरफोजी भोसलेंनी केली यासाठी दररोज भारतातील खेडय़ापाडय़ातून हजारो लोक तंजावरच्या राजवाड्यात दाखल होत असत
राजा सरफोजींना निरनिराळ्या विषयावर अभ्यास करण्याची प्रचंड आवड होती यातून त्यांच्याकडे मराठी, तमिळ, तुळुव, कन्नड अशा भाषेतील जवळपास ६५००० हजार पुस्तकांचा संग्रह झाला होता हा संग्रह जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाहीला तेव्हा त्या ही थक्क झाल्या होत्या
या शिवाय छापखाना, बंदुकीचा कारखाना, जहाज बांधणीचा कारखाना, शाळा, महाविद्यालये अशी अनेक सामाजिक सुधारणा राजा सरफोजी भोसलेंनी केली होती छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहूं, यांच्या तोलामोलाचे असे राजा सरफोजी भोसले होते

साभार
Zunjarji Babar

नाईक यांनी बांधकाम केलेले पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर







नाईक यांनी बांधकाम केलेले पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर
पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळ पाडळी नावाचे एक गाव आहे. या गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे या गावचं कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! नारायण हा खुप हट्टी होता. यामुळे त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा ‘आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन’ या इर्षेने घरातुन एकटाच चालत चालत निघाला आणि पुण्यात आला. पुण्यात शहरभर हा फिरला आणि दिवस मावळेपर्यंत हा एकदम थकुन गेला होता. मग पुण्यातील आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात तो आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच एका कोपऱ्यात तो निजुन गेला. त्या मंदिरात दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्या दिवशी आल्यावर त्यांनी नारायणाला कोपऱ्यात गाढ झोपलेलं पाहीलं. त्याला त्यांनी उठवलं आणि त्याची आस्थेने चौकशी केली. सगळं प्रकरण कळल्यावर त्यांनी त्याला आश्रय दिला. स्वतःकडे आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. त्याला ते लाडाने ‘नारो’ म्हणत आणि पुढं त्यांचं तेच नाव रूढ झालं. ब्राह्मण असल्यामुळे त्याचाकडे खासगीवाल्यांनी आपल्या रोजच्या पुजा अर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले वगैरे आणण्याचं काम दिलं. आजची जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. एक एकर भर पसरलेल्या या जागेत त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुले वगैरे इथे त्यांनी वाढवली होती आणि तुळस ही तिथे जास्त प्रमाणात होती. म्हणुन त्याच नाव ‘तुळशीबाग’ असे पडले. या बागेतुन तेव्हा नारो तुळस फुले आणायचा. आपल्या कामातील मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. एकदम एवढी मोठी जवाबदारी अंगावर आल्याने त्याला गर्व झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी खासगीवाल्यांनी नारोला आपल्या घरी जेवायला बोलावले. पण इतरांसारखे आपल्याला चांदीची ताटे वगैरे न देता साध्या पंगतीत बसवले, यामुळे तो चिडुन उपाशी पोटीच तिथून उठुन निघुन आला. खासगीवाल्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच दोन माणसे नारोच्या मागावर पाठवुन त्याला धरुन आणण्यास सांगितलं. त्याला आणल्यावर संतापलेल्या खासगीवाल्यांनी नारोला कडक शब्द सुनावले. त्यामुळे नारोला आपली चुक समजली आणि तो वठणीवर आला. त्याचा गर्व गळुन गेला. नारोने मग खासगीवाल्यांची क्षमा मागितली. खासगीवाल्यांनीही त्याला माफ करुन छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवुन दिले. तिथेही त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. ‘कामाचे मर्दाने लिहिणारा’ असा नारो आप्पाजींचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी पुन्हा या हुशार माणसाची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्याला पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य केली आणि नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेची व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली. १७५० साली त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नारो आप्पाजींनी नानासाहेबांचा अजुनच विश्वास संपादन केला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली.
१७५८ साली पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. सर्व जागा तुळशी वगैरे काढुन मोकळी केली गेली. त्याला तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणुन लोक संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.
पानिपताच्या पराजयाने खचुन नानासाहेबांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने हे बांधकाम थांबले. पुर्ण पुणे या दुहेरी दुःखात बुडाले होते. थोरले माधवराव पेशवे झाले आणि काही दिवसांनी स्वतः त्यांनी तुळशीबागवाल्यांना बोलावून राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याची आज्ञा दिली. १७६३ सालच्या अखेरीस मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसविण्यात आला. मंदिराला १४० फुट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसविला. हे काम पुर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. १७६५ साली उमाजीबुवा पंढरपुरकर यांच्याकडुन रामरायाची सुंदर मुर्ती घडविण्यात आली आणि तिची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. यानंतर राम मंदिराच्या आजुबाजुला अनेक छोटी मंदिरे बांधुन त्यात गणपती, विष्णु, त्र्यंबकेश्वर महादेव, विठ्ठल रखुमाई इत्यादी देवतांची स्थापना केली. रामापुढे दासमारूतीची स्थापना केली. या सर्व मुर्ती घडविण्यास ३५० – ४०० रुपये खर्च आला. मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला. याचे संगीत दरवाजा असे नामकरण करण्यात आले. पहिल्या रामनवमी उत्सवास २००० रुपये खर्च आला.
१७६३ साली निजामाने पुणे उध्वस्त करु नये म्हणुन तुळशीबागवाल्यांनी निजामाला दीड लाख रुपये खंडणी देऊ केली. पण तरीही सूडाची भावना मनी घेऊन निजामाने पुणे पुर्ण जाळले. हि घटना स्वारीवर असलेल्या थो. माधवराव पेशव्यांना समजताच त्यांनी निजामाच्या राजधानीत घुसुन निजामाची पळता भुई थोडी केली. पुण्यात परतल्यावर पेशव्यांना पुण्याची अवस्था पहावली नाही. त्यांनी लगेच तुळशीबागवाले यांना ‘मुख्य नगर रचनाकार’ हे पद देऊन शहराच्या अवस्थेस सुधरवण्याची आज्ञा दिली. तुळशीबागवाल्यांनी काही वर्षातच अत्यंत खुबीने होते त्याही पेक्षा सुंदर रितीने पुणे शहर वसविले. थोरल्या माधवराव पेशव्यांवर त्यांचा विशेष जीव होता. त्यांचे थेऊर मुक्कामी निधन झाल्याने तुळशीबागवाले खुप खचून गेले होते. तशाच अवस्थेत ते खंबीर राहुन आपली सुभेदारी सांभाळीत. नारायणरावांच्या वधानंतरही पुण्याची तात्काळ नाकाबंदी करून गारद्यांपासून पुणे वाचविले. शनिवारवाड्यावर खडे पहारे ठेवले. श्रीमंत नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईसाहेब यांना पुरंदर किल्ल्यावर सुखरूप हलवले. गंगाबाईंच्या नावे पेशवाईचा कारभार सुरु झाल्यावर त्यांच्या नावाची द्वाही पुर्ण पुण्यात तुळशीबागवाल्यांनी फिरवली. मार्च १७७५ साली वयाच्या ७५व्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ़ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले.
तुळशीबागवाल्यांच्या मृत्युनंतरही तब्बल २० वर्षे राम मंदिराचे बांधकाम चालले. खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाज्यावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लाऊन नित्य सनई चौघडा झडू लागला. शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले. याची आठवण म्हणुन दर शनिवारी दुपारी ३ वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरु केली जी आजतागायत सुरु आहे. मंदिराच्या दक्षिणेला आणि पश्चिमेलाही प्रवेशद्वार पेशव्यांनी बांधुन घेतले. १७८९ मध्ये मंदिरातील देवांच्या दागदागिन्यांची चोरी झाली. तेव्हा सवाई माधवरावांनी दोन हजार चौदा रुपये बारा अणे इतक्या किमतीचे दागिने रामरायास अर्पण केले. मंदिराचा नित्य चौघडा १८९५ मध्ये सुरु झाला. एकुण ३५ वर्ष राम मंदिराचे बांधकाम चालु राहिले, ज्याला त्याकाळी १ लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्च आला.
तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरू झाले, परंतु ते सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या (२०१७ साली) असलेला सभामंडप हा सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावरच वरच्या बाजूस नवीन उत्तुंग शिखर बांधले. हे शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झालेले आहे. शिखरावर अनेक साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसविल्या आहेत. मूर्ती बसविलेले सुमारे ७० कोनाडे आहेत व त्यांवर १०० कळसही आहेत. शिखर सुमारे १४० फूट उंच असून वरचा कळस सुमारे ४ फूट उंचीचा आहे. त्यास सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. हा कळस बसविण्याच्याआधी तो गावातून वाजत गाजत मिरवणुकीने येथे आणला असे सांगतात. सन १८५५ मध्ये देवाच्या गाभार्‍याच्या मुख्य चौकटीस पितळी पत्रे बसविले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव भोर यांनी त्या दरवाज्याला चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आंतल्या व बाहेरच्या गाभार्‍यात संगमरवरी फरशी आहे. श्रीराम, लक्षमण व सीता या तिन्ही मूर्ती पांढर्‍या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतेच्या एका हातात कमळ असून दुसर्‍या हातांत कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते.
श्रीमंत सवाई माधवराव इथे नेहमी दर्शनास येत. त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर फार प्रसिद्ध झाले. एका पोवाड्यात वर्णन आहे,
श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या।
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।
अशी मंदिराची ख्याती होती. ह्या मंदिरात कीर्तन, प्रवचनकारांचा, पुराणिक, कथाकारांचा राबता असे. असे सांगितले जाते की, या मंदिरात जो कीर्तनकार, प्रवचनकार श्रोत्यांची वाहवा मिळावी तो सगळीकडेच श्रेष्ठ समजला जाई.
तुळशीबाग राममंदिराच्या रामनवमीचे वैशिष्टय आहे.चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. त्यावेळी पाळणे गात आणि प्रसाद वाटत रामजन्माचे स्वागत केले जाते. पण पुण्यातल्या तुळशीबाग राम मंदिरात मात्र रामाच्या पोशाखाच्या तुकडारुपी आशीर्वाद मिळवण्याची प्रथा आहे.
या मंदिरात राम जन्माआधी जवळच असलेल्या शंकर मंदिरापर्यंत छबिन्याची मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी रामाचा पोशाखही मिरवून आणण्यात येतो. रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडल्यानंतर रामाच्या वस्त्राचा भाग असलेला लाल रंगाचा तागा भक्तांमध्ये वाटला जातो. पण ही वाटण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. शहरातील जुन्या तालमीचे पहिलवान ते वस्त्र अक्षरशः खेचून त्याचे तुकडे करतात आणि उंचीवरून खाली टाकले जातात. हे तुकडे झेलण्यासाठी खाली अगदी झुंबड उडालेली असते. हे वस्त्र खिशात किंवा देवघरात ठेवल्याने किंवा सोबत बाळगल्याने सर्व संकटे दूर होतात अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे.या मंदिराची व्यवस्था बघणाऱ्या तुळशीबागवाले कुटुंबाची ही ११वी पिढी आहे. राघवेंद्र तुळशीबागवाले यांनी याबाबत माहिती देताना भाविक सकाळपासून वस्त्राचा प्रसाद मिळवण्यासाठी गर्दी करतात. हे वस्त्र वाटण्याचा मान पहिलवानांना आहे, रामाचा भक्त हनुमान हा प्रचंड ताकदवान होता. त्याचे प्रतीक म्हणून हा मान तालमीच्या पहिलवानांना दिला जातो असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुर्वी दर एकादशीला एखाद्या जत्रेसारखी तुळशीबागेबाहेर म्हणजेच या राम मंदिराबाहेर दुकाने बसत. तीच कालांतराने तिथे साठ सत्तर वर्षांपुर्वीपासून नित्य वसु लागली आणि आता या दुकानांनी प्रसिद्ध बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. अगदी कुठल्याही प्रांतातुन पुण्यात कुणी महीला आलं की ती तुळशीबागेत येतेच येते. स्त्रियांचं हे आवडतं ठिकाण. स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तु असोत, सौंदर्य प्रसाधने असोत की दागिने असोत किंवा कपडे असोत. पुजा साहित्याचीही अनेक दुकाने, अगदी देवांच्या सुबक मुर्तींपासून पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत. तुळशीबागेत गर्दीतुन फिरुन भुक लागतेच मग आहेना इथे मस्त श्रीकृष्ण मिसळ आणि मिसळ खाऊन झाल्यावर तोंडाची आग शमवण्यासाठी कावरे कोल्ड्रींग सुद्धा आहे.
पण आठवणीने खरेदी करा पण आधी या रामरायाच्या पुढे नक्की नतमस्तक होत जा.
।।जय श्रीराम । जय हनुमान।।
पुण्याचे आद्य नगररचनाकार नारो आप्पाजी खिरे अर्थात तुळशीबागवाल्यांची ही तुळशीबाग! त्यांच्या कार्याची, प्रसंगी केलेल्या कष्टांची, त्यागाची आणि पेशव्यांप्रती, आपल्या राज्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची जाणीव आपल्याला करुन देते. या थोर मुत्सद्याचे वर्णन एका श्लोकात खुबीने केले आहे….
जयाने स्वशौर्ये पुणें रक्षियेलें।
जयें पुण्यनगरी सह भूषविलें।
तशी मंदिरीं स्थापिलीं राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।
श्री नितीन भैय्यासाहेब नाईक
प्लॉट क्रमांक 57, रुतू बंगला, वैभव सोसायटी, कॅनरा बँकेच्या मागे, बिबवेवाडी, पुणे 411037.

छत्रसाल बुंदेला व छत्रपती शिवाजी महाराज भेट -

छत्रसाल बुंदेला व छत्रपती शिवाजी महाराज भेट -
उत्तर भारतातील बुंदेलखंडचा परिसर म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि माळव्याचा ३००० चौ. मैलचा भाग या साम्राज्यात मोडत होता. चंबळ, यमुना, नर्मदा, टोंस केन, धसाळ, पार्वती, सिंधू, बेतवा, जामनेर या १० नद्यांचा प्रदेश म्हणजे बुंदेलखंड देवीपुढे आपले शिर कलम करून तिच्या आशीर्वादाने जे राज्य निर्माण केले त्याला बुंदेलखंड म्हटले जाते. या वेळी देवीच्या चरणावर जे बूंद म्हणजे थेंब पडले त्याला बुंदेल म्हटले गेले. छत्रसालचा पिता चंपतराय हा स्वाभिमानी असून मोगलांच्या विरोधात त्याने उघड संघर्ष केला. औरंगजेबाने त्याच्या भाऊबंदांना हाताशी धरून त्याचे राज्य घेतल्याने हताश होऊन चंपतरायने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली.
या वेळी छत्रसाल बुंदेला यांचे वय केवळ १२-१४ वर्षांचे होते. तेव्हा मामा साहेबसिंह धंधरे आणि भाऊ अंगदराय यांच्या नेतृत्वाखाली छत्रसाल बुंदेला यांनी सैनिक शिक्षण पूर्ण केले. पुढे देवासच्या पवार घराण्यातील देवकुंवारीशी विवाह होऊन त्यांना जगतराय आणि हरेदशाह ही दोन मुले झाली. मोगलांशी बदला घेण्याची इच्छा असूनही स्वत:ची ताकत कमी असल्याने छत्रसालने मिर्झाराजे जयसिंहाच्या सैन्यात चाकरी धरली. आपल्या पराक्रमाने छत्रसालने औरंगजेबाला अनेक प्रांत मिळवून दिले. मिर्झाराजा हा औरंगजेबाचा मांडलिक असल्याने १६६५ ला बादशहाने त्याला छत्रपती शिवरायांच्या विरोधात पाठविले. त्यात छत्रसालही होता. या वेळी राजांना मोगलांपुढे शरणागती पत्करावी लागली होती. उत्तरेतील अनेक राजांनी मोगलांना स्वत:च्या मुली देऊन त्यांची चाकरी पत्करली होती. तेव्हा शिवाजी महाराज मात्र स्वत:च्या हिमतीवर औरंगजेबाशी दोन हात करत होते.
औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूपुढे उत्तर भारतातील बहुतांश राजांनी लोटांगण घातले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या लढ्यामुळे औरंगजेबाचा सेवक असलेल्या राजा छत्रसालला त्याचे आश्चर्य वाटले. महाराजांचा आदर्श घेऊन राजा छत्रसालने मोगलांविरोधात बंडाचा झेंडा उभा करून बुंदेलखंडात स्वत:चे राज्य निर्माण केले. छत्रसालच्या स्वराज्य उभारणीमागे राजांची प्रेरणा व संघर्ष या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत

सरनौबत हंबीरराव मोहिते

सरनौबत हंबीरराव मोहितेसरनौबतस्तु सेनानी: || | ** शिवसंकल्प ...

हंसाजीरावांचे (हंबीररावांचे) बालपण
१) प्रस्तावना
महाराष्ट्राच्या इतिहासात १७ वे शतक हे राजकीय परिवर्तनाचे शतक होते.छत्रपती शिवाजी महाराज हे या परिवर्तनाचे जनक होते. त्यांच्या राजकीय धोरणाची, दूरदृष्टीची आणि कर्तृत्वाची प्रेरणा घेऊन याच शतकाच्या उत्तरार्धात मराठी समाज नव्या ध्येयाने जागृत झाला. त्यांनी आपल्या अस्मितेचा ठसा त्या काळावर आणि नंतरच्या सुमारे १५० वर्षाच्या इतिहासावर उमटविला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील इतर सत्तांशी संघर्ष करुन महाराष्ट्रामध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ निर्माण केले. त्यामुळे मराठ्यांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्वराज्य, स्वधर्म व संस्कृती यांच्या रक्षणार्थ, प्रसंगी प्राणांचेही मोल देणारे अनेक मराठा घराणी व कर्तबगार पिढी महाराष्ट्रामध्ये उदयास आली.अशा मराठा घरण्यापैकीच मोहिते हे एक घराणे होय. हे घराणे १६व्या शतकापासून अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये लष्करी सेवा चाकरी करीत होते.
१७व्या शतकाच्या पूर्वार्धात विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अनेक युद्ध-मोहिमामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केल्याने ‘तळबीड’ (ता.कराड जि.सातारा) ची देशमुखी मोहिते घराण्याला मिळालेली होती. तेव्हापासून ते तळबीडचे (बाजी मोहिते) देशमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या परिसरात त्यांनी चांगलेच वैभव प्राप्त केले होते.आता आपण त्यांच्या जन्माविषयी जाणून घेऊयात.
२) हंसाजीचा जन्म
मोहिते घराणे हे महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न घराण्यापैकी होते. इतिहासाला ज्ञात असलेल्या मोहिते घराण्यातील रतोजी मोहिते यांना तुकोजी मोहिते नावाचा कर्तुत्ववान मुलगा होता. त्यानेच तळबीडच्या पाटीलकीचा वाद मिटवून तेथील पाटीलकी मोहिते घराण्याकडे घेतली होती. तेंव्हापासून तळबीडचे मोहिते पाटील किंवा देशमुख म्हणून ओळखू लागले.
तुकोजी मोहिते यांना संभाजी व धारोजी नावाची मुले व तुकाबाई नावाची मुलगी होती. यांचे नातेसंबंध तत्कालीन घाटगे, घोरपडे व भोसले घराण्याशी निर्माण झालेले होते. मोहिते घराण्यातील संभाजी मोहिते यांना हरिफराय, हंसाजी, शंकराजी आणि सोयराबाई व अण्णुबाई अशी पाच मुले होती. हंसाजीच्या जन्म व मृत्यु संबंधीचे पुरावे अद्यापही मिळाले नसल्यामुळे त्यांचा कालखंड कोणता होता हे निश्चित सांगता येत नाही. परंतु तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा संदर्भ घेऊन काही अंशी अंदाज बांधता येतो.
प्रसिद्ध इतिहास संशोक डॉ.आप्पासाहेब पवार यांनी ‘ताराबाईकालीन कागदपत्रे, खंड पहिला’ मध्ये संभाजी व धारोजी मोहितेच्या पराक्रमा विषयीचे अनेक कागदपत्रे प्रकाशित केलेली आहेत. संभाजी व धारोजी मोहिते यांनी आदिलशाहीमध्ये चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट होते. तर डॉ.जयसिंगराव पवार यांनी ‘शिव-विजय’ ग्रंथात, पान क्रमांक अठरा वर संभाजी व धारोजी मोहितेंचा विवाह घाटके व घोरपडे घराण्यातील मुलीशी झालेला असून, इ.स.१६२२ मध्ये आदिलशाहीतील सरदार घाटके व घोरपडे यांनी आपल्या सासऱ्यांना आदिलशाहीमध्ये रुजू केले. तेंव्हापासून मोहिते हे आदिलशाहीमध्ये सेवा चाकरी करु लागले.
त्यावेळी शहाजीराजे भोसले जुलै १६२५ मध्ये निजामशाही सोडून आदिलशाहीमध्ये सरलष्कर झाले. तेंव्हा शहाजी राजांना शिक्षा करण्यासाठी मलिक अंबरने साबाजी अनंत नावाच्या सरदाराला सैन्य देऊन पाठविले. शहाजी राजांना निजामशाही सैन्याने सालप्याच्या घाटात इ.स.१६२५ मध्ये अडविले. अशा प्रसंगी संभाजी व धारोजी मोहिते बंधुनी शहाजी राजांना कठीण प्रसंगी मदत केल्यामुळे शहाजी राजांना साबाजी अनंतचा पराभव करता आला व स्वतःला वाचविता आले. या मदतीची परतफेड म्हणून शहाजी राजांनी आदिलशहाकडे विनंती करुन मोहिते बंधुना तळबीडच्या देशमुखीचे अधिकार मिळवून दिले. याची जाण ठेवून मोहिते बंधुनी त्यांच्या बहिणीचा (तुकाबाईचा) विवाह एप्रिल १६२७ मध्ये शहाजी राजांशी करून दिला. यांच्या पोटी व्यंकोजी नावाचा मुलगा ‘इ.स.१६३१’ झाला.
संभाजी मोहिते यांना हरिफराय, हंसाजी व शंकराजी ही मुले होती. पण यांचा जन्म केव्हा व कोठे झाला याबाबत पुरावा नाही. मात्र संभाजी मोहितेची बहीण तुकाबाई हिला शहाजी राजापासून इ.स.१६३१ मध्ये व्यंकोजी नावाचा मुलगा झाला हे सत्य आहे. म्हणजेच व्यंकोजीच्या अगोदर हरिफराय नावाच्या मुलाचा जन्म झाला असावा व नंतर हंसाजी (हंबीरराव) हे व्यंकोजी राजांचे समकालीन असावेत आणि त्यानंतर शंकराजी, सोयराबाई व अण्णुबाई ही मुले जन्मास आली असावीत. संभाजी मोहिते हे तुकाबाईपेक्षा मोठे होते. त्यांचे लग्न तुकाबाईच्या अगोदर झाल्याने काही मुले जन्मास आलेली असावित. यावरुन हंसाजीचा जन्म १६३१ मधील असावा.
हंसाजीचे मूळ नाव बह्माजी असे असून ‘अमीरराव’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे ‘हंबीरराव’ हा शब्द तयार झाला. याचे उपनाव चव्हाण होते. हंसाजीचे बालपण सुप्याच्या गढीत गेले. त्यांचे वडिल पराक्रमी असल्यामुळे तो वारसा त्यांना लाभला. त्या काळामध्ये सरदार घराण्यातील त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून लष्करातील नामांकित सैनिक किंवा पंडित मंडळी ठेवली जात होती. त्यामुळे हंसाजीला अतिशय चांगल्या पद्धतीचे लष्करी शिक्षण मिळाले असले पाहिजे. कारण त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा स्वामीनिष्ठा, सचोटी इत्यादी गुण त्यांच्यात असल्यामुळे पुढील काळात सरसेनापती पदापर्यंत ते जावून पोहचले होते.
हंसाजी मोहिते यांचा विवाह कधी व कोणत्या घराण्यातील मुलीशी झाला या बाबत अजून तरी साधने उपलब्ध झाली नाहीत. पण त्यांचा विवाह तत्कालीन काळातील नामवंत घराण्यातील मुलीशी झालेला असावा. कारण हंसाजीच्या पोटी महाराणी ताराबाईचा जन्म झाला. (राजारामाची पत्नी) हिने जो पराक्रम गाजविला या वरुन हंसाजीची पत्नी ही सुद्धा एका पराक्रमी व्यक्तीची मुलगी असली पाहिजे.
हंसाजीच्या व्यक्तीमत्वावर त्यांच्या वडिलाचा प्रभाव पडलेला होता. वडिल संभाजी मोहितेंनी अनेक युद्ध मोहिमांमध्ये पराक्रम गाजवून आपल्या धन्याला खुष ठेवले होते. ज्यावेळी त्यांचा ‘शहाजी राजांशी संबंध आला. तेंव्हापासून शहाजी राजांबरोबर एकनिष्टेने प्रत्येक प्रसंगात सहकार्य करुन दाखविले आहे. सालप्याच्या लढाईत अनुलनीय पराक्रम करुन शहाजी राजांना साथ दिलेली होती.
त्यामुळेच शहाजी राजे आदिलशाहीत आपले वर्चस्व निर्माण करु शकले. त्यांच्या मुलास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करता आले. जर सालप्याच्या युद्धाप्रसंगी संभाजी मोहिते यांनी सहकार्य केले नसते तर हिंदवी स्वराज्य उदयास आले नसते.
इ.स.१६४६ मध्ये शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील पुणे, चाकण इत्यादी प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली घेतल्यानंतर सुपेच्या प्रदेशाची मागणी संभाजी मोहिते यांच्याकडे केली असता त्यांनी तो देण्यास नकार दिलेला होता. कारण शहाजी राजांवर त्यांची निष्ठा होती. त्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी मोहिते यांच्या बाबत वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण करुन ठेवले आहे.
शिवचरित्र साहित्य खंड ३ रा पेज क्र.६९८
‘ सुपे परगणा शुहूर सन १०४९ (२४ मे १६४८ ते २३ मे १६४९) मध्ये सुपे पराणा शुहूर सन १०५० (२४ मे १६४९ ते २३ मे १६५०) मध्ये तो परगणा शहाजीला मुकासा म्हणून मिळाला. त्यावर्षी काही काळ तो शहाजीकडून पोटमुकासा म्हणून शिवाजीकडे होता. पण त्यानंतर लवकरच शहाजीने तो परगणा शिवाजीकडून काढून घेतला असे दिसते. शहाजीच्या वतीने त्या पराण्याचा सरहवालदार म्हणून संभाजी मोहिते २६ ऑक्टोबर १६५२ च्या पूर्वीपासून काम पहात होता. शिवाजीने २४ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहित्यास कैद करुन त्या परगण्याचा ताबा घेतला. त्यानंतर त्या परगण्यावर शिवाजीची सत्ता चालत होती.’
सुपे पराणा व सुप्याची गढी स्वराज्याच्या पूर्वेस होती. हा परगणाही शहाजीराजांच्या जहागिरीतीलच होता. पण या वेळी याचा कारभार शहाजी राजांनी संभाजी मोहित्याकडे सोपविला होता. संभाजी मोहिते शहाजीराजांच्या दुसऱ्या राणीसाहेबांचे (तुकाबाईचे) बंधू म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा मोहिते मामाकडे सुपे परगण्याची सरहवालदारी दिली होती.
ही सत्यता असून संभाजी मोहिते यांच्यावर आरोप जे केले जातात. ‘मोहिते मामा जुलमी. लाचखावू अमलदार होते. तसेच ते शिवरायांच्या नियंत्रणाबाहेर होते. पण याबाबतचा एकही पुरावा नाही. इतिहासकारांनी भोसले व मोहिते घराण्यासंबंधात कपोलकल्पीत स्वरुपाचे लिखाण करुन ठेवले आहे. वास्तविक शहाजी राजे आणि संभाजी व धारोजी मोहिते हे निजामशाहीत असताना ते एकमेकांना चांगले ओळखत होते. आदिलशाहीमध्ये असताना शहाजीराजे यांना निजामशाहीकडून संपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. अशा प्रसंगी मोहिते बंधुनी शहाजी राजांना मदत केलेली होती. त्यावेळी आदिलशाहीमध्ये मोहितेंचे चांगलेच वजन होते. त्यांना शहाजीराजांची साथ मिळाली आणि दोघेही एकमेकांना मोठे करण्यासाठी प्रयत्न करीत होते.
शहाजीच्या सहकार्याने तळबीडच्या देशस्त्रीचे अधिकार मिळाले होते. तसेच सुप्याचे सरहवालदार म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. यावेळी नाते संबंध निर्माण झाल्याने सर्वकाही गोष्टी पूर्णतः प्राप्त झालेल्या होत्या. संभाजी मोहिते लाचखावू व जुलमी असते तर शहाजी राजांनी त्यांच्याशी कसलेही संबंध ठेवले नसते.
तसेच संभाजी मोहिते यांच्या बाबत कृष्णाजी अनंत सभासद ‘ म्हणतो,
‘संभाजी मोहिता म्हणोन सावत्र आईचा भाऊ, मामा होता. तो महाराजानी महालावरी ठेविला होता. त्याचे भेटीस शिमग्याचे सणास पोस्त मागावयास म्हणून गेले. मामास कैद करुन ठेविले. त्याचे तीनशे घोडे पागेचे होते व द्रव्यही बहून होते. वस्तभाव, कापड हस्तगत करुन सुपे देश साधिला’
यावरुन असे स्पष्ट होते की, छत्रपती शिवरायांनी संभाजी मोहिते यांच्यावर लष्करी कारवाई करुन त्यांचा पराभव केला. आणि सुपे हा प्रांत स्वराज्यामध्ये घेतला. संभाजी मोहीते यांना छत्रपती शिवरायांनी तात्काळ स्वराज्यात सामील होण्याचे पत्र लिहीले. परंतु मोहिते शहाजी राजाची परवानगी घेतल्याशिवाय सुप्याचा ताग सोडण्यास तयार होईनात आता काही तरी करुन मामांची भेट घेतली पाहिजे असे महाराजांनी ठरवले. शिमग्याच्या दिवसात पोस्त मागल्याच्या बहाव्याने महाराज काही मावळ्यांना बरोबर घेऊन सुप्यास गेले. सुप्याचा प्रांत व पागा हस्तगत केली. मामांना स्वराज्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. परंतु मामा काही कबूल होईनात तेंव्हा त्यांना शहाजीराजाकडे बंगळूर येथे मोठ्या आदराने पाठवण्यात आले.
जर शिवाजी महाराजांना सुपे घेण्यासाठी संभाजी मोहिते याच्यांशी संघर्ष करावा लागला असता तर ‘संभाजी मोहिते यांनी आपल्या लेकीचा म्हणजे सोयराबाईचा विवाह शिवरायांशी इ.स.१६५० मध्ये लावला नसता.एकंदरीत संभाजी मोहिते हे यांच्यावर केलेले आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. स्वतः प्रत्येक प्रसंगातून मित्रत्व नातेसंबंध योग्य पद्धतीने सांभाळलेले आहेत.
तसेच भोसले घराण्यावर त्यांचे प्रेम, माया, आपुलकी होती. त्यांचे संबध जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा, स्वामीनिष्ठपणा, कृर्तृव्यपणाची जाण होती या सर्व गुणांचा वारसा त्यांच्या सर्व कुटुंबावर होता. त्याचेच द्योतक म्हणजे सेनापती म्हणून हंसाजी यांनी केलेले कार्य होय म्हणून मराठ्याच्या दोन छत्रपतींना कधीही मागे वळून पहाण्याची त्याच्यावर वेळ आलेली नव्हती. अशा अत्यूच्च गुणांचा वारसा हंसाजीवर पडलेला असून त्यांचे संपूर्ण बालपण संभाजी मोहिते यांच्या देखरेखीत गेले. पण हंसाजीचा जन्म नेमका केंव्हा व कोठे झाला या बाबत अद्याप पुरावा नसल्यामुळे निश्चित सांगता येत नसले तरी त्यांचा जन्म बहुतेक सुप्याच्या गढीमध्ये झालेला असावा.

#जम्बुद्विपावरराज्यकरणारासम्राटअशोक




#जम्बुद्विपावरराज्यकरणारासम्राटअशोक

कलिंग देशावर मिळवलेल्या विजयानंतर त्या युद्धात झालेली प्रचंड हानी पाहुन उद्विग्न झालेल्या सम्राट अशोकाने बुद्धांचा संदेश जनमानसांपर्यँत पोहचवण्याचा शेवटपर्यँत प्रयत्न केला. अशोकाची पत्नी विदिशा हि बुद्ध धम्माचे पालन अगोदर पासुनच करत होती.
जगातील एकमेव सम्राट असा असेल की ज्याने तलवार म्यान केल्यावर सुद्धा त्याचे राज्य हे वाढतच गेले.
सम्राट अशोक हा असा एकमेव राजा होता की त्याने सर्वप्रथम मनुष्यां सोबतच प्राण्यांचे देखील दवाखाने उभे केले. सम्राटाने त्याच्या प्रजेसाठी काही नियम केले ते सर्व नियम आजही आपल्याला त्याच्या शिलालेखांतून वाचायला मिळतात. आपल्या शिलालेखांत वडीलधारे मंडळी,श्रमण,ब्राम्हण यांच्या सोबत आदराने वागायला सांगितले.कोणीही भ्रष्टाचार करू नये म्हणुन प्रत्येक विभागात एका अमात्याची नेमणुक केली.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली,पाणपोई निर्माण केल्या.
बुद्धांच्या दोनशे वर्षां नंतर सम्राट अशोकाचा काळ येतो तोवर या भुमीतून बुद्ध धम्म नष्ट होत चाललेला. बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी येथे एक शिलालेख लिहुन ठेवला कि याठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला असल्याने लुंबीनी ग्राम मधील सर्व नागरिकांना कर माफी केली.तसेच बुद्धांचे अस्थी धातु स्तुपांतून काढुन त्या सर्व अवशेषांवर ८४००० स्तुपांची निर्मिती केली.
आज या स्तुपांपैकी सांची येथील स्तुप आपल्याला ज्ञात आहेत.व्यवस्थित संशोधन केल्यास अनेक स्तुपांची माहिती आजही मिळु शकते.
अशोकाने २५६ दिवस धम्मयात्रा केली. श्रमण आजीवकांसाठी बिहार येथील बाराबर या ठिकाणी भारतातील पहिली लेणी कोरली.
बुद्ध धम्माने सर्व मानवांचे कल्याण व्हावे यासाठी स्वतःची मुलगी संघमित्रा व मुलगा महामहेंद्र यांना सिरीलंकेत बुद्ध गयेतील बोधी वृक्षाची फांदी घेऊन पाठवले आजही श्रीलंकेतील अनुराधापुर येथे तो बोधिवृक्ष आहे.

*अतुल भोसेकर सरांनी सम्राट अशोकाने धम्मलिपीत कोरलेल्या १४ शिलालेखांचे मराठीत वर्णन.
१. पूर्वी प्रियदराशी राजाच्या भटारखान्यात हजारों प्राणी मारले जात. आता धम्म समजल्यामुळे, येथून पुढे पशु हत्या निषेध आहे.
२. संपूर्ण राज्यभर तसेच इतर राज्यांच्या सीमेवर देखील मनुष्य आणि जनावरांसाठी हॉस्पिटल आणि फार्मसी ची सोय. तसेच या फार्मसी जवळ औषधी वनस्पतींची लागवड. मनुष्य आणि पशूंसाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे व पाणपोई.
३. दर पाच वर्षांनी, राज्यातील सर्व कमिश्नर आणि कलेक्टर यांनी आपल्या हद्दीतील सर्व गावांना भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. तसेच सर्व लोकांनी आपल्या आई वडील, मित्र परिवार, ब्राह्मण, श्रमण यांचा आदर केला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने बोलायला हवे.
४. माझे सर्व पुत्र, पौत्र, प्रपौत्र मी दाखविलेल्या नीतीमार्गावर चालणार आहेत व हीच अपेक्षा मी माझ्या प्रजे कडून करत आहे.
५. माझे अनेक दूत राज्यभर विखुरले आहेत. सर्व लोके सर्व व्यवहारात नीतिमत्ता पाळतात का याकडे त्यांचे लक्ष असेल. तसेच कोणता अधिकारी लोकांना उगीचच छळतोय अथवा त्यांच्याशी अन्यायकारक वागतो का हे ते पाहतील.
६. मी शयनकक्षेत असो अथवा बागेत अथवा अंतःपुरात, माझ्या राज्याची मला प्रत्येक बातमी समजली पाहिजे म्हणजे लोककल्याणाच्या निर्णय मला ताबडतोब घेता येईल. दिवसातील माझा प्रत्येक प्रहर हा लोकांसाठीच असेल, माझं उर्वरित संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठीच असेल.
७. प्रत्येक मनुष्याला उत्कर्ष करायचा असतो, मात्र त्याच्यात तेवढी नैतिकता, सजगता आणि तळमळ असेल तरच तो तेथे पोहचू शकेल. माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला ही संधी असेल मग तो कुठलाही पंथ मानणारा असो.
८. पूर्वी प्रियदर्शी राजा शिकारी साठी लांब यात्रा करायचा मात्र येथून पुढे त्याच्या यात्रा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण्यासाठीच असेल.
९. लोकं उत्सवात किंवा लग्नात प्रचंड खर्च करतात मात्र या दिखाव्यामुळे कुठलेही नीतिमान कार्य होत नाही. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरातील नोकर चाकर, शेजारी, मित्रपरिवार व सगळ्यांशी प्रेमाने वागावे. त्यामुळे त्यांचे जीवन नीतिमान होईल व त्यांना पुण्य लाभेल.
१०. खरी प्रतिष्ठा ही सत्ता आणि पदावर अवलंबून नाही तर लोककल्याणासाठी तुमची किती तळमळ आहे यावर प्रतिष्ठा ठरते. लोककल्याणाच्या विचार करणे हा धम्म आहे. लोकांनी खऱ्या प्रतिष्ठेचा अवलंब करावा.
११. लोकधर्म पाळणे या सारखे धर्मदान नाही. आपला मित्र परिवार, नोकर, नातेवाईक, समाजातील प्रत्येक घटक यांच्या बद्दल आपल्याला मैत्री असायला हवे. त्यांच्या सुख दुःखात आपण त्यांना सदोदित मदत केली पाहिजे. हीच धम्माची शिकवण आहे. तेच सर्वश्रेष्ठ धर्मदान होय.
१२. प्रत्येक धर्मात चांगले विचार असतात. ते समजून न घेता दुसऱ्या धर्माला नावे ठेवणे चुकीचे आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या धर्माची कमकुवत शिकवण दाखवता. त्यापेक्षा चर्चा करा, दुसऱ्या धर्माची शिकवण समजून घ्या. यातच सर्वांचे कल्याण आहे.
१३. कलिंगातील युद्धात मारलेले लाखों सैनिक पाहून प्रियदर्शी राजाचे मन दुखी झाले आहे. येथून पुढे जग जिंकायचे ते केवळ धम्माच्या मार्गाने. हाच मार्ग योग्य आहे.
१४. हा धम्म प्रियदर्शी राजाने अनेक ठिकाणे कधी लघु, कधी मध्यम तर कधी दीर्घ स्वरूपात लिहिले आहेत. त्याचे कारण म्हणजे तेथे उपलब्ध असलेला दगड. तसेच काही ठिकाणी माझे लेख अर्धवट किंवा चुकीचे शब्द असतील तर ती सर्वस्वी चुकी तेथील लिपिकाराची आहे.

अशा या महान सम्राटाचे भारतावर अनंत उपकार असुनही आपण त्यांना विसरलो आहोत कारण येथील इतिहासकारांनी या सम्राटाचे केलेले चुकीचे वर्णन.
वरील शिलालेखातून आपल्याला हे समजते कि अशोकाला त्याच्या प्रजेविषयी तसेच त्याच्या राज्यातील प्रत्येक प्राणिमात्राविषयी प्रचंड आपुलकी होती. जर दूरदर्शनवर सम्राट अशोक,बुद्ध या संबधी मालिका निर्माण केल्या गेल्या असत्या तर आज देशाची परिस्थिती नक्कीच वेगळी असती.
काही वर्षां पुर्वी झी टी. व्ही. वर बुद्धांची एक अप्रतिम ५० एपिसोडची मालिका तयार केली होती.

आपल्या सर्वांना सम्राट अशोकाच्या २३२४ व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

सिद्धार्थ कसबे

रायगडावरील शरभ शिल्प






रायगडावरील शरभ शिल्प
किल्ले रायगडाने कित्येक राजवटी याची देही याची डोळा पाहिल्या न्हवे तर अनुभविल्या आहेत. या गडाची सर्वगुण संप्पन्नता ही केवळ इतिहास काळातच न्हवे तर सद्य शतकातील इतिहास अभ्यासकांस मेजवानी ठरते. गडावरील बांधकाम, गडावरील भुगोल, गडाचा इतिहास, ऐतिहासिक महत्त्व, जलसाठे, हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे ठीकाण म्हणून या गडाचा अभ्यास अजुनही अपुराच भासतो. गडावरील इतर कलाकुसर पहाता लक्षणीय आहे. तसेच गडावरील सर्वच शिल्पकले पैकी वेशेष लक्ष वेधक ठरते ते शरभ शिल्प.
रायगडावरील शरभ शिल्प आभ्यासण्याआधी शरभ शिल्पाबद्दल सर्वसाधारण माहिती जाणुया. गड, मंदिरे, विहिरी, वाडे इत्यादी जुन्या इमारतींच्या भिंतीवर आढळणारे व्याघ्रसदृश काल्पनिक प्राण्याचे शिल्प म्हणजे शरभ .या शरभ प्राण्याबद्दल हिंदुधर्म ग्रंथात काही कथा वाचनास मिळतात. भगवान शिवशंकराने धारण केलेले काल्पनिक पशुचे रुप म्हणजे शरभ. हिरण्यकश्यपु चे विदारण केल्यावर नरसिंह उतला मातला. त्यापासुन मुक्ती मिळवण्यासाठी लोकांनी भगवान शंकराची उपासना केली. आखेर नरसिंहाचा धारण अवतार संपविण्यासाठी शंकराने प्राणी, पक्षी व मानव यांचे एकत्रित आसे अधिक शक्तिशाली रुप धारण केले तेच हे शरभ रुप. डॉ. ग. ह. खरे आपल्या मुर्तिविज्ञान या ग्रंथात देखील ही माहिती देतात. ते सांगतात शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख, लांब शेपुट आसलेल्या शरभाचे रुप धारण केले व नरसिंह अवतार संपविला. नंतर त्याचे कातडे आंगावर पांघरुन , डोके मस्तकावर धारण केले. हत्ती हे अतिशय बुद्धिमान व सामर्थ्यशाली प्राणी म्हणून ओळखले जातात. याच हत्ती प्रमाणे सामर्थ्यवान व हुशार शत्रूला पराजीत करण्याची ताकद बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ (अती शक्तिशाली) दर्शवत, स्वताचे व राज्याचा शक्तिचे प्रदर्शन करण्याचे शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावे. म्हणुनच शरभ शिल्प गड, किल्ले, मंदिरे तसेच इतर पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागावर लावले जात असावे.अशा प्रकारच्या प्राण्याची शिल्पे महाराष्ट्रात आढळत नसली तरीही महाराष्ट्रात कित्येक ऐतिहासिक ठीकाणी चार पाय, तीक्ष्ण नख्या आसणारा, लांब शेपटीचा, पंख आसलेला कींवा नसलेला अक्राळ विक्राळ प्राणी शिल्प कृतीत आढळतो म्हणजे तो शरभ असावा. सत्य परिस्थिती पहाता हत्ती किंवा सिंह यांपेक्षा शक्तिशाली, पंख आसणारा आसा कोणताही प्राणी अस्तित्वात आसल्याचे उल्लेख नाहीत. हा केवळ काल्पनिक प्राणी आहे. मात्र महाकवी कालीदासाच्या ‘मेघदुत’ या महाकाव्यात शरभाचा उल्लेख आहे. हिंदु धर्म शास्रातील १०८ उपनिषदांपैकी ‘शरभोपनिषद’ हे देखील एक उपनिषद आहे. म्हणजेच हिंदुधर्म शास्त्रात शरभ संकल्पना अस्तित्वात आहे. मात्र त्याच बरोबर कित्येक परकिय तसेच परधर्मीय ऐतिहासिक स्थळांवर शरभाकृती पहायला मिळतात.आपल्या सभोवतालच्या किल्ले रायगड बरोबर मुरुड मधिल जंजिरा किल्याच्या प्रवेश द्वारावर, हरिश्चंद्र गडाच्या वाटेवर तोलार खिंडत, राजगड, अवचितगड, पनवेल जवळील कर्नाळा कील्ला, सुधागड, तळगड, शिवजन्म भुमी शिवनेरी अशा कित्येक ठीकाणी हे शिल्प पहावयास मिळते.
इतिहास अभ्यासक श्री. महेश तेंडुलकर सर आपल्या गड मंदिरावरील द्वारशिल्पं या पुस्तकात, त्यांच्या अभ्यासण्यातले शरभाचे तब्बल २९ प्रकार सांगतात. हे प्रकार शिल्पाच्या विशेष ठेवणी वरुन केले आहे.जसे पंख आसणारा किंवा पंख नसणारा, जित कींवा जेता शरभ, गजभक्षक कींवा गजसह, खड्गधारी कींवा बाल शरभासहीत केवल शरभ आशाप्रकारे ते वर्गीकरण पहावयास मिळते.
किल्ले रायगड निहाळत असताना, गडाच्या भिंतीवर विराजमान झालेली शरभ शिल्प लक्ष वेधुन घेतात. रायगडावर एक दोन न्हवे तर तब्बल सात शरभ शिल्प पहावयास मिळतात. रायगडाच्या अतिभव्य महाद्वारात उभे राहिले असता आपल्या उजव्या व डाव्या दोन्हीही अंगाला दोन शरभ शिल्प सुस्थितीत पहावयास मिळतात.१) आपल्या उजव्या हाताला महादरवाजावर आसलेेल्या शरभ शिल्पामद्धे, शरभ आपल्या उजव्या पायाने हत्तीला दाबत आहे. हा गजजेता शरभ प्रकारातील शिल्प आहे.
या शिल्पातील शरभाचे निट अवलोकन केल्यास शरभास शिंगे आहेत आसे जाणवते. (शिंगे आसलेला शरभ माझ्या निदर्शनास पहिल्यांदा आला आहे) काहिंच्या मते ते शरभाचे कान आहेत मात्र त्या शरभार कान व शिंगे हे निरनिराळे अवयव स्पष्ट नजरेस पडतात.आपल्या डाव्या हाताला महादरवाजा वर आसलेल्या शरभ शिल्पात शरभ एका हत्ति सोबत उभा आहे. हत्ती नक्षिदार चौथऱ्यावर उभा आहे. हा गजसहित शरभ प्रकारातील शिल्प आहे. (रायगड चढुन वर गेल्यावर नगारखान्याच्या समोर उभे राहुन वर नजर टाकली तर लक्षात येते की, नगारखान्याच्या समोरील दर्शनी भागावर दोन शरभ शिल्प आहेत. दोन्हीही शरभांचे निट अवलोकन केले तर लक्षात येईल शरभांच्या अंगावर अलंकार व नक्षिकाम पहायला मिळते. ह्या शरभ शिल्पकाराने ह्या शरभाच्या माध्यमातून राज्याच्या सामर्थ्यासोबत राज्यातील ऐश्वर्य व संप्पन्नता दाखविण्याचा प्रयत्न केला असावा.
आपल्या उजव्या हाताला वर पाहिले आसता जो शरभ दिसतो. त्या अतिशक्तिशाली शरभाने आपल्या चारही पायात एक एक व शेपटीवर एक आसे एकुण पाच हत्ती रोखुन धरले आहेत. हा शरभ पंचगज विजयी शरभ प्रकारातील आहे.आपल्या डाव्या हाताला वर पाहिले आसता जो शरभ दिसतो या शरभाने आपल्या पुढच्या उजव्या पायात एक व शेपटी वर एक आसे एकुण दोन हत्ती पकडले आहेत. हा शरभ द्विगज विजयी शरभ प्रकारातील आहे..नगारखान्याखालुन राज सिंहासनाकडे चालत जाताना, नगारखान्याकडे वळुन पाहिले.(सिंहासन चौथर्याकडे पाठमोरे उभे राहुन) आणखी दोन भग्न अवस्थेत शरभ शिल्प नजरेस पडतात.
हे दोन्हीही शरभ शिल्प एकसारखेच दिसतात. या शरभांनी आपल्या पुढच्या उजव्या पायाखाली गंडभेरुंड दाबले आसुन गंडभैरुडाच्या पायांत दोन हत्ती आहेत. (गंडभेरुंड – एक धड, दोन डोकी, दोन पंख आसणारा प्रसंगी पक्षी कींवा अर्धमानव देहधारी पौराणिक पक्षी म्हणजे गंडभेरुंड होय.गंडभेरुंडाचे प्राचिनत्व ४००० वर्ष पुर्विपासुन आढळते. हिंदु धर्म ग्रंथातही याचे उल्लेख अढळुन येतात. एकंदरीत द्वीमुखी गरुड समजुया. ) हे गंडभेरुंड सहजासहजी नजरेत येत नाहीत. बारकाईने निरीक्षण करावे लागते. या शरभाने या व्यतिरिक्त एक हत्ती आपल्या शेपटीवर उचलुन धरला आहे. तीन हत्ती व एक गंडभैरुड यांना थोपवणारा म्हणजेच हा त्रिगज तथा गंडभेरुंड विजयी शरभ प्रकारातील आहे.कुणा एका उपद्रवीचे हात या शरभ शिल्पांना लागुन काळाचा घण या शिल्पांवर चालविला गेला. त्यामुळे या शिल्पांची आशी दुरावस्था झाली आसावी. या शिल्पांतील शरभांची डोकी फोडण्यात आली आहेत. नगारखान्याच्या आतील व बाहेरील शरभ व रायगडाच्या महाद्वारावरील शरभ पहाता, महाद्वारावरील शरभांची शारीरिक ठेवण, कलाकृती व नगारखान्यावरील शरभांची बनावट भिन्न आहे..त्यामुळे या दोन्हीही ठीकाणचे शरभ शिल्प निरनिराळ्या कालखंडात बनविले गेले असावेत.
७) रायगड भ्रमंती ही आजकाल इतिहास जिज्ञासे पोटी, शिवचरण स्पर्श पुण्यप्राप्ती करीता, छायाचित्रीकरण अशा निरनिराळ्या अनुशंघाने केली जाते. त्यापैकीच राजसिंहासनापासुन ते जगदिश्वर मंदिरा समोरील शिवसमाधी पर्यंत रायगड भ्रमंती म्हणजे संपुर्ण रायगड न्हवे. रायगडावरील कित्येक खळगे, ठिकाणे, ऐतिहासिक पुरावे त्यांमागे लपलेला इतिहास शोधण्यासाठी आपली वाट पहात आसावेत. हुजुर बाजाराकडुन जाऊन जगदिश्वर मंदिराला वळसा घालुन भवानी कड्याकडे जाताना.आपल्या डाव्या हाताला जगदिश्वर मंदिराची भिंत निट निहाळली तर आणखी एक शरभ शिल्प नजरेत भरते. रायगड भ्रमंती सिंहासना पासुन ते शिवसमाधी पर्यंत समजली जात असल्यामुळे या आडवाटेला कोणी शक्यतो जात नाही व गेल्यास शोधक नजरेने पहात नाहीत. त्यामुळेच हे शिल्प दुर्लक्षित राहिले असावे.
जगदिश्वर मंदिराच्या भिंतीवरील शरभ शिल्प पहाता हे शरभ शिल्प कुणा दुसऱ्या ठीकाणावरुन येथे आणुन लावले आसल्यासारखे वाटते. जगदिश्वर मंदिराबाहेरील धर्मशाळेच्या ओवऱ्यांच्या मागे हे शिल्प आहे.रायगड बांधणी, तेथील रचना, कलाकुसर सर्व पहाता रायगडाचे बांधकाम अती रेखीव व कुशलतेने केले आहे हे लक्षात येते. मात्र हे शरभ शिल्प समोर उभे राहुन पाहिले तर थोडेसे तिरके म्हणजे ९० अंशाचा कोन सोडुन लावले आहे. ( कदाचित मंदिराच्या कींवा ओवऱ्यांच्या डागडुजीच्या वेळी कींवा घाईगडबडीत) ज्या वास्तू कलाकाराने हा रायगड बनविला त्याला हे शिल्प लावताना काटकोन साधता आला नसेल का ?रायगड बांधणी, तेथील रचना, कलाकुसर सर्व पहाता रायगडाचे बांधकाम अती रेखीव व कुशलतेने केले आहे हे लक्षात येते. मात्र हे शरभ शिल्प समोर उभे राहुन पाहिले तर थोडेसे तिरके म्हणजे ९० अंशाचा कोन सोडुन लावले आहे. ( कदाचित मंदिराच्या कींवा ओवऱ्यांच्या डागडुजीच्या वेळी कींवा घाईगडबडीत) ज्या वास्तू कलाकाराने हा रायगड बनविला त्याला हे शिल्प लावताना काटकोन साधता आला नसेल का ?त्यामुळेच हे शिल्प नंतर कधीतरी लावले असावे आसे वाटते. शरभ शिल्प हे शक्यतो प्रमुख दर्शनी भागात लावले जाते. मग हे शिल्प येथे आडवाटेला कसे आले हे ऐक गुढ आहे. हे शरभ शिल्प पाहिता विशेष आशी कोणतेही गुण हा शरभात दाखविले नसुन हा शरभ केवळ उभा आहे. याला पंख नाहीत मात्र हा झेप घेण्याच्या तैयारीत भासतो. म्हणुनच पंखविहीन केवल शरभ या प्रकारातील हे शरभ शिल्प आहे.आशाप्रकारे महादरवाजा वरील दोन (गजजेता शरभ व गजसहित शरभ ), नगारखान्याच्या समोरील दोन ( पंचगज विजयी शरभ व द्विगज विजयी शरभ), नगारखान्यावर शिव सिंहासना समोरील सारखेच बनावटीचे दोन त्रिगज तथा गंडभैरुड विजयी शरभ अशाप्रकारे सहा व जगदिश्वर मंदिराच्या भिंती बाजुचे सातवे पंखविहीन केवल शरभ आसे एकूणच सात शरभ शिल्प रायगडावर पहायला मिळतात.

Thursday, 2 April 2020

दुर्ग भ्रमंती – अजेय ‘जंजिरा’













दुर्ग भ्रमंती – अजेय ‘जंजिरा’


आजवर आपण काही गिरी दुर्गांची भ्रमंती केलेली आहे. परंतु समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अथवा समुद्रात भक्कमपणे उभ्या असलेल्या दुर्ग रत्नावर भ्रमंती करण्याची मज्जा काही वेगळीच असते. अथांग अशा सिंधु सागरात (अरबी समुद्रात) महाराष्ट्राचे रक्षक म्हणून काही जलदुर्ग तटरक्षकासारखे उभे आहेत. त्यामधील सर्वाधिक महत्वाचा आणि अजेय असा दुर्गरत्न जलदुर्ग म्हणजे ‘जंजिरा’ आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेले जलदुर्ग, महाराष्ट्राच्या अर्थात भारत देशाच्या तट रक्षणाचे काम करत आलेले आहेत. त्यामुळे या अभेद्य तटरक्षक सिंधु रत्नांवर भ्रमंती करणे ही आपल्यासाठी एक पर्वणीच आहे. साक्षात इतिहासाच्या पाउलखुणा अधोरेखित करणाऱ्या या जलदुर्गावर भ्रमंती करत असताना इतिहासाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजापुरी खाडीच्या जवळच हा अजेय जलदुर्ग उभा आहे. त्यामुळे सिंधु सागराच्या दर्शनाबरोबरच या जलदुर्गाचे तट राजपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून दिसतात.
अलिबाग (रायगड) मार्गे : दुर्गरत्न ‘जंजिरा’ या जलदुर्गावर पोहचण्यासाठी पुणे आणि मुंबईहून अलिबागला आल्यानंतर रेवदंडामार्गे मुरुड गावास येण्यास बस आहेत. मुरुड गावातून राजापूरी गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर या जलदुर्गावर जाण्यासाठी होडी/ बोट आहे. राजापुरीच्या समुद्र किनार्‍यापासून बोटीने या दुर्गाकडे जात असताना, याची अभेद्यता आणि भक्कमता पाहून दुर्ग कसा असेल याबाबतचे कुतूहल वाढत जाते.
दिघी मार्गे : कोकणातून जंजिराकडे येत असताना महाडमार्गे दिघी गावातून समुद्र किनाऱ्याकडे जाता येते. दिघीहून जंजिराकडे जाण्यासाठी होडी/बोट उपलब्ध आहे.
📷
जंजिरा किल्याचा इतिहास : हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा जिंकता आला नाही, अशा या जंजिरा किल्ल्यास पूर्वी ‘किल्ले मेहरुब’ असे म्हणत असत. त्यावेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना आणि व्यापाऱ्यांना खुप त्रास देत होते. त्यामुळे इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशहा मरण पावल्यानंतर त्याच्या मुलाने कोळ्यांच्या मदतीने समुद्रातील खडकावर मजबूत लाकडी मेढेकोट उभारला. बुर्‍हाण निजामशहा गादीवर आला त्यावेळी कलबअल्ली आणि मिर्झाअल्ली हे निजामशाही सरदार उत्तर कोकणात आले. समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त केल्यानंतर पुढे इ.स. १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या पुढाकाराने लाकडी मेढेकोटाच्या जागी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या दगडी कोटास ‘किल्ले मेहरुब’ हे नाव देण्यात आले. इ.स. १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ‘किल्ले मेहरुब’चा गडकरी झाला. इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला त्यावेळी सिध्दी नवाब स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. यानंतर इ.स. १९४८ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर राज्य केले. १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.
इ.स १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळेगड, घोसाळगड परिसरातील प्रदेश जिंकून घेतला होता. जंजिरा किल्ल्याचा प्रदेश ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकण तसेच अप्रत्यक्षपणे समुद्रावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही, हे महाराजांनी हेरले होते. त्यामुळे १६५७ मध्ये जावळीचा परिसर जिंकल्यानंतर उत्तर कोकणात मराठेशाहीची पताका फडकावण्याच्या विचाराने महाराजांनी जंजिरा किल्ल्याकडे नजर वळवली. इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शामराजपंत आणि बाजी घोलप यांना जंजिराच्या दिशेने कूच करण्यास पाठवले. परंतु या मराठेशाहीच्या सरदारांना यश आले नाही. त्यानंतर पुन्हा इ.स. १६५९ मध्ये निळोजीपंत जंजिरावर चाल करून गेले होते, परंतु हा ही प्रयत्न फसला होता. त्यानंतर तिसऱ्या वेळेस मराठे सरदारांनी आक्रमण केले होते. इ.स. १६७८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिर्‍यावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी देखील यश मिळाले नाही. संभाजी महाराजांनी जंजिरा काबीज करण्याचा प्रयत्न देखील अयशस्वीच ठरला होता. शेवटी १९४८ साली जंजिरा संस्थानाचा शेवटचा सिध्दी मुहंमदखान याच्या कारकिर्दीत जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले.
📷
‘दुर्गरत्न जंजिरा’वर पहाण्यासारखी ठिकाणे :
राजापुरीच्या समुद्र किनाऱ्यावरूनच किल्ला नजरेत भरण्यास सुरुवात होते. किल्ल्यास सर्व बाजुंनी बुलंद असे २२ तटरक्षक बुरुज आहेत. या तटरक्षक बुरुजांवर अनेक तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिरा किल्ल्याची तटबंदी बुलंद आणि अभेद्य आहे. तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. होडी/ बोटीमध्ये बसून किल्ल्याच्या दिशेने जात असताना हे सर्व स्पष्ट होत जाते. राजापुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून निघालेली होडी जंजिरा किल्ल्याच्या पायर्‍यांपाशी थांबते. त्यावेळी उंचच उंच आणि भक्कम प्रवेशद्वार जणू आकाशापर्यंत उंच आहे असा भास होतो. किल्ल्यात प्रवेश करत असताना प्रवेशद्वारावर फारशी भाषेत लिहिलेले शिलालेख दिसतात. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याची भव्यता लक्षात येण्यास सुरुवात होते.
महादरवाजा : जंजिरा किल्ल्याच्या पायथ्याशी होडीने/ बोटीने गेल्यानंतर महादरवाज्यामधून किल्ल्यात प्रवेश करता येतो. महादरवाजा आणि त्याची भव्यता पाहून जंजिरा किल्ला अजेय का राहिला याचे कारण लक्षात येते. मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव असलेल्या कमानी आणि घुमट दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर विशेष लक्ष वेधून घेतात. मुळचे आफ्रिकन असलेले सिद्धी लोक सुन्नी मुस्लीम होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा ठेवा जंजिरा किल्ल्यावर दिसून येतो.
नगारखाना : जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. तसेच हा किल्ला स्थापत्य कलेचा अजोड नमुना आहे. त्यामुळे किल्ल्याच्या प्रवेश द्वाराशी असलेला नगारखाना ही त्याचेच स्वरूप आहे.
पीरपंचायतन मजार : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक दरवाजा आहे. या दरवाज्यासमोर एक वास्तू आहे, त्यास पीरपंचायतन मजार असे म्हणतात. पीरपंचायतन वास्तूमध्ये पाच पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणात इतरही काही वास्तू आहेत.
घोड्याच्या पागा : पीर पंचायतनाच्या समोर असलेल्या तटावरून पुढे गेल्यानंतर घोड्याच्या पागा आहे. यापुढे किल्ल्याच्या तटावर जाणार्‍या पायर्‍यांनी तटावर गेल्यानंतर तटावर ठेवलेल्या तोफा दिसतात. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलालबांगडी’ असे आहे. किल्ल्यावर असलेल्या बुरुजांवर एकूण १३० पेक्षा अधिक तोफा आहेत.
सुरुलखानाचा वाडा : किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत उभा आहे. यास सुरुलखानाची हवेली असे म्हणतात. या हवेलीत भरपूर हवा यावी याकरिता, अनेक खिडक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे आणि एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती देखील होती. बाजारपेठ होती. या मुख्य वाड्याच्या सभोवती इतर ठिकाणी ही वस्ती उभारण्यात आलेली होती.
📷
तलाव : जंजिरा किल्ला सर्व बाजुंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. परंतु किल्ल्याच्या परिसरात असलेल्या दोन्ही तलावांमध्ये गोड पाणी आहे. सुरुलखानाच्या वाड्याच्या बाजूस बांधकाम केलेला गोड्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूस चार हौद आहेत.
बालेकिल्ला : तलावाच्या बाजूने बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या असलेली वाट आहे. या वाटेने चालत गेल्यानंतर बालेकिल्ला आणि त्याचे भग्न अवशेष दिसतात. या ठिकाणाहून दूरवर पसरलेला समुद्र आणि लाटा नजरेस पडतात.
राज सदर : बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस राजसदर आहे. बालेकिल्ल्याच्या आवारातून राजसदरेकडे जाता येते.
पश्चिम दरवाजा (दर्या दरवाजा) : किल्ल्याच्या पश्चिम तटाखाली मागील बाजूस, किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. याला ‘दर्या दरवाजा’ असे म्हणतात. युद्ध काळात बाहेर पडण्यासाठी या दरवाज्याचा वापर होत असे.
कैदखाना : दर्या दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या तटबंदीजवळ कैदखाना होता. याठिकाणी आता केवळ अवशेष शिल्लक आहेत. तसेच किल्ल्याच्या परिसरात, किल्ला बांधत असताना मृत झालेल्या कारागिरांना दफन करण्यात आलेले आहे. दफन केलेल्या ठिकाणी कारागीरांची समाधी उभारण्यात आलेली आहे.
📷
जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवरुन समुद्रातील दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. अरबी समुद्रात असलेला पद्मदुर्ग (कासा) आणि समुद्र किनार्‍यावर असलेला सामराजगड हे किल्ले देखील दिसतात. इतिहासातील नोंदीनुसार ३३० वर्षे अजेय राहिलेला जंजिरा किल्ला आज ही महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याचा रक्षक असल्यागत अभेद्य उभा आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जात असताना थोडासा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती भेट निश्चितच संस्मरणीय आणि आनंददायक ठरेल.
– नागेश कुलकर्णी
ताज्या बातम्या