दुर्ग भ्रमंती – अजेय ‘जंजिरा’
post by :- नागेश कुलकर्णी
आजवर आपण काही गिरी दुर्गांची भ्रमंती केलेली आहे. परंतु समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अथवा समुद्रात भक्कमपणे उभ्या असलेल्या दुर्ग रत्नावर भ्रमंती करण्याची मज्जा काही वेगळीच असते. अथांग अशा सिंधु सागरात (अरबी समुद्रात) महाराष्ट्राचे रक्षक म्हणून काही जलदुर्ग तटरक्षकासारखे उभे आहेत. त्यामधील सर्वाधिक महत्वाचा आणि अजेय असा दुर्गरत्न जलदुर्ग म्हणजे ‘जंजिरा’ आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेले जलदुर्ग, महाराष्ट्राच्या अर्थात भारत देशाच्या तट रक्षणाचे काम करत आलेले आहेत. त्यामुळे या अभेद्य तटरक्षक सिंधु रत्नांवर भ्रमंती करणे ही आपल्यासाठी एक पर्वणीच आहे. साक्षात इतिहासाच्या पाउलखुणा अधोरेखित करणाऱ्या या जलदुर्गावर भ्रमंती करत असताना इतिहासाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजापुरी खाडीच्या जवळच हा अजेय जलदुर्ग उभा आहे. त्यामुळे सिंधु सागराच्या दर्शनाबरोबरच या जलदुर्गाचे तट राजपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरून दिसतात.
अलिबाग (रायगड) मार्गे : दुर्गरत्न ‘जंजिरा’ या जलदुर्गावर पोहचण्यासाठी पुणे आणि मुंबईहून अलिबागला आल्यानंतर रेवदंडामार्गे मुरुड गावास येण्यास बस आहेत. मुरुड गावातून राजापूरी गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतर या जलदुर्गावर जाण्यासाठी होडी/ बोट आहे. राजापुरीच्या समुद्र किनार्यापासून बोटीने या दुर्गाकडे जात असताना, याची अभेद्यता आणि भक्कमता पाहून दुर्ग कसा असेल याबाबतचे कुतूहल वाढत जाते.
दिघी मार्गे : कोकणातून जंजिराकडे येत असताना महाडमार्गे दिघी गावातून समुद्र किनाऱ्याकडे जाता येते. दिघीहून जंजिराकडे जाण्यासाठी होडी/बोट उपलब्ध आहे.
📷
जंजिरा किल्याचा इतिहास : हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा जिंकता आला नाही, अशा या जंजिरा किल्ल्यास पूर्वी ‘किल्ले मेहरुब’ असे म्हणत असत. त्यावेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना आणि व्यापाऱ्यांना खुप त्रास देत होते. त्यामुळे इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशहा मरण पावल्यानंतर त्याच्या मुलाने कोळ्यांच्या मदतीने समुद्रातील खडकावर मजबूत लाकडी मेढेकोट उभारला. बुर्हाण निजामशहा गादीवर आला त्यावेळी कलबअल्ली आणि मिर्झाअल्ली हे निजामशाही सरदार उत्तर कोकणात आले. समुद्रातील चाच्यांचा बंदोबस्त केल्यानंतर पुढे इ.स. १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या पुढाकाराने लाकडी मेढेकोटाच्या जागी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या दगडी कोटास ‘किल्ले मेहरुब’ हे नाव देण्यात आले. इ.स. १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ‘किल्ले मेहरुब’चा गडकरी झाला. इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला त्यावेळी सिध्दी नवाब स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. यानंतर इ.स. १९४८ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर राज्य केले. १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.
इ.स १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तळेगड, घोसाळगड परिसरातील प्रदेश जिंकून घेतला होता. जंजिरा किल्ल्याचा प्रदेश ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकण तसेच अप्रत्यक्षपणे समुद्रावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही, हे महाराजांनी हेरले होते. त्यामुळे १६५७ मध्ये जावळीचा परिसर जिंकल्यानंतर उत्तर कोकणात मराठेशाहीची पताका फडकावण्याच्या विचाराने महाराजांनी जंजिरा किल्ल्याकडे नजर वळवली. इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शामराजपंत आणि बाजी घोलप यांना जंजिराच्या दिशेने कूच करण्यास पाठवले. परंतु या मराठेशाहीच्या सरदारांना यश आले नाही. त्यानंतर पुन्हा इ.स. १६५९ मध्ये निळोजीपंत जंजिरावर चाल करून गेले होते, परंतु हा ही प्रयत्न फसला होता. त्यानंतर तिसऱ्या वेळेस मराठे सरदारांनी आक्रमण केले होते. इ.स. १६७८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिर्यावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी देखील यश मिळाले नाही. संभाजी महाराजांनी जंजिरा काबीज करण्याचा प्रयत्न देखील अयशस्वीच ठरला होता. शेवटी १९४८ साली जंजिरा संस्थानाचा शेवटचा सिध्दी मुहंमदखान याच्या कारकिर्दीत जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले.
📷
‘दुर्गरत्न जंजिरा’वर पहाण्यासारखी ठिकाणे :
राजापुरीच्या समुद्र किनाऱ्यावरूनच किल्ला नजरेत भरण्यास सुरुवात होते. किल्ल्यास सर्व बाजुंनी बुलंद असे २२ तटरक्षक बुरुज आहेत. या तटरक्षक बुरुजांवर अनेक तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिरा किल्ल्याची तटबंदी बुलंद आणि अभेद्य आहे. तटबंदीवर जाण्यासाठी पायर्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. होडी/ बोटीमध्ये बसून किल्ल्याच्या दिशेने जात असताना हे सर्व स्पष्ट होत जाते. राजापुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून निघालेली होडी जंजिरा किल्ल्याच्या पायर्यांपाशी थांबते. त्यावेळी उंचच उंच आणि भक्कम प्रवेशद्वार जणू आकाशापर्यंत उंच आहे असा भास होतो. किल्ल्यात प्रवेश करत असताना प्रवेशद्वारावर फारशी भाषेत लिहिलेले शिलालेख दिसतात. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर किल्ल्याची भव्यता लक्षात येण्यास सुरुवात होते.
महादरवाजा : जंजिरा किल्ल्याच्या पायथ्याशी होडीने/ बोटीने गेल्यानंतर महादरवाज्यामधून किल्ल्यात प्रवेश करता येतो. महादरवाजा आणि त्याची भव्यता पाहून जंजिरा किल्ला अजेय का राहिला याचे कारण लक्षात येते. मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव असलेल्या कमानी आणि घुमट दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर विशेष लक्ष वेधून घेतात. मुळचे आफ्रिकन असलेले सिद्धी लोक सुन्नी मुस्लीम होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा ठेवा जंजिरा किल्ल्यावर दिसून येतो.
नगारखाना : जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. तसेच हा किल्ला स्थापत्य कलेचा अजोड नमुना आहे. त्यामुळे किल्ल्याच्या प्रवेश द्वाराशी असलेला नगारखाना ही त्याचेच स्वरूप आहे.
पीरपंचायतन मजार : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक दरवाजा आहे. या दरवाज्यासमोर एक वास्तू आहे, त्यास पीरपंचायतन मजार असे म्हणतात. पीरपंचायतन वास्तूमध्ये पाच पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणात इतरही काही वास्तू आहेत.
घोड्याच्या पागा : पीर पंचायतनाच्या समोर असलेल्या तटावरून पुढे गेल्यानंतर घोड्याच्या पागा आहे. यापुढे किल्ल्याच्या तटावर जाणार्या पायर्यांनी तटावर गेल्यानंतर तटावर ठेवलेल्या तोफा दिसतात. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलालबांगडी’ असे आहे. किल्ल्यावर असलेल्या बुरुजांवर एकूण १३० पेक्षा अधिक तोफा आहेत.
सुरुलखानाचा वाडा : किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत उभा आहे. यास सुरुलखानाची हवेली असे म्हणतात. या हवेलीत भरपूर हवा यावी याकरिता, अनेक खिडक्या तयार करण्यात आलेल्या आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे आणि एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती देखील होती. बाजारपेठ होती. या मुख्य वाड्याच्या सभोवती इतर ठिकाणी ही वस्ती उभारण्यात आलेली होती.
📷
तलाव : जंजिरा किल्ला सर्व बाजुंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. परंतु किल्ल्याच्या परिसरात असलेल्या दोन्ही तलावांमध्ये गोड पाणी आहे. सुरुलखानाच्या वाड्याच्या बाजूस बांधकाम केलेला गोड्या पाण्याचा तलाव आहे. या तलावाच्या चारही बाजूस चार हौद आहेत.
बालेकिल्ला : तलावाच्या बाजूने बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या असलेली वाट आहे. या वाटेने चालत गेल्यानंतर बालेकिल्ला आणि त्याचे भग्न अवशेष दिसतात. या ठिकाणाहून दूरवर पसरलेला समुद्र आणि लाटा नजरेस पडतात.
राज सदर : बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस राजसदर आहे. बालेकिल्ल्याच्या आवारातून राजसदरेकडे जाता येते.
पश्चिम दरवाजा (दर्या दरवाजा) : किल्ल्याच्या पश्चिम तटाखाली मागील बाजूस, किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. याला ‘दर्या दरवाजा’ असे म्हणतात. युद्ध काळात बाहेर पडण्यासाठी या दरवाज्याचा वापर होत असे.
कैदखाना : दर्या दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या तटबंदीजवळ कैदखाना होता. याठिकाणी आता केवळ अवशेष शिल्लक आहेत. तसेच किल्ल्याच्या परिसरात, किल्ला बांधत असताना मृत झालेल्या कारागिरांना दफन करण्यात आलेले आहे. दफन केलेल्या ठिकाणी कारागीरांची समाधी उभारण्यात आलेली आहे.
📷
जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवरुन समुद्रातील दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. अरबी समुद्रात असलेला पद्मदुर्ग (कासा) आणि समुद्र किनार्यावर असलेला सामराजगड हे किल्ले देखील दिसतात. इतिहासातील नोंदीनुसार ३३० वर्षे अजेय राहिलेला जंजिरा किल्ला आज ही महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याचा रक्षक असल्यागत अभेद्य उभा आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जात असताना थोडासा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्याला भेट दिल्यास ती भेट निश्चितच संस्मरणीय आणि आनंददायक ठरेल.
– नागेश कुलकर्णी
ताज्या बातम्या
No comments:
Post a Comment