Followers

Friday, 10 April 2020

#जम्बुद्विपावरराज्यकरणारासम्राटअशोक




#जम्बुद्विपावरराज्यकरणारासम्राटअशोक

कलिंग देशावर मिळवलेल्या विजयानंतर त्या युद्धात झालेली प्रचंड हानी पाहुन उद्विग्न झालेल्या सम्राट अशोकाने बुद्धांचा संदेश जनमानसांपर्यँत पोहचवण्याचा शेवटपर्यँत प्रयत्न केला. अशोकाची पत्नी विदिशा हि बुद्ध धम्माचे पालन अगोदर पासुनच करत होती.
जगातील एकमेव सम्राट असा असेल की ज्याने तलवार म्यान केल्यावर सुद्धा त्याचे राज्य हे वाढतच गेले.
सम्राट अशोक हा असा एकमेव राजा होता की त्याने सर्वप्रथम मनुष्यां सोबतच प्राण्यांचे देखील दवाखाने उभे केले. सम्राटाने त्याच्या प्रजेसाठी काही नियम केले ते सर्व नियम आजही आपल्याला त्याच्या शिलालेखांतून वाचायला मिळतात. आपल्या शिलालेखांत वडीलधारे मंडळी,श्रमण,ब्राम्हण यांच्या सोबत आदराने वागायला सांगितले.कोणीही भ्रष्टाचार करू नये म्हणुन प्रत्येक विभागात एका अमात्याची नेमणुक केली.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली,पाणपोई निर्माण केल्या.
बुद्धांच्या दोनशे वर्षां नंतर सम्राट अशोकाचा काळ येतो तोवर या भुमीतून बुद्ध धम्म नष्ट होत चाललेला. बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी येथे एक शिलालेख लिहुन ठेवला कि याठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला असल्याने लुंबीनी ग्राम मधील सर्व नागरिकांना कर माफी केली.तसेच बुद्धांचे अस्थी धातु स्तुपांतून काढुन त्या सर्व अवशेषांवर ८४००० स्तुपांची निर्मिती केली.
आज या स्तुपांपैकी सांची येथील स्तुप आपल्याला ज्ञात आहेत.व्यवस्थित संशोधन केल्यास अनेक स्तुपांची माहिती आजही मिळु शकते.
अशोकाने २५६ दिवस धम्मयात्रा केली. श्रमण आजीवकांसाठी बिहार येथील बाराबर या ठिकाणी भारतातील पहिली लेणी कोरली.
बुद्ध धम्माने सर्व मानवांचे कल्याण व्हावे यासाठी स्वतःची मुलगी संघमित्रा व मुलगा महामहेंद्र यांना सिरीलंकेत बुद्ध गयेतील बोधी वृक्षाची फांदी घेऊन पाठवले आजही श्रीलंकेतील अनुराधापुर येथे तो बोधिवृक्ष आहे.

*अतुल भोसेकर सरांनी सम्राट अशोकाने धम्मलिपीत कोरलेल्या १४ शिलालेखांचे मराठीत वर्णन.
१. पूर्वी प्रियदराशी राजाच्या भटारखान्यात हजारों प्राणी मारले जात. आता धम्म समजल्यामुळे, येथून पुढे पशु हत्या निषेध आहे.
२. संपूर्ण राज्यभर तसेच इतर राज्यांच्या सीमेवर देखील मनुष्य आणि जनावरांसाठी हॉस्पिटल आणि फार्मसी ची सोय. तसेच या फार्मसी जवळ औषधी वनस्पतींची लागवड. मनुष्य आणि पशूंसाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे व पाणपोई.
३. दर पाच वर्षांनी, राज्यातील सर्व कमिश्नर आणि कलेक्टर यांनी आपल्या हद्दीतील सर्व गावांना भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. तसेच सर्व लोकांनी आपल्या आई वडील, मित्र परिवार, ब्राह्मण, श्रमण यांचा आदर केला पाहिजे. सर्वांशी प्रेमाने बोलायला हवे.
४. माझे सर्व पुत्र, पौत्र, प्रपौत्र मी दाखविलेल्या नीतीमार्गावर चालणार आहेत व हीच अपेक्षा मी माझ्या प्रजे कडून करत आहे.
५. माझे अनेक दूत राज्यभर विखुरले आहेत. सर्व लोके सर्व व्यवहारात नीतिमत्ता पाळतात का याकडे त्यांचे लक्ष असेल. तसेच कोणता अधिकारी लोकांना उगीचच छळतोय अथवा त्यांच्याशी अन्यायकारक वागतो का हे ते पाहतील.
६. मी शयनकक्षेत असो अथवा बागेत अथवा अंतःपुरात, माझ्या राज्याची मला प्रत्येक बातमी समजली पाहिजे म्हणजे लोककल्याणाच्या निर्णय मला ताबडतोब घेता येईल. दिवसातील माझा प्रत्येक प्रहर हा लोकांसाठीच असेल, माझं उर्वरित संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठीच असेल.
७. प्रत्येक मनुष्याला उत्कर्ष करायचा असतो, मात्र त्याच्यात तेवढी नैतिकता, सजगता आणि तळमळ असेल तरच तो तेथे पोहचू शकेल. माझ्या राज्यात प्रत्येक माणसाला ही संधी असेल मग तो कुठलाही पंथ मानणारा असो.
८. पूर्वी प्रियदर्शी राजा शिकारी साठी लांब यात्रा करायचा मात्र येथून पुढे त्याच्या यात्रा लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण्यासाठीच असेल.
९. लोकं उत्सवात किंवा लग्नात प्रचंड खर्च करतात मात्र या दिखाव्यामुळे कुठलेही नीतिमान कार्य होत नाही. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरातील नोकर चाकर, शेजारी, मित्रपरिवार व सगळ्यांशी प्रेमाने वागावे. त्यामुळे त्यांचे जीवन नीतिमान होईल व त्यांना पुण्य लाभेल.
१०. खरी प्रतिष्ठा ही सत्ता आणि पदावर अवलंबून नाही तर लोककल्याणासाठी तुमची किती तळमळ आहे यावर प्रतिष्ठा ठरते. लोककल्याणाच्या विचार करणे हा धम्म आहे. लोकांनी खऱ्या प्रतिष्ठेचा अवलंब करावा.
११. लोकधर्म पाळणे या सारखे धर्मदान नाही. आपला मित्र परिवार, नोकर, नातेवाईक, समाजातील प्रत्येक घटक यांच्या बद्दल आपल्याला मैत्री असायला हवे. त्यांच्या सुख दुःखात आपण त्यांना सदोदित मदत केली पाहिजे. हीच धम्माची शिकवण आहे. तेच सर्वश्रेष्ठ धर्मदान होय.
१२. प्रत्येक धर्मात चांगले विचार असतात. ते समजून न घेता दुसऱ्या धर्माला नावे ठेवणे चुकीचे आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या धर्माची कमकुवत शिकवण दाखवता. त्यापेक्षा चर्चा करा, दुसऱ्या धर्माची शिकवण समजून घ्या. यातच सर्वांचे कल्याण आहे.
१३. कलिंगातील युद्धात मारलेले लाखों सैनिक पाहून प्रियदर्शी राजाचे मन दुखी झाले आहे. येथून पुढे जग जिंकायचे ते केवळ धम्माच्या मार्गाने. हाच मार्ग योग्य आहे.
१४. हा धम्म प्रियदर्शी राजाने अनेक ठिकाणे कधी लघु, कधी मध्यम तर कधी दीर्घ स्वरूपात लिहिले आहेत. त्याचे कारण म्हणजे तेथे उपलब्ध असलेला दगड. तसेच काही ठिकाणी माझे लेख अर्धवट किंवा चुकीचे शब्द असतील तर ती सर्वस्वी चुकी तेथील लिपिकाराची आहे.

अशा या महान सम्राटाचे भारतावर अनंत उपकार असुनही आपण त्यांना विसरलो आहोत कारण येथील इतिहासकारांनी या सम्राटाचे केलेले चुकीचे वर्णन.
वरील शिलालेखातून आपल्याला हे समजते कि अशोकाला त्याच्या प्रजेविषयी तसेच त्याच्या राज्यातील प्रत्येक प्राणिमात्राविषयी प्रचंड आपुलकी होती. जर दूरदर्शनवर सम्राट अशोक,बुद्ध या संबधी मालिका निर्माण केल्या गेल्या असत्या तर आज देशाची परिस्थिती नक्कीच वेगळी असती.
काही वर्षां पुर्वी झी टी. व्ही. वर बुद्धांची एक अप्रतिम ५० एपिसोडची मालिका तयार केली होती.

आपल्या सर्वांना सम्राट अशोकाच्या २३२४ व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

सिद्धार्थ कसबे

No comments:

Post a Comment